Wednesday, February 1, 2017

कावळा ...माळावरच्या ओसाड दुनियेत भकासलेली उनाड पाखरं भिरभिरतात,
तेंव्हा पायाखालचं अस्ताव्यस्त अरबट चरबट तणसुद्धा मखमली वाटतं
गुरांच्या कळपापाशी उभारता डोक्यातलं जित्राबसुद्धा कान टवकारतं.
वठलेल्या झाडावरची साल आपल्याच अंगावरून सोलून काढल्यासारखी वाटते,
खुनशी वारा पाचोळ्यांचे रकाने हवेत भरत, रोंरावत राहतो,
चिलबटलेल्या पोराबाळांच्या डोळ्यातील स्वप्नेही त्यातून सुटत नाहीत,  
तेंव्हा त्याच्या वावटळीवर स्वार होऊन सटवाईला भेटावंसं वाटतं.
रखरखत्या उन्हाची सहस्त्रावधी शकले करावी वाटतात,
बेसावध चोरपावलांनी कलता सूर्य गवताच्या पात्यातलेही बाष्प शोषून जातो !
रापलेल्या चेहऱ्यावरच्या अन उसवलेल्या तळहाताच्या रेषा कुरतडल्या जातात
तेंव्हा, 'परमेश्वराच्या दाराला काठी लागो' म्हणावंसं वाटतं
आभाळाआडून तो फिदीफिदी हसतो,
मरणासन्न हडकुळया गाईच्या अंगावर कावळा होऊन बसतो !
उदासलेल्या जीर्ण चेहऱ्यांच्या डोळ्यात आरपार उतरत जातो !!

- समीर गायकवाड.