शनिवार, २४ मे, २०२५

परंपरेच्या आडून भरणारा वासनांचा बाजार!


ही गोष्ट आहे एका लिलाववजा बाजाराची जिथे वयात आलेल्या मुलीची, तरुण स्त्रीची आणि पोक्त महिलेची बोली लावली जाते. इथे बायकांचा बाजार भरवला जातो. सोबतच्या फोटोतली निळ्या लहंग्यामधली मुलगी कंवरबाई आहे. तिचं मुळचं नाव अनिता. ती मध्यप्रदेशातील शिवपूरीची. बंचरा या भटक्या जमातीत तिचा जन्म झालेला. या जातीत एक प्रथा पाळली जाते, घरातील थोरल्या स्त्रीने घर नीट चालावे म्हणून बाहेरख्याली व्हायचं. त्यासाठी या बायकांचा रीतसर बाजार भरतो. बंचरा समाजाच्या तरुण पिढीच्या प्रयत्नांना फारसे यश आले नाही. परंपरेच्या नावाखाली आपल्या मुलींना वेश्याव्यवसाय करायला लावावे असे आजही अनेक पुरुषांना वाटते. एकेकाळी या जमातीमधील कर्त्या पुरुषांनी आपल्या मुली स्थानिक सरदारांना देण्यासाठी गरीब समाजबांधवांवर दडपण आणलं. पुढे जाऊन याचीही परंपरा तयार झाली. आपल्या मुलींची बिनपैशाची सोय लागते या नीच स्वार्थी हेतूने हा रिवाज कधीच बंद झाला नाही!

वायव्य मध्य प्रदेशातील राज्य महामार्ग एकतीसच्या बाजूने मंदसौर ते नीमच हा प्रवास भारतीय ग्रामीण भागातील नेहमीच्या देखण्या पार्श्वभूमीवर होतो. नीमच, मंदसौर आणि रतलाम जिल्ह्यांतील सत्तरेक 'डेरा' - वस्त्यांमध्ये - समुदायाचे हजारो लोक विखुरले आहेत. मंदसौरमध्ये त्यांची वस्ती इंदूरपासून सुमारे दोनशे किमी अंतरावर आहे. ही बंचरांची भूमी आहे, ज्या समुदायासाठी मुली अप्रत्यक्षरित्या धंद्याला लावणं हा जीवनमार्ग झाला आहे. कुटुंबातील मोठी मुलगी एक प्रकारची वेश्या बनते आणि ती वृद्ध होईपर्यंत कुटुंबासाठी कमावते. तिची पाळी गेल्यावर म्हणजेच ती भाकड(!) झाल्यावर दुसरी तरुण मुलगी तिची जागा घेते. कुटुंबातील पुरुष सदस्य पिंपाचे काम करतात. यामुळॆच या हायवेवर संपूर्ण भागात रस्त्याच्या कडेला मुली दिसतात! त्यांचे चेहरे सुंदररित्या रंगवलेले असतात आणि त्यांच्या कमाईच्या दिवशी म्हणजे रविवारी त्या सर्वोत्तम पद्धतीने सजलेल्या असतात, रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या पुरुषांना या अडवत असतात आणि गटांमध्ये किंवा एकट्याने ग्राहकांना विनंती करतात. यातल्या बहुतेक मुली अल्पवयीन असतात! जे विकृत लिंगपिसाट असतात त्यांच्यासाठी हा रस्ता म्हणजे लैंगिक सुखाचा आनंदमार्ग होय!

या मुलींचा बाजार अगदी रीतसर भरतो! कुणालाही लाज वाटावी वा शरमेने मान खाली जावी अशी ही प्रथा! अगदी थेट स्टॅम्पपेपरवर करारपत्र करून यांची विक्री केली जाते. दहा रुपयापासून ते दहा हजार रुपयांपर्यंतची बोली लागते आणि एका वर्षासाठी त्या बाईचा पाट लावून दिला जातो. थॊडक्यात त्या अभागी मुलीला एका वर्षाचा नवरा करून घ्यावा लागतो. करारानुसार वर्ष पूर्ण होताच तो पुरुष तिला सोडून देतो मग ती पुन्हा बाजारात उभी राहते, पुन्हा तिची बोली लागते. चुकून एखाद्या वर्षी तिची बोली लागलीच नाही तर तिचा सख्खा भाऊ किंवा तिचा जन्मदाता बाप तिचा दलाल बनतो आणि तिला पुरुष सहवास घडवून आणतो. जोवर तिची मासिक पाळी बंद होत नाही तोवर ती याला नकार देऊ शकत नाही, ती भाकड होऊन बिनकामाची झाल्यावर तिची जागा दुसऱ्या ज्येष्ठ स्त्रीला / मुलीला घ्यावी लागते. मग ती तिची मुलगी असू शकते, सून असू शकते वा रक्ताच्या नात्यातली आणखी कुणीही असू शकते.

मध्यप्रदेशातील मंदसौर, नीमच आणि रतलाम या तिन्ही जिल्ह्यात या मुलींचं रीतसर बोभाटा करून शोषण होतं, ज्याला स्टॅम्पचा आधार घेतला जातो! आपल्या देशातील हायवे सेक्सचा ट्रेंड आणि हायवे ह्युमन ट्रॅफिकिंगचे जनकत्व रतलाम नीमच हायवेवर चालणाऱ्या सेक्सवर्किंगला द्यावं लागतं, ज्याला कारणीभूत ही किळसवाणी प्रथा आहे. बोली न लागलेल्या मुली सर्रास नीमच रतलाम हायवेवर उभ्या पाहायला मिळतात, तेही अगदी स्वस्तात! ही प्रथा बंद व्हावी म्हणून आजवर अनेकांनी व्यक्तिगत पातळीवर तर काही एनजीओंनी संस्था स्वरूपात तक्रारी करून पाहिल्या. प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेण्यात आलं, पण एकही पीडित स्त्री आजवर तक्रार देण्यासाठी पुढे आलेली नाही हे वास्तव आहे. खाकरीया खेरी गावात पन्नास वर्षीय निर्मला यांनी आपल्या आयुष्यातला बहुतांश काळ वेश्या म्हणून व्यतित केलाय. त्यांची पंचवीस वर्षांची तरुण मुलगी रोमा हिला देखील हाच व्यवसाय स्वीकारणं भाग पाडलं गेलं. रोमाने रोजंदारीवर काम करणाऱ्या मुकेशशी लग्न केले. त्याच्यापासून तिला दोन मुले झालीत जी शाळेत जात आहेत. रोमाची इच्छा आहे की तिच्या मुलाबाळांनी वेगळा मार्ग धुंडाळला पाहिजे, या दलदलीत त्यांनी येऊ नये असं तिला मनोमन वाटतं. तिच्या मुलींच्या समवयीन असणाऱ्या अनेक मुलींना केवळ पर्याय नसल्याने आणि परंपरा जारी असल्यामुळे वेश्याव्यवसायाकडे नेले जाते.

1998 मध्ये 'निर्मल अभियान' या मोहिमेअंतर्गत बंचरांच्या वसाहतींना वेढा घालून काही अल्पवयीन मुली ताब्यात घेण्यात आल्या होत्या ज्यांनी आपल्याला जबरदस्तीने डांबून ठेवल्याची तक्रार देण्यास संमती दर्शवली होती. या मुलींना पुढे इंदूर येथे वसतीगृहात ठेवलं गेलं, पण नंतर जे व्हायचं होत तेच झालं. 2014 मध्ये यांच्यवरची आजवरची सर्वात मोठी पोलीस कारवाई झाली ज्याचा परिणामस्वरूप हायवेवरील सेक्सदेखील तब्बल सहा महिने बंद पडलं, पण पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या' सुरु झालं. जेव्हा छापे टाकण्यात आले तेव्हा बंचरा समाजात घबराट पसरली होती कारण अनेकांना अटक करण्यात आली होती आणि त्यांच्यावर मानवी तस्करीचा आरोप होता. रतलाम-नीमच महामार्गावर अनेक बंचरा ज्यांना अटक करण्यात आली नाही आणि दुकान बंद करण्यात आले नाही अशा बंचरा मुली दिसत होत्या. पण ते सहा महिने चालले. मुळात ही प्रथा बंद व्हावी अशी कोणत्याही राजकीय पक्षाची तीव्र इच्छा नाही, कारण बिस्तर गरम करायला स्वस्तात निर्धोक माल मिळत असेल तर कोण सोडेल? आणि कुठला राजकीय पक्ष यापासून दूर आहे? कुणीच नाही. उलट राजकीय पक्षांचे पाठबळ असलेले सेक्सवर्कींगमधले दलाल आणि या मुलींचे आप्तेष्ठ यांचे नेक्सस इथे दिसून येतं.

नाही म्हणायला पप्पू दायमा नावाच्या तरुणाने 'बंचरा समाज सुधार समिती'ची स्थापना करून काही महिलांचे मतपरिवर्तन केलंय, कारण पुरुषांना त्याचे हे उद्योग पसंत नाहीत. पप्पू दायमा यांना वाटतं की, 'समाजातील वयस्क धुरिणांना परंपरेच्या नावाखाली निष्क्रिय बसायचे आहे आणि आपल्या मुलींना वेश्या बनवायचे आहे. त्यांचे बहुमत आहे आणि सर्व आधुनिक बदलांना ते विरोध करतात. खेरीज अशीही परंपरा आहे की ज्या कोणत्याही मुलाला बंचरा मुलीशी लग्न करायचे असेल तर वधूपिता त्याला हुंडा मागतो. गरीब बंचरा पोरांना वधू शोधणे कठीण जात आहे, त्यामुळे मुलींची लग्ने होण्याचे प्रमाण कमी आहे पर्यायाने त्यांना बाजारात उभं करणं सोपं जातं. मुलींना कर्मठ अनैतिक व्यवहार - वातावरणातून बाहेर काढले पाहिजे आणि योग्य शिक्षण दिले पाहिजे आणि त्यांना पर्यायी जीवनाचा मार्ग दाखवला पाहिजे. वास्तवात ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे आणि ज्येष्ठ प्रभावी लोकांकडून यासाठीची वचनबद्धता आवश्यक आहे असं दायमा यांना वाटतं.

पप्पूंच्या मताचे समर्थन करणाऱ्या तरुणांना वाटते की, आपल्या मुलींना वेश्या म्हणून काम करायला लावणाऱ्या बंचरा पालकांविरुद्ध कठोर पोलिस कारवाई केली गेली आणि त्याला सरकारी पाठिंबा मिळाला तर ही प्रथा संपुष्टात येऊ शकते. यामुळे पप्पू नव्या पिढीबाबत आशादायी आहेत, कंवरबाई ही पहिली स्त्री ठरलीय जिने पहिलं लग्न केल्यानंतर बाजारात उभं राहण्यास नकार दिलाय. दुर्गा आणखी कोण असते ? जी दुर्जनांच्या शोषणाविरुद्ध उभी राहते, जिच्या बाजूने कुणीही नाही अगदी जन्मदाते आईबापही नाहीत तिथं समाज नावाच्या लांडग्यांना तोंड देणं म्हणजे साधी बाब नव्हे! पप्पू दायमाच्या कार्यात आणखी दुर्गा सामील होतील याची मला खात्री आहे. "यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः" हे आपले दाखवायचे दात आहेत, खायचे दात काही और आहेत ज्या बद्दल बोलण्यास सक्त मनाई आहे!

दुसऱ्या फोटोतलं जोडपं म्हणजे मुकेश आणि दिव्या आहेत, ज्यांनी पहिल्यांदा विद्रोह केला आणि वर्ष पूर्ण झाल्यानंतरही दांपत्य म्हणून राहण्याचा निर्धार केला. या युगुलाला संपवून टाकण्यासाठी समाजाने जंग जंग पछाडलं पण पप्पू दायमांनी त्यांना आश्रय दिला. ही क्रूर प्रथा संपवण्याच्या तरुण पिढीच्या प्रयत्नांमुळे अनेक तरुणांचे समाजातील वडिलधाऱ्यांशी भांडण झाले आहे पण अनेकजण या जोखडातून सुटण्यात यशस्वी झाले आहेत. अनेकांनी व्यवसाय सोडला, शिक्षण घेतले आणि काहींना सरकारी नोकऱ्याही आहेत. त्यापैकी एक ‘पटवारी’ बनला आहे तर इतर अनेक परिचारिका, शिक्षक आणि वन विभागाचे कर्मचारी आहेत.

काही प्रमाणात बदल होऊनही, हा कलंक कायम आहे. सुस्थितीत असलेले अनेक बंचरा ‘डेरा’ मधून जवळच्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये स्थलांतरित झाले आहेत आणि त्यांनी स्वतःला ‘सोंढिया राजपूत’ म्हणवून त्यांचे आडनावही बदलले आहे. मध्य प्रदेशच्या मध्यभागी, जिथे रतलाम-मंदसौर महामार्ग देखण्या लँडस्केपमधून मार्ग काढतो, तिथे एक भयानक वास्तव समोर येते. या भागामध्ये, माननखेडा गावातील बंचरा जमातीतील महिला रस्तोरस्ती दिसून येतात. भडक कपड्यातल्या आणि तितक्याच भडक मेकअपचे थर चेहऱ्यावर लेपलेल्या अवस्थेतल्या या मुली पाहवत नाहीत. रस्त्याच्या कडेने बाज टाकून त्यावर या मुलींना बसवलेलं असतं. ग्राहकांना आकर्षित करण्याच्या आशेने या स्त्रिया कधी ट्रक ड्रायव्हर्सना तर कधी आलिशान कारमधील पुरुषांना खाणाखुणा करत असतात. जगाच्या एका निर्जन कोपऱ्यात आपल्या देहाचं रूपांतर एका भोगवस्तूमध्ये झालं आहे हे त्यांच्या गावीही नसतं.

अत्यंत वाईट गोष्ट अशी की जन्माला येऊन डोळे उघडण्याआधी या धंद्यात येण्याचं काहींचं नक्की झालेलं असतं! अशा मुलीच्या आईला वा तिच्या गर्भात वाढणाऱ्या मुलीला या कुकृत्यास नकार देण्याचा शून्य अधिकार असतो! बालवयात मैदानात खेळणाऱ्या यांच्यापैकीच एक असणाऱ्या तीन, पाच आणि सात वर्षांच्या लहान मुलींना लग्नाचा नेमका अर्थही कळत नाही. पण ते कोणत्या वर्षी केलं जाईल याची त्यांना जाणीव असते. काही मुलींना हा धंदा त्यांच्याच गावात करावा लागतो, त्यांना कसे वाटत असेल! त्यांच्या बरोबरीच्या मुली शिक्षण घेत असतात, स्वच्छंदपणे बागडत असतात आणि यांना मात्र रोज नित्य नेमाने कुस्करलं जातं! अक्षरश: त्यांच्या काळजाचं पाणी पाणी होत असावं! त्यांच्याच कुटुंबातले काही लोक त्यांची दलाली करतात याचा त्यांना किती धक्का बसत असेल नाही का! हा समाज याला निर्ढावला आहे असंही म्हणवत नाही कारण कोणत्या मुलीला आवडेल की तिचे भाऊ, बाप, चुलते यांनीच तिची बोली लावावी! अवघ्या 12 ते 14 वर्षे वयाच्या मुलींना त्यांच्याच पालकांकडून या नीच व्यवसायात ढकललं जातं. या मुली काही अपवाद वगळता वा जवळजवळ सर्वच मुली त्यांच्या स्वतःच्या गावाच्या हद्दीत राहतात, जिथे त्यांच्या पोटी अनैतिक, लावारिस म्हणून लेबल असलेली अपत्ये जन्माला येतात. काही काळ विरोध केल्यानंतर त्यांना कळून चुकते की वेश्याव्यवसाय हीच त्यांची जीवनशैली बनली आहे आणि ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे, सबब आपण काहीच करू शकत नाही हे त्यांच्या मनावर बिंबवले जाते. तरुण मुलींना त्यांच्या पूर्ववर्तींच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी काळजीपूर्वक तयार केले जाते, कुटुंबातील पुरुष सदस्यच त्यांच्या श्रमाचे फायदे घेतात.

नीमचला जवळून ओळखणारे लोक सांगतात की ब्रिटिश काळात बंचरा आदिवासींना राजस्थानमधून नीमचमध्ये आणलं गेलं. त्या काळात जे इंग्रज आपल्या बायकांसह भारतात आले नाहीत ते भारतीय महिलांचे शारीरिक शोषण करायचे. ही परिस्थिती पाहून स्थानिक राजा दुखावला गेला. त्यानंतरच बंचरा कुटुंबियांना राज्यात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. बंचरांच्या आगमनानंतर स्थानिक महिलांशी इंग्रजांची जबरदस्ती थांबली. ब्रिटिशांनी 1947 मध्ये देश सोडला आणि 20 वर्षांनंतर 1967 मध्ये सीआरपीएफ नीमचमध्ये आले. नीमच हे सीआरपीएफचे पहिले कॅम्प असल्याचे सांगितलं जातं. त्यानंतर बंचरा येथेच राहिले. ते कुठेही गेले नाहीत. जेव्हा-जेव्हा बंचरांबद्दल माध्यमांमध्ये मोठी बातमी आली, तेव्हा लगेचच त्यांच्या पुनर्वसनाची चर्चा व्हायची. त्यांना हमरस्त्याच्या एका कडेला दूरवर लोटण्यात आले आणि नंतर ही बातमी जुनी झाल्यावर सर्वजण त्यांना विसरले आणि ते पुन्हा रस्त्याच्या कडेला राहायला आले. म्हणजेच या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जेव्हा-जेव्हा प्रयत्न झाले, तेव्हा ते प्रशासकीय किंवा सरकारी नाकर्तेपणामुळे अपयशी ठरले.

बंचरा समाज लिंगभेदाच्या दलदलीतून बाहेर पडू शकला नाही. कालांतराने बंचरांना आणखी एक गोष्ट कळून चुकलीय की मीडिया हा त्यांचा हितचिंतक नाही! त्यांची इच्छा असो वा नसो, प्रसारमाध्यमांकडून त्यांना कोणताही लाभ मिळू शकत नाही, असा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला आहे. मीडियाचे लोक त्यांच्यात येतात ते फक्त त्यांचे नुकसान करण्यासाठी हे त्यांना उमगलं आहे. त्यामुळेच मध्यंतरी एके दिवशी बंचरांच्या जातपंचायतीमध्ये असे ठरलं की कोणताही बंचरा मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर येणार नाही. मात्र काही मुली आपलं मन रितं करण्यासाठी संवाद साधायला नेहमीच तयार असतात. दिवसा यांच्या घरातून पुरुष गायब असतात, आपल्यापैकी कुणीही दिवसा किंवा रात्री त्या घरात जाऊ शकतो मात्र दिवसा यांच्या कुटुंबात फक्त महिलाच आढळतात. बंचरांच्या कुटुंबियांना असे वाटते की, त्यांच्या घरात दुसरा माणूस दिसल्यानंतर घरी येणारे पाहुणे छछोर टवाळखोर असणार नाहीत. बाहेरून आलेला पुरुष ज्या स्त्रीसोबत समागम करू इच्छितो तिचा नवरा घराबाहेर कॉटवर बिडी ओढत बसला आहे हे कळल्यावर कोणता भारतीय पाहुणा त्या भयंकर दारुण अवस्थेतील मुलीच्या घरात येईल? या मुलींना कोणतेही ठोस भवितव्य नाही की कोणत्या सरकारी योजनाही त्यांच्यासाठी राबवल्या जात नाहीत.

काही कुटुंबे बंचरांची शिबिरे घेताना आढळतात. या कुटुंबांमध्ये तीन श्रेणीतील महिला राहतात. पहिली म्हणजे सेक्स वर्कर. दुसऱ्या म्हणजे ज्या एकेकाळी सेक्स वर्कर होत्या आणि ज्यांना भविष्यात सेक्स वर्कर बनण्याचे प्रशिक्षण दिले जाते त्या म्हणजे तिसऱ्या श्रेणीतल्या महिला होत. हे भोग वाट्याला आलेल्या बंचरा मुलीला या तीनही वर्गवारीमधून जावे लागते. तिचा एकदा तरी बाजार भरतोच! नीमच रतलाम हायवेवर यातल्याच काही मुली दिसतात, लोक गाडीचा स्पीड कमी करतात, सौदा ठरतो, हायवेलगतच्या ढाब्यात यांच्या अंगावरची वस्त्रं उतरत राहतात; बाजूने रस्ता अखंड वाहत असतो, जिथं तथाकथित सभ्य पांढरपेशी समाज आपल्या लूतभरल्या दुनियेचं गंधं अंडं आपल्या बुडाखाली अलगद उबवत असतो!

एकीकडे आपण आपल्याच कोशात जगत असतो नि दुसरीकडे आपल्या पांढरपेशी विश्वास समांतर परिघात एक अशी दुनिया नांदत असते जी आपल्या खिजगणतीही नसते! या दुनियेत वासनांचा बाजार भरतो आणि या बाजारात विकल्या गेलेल्या मुलींच्या आयुष्याचे कायम धिंडवडे निघतात! सरकार, प्रशासन आणि समाज नाकर्त्याच्या भूमिकेत असतो! बाजारातून एखादी बाई नाममात्र किंमतीत भोगायला मिळाली तर कोणाला नको असते! या बाजाराच्या यशस्वी परंपरेचे हे पाशवी गमक आहे, कुणास पटो अथवा न पटो हे कटूसत्य आहे! वासनांना परंपरेच्या वस्त्राआड लपेटले की त्या बाजाराचे आपल्याला फारसे शल्य नसते, कारण आपण आपल्या परंपरांचे गळू मोठ्या आनंदाने जोपासत असतो मग ते चांगले असो वा वाईट असो आपल्याला त्याचे घेणे देणे नसते! विवेक लोप पावत चाललेला समाज आणखी काय करणार!

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा