बुधवार, ९ नोव्हेंबर, २०२२

टिकली, कुंकू आणि सुधा मूर्ती!सुधा मूर्ती या विख्यात उद्योगपती नारायण मूर्तींच्या पत्नी आहेत. नारायण मूर्तींची 'इन्फोसिस' ही कंपनी आयटी क्षेत्रातील एक दिग्गज रोजगार निर्मिक आहे. 'इन्फोसिस'च्या तगड्या सात आकडी पगाराचे अनेकांना आकर्षण असते.मध्यमवर्गास आर्थिक सुबत्ता, आयुष्यभर वंचित राहावं लागलेल्या ऐश आरामी जीवनशैलीचं अत्यंत तीव्र नि छुपं आकर्षण असतं. त्यामुळे नारायण मूर्ती आणि तत्सम लोक यांच्यासाठी अत्यंत प्रातःस्मरणीय आदर्श असतात. वास्तवात या दांपत्याने औद्योगिक जगतात जे करून दाखवले आहे त्याला तोड नाही. आयटी सेक्टरमध्ये इन्फोसिसचा दबदबा अजूनही कायम आहे. या बाबतीत मूर्ती दांपत्य निश्चितच कौतुकास पात्र आहेत, त्यांचे हे कार्य उत्तुंग पातळीवरचे आहे हे कुणीही मान्य करेल.        

सुधा मूर्तींच्या संवादात, भाषणात वा व्यक्त होण्यात एक उल्लेख नेहमी येतो. तो म्हणजे आपल्या पतीच्या उद्योगासाठी आपले दागिने विकण्याच्या घटनेचा. जोडीनेच पतीच्या मेहनतीस सकारात्मक साद दिली वगैरे वगैरे.

सुधा मूर्ती अब्जाधीश पतीच्या पत्नी आहेत, सुविद्य नि धनवान अपत्याच्या माता आहेत. आता तर ब्रिटिश पीएमच्या सासूबाई आहेत.
असं असूनही त्यांचं राहणीमान सामान्य मध्यमवर्गीय लोकांना ज्याचं अप्रूप वाटतं त्या पद्धतीचे आहे, म्हणजेच अगदी साधं सुधं! भडकपणा नसणारं असं त्या राहतात.
आपल्याकडे या गोष्टींचं भांडवल केलं जातं अमका कलेक्टर पायरीवर बसला होता, फलाण्या मंत्र्यांकडून सायकलचा वापर होतो, ढिमका विना इस्त्रीचे कपडे घालतो, तमक्याने अमूक तमूक साधेपणा अंगीकारला होता. इत्यादी.

धर्माच्या आणि संस्कृतीच्या बऱ्याचशा कथित खुणा वा प्रतिकं सुधा मूर्ती यांच्या अंगी दिसतात. नाकात नथ, भाळी कुंकू, पायात जोडवी, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या इत्यादी ठसठशीतपणे दिसेल अशा पद्धतीने असतं.
वृंदा करात देखील रुपयाएव्हढं कुंकू लावतात! अर्थात हा ज्याच्या त्याच्या अभिरुचीचा, विचारपद्धतीचा आणि जीवन अनुसरण पद्धतीचा मुद्दा असल्याने त्याबद्दल कुणा एकाला त्या व्यक्ती विषयी आक्षेप असण्याचा मुद्दा नाही.
वैयक्तिक रित्या याविषयी आधुनिक विचारधारा वा मतभिन्नता असू शकते जी उचित आहे.

मध्यम व उच मध्यमवर्गीयास ज्यांचा प्रचंड हव्यास आहे अशा एका अब्जाधीश उद्योगपतीची पत्नी सामान्य सांसारिक स्त्रीला जी जीवनपद्धती आदर्श संस्कारिक वाटते तिचा अंगीकार करते याचे विलक्षण कौतुक त्या वर्गातील मंडळींना वाटतं.
समाजमाध्यमं आणि मीडिया याला खतपाणी घालत राहतो, कारण त्यात त्यांना क्लिकबाईटचे मूल्य दिसते.

सुधा मूर्तींनी लिहिलेल्या पुस्तकांवर नुसती नजर टाकली तरी लक्षात येईल की त्यांचा टोन कोणता आहे!
पत्नी आणि पती यांनी आपसी सामंजस्य कसे राखावे, नात्यांत विश्वास कसा राहावा, आयुष्यातील विविध टप्प्यावर संघर्षास कसे सामोरे जावे, जीवनातील आखीव रेखीव आदर्श संकल्पना असलेली कथामूल्ये, नकळत केल्यागत वाटावं अशा धाटणीचं उदात्तीकरण, सांसारिक जीवनतत्वे इत्यादींवर त्यांचा भर आहे.
अर्थातच अशा लेखनाचा चाहता वर्ग कोण आहे हे वेगळे सांगायला नको.

श्रमिक, कष्टकरी, शेतकरी, दारिद्रय रेषेखालचा वा अगदी कनिष्ठ वर्गीय व्यक्तीची स्वप्ने फार मोठी नसतात.
आयुष्यातील रोजच्या लढाईस ते वैतागलेले असतात.
त्यामुळे अगदी भुरळ पडावी अशा अब्जाधिशाचं आयुष्य जगण्यासाठीची तडफड त्यांच्या गावी नसते. सबब त्यांना इन्फोसिस, नारायण मूर्ती, सुधा मूर्ती, 'वाईज अँड अदरवाइज' - 'आयुष्याचे धडे गिरवताना' - 'तीन हजार टाके' - 'सर्पाचा सूड' - 'गरुडजन्माची कथा' इत्यादीमधलं काहीच ठाऊक नसतं.

सामाजिक विषमता, जातीय वर्चस्ववाद, तळातील लोकांचे शोषण, असमतोलाविरोधातला विद्रोह, व्यवस्थेनं सरकारचं मांडलिकत्व पत्करणं याविषयी त्यांची लेखणी मौन आहे.
तरीही त्यांच्या लेखनाचं, वागण्याचं अप्रूप असणारा शहरी, निमशहरी वर्ग एका विशिष्ठ विचारांच्या कुपीत बंदिस्त आहे.

सुधा मूर्ती त्यांना हवे असलेले धार्मिक अधिष्ठान खुलेपणाने करताना दिसून येतात.
त्या प्रार्थनास्थळांना भेटी देतात, माथा टेकवतात.
त्या आस्तिक आहेत आणि ईश्वरी पूजेवर त्यांचा विश्वास आहे हे त्यांनी कधी लपवलेले नाही, हा त्यांचा धार्मिक धारणेच्या स्वातंत्र्याचा भाग आहे त्या स्वातंत्र्याचा आदर असला पाहिजे.

परवा दिवशी संभाजी भिडे यांना त्या भेटल्या. 
भेट कशी झाली, का झाली, कोणत्या हेतूने झाली, भेटीचे फलित काय इत्यादी मुद्दे खऱ्या अर्थाने त्या दोघांनाच ठाऊक असणार आहेत. इतरांनी काढलेले अन्वयार्थ नेमकेच असतील असं म्हणता येणार नाही.
भिडे यांना भेटताना त्यांच्या त्या पाया पडल्या.
हा देखील त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा आणि अभिव्यक्तीचा भाग आहे, किंबहुना जडणघडणीचा देखील भाग आहे.

भिडे यांच्या पाया पडल्यानंतर त्या बोलताना दिसतात की 
भारतमाता 
आपण खूप वर्षांआधी भेटलो होतो का?
म्हणजेच त्यांची ओळख जुनी असावी का ?आणि नि त्यांनी ती ध्यानात ठेवली असावी का?
भेटीचा व्हिडीओ सुधामूर्ती यांच्या ट्विटर हॅन्डलवर त्यांनी पोस्ट केलाय म्हणजे ती भेट त्यांना तितकी महत्वाची वाटलीय की त्याचा त्यांना आनंद आहे आणि त्यांनी ती शेअर केलीय.
हे हॅन्डल त्यांचे नाही असे काही लोक म्हणत असले तरी त्यावरही त्यांनी कुठले भाष्य केलेले नाही.
काही दिवसानंतर हे ट्विट आमचे नाही असा त्रोटक खुलासा करताना आपण भिडे गुरुजी यांना पहिल्यांदा भेटलो असून त्यांच्याविषयी काही माहिती नाही असे सांगितले गेलेय. 
शिवाय ते वयस्कर असल्याने त्यांच्या पाया पडले असल्याचा खुलासाही केला गेलाय.      
असे असले तरी भिडेंनी त्यांच्याशी आनंदाने संवाद साधलाय.

आता गंमत पाहा. 
सुधा मूर्ती यांचे विचार काय आहेत, त्यांचं वैचारिक विश्व कोणत्या परिघातलं आहे याचे दाखले त्यांचं साहित्य देतं.
त्यांची धार्मिक विचारसरणी काय आहे याची साक्ष त्यांचं राहणीमान देतं,
समाजातील ज्या व्यक्तींना त्या भेटतात त्याविषयी काय वाटतं याचे पुरावे त्यांच्या सोशल मीडियावर उपलब्ध आहेत.

इथे तर सुधा मूर्तींनी कुठला मुखवटाही लावलेला नाही! त्यांना भिडे यांची कुठली कुठली अडचण नाहीये. पाया पडण्यातही त्यांना गैर वाटत नाहीये. सारं काही त्यांच्या इच्छेनुरुप तर झालंय असं सध्या तरी दिसतंय(!)
या सर्व घटनाक्रमामुळे डॉलरप्रेमी तरीही कथित संस्कृतीरक्षक असणाऱ्या वर्गातला छानसा उन्माद जाणवला!

असं असूनही सुधा मूर्तींनी भिडे यांच्या पाया पडल्यानंतर काहींनी उद्वेगाने, तर काहींनी चकित होत तर काहींनी संताप व्यक्त करत पोस्ट केल्या!
बहुधा काहींचा भ्रमनिरास झाला असावा! यांनी त्यांना जसं समजलं तशा त्या कधी नव्हत्याच! त्यांचा पैस जोखायला हे लोक चुकलेत!

सुधा मूर्ती त्यांच्या आकलनाप्रमाणे, जडणघडणीप्रमाणे, वकुबाप्रमाणे नि धार्मिक - सामाजिक जाणिवांप्रमाणेच तर वागल्यात! त्यांनी कुठे भूमिका बदललीय?

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा