Wednesday, January 17, 2018

अनुवादित कविता ...

एके दिवशी मी वृक्षाकडे गेलो आणि त्याला विचारलं,
"प्रिय वृक्षराज, तुम्ही मला कविता करून द्याल का ?"
वृक्ष उत्तरला, "जर तू चिरफाळ्या उडवल्यास
माझ्या सालीच्या अन खोडाशी एकरूप होऊन गेलास,
तर तूच एक कविता होऊन जाशील !"
त्या दिवसापासून कुठे झाड तुटताना पाहिलं की मी छिलून निघतो,
कवितेच्या जाणिवांतून कित्येक कोस दूर होत उस्मरत राहतो ...

प्रसिद्ध बांग्लादेशी कवी शमसूर रहमान यांच्या कवितेचा हा स्वैर अनुवाद आहे. बांग्लादेश म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे एक ठराविक हिंस्त्र आणि विध्वंसक चित्र येते, डोक्यात एक मासलेवाईक धर्मभेदाचे घड्याळ टिकटिक करू लागते. तिथं सर्वत्रच एकसारख्या वृत्तीची माणसं असतील का, याचा सारासार विचार देखील आपण करत नाही. कारण तिथलं अन्य काही चांगलं आपल्यापर्यंत आलेलं नसतं किंवा येऊ दिलेलं नसतं वा आपणही त्या दिशेने शोधण्याचा प्रयत्न केलेला नसतो.

जो व्यक्ती एका विशालकाय गर्दीच्या समुदायाचा भाग होऊन गेलेला असतो त्याच्याकरिता तर ही बाब जवळपास अशक्य, अतर्क्य होऊन बसते. मग कल्पना करा की ज्या देशात आर्थिक, सामाजिक स्थैर्य नावाला देखील नसेल व भेदाभेद, विषमता, हेट्रेड हाच तिथल्या सत्ताभावाचा पाया असेल तर परिपक्व वा नवनवोन्मेषशाली विचारांची मांडणी करणाऱ्या लोकांची तिथली अवस्था आणि व्याप्ती किती असेल ? अशा लोकांना तिथल्या जनमानसात काय स्थान असेल अन त्यांच्या मतांना काय किंमत असेल ? या सर्वच प्रश्नांची उत्तरे अतिशय निराशाजनक असणार हे सांगायला कुणा कुडमुडया ज्योतिषाची गरज नाही. तरीही असे काही लोक तिथे आहेत. त्यात काही प्रतिभावंत कवी व लेखकही आहेत. एकोणीसाव्या शतकाच्या प्रारंभीचे अर्वाचीन कवी मायकेल मधुसुदन दत्ता यांचा वारसा पुढच्या पिढीतल्या कवींनी समर्थपणे पेलला. त्यापैकी एक होते शमसुर रहमान. आताच्या पिढीत एक नाव उहीन दासचे आहे ज्याच्या शब्दांचं लवलवतं पातं अनेकांना घाम फोडतेय. असो..

शमसूर रहमान यांनी त्यांच्या या कवितेत वृक्षांच्या संवेदना चितारताना वृक्षांच्या कत्तलीवरही कटाक्ष टाकलाय. त्याच वेळी कवीने संवेदनशील असणं अनिवार्य आहे हे ही सुचवलं आहे. इतकंच नव्हे तर आपल्या रोजच्या जीवनातील सामान्य वाटणाऱ्या परिचित घटनांत देखील प्रचंड ताकदीचं काव्यबीज दडलं आहे हे ही त्यांनी दाखवून दिलं आहे. पाच ओळीची ही कविता म्हटलं तर एक संदेश आहे अन कवितेचं प्रयोजनही आहे. हिंसाचार, दारिद्र्य, वंशभेद, निरक्षरता, अनारोग्य, कर्मठता, परंपरावाद आणि विषमता यांनी ग्रासलेल्या आपल्या शेजारी देशातील बिनचेहऱ्याच्या गर्दीच्या लाखो जत्थ्यातील लोकांपैकीच एक बिंदू असलेला एक कवी मनाचा माणूस झाडांच्या वेदनावरही काव्य करतो....
अस्सल कवीमन कुठेही तग धरू शकतं याचे हे धीरोदात्त उदाहरण ...

- समीर गायकवाड.

#अनुवादित_कविता ...
________________________________________________________________________________
हे माझ्या चैतन्या सर्व सीमांच्या पार जा,
सर्व आकारांच्या पार जा.
सर्व अस्तित्वांच्या पार जा.
आर्त भावनांनी हृदयाच्या चिरफाळ्या केल्या तरी,
हे माझ्या चैतन्या सर्व सीमांच्या पार जा !
शेकडो जातींची भुसकटं हवेत उडवून दे
तत्वज्ञानांच्या मर्यादा लांघून पार जा
अन दिगंतापार जाऊन उगव,
हे माझ्या चैतन्या सर्व सीमांच्या पार जा !
तू कुठेही थांबू नकोस
चिंचोळ्या भिंतीत गुंतू नकोस
अंतास जाईपर्यंत कुणाचेही साधन होऊ नकोस
तू अमर रहा,
हे माझ्या चैतन्या सर्व सीमांच्या पार जा !
जो अक्षय असतो तो सदैव अनंत असतो,
एका विमुक्त तपस्वीगत.
तू अमर आहेस, अनंत आहेस.
अन अमर अनंत राहण्यासाठी,
हे माझ्या चैतन्या सर्व सीमांच्या पार जा !
विख्यात प्रतिभावंत कन्नड कवी कुप्पली वेंकटप्पा पुटप्पा यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुगलने त्यांचे डूडल बनवून आदरांजली अर्पण केलीय. जगभरातला कानडी माणूस कुप्पलींना 'कुवेम्पू' या नादमाधुर्य असणाऱ्या टोपणनावाने ओळखतो. माझ्या कानीही त्यांचे नाव पडलेय. सोलापूरातल्या सिद्धेश्वर प्रशालेत माझे प्राथमिक - माध्यमिक शिक्षण झाले. त्या शाळेत मराठी सोबतच कन्नड हा विषयही ऐच्छिक (ऑप्शनल) होता. कन्नड मायबोली असणारी मुले हा भाषाविषय निवडत. त्यांच्या तोंडून बऱ्याचदा कुवेम्पू यांचे नाव ऐकलेले. एक श्रेष्ठ कादंबरीकार, कवी, नाटककार, समीक्षक आणि व्यासंगी विचारवंत म्हणून ते कन्नड साहित्यात ओळखले जातात. ज्ञानपीठ, साहित्य अकादमी, पद्मभूषण, पद्मविभूषण, कर्नाटक रत्न अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला. कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील कुप्पल्ली या गावात त्यांचे वडिलोपार्जित घर अत्यंत नेटक्या आणि देखण्या पद्धतीने जतन केले आहे. अनोख्या स्थापत्य शैलीतले त्यांचे स्मारकही अचंबित करते. कुवेम्पूंचा जतन केलेला हा भव्य वारसा पाहता क्षणी आपल्या मराठी कवींची निवासस्थाने आणि स्मारके यांची दुर्दशा काळजाला डंख मारून जाते. कुवेम्पूंच्या कविता तरल आणि भावसुलभ होत्या. त्यांच्या 'अनिकेतना' या कवितेस कर्नाटकमध्ये प्रार्थनेचा दर्जा आहे. या कवितेचा स्वैर मराठी अनुवाद वरती दिलाय.
कोणत्याही वर्णाच्या, लिंगाच्या, वयाच्या अन कोणत्याही जातधर्मातील, भाषेतील, प्रांतातील, देशातील साहित्यिकाच्या रचना असोत, त्यात सच्चेपणा आणि प्रतिभा यांचा अनुभवसमृद्ध मिलाफ असला की सर्व सीमा पार करून ते साहित्य आपलेसे वाटू लागते. हा साहित्याचा सर्वात मोठा सदगुण आहे. यामुळेच साहित्याला कोणत्याही सीमा नाहीत की कोणतीही बंधने त्यावर लादता येत नाहीत. कुणी कितीही आदळआपट केली वा नाके मुरडली तरी साहित्य आपल्या वाटेने जोमाने वाढत असते, फुलत असते, जगत असते आणि रसिकांनाही जगवत असते. आपण त्याचा फक्त मनमुराद आस्वाद जरी घेतला तरी आपलं जगणं त्यातून सफल होऊन जातं....
- समीर गायकवाड.


_______________________________________________________________________________
अम्मा फक्त भल्या सकाळीच ओसरीत जाते
सूर्यकिरणे येण्याआधी ती घराबाहेर येते
लख्ख झाडून अंगण स्वच्छ करते.
अनोळखी कोणी भेटायला अब्बूकडे आला की
स्वतःला लपवत दाराआडून बोलते.
आता तीच अम्मा पडून आहे
त्याच ओसरीवरची जणू शिळा
अनोळखी माणसांच्या त्याच
गर्दीने वेढले आहे तिला.
आता मात्र तिला मोकळं वाटत असेल.
अब्बूनंतरची आठ वर्षे एकाकी जगल्यानंतर
आता ती अब्बूच्या शेजारी असेल.
माझे ओलेते डोळे शोधताहेत
थोडीशी जागा माझ्यासाठी
गर्दीत मेंदीच्या पानांत तिथेच
स्वतःला गुरफटून घेण्यासाठी
माझे हृदय अजूनही आक्रंदतेय
थोडीशी घट्ट मिठी मारून
अम्माशेजारी झोपण्यासाठी ....
~~~~~~~~
मल्याळी कवी अहमद मोईनुद्दिन यांच्या 'कबर' या कवितेचा हा स्वैर अनुवाद आहे. कवीच्या वृद्ध मातेने आपल्या पतीच्या पाठीमागे एकाकी जिणं जगत, त्यांच्या आठवणीपायी हट्टाने गावातल्या घरात एकट्याने राहत आठ वर्षे घालवली. एका सकाळी कवीला कळले की, गावाकडे आपली आई अनंताच्या प्रवासाला गेली आहे. तो गावातल्या घरात येतो, तिथे येताच जे दृश्य दिसले त्यावरून त्याला ही कविता स्फुरली. ही तरल कविता निस्संशय अंतःकरणाचा ठाव घेऊन जाते.
बहुतांश कब्रस्तानात मेंदीची झाडे असतात, कवीने त्याचा संदर्भ नेटका आणि नेमका वापरत कवितेत कुठेही 'मृत्यू' वा 'कबर' या शब्दांचा उल्लेखही न करता एकाच वेळी अनेक छटा रंगवल्या आहेत. कविता वाचताना वाचकाला त्यात स्वतःला, आपल्या आईला शोधावसं वाटणं हे या कवितेचं सात्विक यश आहे.
____________________________________________________________________________

मी कुठेही गेलो तरी संध्येस त्याच खोलीत असतो जी माझ्या आईने अज्ञात पानाफुलांच्या सुगंधाने भरलेली असते.
हा सुगंध माझ्यासोबतच असतो जणू.
माझी आई देवाघरी गेली आणि तेंव्हापासून ही गंधभारीत खोली माझ्यासवे असते.
बालकवींच्या 'औदुंबरा'सारखा हा गंध माझा पिच्छा करतो.
खरे तर आपले आयुष्य आपण जितके उध्वस्त करू तितका विध्वंस आपला पाठलाग करत राहतो.
हे तर माझ्या आजीच्या अंतहीन म्हणींसारखे घडतेय, जे पुन्हा पुन्हा प्रारंभाकडे खेचतेय.
विमनस्कतेच्या या वर्तुळाला मी कसे छेदेन हे ठाऊक नाही.
शब्द, गंध आणि झेपेच्या बंधनातून मुक्त होत हवेहवेसे पदलालित्य मला लाभेल का याचेही उत्तर माझ्याकडे नाही.
आईच्या गंधभारीत आठवणींचे कढ हेच आता जणू जीवन झालेय...

लंडन येथे वास्तव्यास असणारे जॉर्डनचे कवी-लेखक याह्या न्युमेरी अल नैमत उर्फ अमजद नासीर यांच्या hadhian (विमनस्क) या अरेबिक कवितेचा हा स्वैर अनुवाद आहे. मूळ कवितेत सी.पी. कॅव्हफी यांच्या प्रसिद्ध 'सिटी' या कवितेचा उल्लेख आहे त्याजागी मी बालकवींच्या औदुंबर कवितेचा उल्लेख केला आहे. कारण कॅव्हफींच्या 'सिटी' कवितेतले शहर कुठेही गेलं तरी कवीचा पिच्छा सोडत नाही अन तो विमनस्क होत जातो असे दर्शवले आहे ; बालकवींच्या 'औदुंबरा'चेही असेच होते.
प्रौढत्वास पोहोचलेल्या एका कवीच्या मातेचे निधन होते आणि त्याला सर्वत्र तिचा गंध जाणवू लागतो. ज्यातून त्याला सुटका नकोय पण त्याला त्याची खेद-खंत आहे कारण आई हयात असताना इच्छा असूनही त्याला तिचा सहवास लाभला नाही. मग या गंधापासून दूर जात पूर्वीसारखं आईच्या सहवासाच्या ओढीतलं स्वच्छंदी जगणं वाट्यास येईल का हा कवीचा प्रश्न खूप घायाळ करून जातो. या अनुषंगानेच हा अनुवाद सर्वांसमोर मांडावासा वाटला.
काव्यार्थ वाचल्यानंतर आपल्यापैकी अनेकांना ही आपलीच कविता असल्याची भावना नक्कीच दाटून येईल याची मला खात्री आहे.

'औदुंबर'मधल्या शेवटच्या दोन ओळी सोडल्या तर कविता निखळ आनंदाचा नैसर्गिक झरा वाटते पण .. "झांकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर' इथे बालकवींना अभिप्रेत असणारा शोकात्म औदुंबर विमनस्कतेचे प्रतिक आहे, जे त्यांच्या जीवनात त्यांनी कठोरपणे अनुभवले होते. 'ऐल तटावर पैल तटावर' हा पिच्छा पुरवणारा भास आहे जो हरवून गेलाय, वास्तव आहे तो इतक्या देखण्या निसर्गाला काळ्या डोहात बुडवून त्यात आपले पाय मोकळे सोडून बसलेला औदुंबर...असाच अर्थ सी.पी. कॅव्हफी यांच्या प्रसिद्ध 'सिटी' या कवितेतून प्रतीत होतो आणि मराठी वाचकांना सहज उमजेल असा चपखल काव्य्यात्म शब्द औदुंबराशिवाय दुसरा योग्य वाटला नाही म्हणून त्याचा उल्लेख केलाय...

____________________________________________________________________________ 
आई तू मला वाचवू शकली असतीस, आई तू मला वाचवू शकली असतीस.
तुझ्या रक्ताच्या मेंदीने माझ्या अस्तित्वाचा प्रत्येक अणूरेणू रंगलेला होता गं !
मला पूर्णत्वास येऊ द्यायला पाहिजे होतं, प्रत्येक अंग रक्ताने अजूनही भरलं गेलं असतं.
माझ्या डोळ्यांना प्रकाशकिरणांनी शिवण्याआधी काजळाने रेखांकीत केलं असतं.
सट्टा बट्टा करावा तसं मला दिलं घेतलं असतं, वा हॉनर किलिंगसाठी मी कामी आले असते !
मात्र आता प्रत्येक स्वप्नं अधुरीच राहिलीत ..
मी थोडी मोठी झाली असती तर माझ्या वडीलांचा लौकिक घटला असता,
माझी ओढणी थोडी जरी घसरली असती तर माझ्या भावाच्या पगडीच्या गर्वाला धक्का बसला असता.
पण तुझी मधुर अंगाई ऐकण्याआधीच, माझ्या न जन्मलेल्या चिरनिद्रेच्या मी अधीन झाले.
आई, मी एका अज्ञात प्रदेशातून आले होते आणि आता एका अज्ञात प्रदेशात हरवतेय.
आई मला वाचवू शकली असतीस, आई मला वाचवू शकली असतीस
तुझ्या रक्ताच्या मेंदीने माझ्या अस्तित्वाचा प्रत्येक अणूरेणू रंगलेला होता गं !

सुप्रसिद्ध पाकिस्तानी कवयित्री जेहरा निगाह यांच्या कवितेचा हा स्वैर अनुवाद आहे.
आज घडीला जेहरांच्या बंडखोर काव्यशैलीने संपूर्ण पाकिस्तानला भुरळ घातलीय. क्लेशदायक विचारांना त्या आपल्या रचनांत नव्या आयामात गुंफतात, त्यातला आशय एकदम टोकदार करताना वाचकांना विचार करण्यास भाग पाडतात. स्त्रियांविषयक पारंपारिक दृष्टीकोनास सुरुंग लावताना त्या आपला ठसा कवितेत उमटवतात. बालवयापासून त्यांनी काव्यनिर्मिती केली आहे. एक मनस्वी अक्षरयात्री म्हणून त्या साहित्यविश्वास परिचित आहेत..

या कवितेतील पाकिस्तानची सामाजिक स्थिती आणि आपल्याकडील सामाजिक स्थिती यात काहीच फरक नाही. चला इथे तरी आपल्या दोहोंत समानता आहे. दोहोतले कुणी पुढारलेले नाही, आपण दोघेही मागासलेलेच आहोत !! स्त्री असतेच मुळात शोषणासाठी हा विचार इतका खोलवर रुजलाय की त्याची पाळेमुळे खणून काढण्यासाठी कोट्यावधी हातांचा एल्गार अनिवार्य आहे, तो होईल तेंव्हा होईल पण तोवर संवेदनशील मनांनी शब्दांचा अविरत जागर केला पाहिजे..

 _________________________________________________________________________

ज्या इराकमध्ये गृहयुद्ध आणि अशांतता यांनी राज्य केलं आहे तिथले कवी ओबेदुल जाबिरी यांच्या फेडिंग (म्लान) या कवितेचा हा स्वैर अनुवाद आहे. आसपास जिथं तोफांचे आवाज घुमतात आणि मृत्यूचे तांडव चालते तिथल्या एका कवीला शांतीदूत समजल्या जाणारया कबूतराच्या वृद्धत्वावर कविता सुचावी हेच मुळात गूढरम्य आहे... एक विलोभनीय शब्दचित्र साकारण्याची ताकद या कवितेत आहे. कविता आणि जगणं समृद्ध व्हावं असे वाटत असेल तर असलं थोडंफार तरी वाचलंच पाहिजे...

ती मादी कबूतर जेंव्हा वयस्क होईल.
तेंव्हा तिचे पंख करडे होत जातील, तिचं हुंकार भरणं दमत जाईल.
तेंव्हा कल्पना करा ती कुठे जाईल ?
कोवळ्या चिमण्यांसाठी ती दिशादर्शक आरशात परावर्तित होईल काय ?
की एखाद्या मूक खिडकीला गाता यावं म्हणून डहाळी होईल काय ?
विस्कळीत थव्यातून फडफडताच तिचे पंख आपल्याला मिळावेत
अशी मनीषा असणाऱ्या वाटसरूची ते कशी काय माफी मागेल.
छाती फुगवून अंगणातून ती कशी काय उडेल
वा गवताच्या पात्यांना कसे काय भूलवेल ?
बहुधा ती एखाद्या दयाळू मुलाची प्रतिक्षा करेल,
जो तिला गव्हाचे भरडलेले दाणे चारेल !
की वृद्धत्वाच्या आसक्तीला चेतविणारी एखादी ज्योत होईल ?
किंबहुना स्वतःच्या दुःखाचे
मुक्त खिडकीत आणि लोखंडी पिंजऱ्यात ती विभाजन करेल !
कदाचित ती एक पेशेवर रुदाली होऊन जाईल
अन पक्षांच्या अंत्यविधीत रुदन करत राहील.
कल्पना करा, तिच्या अशा अवस्थेत
मायाळू झाडे तिला तळाची फांदी बहाल करतील
अन तिचे एकेकाळचे शेजारी निर्विकार होतील तेंव्हा ती कोठे जाईल ?
नियतीच्या न्यायाचे कातळओझे तिच्या म्लान फिकट पंखांना पेलवेल का ?

कविता वाचल्यानंतर उदासीनता आणि तृप्तता यांचे एकत्रित समाधान मिळते ही या कवितेची जमेची बाजू आहे. तरलता, ओघवती भाषाशैली आणि आशयसमृद्धी यामुळे कवीच्या प्रतिभाशक्तीची कल्पना येते. कवितेला आशय, विषय, कवितेची पार्श्वभूमी आणि कवीच्या भोवतालची परिस्थिती यांची बंधने असू शकत नाहीत याचा प्रत्यय या कवितेतून येतो....
__________________________________________________________________________
 सच की हालत किसी तवायफ जैसी है,
तलबगार तो बहुत हैं, तरफदार कम है!
_____________________________________________________________________________

बांगडया...

सख्यांनो तो ज्या समुद्रात जातो, तो गगनभेदी रोरावतो, प्रलयंकारी फुगतो.
शंख शिंपल्यांना उधळतच किनाऱ्यावर आणतो, कधी त्यात आवाज शिटीचा घुमवतो.
पण माझा नावाडी त्याच्या लाकडी होडक्यातून पुढेच जात राहतो.
लाटांच्या थंड फटक्यांना वल्ह्यांचे गतिमान संगीत देतो.

सख्यांनो माझ्या बांगड्यांकडे पहा.
तो दर्याच्या भेटीस गेला की त्या ढिल्या होऊन म्लान पडुनी राहतात.
तो परत येऊ लागताच आपसूक घट्ट होत जातात.
त्याच्या येण्याजाण्याचे त्या संकेत देत राहतात.
त्याच्या असण्या नसण्याने फरक माझ्या धमन्यात पडतो.
त्याच्या असण्या नसण्याने श्वास संथ होतात अन काया मलूल होते.
माझ्या हातातल्या बांगडयांनाही हे गणित आता चांगलेच उमजते !

- ए. के. रामानुजन यांच्या Vaḷaiyalkaḷ ( वलैलकल - बांगड्या) या तमिळ कवितेवर आधारित ही कविता आहे.
या कवितेतून एका दर्या सारंगाच्या पत्नीच्या भावबंधास तरलतेने रेखाटले आहे. कविता वाचणारयाच्या डोळ्यापुढे त्याचे दृश्य तयार होते इतकी उत्कट परिणामकारकता तिला प्राप्त झालीय. तिचा प्राणप्रिय पती त्याच्या नेहमीच्या होडीतून मोहिमेवर गेल्यावर तिच्या मनात दाटून येणाऱ्या भावना बांगडीच्या रूपकातून अत्यंत हळुवारपणे व्यक्त केल्या आहेत.

छोट्याशा विषयातून कविता किती देखण्या शैलीतून फुलवता येते याचे हे उत्फुल्ल उदाहरण. कवीच्या प्रतिभेचे विलोभनीय दर्शन यातून होते.

_________________________________________________________________________________


ज्या रात्री वहिदा मरून गेली होती
तिची विधवा आई आस्मा बाहेर एकाकी उभी होती.
एकेक करून सगळे नातलग निघून गेले तेंव्हा
अंगणात कुणीच राहिले नव्हते..
भाड्याने आणलेल्या खुर्च्या परत देतानाच
गॅसबत्ती आणि चटयाही देऊन टाकल्या होत्या.
वहिदाने कधी काळी लावलेल्या प्राजक्ताच्या
चिमुकल्या फांद्यांवर अंधार रात्र चांगलीच सुस्तावली होती.
जीर्ण चिमणीचा मंद पिवळा उजेड
दीनवाणा होऊन जणू अश्रू ढाळत होता.

उदास मखमली पट्टेरी मांजरी तिथेच होती उभी,
वहिदाच्या गुळगुळीत स्लीपरवर हळुवार नाक घुसळत.
काही वेळापूर्वीच जणू
मनमुराद खेळून येऊनी तिने सोडल्या होत्या त्या
दगडांच्या ओबड धोबड पायऱ्यांवर.

झोपडीच्या दक्षिणेस कपडयांच्या तारेवरती
वहिदाचा फ्रॉक झिरलेला वाळत घातलेला, अजुनी होता लटकत.
जवळून जाणाऱ्या उनाड वाऱ्याने एका लाटेत त्याला उडवले,
जणू वहिदालाच जागे करायचे होते त्याला.
शेजारच्या झाडावरील घरट्यावरती उडुनी तो पडला.

ज्या रात्री वहिदा मरून गेली होती
तिची विधवा आई आस्मा बाहेर एकाकी उभी होती......

पाऊस वादळी अकस्मात दाखल झाला तिथे.
आस्मा घरात धावली, परतली अन निमिषार्धात
ठिपक्यांची शुभ्र छत्री हाती घेऊनि,
याच छत्रीसाठी वहिदाची तक्रार असे,
की चक्र तिचे तुटके आहे अन दुरुस्तीच्या पलीकडची गत आहे.
दफनभूमीतल्या ताजी माती अंथरलेल्या जागेवरती धाव आस्माने घेतली
मातीच्या आडोशाला छत्री धरली, माती घेतली कवेशी,
जमेल तितकं ती झाकत होती. .
पाऊस संततधार कोसळतच होता, आस्मा मातीवर आडवी पडून होती.
मातीच्या कुशीतली वाहिदा तिला घट्ट चिकटली होती.
पावसात भिजणं आवडणाऱ्या वहिदाच्या देहावरील मातीत आस्माचे अश्रू मिसळत होते.

वहिदा मरून गेलेल्या रात्री पाऊस संततधार कोसळतच होता....

मल्याळी कवी रफीक अहमद यांच्या 'सीझलेस रेन' या कवितेत अंशतः बदल करून केलेला हा स्वैर अनुवाद आहे.
अकाली मृत्यूमुखी पडलेली एक कोवळी मुलगी आणि तिची गांजलेली आई यांचे तरल भावविश्व कवीने अत्यंत प्रभावशाली शब्दचित्रातून रेखाटलेले आहे. मनावर खोल परिणाम साधण्यात ही कविता यशस्वी ठरते. आपण कधी न भेटलेल्या वा कधी कल्पना न केलेल्या लोकांचे दुःख आपलेसे वाटावे या भावनेपर्यंत वाचकाला घेऊन जाण्याचे सामर्थ्य या कवितेत आहे. मुलगी आणि आई यांचे भावबंध अगदी हळव्या शैलीत रेखाटताना निसर्गाचा खुबीने वापर केला आहे. कवितेत असणारी डार्क शेड बेचैन करून सोडते. आपण हतबल असण्याची भावना तीव्र करून जाते.

- समीर गायकवाड.
______________-____________________________________________________________