शनिवार, ३१ मे, २०२५

एकमेवाद्वितीय - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर!

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  

महाराणी महान रयतप्रेमी होत्या. रयतेचे हालहवाल जाणून घेण्यासाठी त्यांचे गुप्तहेर रयतेत फिरत असत. एकदा एका हेराने खबर आणिली की, लक्ष्मीबाई नामे एका विधवा वृद्धेची सकल संपत्ती ऐवज रुपये पंधरा हजार तिच्या मुलाने जबरदस्तीने काढून घेऊन पत्नीच्या स्वाधीन केली असे. ही माहिती ऐकताच राणीबाईंना संताप अनावर झाला. त्यांनी तत्काळ त्या वृद्धेच्या सुनेला एक खलिता धाडला आणि विधवा सासूचे पैसे परत करण्याकरिता बजावले. त्यांनी नुसता आदेश दिला नाही तर सज्जड दम दिला. सुनेने रक्कम परत केली राणीबाईंनी ती रक्कम त्या अभागी सासूला परत केली. या प्रसंगी धाडलेल्या खलित्याचा तजुर्मा - 
'चिरंजीव साळूबाई वाघ यासी अहिल्याबाई होळकर यांचा आशीर्वाद. गंगाजळ निर्मळ लक्ष्मीबाई वाघ यांजकडून चिरंजीव अमृतवराव वाघ याने अमर्याद करून ऐवज पंधरा हजार घेऊन तुम्हापासी ठेविले. ते हुजुरी आणले पाहिजेत. यास्तव सरकारातून पागेचे स्वारासमागमे हे पत्र तुम्हास लिहिले आहे. तरी एक घडीचा विलंब न करता रुपये पंधरा हजार स्वारासमागमे पाठवावे. ढील केल्यास परिच्छन्न उपयोगी पडणार नाही. जाणिजे.'

रयतेविषयी विलक्षण ममत्व असणाऱ्या त्या राणीबाई साहेब म्हणजे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर! अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी अनेकांनी अनेकदा लिहिलंय. हा थोडा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न. एखाद्या व्यक्तीने सर्व जिवलग नातलगांचे मृत्यू एका पाठोपाठ एक होताना पाहिले असतील आणि तरीदेखील त्या व्यक्तीचा वज्रनिश्चय कायम असेल तर नि:संशय ती व्यक्ती असाधारण असते.

३१ मे १७२५ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी येथे माणकोजी आणि सुशीलाबाई शिंदे यांच्या पोटी त्यांचा अहिल्यादेवींचा जन्म झालेला. त्या आठ वर्षांच्या असताना पेशवे आणि मल्हारराव होळकर चौंडी येथे आले होते. निर्भय, चौकस, कामसू आणि चुणचुणीत अशा बालवयीन अहिल्याला पाहून पेशव्यांनी मल्हाररावांना सांगितलं की, हिला तुमची सून करून घ्या!

पेशव्यांनी पुढाकार घेऊन शनिवारवाड्यासमोर थाटात लग्न लावलॆ. आठ वर्षांच्या अहिल्यादेवींचे लग्न मल्हारराव होळकर यांचे एकुलते पुत्र खंडेराव यांच्याशी झाले. बालवयीन अहिल्या आपल्या माता पित्यांचा निरोप घेऊन थेट मध्यप्रदेशातील इंदूरच्या होळकर वाड्यात आल्या. सारा दिनक्रम समजून घेऊन त्यांनी अनेक कामात लक्ष घालायला सुरुवात केली. त्यांचा कामाचा उरक पाहून आणि काम करण्याची पद्धत पाहून मल्हारराव अत्यंत प्रभावित झाले, त्यांनी अहिल्यादेवींवर अधिकाधिक जबाबदाऱ्या सोपवण्यास सुरुवात केली. अहिल्यांचे पती खंडेराव तुलनेने तितके क्रियाशील नव्हते.

पत्रांची नेआण करण्याची व्यवस्था लावण्यापासून तोफखाना हाताळण्यापर्यंतची सर्व प्रशासकीय व सैनिकी कामे त्या करू लागल्या. १७४५ मध्ये त्यांना मालेराव हा मुलगा झाला आणि १७४८ मध्ये मुक्ता ही मुलगी त्यांच्या पोटी जन्मास आली. अहिल्येच्या हाती राज्यकारभाराची दोरी देऊन होळकर पितापुत्र त्यांच्या राज्याच्या कक्षा रुंदावत होते. या दरम्यान आहिल्यांवर पहिला आघात झाला. २० जानेवारी १७५४ रोजी त्यांचे पती खंडेराव हे एका सैनिकी वेढ्यात तोफगोळा लागून मरण पावले.

अहिल्यादेवींचे आपल्या पतीवर निस्सीम प्रेम होते. मुलांची माया बाजूला ठेवून त्या सती जायला निघाल्या. इथे मल्हाररावांनी त्यांना अडवले. त्यांची मनधरणी केली. या प्रसंगी मल्हारराव जे बोललेत ती आपली मराठी मनाची ओळख होय. मल्हारराव म्हणतात, "मुली तू माझ्या आयुष्याचा आणखी उन्हाळा करू नको. तुला माझा लेक समजूनच दौलतीचा कारभार तुझ्या हाती सोपवला होता. तू जर हा सती जायचा निर्णय बदलला तर मी असे समजेन की जो इहलोकाला गेला तो जीव अहिल्येचा होता आणि आता जो जीव जिवंत आहे तो माझा खंडेराव आहे!" आताचे हावरट हगवणे सासरे एकीकडे आणि तीनशे वर्षांपूर्वीचे मल्हाररावांच्यासारखे करारी सासरे एकीकडे! किती अध:पतन झालेय आपले! असो.

पितासमान सासऱ्यांनी समजावून सांगताच अहिल्यादेवींचे मन परिवर्तन झाले. त्या सती गेल्या नाहीत. मग मात्र मल्हाररावांनी हाताचे काहीही न राखता अहिल्यादेवींना सारी राज्यसूत्रे शिकवली. अहिल्या तरबेज झाल्या. आणि दुसरा आघात झाला. १७६६ मध्ये आयुष्यभराची धावाधाव आणि परिश्रम यांनी शिणलेले मल्हारराव मरण पावले. अहिल्याबाई खचल्या नाहीत कारण त्यांच्या सासऱ्यानेच त्यांना हे बाळकडू दिले होते. नियती इथेच थांबली नाही. मल्हाररावांच्या निधनानंतर अवघ्या एक वर्षाने अहिल्यादेवींचा एकुलता एक मुलगा मालेराव याचे अल्पकालीन आजाराने आकस्मिक निधन झाले. दुर्दैवाची गोष्ट अशी की मालेरावांचे लग्न झाले होते नि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी सती गेली. अहिल्याबाई आपल्या सासऱ्याच्या सांगण्यावरून सती गेल्या नाहीत मात्र त्यांच्या अथक विनवणीनंतरही त्यांची सून सती गेली. याचे त्यांना विलक्षण दुःख झाले.

पती, सासरा आणि मुलगा यांच्या निधनानंतर अहिल्यादेवींनी राजेशाही इंदूरचा निरोप घेतला आणि त्या नर्मदेकाठी असलेल्या महेश्वरला आल्या. नदीतटावर असलेल्या भुईकोट किल्ल्यातील एका साध्या वाड्यात राहू लागल्या. त्यांच्या पदरी वारस नसल्याने अनेकांनी त्यांच्याविरोधात कटकारस्थाने केली, मात्र त्या सगळ्यांना पुरून उरल्या. त्यांनी थेट पेशव्यांशी बोलणी करून जहागिरीच्या कारभाराची सूत्रे स्वतःच्या नावे करून घेतली. मग त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यांच्या मुलुखाचे संरक्षण करण्याच्या जबाबदारीचे काम दूरच्या नात्यातील शूर कर्तबगार आणि तरुण अशा तुकोजी होळकर यास सोपवले.

अहिल्याबाईंनी महे श्वरचा विकास करण्याचा ध्यास घेतला, तिथे विणकर वसवले. त्यांच्या कारागिरीला पाठबळ दिले. आजही महेश्वरी साडी प्रसिद्ध आहे. आता त्यांना मुलीच्या लग्नाचे वेध लागले होते. कल्पना करा की एका ऐश्वर्यसंपन्न जहागिरीच्या एकुलत्या एक वारस मुलीचे लग्न करायचे झाले तर तिचे पालक अधिकाधिक तालेवार आणि बड्या घराण्यात तिची सोयरीक जुळवतील. मात्र अहिल्यादेवी याला अपवाद होत्या. त्यांनी वेगळा निर्णय घेतला. त्या काळात पेंढाऱ्यांचा जुलूम होता. जो कुणी त्यांचा बंदोबस्त करेल त्याच्याशी आपल्या मुलीचे लग्न लावले जाईल असा त्यांनी पण जाहीर केला. यशवंत फणसे या कर्तबगार तरुणाने आपल्या तलवारीच्या बळावर पेंढाऱ्यांचा कासरा आवळला. अहिल्यादेवींनीं मुक्ताचे लग्न त्यांच्याशी लावून दिले.

या दरम्यान अहिल्यादेवींनी थेट दिल्लीच्या पातशहापर्यंत आपला दरारा वाढवला. मंदिरांचे जीर्णोद्धार केले, नद्यांच्या काठी घाट बांधले, सात बारा उतारा ही त्यांची कल्पना. त्यांच्या कारभारात प्रजा सुखी झाली. हा भाग प्रामुख्याने माळवा प्रांतात येतो. तिथल्या अनेक अनिष्ठ रूढी परंपरा त्यांनी मोडीत काढल्या. त्या श्रद्धाळू होत्या मात्र कर्मकांडे करण्याऐवजी त्या निस्सीम भक्ती करत असत. त्या प्रखर शिवभक्त होत्या. त्यांच्या प्रत्येक पात्राची सुरुवात श्री शंकर आज्ञेकरून अशी झालेली आहे, यावरून लक्षात यावे की आपला राज्यकारभार त्या शंकराच्या नावे करत असत. मुलगी मुक्ता आणि जावई यशवंत यांच्या पोटी जन्मलेला मुलगा नत्थू मोठा होत होता, अहिल्यादेवींच्या मनात होते की, सारा राज्यकारभार त्याच्या हाती सोपवून शिवभक्तीत लीन व्हावे!

सारे काही सुरळीत चालले आहे असे वाटत असतानाच पुन्हा एकदा त्यांच्यावर एका पाठोपाठ एक आघात झाले. अकस्मात एका आजाराच्या फेऱ्यात अडकलेला नत्थू एकाएकी मरण पावला. त्याच्या मरणोपरांत त्याची कोवळी अल्पवयीन पत्नी लाख मिनतवाऱ्या करूनही सती गेली. या घटनेचा वडील यशवंत फणसे यांच्यावर गंभीर परिणाम झाला. ते पुत्रशोकात मरण पावले. कोवळा मुलगा, कोवळी सून आणि पती गमवलेल्या मुक्ताला जगण्याची इच्छा उरली नाही. ती देखील सती गेली. अशा प्रकारे अहिल्यादेवींच्या रक्ताची सारी माणसं एकेक करून त्यांना कायमची सोडून गेली.

यानंतरही अहिल्यादेवी वज्रनिश्चयी राहिल्या. युद्ध केले तर आरपारचे केले पाहिजे, रोज उठून रयतेला जगणे मुश्किल होईल अशी युद्धखोरी कामाची नाही असे त्यांचे म्हणणे असे. त्यामुळे रोज उठून युद्धमोहीमा राबवणे आणि अघोरी साम्राज्यविस्तार करणे याच्या विरोधात त्यांचे मत असे. तो पैसा रयतेच्या कल्याणासाठी वापरला पाहिजे असे त्या म्हणत. त्यांच्या या विचारांपायी तुकोजी होळकरांना कमी निधी देत. यामुळे खार खाऊन असणारे तुकोजी त्यांना जमाखर्च मुद्दाम उशिरा देत. त्यांच्यात ही इतकीच बेकी होती. एकदा तुकोजी होळकरांनी अहिल्यादेवींविरोधात पेशव्यांकडे तक्रार केली.

त्यांच्या तक्रारीची दखल घेत नाना फडणवीसांनी महादजी शिंदे यांनां खलिता धाडला आणि बाईंना समज द्या असे बजावले. याला महादजी शिंदे यांनी खरमरीत उत्तर दिले. त्यात ते म्हणतात, "नाना समजत असतील चिंता कांय? पाच हजारी फौज माहेश्वरी पाठवूमी बाईचा बंदोबस्त करू. तुम्ही सारे शहाणेच आहात, पण बाई साऱ्यापेक्षा अधिक शहाणी आहे. संशय आला तर ती कोणासही बधायची नाही. पैसा व बुद्धी दोन्ही तिच्यापाशी मजबूत आहे. दौलतीचा नाश होईल मग सर्वांचे डोळे उघडतील. बाई दुसऱ्याच्या हाताने घास घेत नाही!"

स्त्रिया अधिक संवेदनशील असतात. त्या मरणदुःखे पचवू शकत नाहीत असे म्हटले जाते. मात्र आयुष्यभर ज्यांनी आपल्या जवळची माणसं एकेक करून मरताना पाहिली त्या अहिल्यादेवी याला अपवाद होत्या. प्रजाहितदक्ष आणि रयतप्रिय राजवट राबवताना त्यांनी कुशल राज्यव्यवहार कसा करावा याचे दाखले दिले. रयतेचे सुख हे रियासतेचे प्रथम आणि अंतिम लक्ष्य राहिले पाहिजे यावर त्यांचा जोर होता!

अहिल्यादेवींच्या समकालीन परिघात येसूबाई, ताराराणी आणि पेशव्यांच्या राधाबाई रमाबाई गोपिका नि आनंदीबाई होत्या! तर समाजकारणात जनाबाई, मुक्ताबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई या गौरवशाली महिला कार्यरत होत्या. त्या काळाच्या पटलावर अहिल्यादेवींनी अमीट ठसा उमटवला. आणि आपण काय केलं? तर आपण त्यांना जातीच्या चौकटीमध्ये मर्यदित करण्याचा निकराचा प्रयत्न करतो! त्यांच्या जयंतीच्या दिवशी मोठमोठाल्या मिरवणुका काढून सामान्य जनतेला विविध त्रासांना सामोरे जाण्यास भाग पाडतो! अर्थातच तमाम महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीस अलीकडे आपण फक्त आणि फक्त इतकेच करत असतो. त्यांच्या विचारांचा जागर आपण करत नाही कारण तेव्हढी आपली ऐपत नाही आणि कुवतही नाही! इतकी मोठी महान माणसं आपल्याकडे होऊन गेली मात्र आपलं कद्रूपण इतकं की त्यांचे विचार नव्याने जाणून घेण्याचीही तसदी आम्हाला घ्यावीशी वाटत नाही! या थोर लोकांच्या शिकवणींचा आम्हाला विसर पडलाय त्याचेच तर हे द्योतक नाही ना!

'ईश्वराने माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे, तिला मला निभवायचेय!' या देदीप्यमान विचाराने काम करणाऱ्या अहिल्यादेवी या जगातल्या एकमात्र महिला आहेत ज्यांना पुण्यश्लोक ही उपाधी लाभली! ३०० व्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन!

- समीर गायकवाड

ही एक महत्वाची नोंद - मल्हारराव होळकर यांच्या निधनानंतर राघोबादादांना वाटले की आता हे राज्य आपण गिळंकृत करू शकतो. त्यांनी होळकरांचे कारभारी गंगोबातात्या यांना हाताशी धरून स्वारी केली. तर त्यांच्या फौजेला उत्तर देण्यासाठी अहिल्यादेवींनी महिलांचीही खास तुकडी उभी केली होती. पुढे जाऊन काळाने कूस बदलली. राघोबादादांची अवस्था वाईट झाली. त्या काळात त्यांच्या पत्नीने आनंदीबाईने अहिल्यादेवींना एक पत्र लिहून आपली अवस्था त्यांच्या कानी घातली, साह्य मागितले. या पत्रात त्या लिहितात- इंग्रजांच्या नादी लागू नका हा सल्ला मालकांनी मानला नाही. आता त्यांच्या नजरकैदेत आहेत. वाईट स्त्रियांची संगत आहे. इंग्रजांचा आम्हांवर भरवसा नाही. मी आजारी आहे. औषध व कपडा यासाठी पैसा नाही. तुम्हाशिवाय हे कुणाला लिहू?"

एका असहाय स्त्रीचे दुःख जाणून अहिल्यादेवींनी त्यांना सहकार्याचे आश्वासन दिले. त्यात मायेचा ओलावाही होता आणि राजकीय सावधपणाही होता. शरण आलेल्याला मरण नाही हे त्यांचे धोरण. साह्य मागणारी स्त्री पेशवे घराण्याची. पण सत्तेवर असलेल्या पेशव्यांनी केलेली बदसलुखी लक्षात घेता त्यांनी उत्तर दिले. सन्मानाने तर वागवायचेय मात्र मदत द्यायला परमुलुखात जायचे नाही हे तत्व पाळून अहिल्यादेवी लिहितात - पेशव्यांचे चाकर आम्ही. त्यांचे उपकार विसरणार नाही. आम्ही वडील भावजय, तुम्ही धाकटी नणंद. आपली साडीचोळी महेश्वर दरबारी येऊन घेऊन जावी!"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा