# बॉयकॉट बॉलिवूड ही मोहीम सुशांतसिंग राजपूत या उमद्या अभिनेत्याच्या अकाली मृत्यूनंतर पद्धतशीरपणे राबवली गेली. लोकांच्या मनात आधी संशय निर्माण करायचा, कुजबुज मोहिमेतून कॉन्स्पिरेसी निर्माण करायची, बेफाम खोटेनाटे आरोप करायचे आणि चारित्र्यहनन करायचे अशी क्रोनॉलॉजी होती. अख्खं बॉलिवूड वेठीस धरून ही मोहीम राबवली गेली तेंव्हा इंडस्ट्री कोरोनामुळे पुरती गलितगात्र झाली होती. यानंतरचा टप्पा म्हणजे अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्जच्या खोट्या केसेसमध्ये गोवण्याचा प्रयत्न! बॉलिवूड कसे व्यसनी, चरसी आहे आणि इथे सारा काळा पैसा वाहतो अशी हॅशटॅग लाईन होती. साऱ्या इंडस्ट्रीला यात गोवले होते. जे आपल्या बाजूने येतात त्यांच्या सिनेमांना अभय द्यायचं आणि जे विरोधाचा सूर लावतात वा तटस्थ राहतात त्यांचे सिनेमे बॉयकॉट करायचे, सोशल मीडिआवर त्यांना ट्रोल करायचं हा एककलमी कार्यक्रम हे लोक राबवत होते. याचा परिणाम असा झाला की अनेक चांगले सिनेमे पडले, कोट्यवधींचे नुकसान झाले! हे नुकसान कधीतरी भरून येईल मात्र बॉलिवूडची प्रतिमा ज्या पद्धतीने डागाळली गेलीय ती सावरण्यास मोठा काळ लागू शकतो!
बॉयकॉट बॉलिवूड ही मोहीमच मुळात इथली इंडस्ट्री हलवून योगींच्या युपीमध्ये नेण्यासाठीच्या उद्देशाने आखली गेली होती, मात्र बॉलिवूडने त्याला भीक घातली नाही तेंव्हा साध्य बदलले गेले. त्या काळात सत्तेत असलेले उद्धव ठाकरेंचे लोकप्रिय सरकार कोसळवणे आणि त्यासाठी बेताल आरोप करायचे, खोट्या माहितीचा डोंगर उभा करायचा हे धंदे सुरु झाले. याचा फटका महाविकास आघाडीला बसला नसला तरी प्रतिमाभंजनास सहायक ठरला. केंद्रातील सरकारच्या विचारधारेचे प्रसारक बनून ज्यांनी आपल्या गळ्यात पट्टा बांधून घेतला ते यातून यशस्वी रित्या सुटले, काहींनी मौन बाळगले तर काहींनी विरोधाचा आवाज बुलंद केला. बॉयकॉट गॅंग अजूनही कार्यरत आहे आणि ती रोज नित्यनवे मनगढंत आरोप लावत असते. त्यांचे आरोप तद्दन तकलादू आणि खोटे असतात हे वेगळं सांगायला नको. या बॉयकॉट बॉलिवूड मोहिमेचे मुद्दे खोडून काढून इंडस्ट्रीचे अस्सल स्वरूप समोर मांडताना त्यात दडलेल्या भारतीय जनमानसाच्या आत्म्याचा शोध घेणं हे या '#लव्ह बॉलिवूड' सदराचे प्रयोजन होय! बॉलिवूडने आपल्याला काय दिलं आणि त्यांची नाळ आपल्याशी कशी जुळलेली आहे याचा धांडोळा वर्षभरात घेऊया.
बॉयकॉट गॅंगचा नेहमीचा आरोप असतो की हिंदी चित्रपटसृष्टी देशद्रोही आहे, इथे देशप्रेमाचे सिनेमे बनलेच नाहीत. देशभक्तीचे जे काही सिनेमे आले ते २०१४ नंतर भगत मंडळींच्या लाडक्या अक्षयकुमार, देवगण कंपनीचे आले असा बालिश दावा ते करतात. त्याचीच पोलखोल करण्याचा प्रयत्न आजच्या लेखात केलाय. मागील सात दशकांत अनेक अविस्मरणीय हिंदी चित्रपटांनी देशभक्ती, शौर्य आणि देशासाठी त्यागाची भावना लोकांमध्ये रुजवली आहे. या जॉनरमधील चित्रपटांचा आशय स्वातंत्र्य लढा, आक्रमण आणि युद्ध, खेळ, प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास, बंड असा व्यापक राहिलाय. मुळात हे सिनेमे बनवतानाच प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयी आपलं भारतीयत्व आणि देशाप्रतीची कर्तव्याची भावना असणं उद्दिष्ट होतं. सद्यकाळात जे धार्मिक विखार निर्माण करणारे कथित देशभक्तीचे सिनेमे बनवले जाताहेत त्यांच्या तुलनेत हे सिनेमे आशय, मांडणी आणि भाष्य या तिन्ही आघाड्यांवर उठावदार होते. बॉलिवूडमध्ये देशभक्तीपर चित्रपट अगदी गत शतकापासून निर्मिले गेलेत हे अंधभक्तांना कादाचित ठाऊक देखील नसेल; काही गायगुंडांना हे ज्ञात असले तरी ते त्याची ओळख दाखवणार नाहीत. कारण सत्य पचवायची ताकद अशा लोकांत नसतेच!
देशातील स्वातंत्र्य चळवळ जोमात असतानाच्या काळात भारतीय चित्रपटसृष्टीचा प्रारंभ झाला. इंग्रजांना भीती वाटत होती की एकोणिसाव्या शतकातील नाट्य चळवळी प्रमाणेच चित्रपटांतूनही देशभक्तीची भावना सांगितली जाईल की काय! त्या काळातील भारलेले वातावरण पाहता ती शंका रास्तच होती. याच आशंकेने 1876 मध्ये लॉर्ड नॉर्थब्रुक प्रशासनाने रंगमंचावरून देशद्रोहाची दृश्ये काढून टाकण्यासाठी ड्रामा परफॉर्मन्स कायदा लागू केला होता. तसेच ब्रिटिश राजवटीच्या अधिपत्याखाली काम करणारे सेन्सॉर कार्यालय आणि पोलिसांच्या माध्यमातून चित्रपटांवर बारीक नजर ठेवली जात असे. 1943 मध्ये रामचंद्र नारायण द्विवेदी उर्फ कवी प्रदीप यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. बॉम्बे टॉकीजचा बिग शॉट मुव्ही 'किस्मत'मध्ये भारत छोडो आंदोलनाच्या समर्थनार्थ अप्रत्यक्षपणे राजवटीच्या विरोधात त्यांनी लिहिलेल्या गाण्यासाठी हे वॉरंट जारी करण्यात आले होते.
'आज हिमालय की चोटी से फिर हम ने ललकरा है
दूर हटो ऐ दुनिया वालों हिन्दुस्तान हमारा है.." हे त्या गीताचे बोल होते.
या गीताच्या पुढच्या पंक्ती अगदीच दाहक होत्या - "शुरू हुआ है जंग तुम्हारा जाग उठो हिन्दुस्तानी, तुम न किसी के आगे झुकना जर्मन हो या जापानी, आज सभी के लिये हमारा यही क़ौमी नारा है.." वास्तवात 1939 ते 1945 च्या काळात दुसऱ्या महायुद्धात भारत मित्र राष्ट्रांच्या बाजूने होता. प्रत्यक्षात जर्मनी आणि जपानचा शत्रू होता. 1942 मध्ये सिंगापूर आणि ब्रह्मदेशाच्या राजवटी डळमळीत झाल्यानंतर भारतातील जपानी आक्रमणाची चिंता खरी वाटू लागली. पण इंग्रजांना चतुराईने ताडले की या गीतामधील 'जंग' म्हणजे भारतीयांचा स्वातंत्र्यलढा आहे आणि गाण्यातला विदेशी हा उल्लेख ब्रिटिशांसाठी आहे. पोलिस आपल्या मागावर आहेत हे कळताच कवी प्रदीप भूमिगत झाले होते. 15 ऑगस्ट 1947 रोजीच्या स्वातंत्र्याच्या घोषणेने असे अडथळे दूर झाले. ब्रिटिशांची राजवट हटली तरीही राष्ट्रवादाच्या विषयावर चित्रपटनिर्मिती जारी राहिली. 1948 साली रिलीज झालेला 'शहीद' हा चित्रपट वजाहत मिर्झा यांनी लिहिला होता. रमेश सहगल यांचे दिग्दर्शन होते. या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला होता. यातले 'वतन की राह में वतन के नौजवान शहीद हो' हे गाणे कमर जलालाबादी यांनी लिहिले होते. 1950 चा सर्वात यशस्वी चित्रपट म्हणजे 'समाधी'. 'समाधी'चे दिग्दर्शनही रमेश सहगल यांनीच केले होते. हा चित्रपट नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेशी संबंधित एका सत्य घटनेवर आधारित असल्याचे सांगितले जाते. त्याच वर्षी आझाद हिंद फौजेवरचा आणखी एक चित्रपट आला. हा चित्रपट 'फर्स्ट मॅन' होता, दिग्गज दिग्दर्शक विमल रॉय यांनी तो दिग्दर्शित केला होता.
1952 मध्ये बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या कादंबरीवर आधारित 'आनंद मठ' हा चित्रपट आला. हेमेन गुप्ता यांचे दिग्दर्शन होते. स्वातंत्र्यसैनिक असणाऱ्या हेमेन गुप्तांनी अनेक वर्षे तुरुंगात घालवली होती. ब्रिटिश जाताच ते फाशीच्या शिक्षेतून वाचले होते. पुढे ते चित्रपट निर्मितीकडे वळले. त्या सालच्या हिट सिनेमांत 'आनंद मठ'ला पहिल्या दहा चित्रपटांमध्ये स्थान मिळाले नव्हते. 'आन', 'बैजू बावरा', 'जाल' आणि 'दाग' हे त्या वर्षीचे यशस्वी चित्रपट होते ज्यात संगीत, रोमान्स, सस्पेन्स आणि सामाजिक नाट्य ठासून भरलेले होते. 1940 आणि 1950 च्या दशकात सामाजिक, रोमँटिक, संगीतमय, पौराणिक चित्रपट बनले असले तरी देशभक्तीपर आणि राष्ट्रवादावरचे चित्रपट देखील मोठ्या संख्येत निर्मिले गेले. हीच परंपरा स्वातंत्र्योत्तर काळात पुढे नेताना 1953 मध्ये सोहराब मोदींनी 'झांसी की रानी' हा चित्रपट बनवला पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वी झाला नाही. त्या वर्षी नंदलाल जसवंतलाल यांचा 'अनारकली' हा चित्रपट टॉपवर होता. त्याचप्रमाणे बंकिमचंद्र चटर्जी यांच्या ऐतिहासिक कादंबरीवर आधारित 1956 साली आलेला 'दुर्गेश नंदिनी' हा चित्रपटही अयशस्वी ठरला. याचा अर्थ स्वातंत्र्य मिळताच भारतीय प्रेक्षक राष्ट्रवादी भावनेपासून दूर गेले होते असे होत नाही. याचा अर्थ असा होता की फक्त राजकीय स्वातंत्र्य हेच भारतासमोरील एकमेव आव्हान नव्हते, आणखी अनेक संकटे, आव्हाने आपल्यापुढे तोंड वासून उभी होती! त्यांना बॉलिवूडने काळजात स्थान दिले तर त्यात नवल ते काय! तत्पूर्वी 1946 मध्ये चेतन आनंदच्या 'नीचा नगर' या चित्रपटात श्रीमंत लोक गावात राहणाऱ्या गरीबांचे कसे शोषण करतात हे दाखवण्यात आले होते. या चित्रपटाने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये धडक मारली होती.
ख्वाजा अहमद अब्बास यांनी यांनी दिग्दर्शित केलेला 'राही' हा चित्रपट 1953 साली प्रदर्शित झाला होता. आसाममधील चहाच्या बागांमध्ये इंग्रज मालकांकडून मजुरांचे होणारे शोषण या चित्रपटात दाखवण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर चित्रपटांना स्वतःचा आयाम मिळाला, चैतन्य लाभलं! 1940 आणि 1950 च्या दशकात लोकांची पसंती एकसारखी दिसून आली असली तरी भारतीय प्रजासत्ताकाच्या स्वतःच्या समस्या होत्या आणि लोकांचे लक्ष त्याकडे होते. पन्नासच्या दशकातील सर्वात यशस्वी चित्रपट म्हणून मेहबूब खानच्या 'मदर इंडिया'चे नाव घ्यावे लागेल. यात गावातील गरीब महिला राधा (नर्गिस अभिनीत) हिचा दोन मुलांना वाढवण्यासाठीचा आणि धूर्त सावकाराच्या विरोधातल्या संघर्षाचा विषय होता. 1955 चा सर्वात यशस्वी चित्रपट होता राज कपूरचा 'श्री 420'. गरीबांचे रक्त शोषणाऱ्या पॉन्झी योजनांची दुर्दशा या चित्रपटात दाखवण्यात आली होती. 1959 मध्ये हृषीकेश मुखर्जी यांच्या 'अनाडी' या चित्रपटाचा नायक होता राज कपूर. यात शहरांमध्ये घातक विषारी औषधांचे भयानक परिणाम दाखवण्यात आले. स्वतंत्र भारतातील समस्यांना चित्रपटांमध्ये स्थान मिळाले होते हे विशेष होय.
सिनेमाच्या वाटचालीने साठच्या दशकात स्पष्ट केले की भारताला केवळ अंतर्गत आव्हानांना सामोरे जावे लागत नसून बाह्य हल्ल्यांना देखील तोंड द्यावे लागणार आहे. त्याकरिता लष्करी दृष्टिकोनातूनही भारताला सज्ज राहावे लागेल हे सिनेमाने ताडले होते. 1960 मध्ये गोवा मुक्ती युद्ध, 1962 मध्ये चिनी आक्रमण आणि 1965 मध्ये पाकिस्तानी आक्रमणाचा सामना देशाला झाला. त्यानंतर 1971 मध्ये भारत-पाक युद्धही झाले. या युद्धांनी आपल्याला शौर्य, देशभक्ती आणि त्यागाची नव्याने जाणीव करून दिली. त्यानंतरच्या काळात पुष्कळ देशभक्तीपर चित्रपट आले. यामध्ये हकीकत (1964), हमसाया (1968), प्रेम पुजारी (1970), ललकार (1972), हिंदुस्थान की कसम (1973), विजेता (1982), अमिताभचा 'देशप्रेमी', अकारवा (1975) यांचा समावेश आहे. याच आक्रमणाची पुनरावृत्ती घडल्यानंतर पुढच्या टप्प्यात प्रहार (1991), बॉर्डर (1997) आणि LOC कारगिल (2003), टँगो चार्ली (2005), शौर्य (2008) हे चित्रपट बनले. या चित्रपटांमुळे सामान्य भारतीय जनतेच्या मनात लष्कराबद्दलचा आदर वाढला.
या दरम्यानच्या काळावर आपला प्रभाव टाकणाऱ्या मनोज कुमार यांचा उल्लेख टाळणं कृतघ्नपणा ठरेल. साठ सत्तरच्या दशकात अभिनेता हरिकिशन गिरी गोस्वामी उर्फ मनोज कुमार यांनी चित्रपटांमध्ये सकारात्मक आणि देशभक्तीपर विचारांची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. त्यामुळे प्रेमाने त्यांना ‘भारत कुमार’ हे टोपणनाव मिळाले. शहीद (1965) या चित्रपटात त्यांनी क्रांतिकारक भगतसिंग यांची भूमिका साकारली होती. 'उपकार' (1967) सारख्या चित्रपटांनी निवृत्त लष्करी जवान काळ्या बाजारात पडण्याचे धोके आणि बनावट औषधांच्या सापळ्याचे चित्रण केले. 'पूरब आणि पश्चिम' (1970) मध्ये त्यांनी भारतीय संस्कृतीची ज्योत पश्चिमेत तेवत ठेवली. विदेशात राहूनही आपले देशप्रेमाचे निखारे धगधगते ठेवता येतात हे त्यांनी दाखवून दिलं. 1970 पर्यंत भारत हा पाश्चिमात्य देशांच्या दृष्टिकोनात मागासलेला आणि प्रतिगामी देश मानला जात होता. मनोजकुमार यांनी भारतीय संस्कृतीची पूर्व आणि पश्चिमेतील श्रेष्ठता मांडली. जागतिकीकरण आणि उदारीकरणानंतर ही परिस्थिती बदलली, ज्यामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीने भारताला जागतिक स्तरावर वाढता दर्जा दिला. 1960 च्या दशकाच्या मध्यापासून, अमेरिका आणि ब्रिटन सारख्या पश्चिमेकडील औद्योगिक देशांमध्ये जाणाऱ्या भारतीय नागरिकांच्या संख्येत वाढ झालीय. यामुळे दूरस्थ राष्ट्रवादाच्या भावनेच्या उदयाचा मार्ग मोकळा झाला, ज्याद्वारे भारतीयांना त्यांच्या ओळखीचा अभिमान वाटू लागला. "आय लव्ह माय इंडिया" (परदेस 1997) सारख्या गाण्यांनी ही भावना कायम ठेवली.
लगान (2001), चक दे इंडिया (2007), भाग मिल्खा भाग (2013), दंगल (2016) यांसारख्या चित्रपटांनी देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी खेळाचा वापर केला. या अनुषंगाने 29 जून 1911 रोजी कोलकाता येथे झालेल्या IFA शील्ड सामन्यात ईस्ट यॉर्कशायर रेजिमेंटवर मोहन बागानच्या विजयावर आधारित अरुण रॉय यांच्या 'इगारो' किंवा 'द इमॉर्टल इलेव्हन' (2011) या बंगाली चित्रपटाचाही संदर्भ घेणं हितावह ठरतं. ब्रिटीश संघावर भारतीय फुटबॉल क्लबचा हा पहिला विजय होता. या घटनेच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आलेला हा चित्रपट म्हणजे त्यांच्याप्रतीची श्रद्धांजली होती. स्वातंत्र्योत्तर पाच दशकानंतरही चित्रपट निर्मात्यांचे देशभक्तीबद्दलचे आकर्षण कायम राहिले. 2002 मध्ये भगतसिंग यांच्यावर तीन हिंदी चित्रपट तयार झाले यावरून हे सिद्ध होते. हे चित्रपट होते – राजकुमार संतोषी यांचा 'द लीजेंड ऑफ भगत सिंग', गुड्डू धनोवा दिग्दर्शित: 'शहीद' आणि सुकुमार नायरचा 'शहीद-ए-आझम'. या दरम्यानच 2004 मध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचा नेताजी सुभाषचंद्र बोस: द फॉरगॉटन हिरो हा चित्रपट आला होता.
लोकांनी देशप्रेमासाठी कितीही गळे काढले तरी बॉक्स ऑफिसवरील अखंड निर्भेळ यशासाठी देशभक्ती हा एकमेव जादूई विषय ठरला नाही हे खूप बोलके ठरावे. आशुतोष गोवारीकरच्या 'खेले हम जी जान से' (2010) च्या अपयशाने हेच सिद्ध झाले. हा चित्रपट 1930-34 दरम्यानच्या चितगाव आरमोरी उठावावर आधारित होता. मागील चार वर्षातही देशभक्तीचे सिनेमे आलेत. पैकी काही सिनेमांनी छप्परफाड यश मिळवले. तर काही सिनेमांनी निर्मात्यांना डुबवलं. सिनेसृष्टीला रुपेरी पडद्यावर येण्याचे नवनवीन मार्ग राष्ट्रवाद शोधत राहतील यात शंका नसली तरी आगामी काळात निव्वळ राष्ट्रभक्तीचे सिनेमे सादर न होता त्याआडून आपले अजेंडे राबवणारे प्रचारकी सिनेमेही येत राहतील. मात्र कुणी अशी कोल्हेकुई करू नये की गतकाळात देशप्रेमाचे सिनेमे बनतच नव्हते! असं कुणी म्हणत असेल तर त्याच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी माझ्याकडून पुष्पगुच्छ आणि शुभेच्छा! पुढच्या वर्षी बॉलिवूडच्या देशप्रेमाची आठ दशके पुरी होताहेत, दोस्तांनो त्यासाठी लव्ह बॉलिवूड म्हटलंच पाहिजे!!
- समीर गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा