![]() |
खडीच्या चोळीवर |
जात्यावर दळण दळताना या स्त्रियांच्या मनात जे जे काही चालले असेल त्याला त्या शब्दबद्ध करत असत. कोणताही विषय त्यांनी वर्ज्य ठेवला नव्हता. अगदी बाहेरख्याली संबंध असो वा अन्य कुठले झेंगट असो त्यावरही या स्त्रिया व्यक्त होत असत. मग एकीने जात्याची पाळी नीट करत करत हा विषय छेडला की तिच्या पुढची जी असे ती याला जोडूनच दुसरी ओवी गाई. हा सिलसिला दळण संपेपर्यंत जारी राही. तोवर अनेकींची मने मोकळी होऊन गेलेली असत. कुणा एकीच्या मनात बऱ्याच दिवसापासून साठून असलेले मळभ रिते झालेले असे. या ओव्या अगदी थेट टीका करणाऱ्या नसत, त्यात प्रतिके असत. अशा गोष्टींची थेट वाच्यता होत नसे आणि तशी ती केलीही जात नसे. कारण तो समाज काही मर्यादा बाळगून होता. आतासारख्या सगळ्या गोष्टींचा चोथा केला जात नसे आणि कुणाचीही इज्जत सार्वजनिक रित्या उधळली जात नसे. तरीदेखील हा घाव वर्मी बसेल अशी त्यातली शब्दरचना असे.