
'टायटन द ओशियनगेट सबमरीन डिझास्टर' ही 2025 मध्ये रिलीज झालेली 'नेटफ्लिक्स'वरील डॉक्युमेंटरी आहे, जी 18 जून 2023 रोजी टायटॅनिकच्या अवशेषांना भेट देण्यासाठी गेलेल्या ओशियनगेट कंपनीच्या टायटन सबमर्सिबलच्या अंतर्गत स्फोटाने झालेल्या दुर्घटनेला केंद्रस्थानी ठेवते. ही दुर्घटना जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरली होती, कारण यात पाच जणांचा मृत्यू झाला होता. या डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शन मार्क मुनरो यांनी केले आहे आणि ती या घटनेच्या मुळाशी असलेल्या कारणांचा, तांत्रिक त्रुटींचा आणि मानवी चुका यांचा सखोल अभ्यास करते.
ही सबमर्सिबल ओशियनगेट एक्सपिडिशन्स या कंपनीने बनवली होती, जी श्रीमंत पर्यटकांना टायटॅनिकच्या अवशेषांना भेट देण्यासाठी प्रति व्यक्ती अडीच लाख डॉलर्सचे शुल्क आकारत होती. जगभराचा कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय असणाऱ्या महाकाय टायटॅनिक बोटीचा अपघात सर्वश्रुत आहेच, समुद्रात चिरनिद्रा घेत असलेल्या टायटॅनिक बोटीचे अवशेष उत्तर अटलांटिक महासागरात सुमारे 3,800 मीटर खोलवर आहेत. टायटॅनिकवर आजवर सिनेमे, माहितीपट निघाले नि त्यावर आजतागायत अनेकदा लिहिलेही गेलेय; त्यामुळे टायटॅनिक हा अनेकांच्या जिज्ञासेचा विषय बनून राहिला आहे. अनेकांना वाटते की हे अवशेष पाहून यावेत, त्यात देखील एक थ्रिल आहे अशी अनेकांची धारणा आहे. त्यातूनच या अवशेषांना भेट देण्याची संकल्पना जन्मास आली. या संकल्पनेला मूर्त स्वरूप ओशियनगेटने दिले. त्यांनी समुद्रतळाशी जाईल अशी पाणबुडीच्या बेसवर बनवलेली सबमर्सिबल बनवली. तिचे नाव टायटन! जून 2023 मध्ये अंतर्गत स्फोटाने तिचा विनाश झाला आणि त्यात स्वार असलेले ओशियनगेटचे सीइओ व पायलट असणारे स्टॉकटन रश, ब्रिटिश अब्जाधीश आणि साहसाची आवड असणारे हॅमिश हार्डिंग, पाकिस्तानी उद्योगपती शाहझादा दाऊद, शाहझादा यांचा एकोणीस वर्षांचा मुलगा सुलेमान दाऊद टायटॅनिक तज्ज्ञ आणि फ्रेंच सागरी संशोधक पॉल-हेंरी नार्जोलेट या सर्वांचा मृत्यू झाला.ही सबमर्सिबल खोल समुद्रात बुडत असताना सुमारे 1 तास 45 मिनिटांनी संपर्क तुटला आणि नंतर ती अंतर्गत स्फोटामुळे नष्ट झाल्याचे सिद्ध झाले. या घटनेने जगभरात मोठी खळबळ उडवली, कारण यामुळे सागरी पर्यटन आणि सुरक्षिततेच्या नियमांबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले.
या माहितीपटात स्टॉकटन रश यांना एक करिष्माई, परंतु अहंकारी आणि हटवादी व्यक्ती म्हणून दाखवलेय. त्यांना जेफ बेझोस किंवा एलॉन मस्क यांच्यासारखे यशस्वी आणि प्रसिद्ध उद्योजक बनायचे होते. त्यांनी ओशियनगेटची स्थापना खोल समुद्रातील साहसी धाडसी गोष्टी सामान्य लोकांना, पर्यटकांना खुल्या व्हाव्यात या दृष्टिकोनातून केली होती. परंतु, त्यांनी सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष केले आणि तांत्रिक तज्ज्ञांचे सल्ले नाकारले, ज्यामुळे ही दुर्घटना घडली. ते स्वतःला एक जीनियस व्यक्ती समजत. नियम तोडण्यातच मजा आहे असे ते म्हणत असत. परंतु या डॉक्युमेंटरीत दाखवले आहे की, भौतिकशास्त्र आणि अभियांत्रिकीच्या नियमांचे पालन न केल्याने ही दुर्घटना अटळ होती. टायटन सबमर्सिबलच्या डिझाइनमध्ये कार्बन फायबर हल (hull) हा सर्वात मोठा विवादास्पद मुद्दा होता. कार्बन फायबर सामान्यतः खोल समुद्रातील सबमर्सिबल्ससाठी वापरले जात नाही, कारण ते प्रचंड दबावाखाली कमकुवत ठरते. याला डिलॅमिनेशन म्हणतात, ज्यामुळे हल कमकुवत होऊन स्फोट होऊ शकतो. 2019 मध्ये एका चाचणी दरम्यान, कार्ल स्टॅनली या सागरी तज्ज्ञाने सबमर्सिबलमधून तडे जाण्याचे आवाज ऐकले होते आणि त्याने रश यांना पुढील प्रवास थांबवण्याचा सल्ला दिला होता, परंतु रश यांनी तो सल्ला नाकारला. या सबमर्सिबलला कोणत्याही स्वतंत्र संस्थेकडून सुरक्षितता प्रमाणपत्र मिळाले नव्हते, जे या उद्योगातील मानक समजले जाते. रश यांनी या प्रमाणपत्राला नको असलेली अडचण मानले आणि आंतरराष्ट्रीय पाण्यात नियमांचा अभाव असल्याचा फायदा घेतला. ओशियनगेटच्या अकॉस्टिक मॉनिटरिंग सिस्टमने हलमधील कमकुवतपणाचे संकेत दिले होते, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले गेले. ही सिस्टम हलमधील त्रुटी शोधण्यासाठी होती, परंतु ती अपुरी होती आणि त्याचे निकाल गांभीर्याने घेतले गेले नाहीत.
डेव्हिड लॉक्रिज हे ओशियन गेटच्या मरिन ऑपरेशन्स विभागाचे माजी संचालक होत, ते या डॉक्युमेंटरीतील प्रमुख व्हिसलब्लोअर आहेत. त्यांनी 2018 मध्ये टायटनच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली होती आणि एक अहवाल सादर केला होता, ज्यामुळे त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. त्यांनी OSHA (Occupational Safety and Health Administration) ला संपर्क केला, परंतु ओशियनगेटच्या वकिलांनी त्यांना धमकावले आणि त्यांचा आवाज दाबला. एमिली हॅमरमिस्टर ही याच कंपनीमध्ये लीड इंजिनिअरची असिस्टंट होती. कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्या चिंता व्यक्त केल्यावर तिला सीइओंच्या विरोधाला सामोरे जावे लागले. तिला नको असलेली जबाबदारी दिली गेली ती म्हणजे टायटन पाण्याखाली जातेवेळी पर्यटकांना टायटनच्या हलमध्ये बंदिस्त करण्याचे! तिला जर हे काम जमत नसेल तर तिने नोकरी सोडावी असे फर्मान जारी करून तिला नोकरी सोडण्यास भाग पाडले गेले. बॉनी कार्ल ही याच कंपनीची माजी आर्थिक संचालक होती, ती एक अकाउंटंट असूनही रश यांनी तिला नवीन लीड पायलट बनवण्याचा प्रस्ताव दिला तेव्हा ती थक्क झाली कारण सबमर्सिबल चालवण्याचा कोणताही अनुभव तिच्याकडे नव्हता! घाबरून जाऊन तिनेही कंपनी सोडली. या तिघांच्या मुलाखती आणि व्हिज्युअल्स, ओशियनगेटचे सीइओ स्टॉकटन रश यांच्या बेफिकिरीचे दाहक दर्शन घडवतात.
एक तास एकावन्न मिनिटांच्या प्रदीर्घ लांबीचा हा माहितीपट इंग्रजी, जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच, इटालियन भाषेत ऑडिओ डिस्क्रिप्शनसह उपलब्ध आहे. कंपनीचे माजी कर्मचारी, व्हिसलब्लोअर्स, पीडितांचे कुटुंबीय, तसेच यूएस कोस्ट गार्डच्या तपासातील फुटेज आणि ऑडिओ रेकॉर्डिंग्जचा वापर केला आहे. यात वायर्ड चे पत्रकार मार्क हॅरिस यांचेही योगदान आहे, जे या दुर्घटनेवर सखोल संशोधन करणारे पत्रकार आहेत. टायटनने प्रवाशांना मिशन स्पेशालिस्ट्स म्हणून संबोधले, ज्यामुळे कायदेशीर जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला गेला. याशिवाय, प्रवाशांना साइन केलेल्या वेव्हर अँड रिलीज ऑफ लायबिलिटी अॅग्रीमेंट मध्ये "मृत्यू" हा शब्द नऊ वेळा वापरला गेला होता, ज्याने सबमर्सिबलच्या जोखमींची स्पष्टता दिली होती. तरीदेखील काहींना असे वाटते की या दुर्घटनेचे समग्र पैलू यात आले नाहीत, अर्थात हे अशक्य आहे कारण तुकडे तुकडे झालेल्या टायटनचे संपूर्ण सत्य जसेच्या तसे समोर येऊच शकत नाही. सखोल विश्लेषणासोबत रंजक माहिती असल्याने नजर खिळून राहते. काहींना ही डॉक्युमेंटरी विचलित करणारी वाटू शकते. याद्वारे खोल समुद्रातील साहस आणि पर्यटन उद्योगातील सुरक्षिततेच्या नियमांबाबत प्रश्न उपस्थित केले गेलेत. यामुळे भविष्यात अशा जोखमीच्या उपक्रमांसाठी कठोर नियम आणि तृतीय-पक्ष तपासणीची गरज अधोरेखित झालीय. यूएस कोस्ट गार्ड्सचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही आणि त्याचा अंतिम अहवाल यावर्षाच्या अखेरीस अपेक्षित आहे. हा अहवाल अशा दुर्घटना टाळण्यासाठी शिफारशी देईल. एखाद्या व्यक्तीच्या अतिमहत्वाकांक्षी स्वप्नांचे, अवगुणांचे आणि त्याच्या चुकीच्या धोरणांचे परिणाम काय होऊ शकतात याची हे टोकदार प्रकटन ठरावे.
- समीर गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा