मंगळवार, २२ जुलै, २०२५

चिरेबंदी गोठ्यातले नंदी!


एक काळ होता जेव्हा प्रत्येक गावातील बहुतांश शेतकऱ्यांकडे गुरे ढोरे असत. ज्याचं शेतशिवार मोठं असे त्याच्या रानात मजबूत गोठा असे. बऱ्यापैकी संख्येत शेळ्या मेंढरं असत, कोंबड्यांची खुराडी असत! रानात हिरवीगार कंच पिकं डोलत असत. पाना फुलांनी डवरलेली चॉकलेटी हिरवी झाडं माना तुकवून उभी असत. रानात कडब्याची भली मोठी गंज असे. झालंच तर गुरांना खायला हिरवंगार कडवळ नाहीतर मकवन तरी असेच, बळीराजाची लईच अडचण असली तर मागून आणलेलं हिरवं वाडं तरी असतंच. एव्हढे करूनही खेरीज जमलं तर अमुन्याची पाटी रोज संध्याकाळी गोठ्यातल्या गुरांसमोर ठेवली जायची. कडबाकुट्टी करून झाली की दावणीत त्याची लगड टाकली जाई. गुरं वळायला गुराखी पोरं असत. सकाळच्या धारा काढून झाल्यावर दिवस डोक्यावर यायच्या आधी गुरं चरायला माळावर नाहीतर गावच्या शीवेच्या हद्दीत नेली जात. हे दृश्य एके काळी खेड्यात दररोज संध्याकाळी सार्वत्रिक असे. विशेषतः गेलेली गुरे सांजेस परत येत तेव्हा हे श्यामल सुंदर दृश्य हमखास नजरेस पडे. गोठ्याकडे परतणाऱ्या लेकुरवाळ्या गायी-म्हशींच्या गळ्यातील घंटांचा आवाज ऐकून गोठ्यात दावणीला बांधून ठेवलेली त्यांची वासरे ताडकन उठून उभी राहत. कान ताठ करून आवाजाकडे कानोसा देऊ लागत, आनंदाने आपले सर्वांग थरथरवू लागत, घंटांचा आवाज जसजसा जवळ येईल तशी वासरे हंबरू लागत अन् आपल्या वासरांच्या हंबरण्याच्या आवाजाने त्या गोमाता अवखळपणे धावू लागत. धावणाऱ्या जनावरांच्या खुरांनी धुळीचे मंद लोट हवेत उडत, या गायी धावतच गोठ्यात आल्या की त्यांचे तटतटलेले पान्हे वाहू लागत. वासरांचे तोंड त्यांच्या कासेला जाऊन भिडले की, गायी आपल्या वासरांना मायेने चाटू लागत. हे मनोरम दृश्य बघून कुणाच्याही ठायी असलेला थकवा कुठच्या कुठे पळून जायचा. पाहणाऱ्याच्या प्रसन्न चेहऱ्यावर एक निरागस हसू उमटत असे. त्यांनाही आपल्या आईची आठवण येई आणि नकळत त्यांचेही मन आपापल्या माऊलीच्या ओढीने धाव घेत असे! हे दृश्य आता फारसे दिसत नाही. मात्र ज्या काळात जात्यावरच्या ओव्या अस्तित्वात होत्या, त्या काळात मात्र याचे मोठे प्रस्थ होते, त्यामुळे साहजिकच याचे प्रतिबिंब ओव्यांमध्ये पडलेले दिसते.

झाली सव सांज दिवा लावू कुठं कुठं
चिरेबंदी गोठयात नंदी आलेत मोठं मोठं..

या ओवीमध्ये खूप सुंदर भाव व्यक्त केले गेलेत. गावाकडच्या या सांजेची इतकी सवय होऊन गेलेली असते की संध्याकाळ होताच घरातल्या कर्त्या सुनेची, मुलीची पावलं देवघराकडे वळत. देवाला नमस्कार करून दिवाबत्ती लावली जाई. देवघरात निरंजन, समईच्या ज्योती लावून होताच घरातले कंदील लावले जात. मग दिवा लावण्यासाठी बाकीच्या ठिकाणांची पाळी असे. हे क्रम अगदी ठरलेले असत. सवयीने ती गृहलक्ष्मी दिवा घेऊन तुळशीपाशी जायची, मग पडवीमध्ये नि गोठ्याकडे जायची! गोठ्यात दिवा लावणे हे दिवाबत्तीचे शेवटचे टोक असे. त्या काळी गुरे मोठ्या प्रमाणात असत, खंडीभर धान्याची कणगी असे नी डझनावारी गाई म्हशी असत, दावण गच्च भरलेली असे. दहा घमेले भरून शेणकुट पडत असे! काहींचे गोठे तर अगदी भक्कम दगडी चिरेबंदी असत. खाली शेणाने सारवलेली जमीन असे, छत वाशाच्या सांगाड्यांवर झावळ्या टाकून शाकारलेले असे नाहीतर धाब्याचे भक्कम छत असे. काहींच्या इथे फरसबंदी असे. अशा भक्कम गोठ्यांत गुरेदेखील तशी धष्टपुष्ट असत, अगदी बलशाली सशक्त जनावरे असत. ओवीमध्ये बैलांचे वर्णन नंदी या शब्दांत केलेय. महादेवाचा नंदी हा सर्वात धष्टपुष्ट आणि बलशाली होय. ओवीमधली स्त्री म्हणते की सांज झालीय आणि सवयीने मी वेगवेगळ्या ठिकाणी दिवे लावू लागलेय, मला आधी गोठ्यात गेलं पाहिजे कारण आपलं खरं पशूधन म्हणजे आपले बैल जे शंकराचे नंदी म्हणून आपल्याला ज्ञात आहेत ते आता गोठ्यात आले असतील! या ओवीमधून त्या स्त्रीची गुरांविषयीची कृतज्ञतेची आणि आदराची भावना दिसून येते. आताशा अशी आस्था माणसांविषयी देखील दिसून येत नाही हे वास्तव आहे! जिथे माणसांनाच किंमत उरली नाही तिथे मुक्या जित्राबांचे काय घेऊन बसलायसा! तो काळ खऱ्या अर्थाने अमृतकाळ होता. तेव्हा मानवी जीवनात माणसांना, नात्यांना आणि शब्दांना विलक्षण स्थान होते. लोक या तीन गोष्टींची कदर करत असत. इतकेच नव्हे तर ज्या मातीतून आपण धान्य पिकवतो तिला ते काळी आई मानत असत आणि जी गुरे ढोरे त्यांच्या गोठ्यात असत त्यांनाही कुटुंबातल्या सदस्यांचे स्थान असे! आता सारेच लोप पावलेय, आता चिरेबंदी गोठे इतिहासजमा झालेत आणि गावोगावचे बैल लोप पावत चाललेत, जिकडे तिकडे यांत्रिक मदत घेतली जाते! मुळात लोकांच्या मनात पहिल्यासारखी गुरांविषयीची आस्था राहिली नाही हे वास्तव आहे! लोकांना आता, फक्त आणि फक्त आपल्या मतलाबाशी, पैशाशी काम असते! मतलब संपला की बात खतम असे आताचे सूत्र आहे! अर्थात यालाही काही माणसं अपवाद असतात आणि अशी अपवाद असलेली माणसं जोवर पृथ्वीतळावर असतील तोवर तरी जग नीट चालेल, त्यांच्या पाठीमागे चांगले काहीच उरणार नाही ही नक्की!

- समीर गायकवाड

1 टिप्पणी: