सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

मराठीचं जगणं म्हणजे काय ?


मॉलमध्ये गेल्यावर 'ये कितने का है ?' किंवा 'हाऊ मच इट कॉस्ट्स ?' असं विचारणाऱ्या तमाम मराठी माणसांना मराठी भाषा दिनाच्या बळेच शुभेच्छा ...आपली मुले इंग्रजी शाळांत घालून इतरांच्या मुलांना मराठीतून शिकण्याचा आग्रह धरणऱ्या गुणीजनांनाही कोरडया शुभेच्छा. खरेदीस गेल्यावर मराठी दुकानदारासमोर इंग्रजीत बोलून पुन्हा आपसात मराठीत बोलणाऱ्या मराठी दांपत्यास तर अनेकोत्तम शुभेच्छा. दूरध्वनीवरचे संभाषण अकारण हिंदी इंग्रजीतून झाडणाऱ्या, आपला रुबाब वाढवण्यासाठी मराठी भाषेऐवजी इतर भाषांचा अंगीकार करणाऱ्या लोकांना त्रिवार शुभेच्छा.. फेसबुकवर वाढदिवसाच्या दिवशी एचबीडी लिहिणाऱ्या किंवा टीसी, जीएन, जीएम, जीई, जीए, हाय, हॅलो, बडी, ब्रो, ड्यूड, सिस, हे मॅन, अंकल, आंट, पापा, ममी, मॉम्झ, डॅड असलं अरबट चरबट लिहिणाऱ्या लोकांनाही ओढून ताणून शुभेच्छा... तसेच शब्दांचे मूळ रूप विद्रूप करून तै, बै, वेग्रे, लोक्स, कळतै, पैले असं पिळून काढलेलं स्वरूप देणाऱ्या प्रतिभावंतांनाही शुभेच्छा.. सोशल मीडियावर लेखन करताना दर वाक्यात इंग्रजी शब्द घुसडून लेखनाचे पुण्यकर्म करणाऱ्या महालेखकांनाही सकळ शुभेच्छा.

शनिवार, २५ फेब्रुवारी, २०१७

सय ....गेल्या दोन तीन रात्रीस रोजच पाऊस पडतोय. याचं वर्णन नेमकं कसं करावं बरं ? शिक्षा म्हणून आईने घराबाहेर उभे केलेल्या पोराने दारापाशी थांबून एकसुरात रडत राहावं आणि एकाच वेळी त्याच्यावरच्या प्रेमाने, संतापाने व्याकुळ झालेल्या आईने अधून मधून हळूच खिडकीतून डोकावून त्याच्याकडे पाहत राहावं तसं ह्या पावसाचं झालंय. कधीकाळी काळजावर ओरखडे ओढून हरवून गेलेली एक रात्र डोळ्यापुढून अलगद तरंगत जावी तसं ह्या पावसाचं झालंय. प्रेमात पडल्यानंतर पहिल्यांदा भांडण झाल्यावर सख्याच्या विरहात होरपळून निघणाऱ्या प्रियेने रात्रभर एका कुशीवर झोपून हलकेच आसवं गाळीत पडून राहावं तसं ह्या पावसाचं झालंय. घरापासून दूर शेकडो किलोमीटर अंतरावर एकट्याने होस्टेलवर राहतानाच्या पहिल्या रात्री आईवडिलांच्या आठवणींनी या कुशीवरून त्या कुशीवर होताना सतत स्मृतींची सय मनात दाटून येत राहावी अन अश्रुंचे पाझर लागून राहावेत तसं ह्या पावसाचं झालंय.

बुधवार, २२ फेब्रुवारी, २०१७

सांगावा ...काळ्या मातीतली मऊ ढेकळे बोटांशी खेळवत रानातले तण खुरपणे म्हणजे एखाद्या चिमुरडीने तिच्या आईचे केस विंचरण्यासारखेच. आपल्या सोबतीच्या कारभारणीसोबत काम करणारया या काळ्या आईच्या लेकी वेगळ्याच धाटणीच्या असतात.एकोप्याने काम करतील. एकत्र जेऊन एकाच जागी विसावा घेऊन एकमेकीच्या सुखदुखात आत्मभान विसरून एकरूप झालेल्या असतात. आपआपल्या घरातल्या या लेकुरवाळ्या इथल्या काळ्या आईची सेवा करताना आपली पोटची लेकरे देखील कधी कधी झोळीत बांधून काम करतात तेंव्हा पांडुरंग देखील हातात खुरपे धरून ढेकळाच्या बंधनात अडकलेल्या गवताच्या पात्यांना हळुवार मोकळे करत असावा.

रविवार, १२ फेब्रुवारी, २०१७

पावसाचे हितगुज .......होय नाही म्हणत म्हणत अखेर ढगांमधले भांडण संपले. बरयाच काळापासून असलेला अबोला मिटला, अन त्यांचे काल मनोमिलन झाले. त्यांच्या मिलनासाठी आसुसलेल्या वीजांनी नेत्रदीपक रोषणाई केली. बघता बघता त्यांच्या मिलनाला धुमारे फुटले, पावसाचा जन्म झाला. पावसाचे थेंब अगदी नाचत नाचत ढगामधुन बाहेर पडले. नाचरया थेंबाना वारयाने आपल्या झोक्यावर मनमोकळे झुलवले. हवेतल्या धुलीकणांनी त्या थेंबाना मायेने ‘गंध-पावडर’ लावली. धरतीवर कासावीस झालेल्या सगळ्या भूमिपुत्रांनी आपल्या डोळ्यातल्या पाण्यात हे थेंब अलगद झेलले. त्यांच्या डोळ्यातले पाणी अधिकच खारे झाले. काल आमच्याकडे पाऊस येऊन गेला......

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१७

वेदाआधी तू होतास - बाबुराव बागूल


"वेदाआधी तू होतास, वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास,
पंच महाभूतांचे पाहून, विराट, विक्राळ रूप
तू व्यथित, व्याकूळ होत होतास,
आणि हात उभारून तू याचना करीत होतास,
त्या याचना म्हणजे ‘ऋचा’
सर्व ईश्वरांचे जन्मोत्सव, तूच साजरे केलेस,
सर्व प्रेषितांचे बारसेही, तूच आनंदाने साजरे केलेस
हे माणसा, तूच सूर्याला सूर्य म्हटलेस
आणि सूर्य, सूर्य झाला
तूच चंद्राला चंद्र म्हटलेस, आणि चंद्र, चंद्र झाला
अवघ्या विश्वाचे नामकरण
तू केलेस
अन् प्रत्येकाने मान्य केले, हे प्रतिभावान माणसा,
तूच आहेस सर्व काही, तुझ्यामुळेच संजीव सुंदर
झाली ही मही."

माणसाच्या अस्तित्वाचा शोध घेणारी, त्याच्या महानतेची गाथा सांगणारी ही कविता आहे बाबुराव बागूलांची. जातिव्यवस्थेला प्रखर नकार देऊन विद्रोहाचा नारा बुलंद करणारे आणि क्रांतिकारी लेखणीतून मानवी मनाचा वेध घेणारे मराठी साहित्यातील तपस्वी साहित्यिक म्हणजे बाबुराव बागूल.
बाबुराव रामजी बागूल हे कवी, कथा-कादंबरीकार, बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत, दलित साहित्याचे प्रवक्ते, परिवर्तनवादी चळवळीचे खंदे कार्यकर्ते आणि एक पारदर्शी व्यक्तिमत्व म्हणून जनमानसात परिचित आहेत. गेल्या अर्धशतकभराच्या काळात वाड:मयीन क्षेत्राबरोबरच पुरोगामी चळवळीत ते कृतिप्रवण होते. तथागत भगवान गौतम बुद्धाचे विचार साध्या सोप्या प्रवाही काव्यरचनेतून मांडणारा कवी असं त्यांचं वर्णन समीक्षक करतात ते या कवितेद्वारे समर्थ वाटते.

बुधवार, १ फेब्रुवारी, २०१७

अनुवादित कविता - न्युमेरी अल नैमत उर्फ अमजद नासीर : जॉर्डन , अरेबिक कविता

मी कुठेही गेलो तरी 
संध्येस त्याच खोलीत असतो 
जी माझ्या आईने अज्ञात पानाफुलांच्या सुगंधाने भरलेली असते.
हा सुगंध माझ्यासोबतच असतो जणू.
माझी आई देवाघरी गेली आणि तेंव्हापासून ही गंधभारीत खोली माझ्यासवे असते.
बालकवींच्या 'औदुंबरा'सारखा हा गंध माझा पिच्छा करतो.
खरे तर आपले आयुष्य आपण जितके उध्वस्त करू 
तितका विध्वंस आपला पाठलाग करत राहतो. 
हे तर माझ्या आजीच्या अंतहीन म्हणींसारखे घडतेय, 
जे पुन्हा पुन्हा प्रारंभाकडे खेचतेय. 
विमनस्कतेच्या या वर्तुळाला मी कसे छेदेन हे ठाऊक नाही.
शब्द, गंध आणि झेपेच्या बंधनातून मुक्त होत 
हवेहवेसे पदलालित्य मला लाभेल का 
याचेही उत्तर माझ्याकडे नाही. 
आईच्या गंधभारीत आठवणींचे कढ हेच आता जणू जीवन झालेय...