बुधवार, २२ फेब्रुवारी, २०१७

सांगावा ...



काळ्या मातीतली मऊ ढेकळे बोटांशी खेळवत रानातले तण खुरपणे म्हणजे एखाद्या चिमुरडीने तिच्या आईचे केस विंचरण्यासारखेच. आपल्या सोबतीच्या कारभारणीसोबत काम करणारया या काळ्या आईच्या लेकी वेगळ्याच धाटणीच्या असतात.एकोप्याने काम करतील. एकत्र जेऊन एकाच जागी विसावा घेऊन एकमेकीच्या सुखदुखात आत्मभान विसरून एकरूप झालेल्या असतात. आपआपल्या घरातल्या या लेकुरवाळ्या इथल्या काळ्या आईची सेवा करताना आपली पोटची लेकरे देखील कधी कधी झोळीत बांधून काम करतात तेंव्हा पांडुरंग देखील हातात खुरपे धरून ढेकळाच्या बंधनात अडकलेल्या गवताच्या पात्यांना हळुवार मोकळे करत असावा.

माथ्यावर आलेला दिवस कलतो आणि पश्चिमेला लाली चढते तेंव्हा काळ्याभोर रानावर अंथरलेली हिरवी चादर यांचे पाय घट्ट धरून आडवू पाहते पण तेंव्हाच यांच्या मनात घरातली चूल साद घालत असते.घराच्या ओढीने झपाझप पावले टाकत या सारया जणी आपल्या घरात पोहोचतात. रानात गड्याईतकेच काम करूनही या थकलेल्या नसतात. चूल पेटते. सरपण ढणाणते. चिखलाने सारवलेले भांडे चुलीवर चढते. घरातले गोकुळ घरात येते अन असेच कोठेतरी कामावर गेलेला घरधनी घरी येतो, तेंव्हा पदराने घामेजलेला गाल पुसत पितळेच्या लख्ख तांब्यात तिने आणून दिलेले थंडगार पाणी त्याला कोण तृप्तीचा अनुभव देत असेल हे उमजणारच नाही.

रात्री चांदण्यांच्या हाती ह्या सारया जणी आपापल्या माहेरी सांगावा धाडतात, "कोरभर भाकरीचा सोन्याचा घास जरी खात असले तरी तुमची लेक इथे खूप समाधानात आहे, जीवाला घोर करून घेऊ नका… तब्येतीला जपा. काळजी घ्या. आम्ही सुखात आहोत." अन तिकडे माहेरी टिमटिमणारया चांदण्यांतून पोरीबाळींनी धाडलेला सांगावा त्यांच्या मायबापाच्या डोळ्यात अलगद झिरपतो. मग ते आनंदाने डोळे मिटून झोपी जातात.

हे सारे सांगावे धाडायला त्यांना फोन, मोबाइल, ई मेल, व्हॉटसअप, एसएमएस असल्या कोणत्याही साधनांची गरज लागत नाही. ह्या सर्वांच्या हृदयाच्या ठाई असणारा पांडूरंग हिच यांची 'कनेक्टीव्हिटी' असते, चांदण्यांच्या आडून सांगावे धाडणारा हाच यांचा खरा निरोप्या असतो !!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा