बुधवार, ५ नोव्हेंबर, २०२५

गोष्ट सुटकेसमध्ये ठेवलेल्या मृतदेहाची!


बेनाव्हिडेस हा मध्यमवयीन पुरुष. भरकटलेला आणि जगण्याच्या विविध समस्यांनी हैराण झालेला माणूस. एके दिवशी त्याच्या संयमाचा विस्फोट होतो, तो अत्यंत विचलित होतो. संतापाच्या भरात, तिशीच्या वयातल्या पत्नीची हत्या करतो. तिची हत्या केल्यानंतर काही वेळाने तो भानावर येतो. रागाच्या भरात आपण हे काय करून बसलो याचे त्याला शल्य वाटू लागते. तो गोंधळून जातो, आता काय करावे, हे काही केल्या त्याला सुचत नाही.  पत्नीचा मृतदेह तो एका मोठ्या सुटकेसमध्ये भरतो. खरेतर आपण ही सुटकेस घेऊन पोलिसांकडे गेले पाहिजे असं त्याचं एक मन सांगत असतं तर त्याचं दुसरं मन त्याला सांगतं की कदाचित डॉक्टर आपल्या पत्नीचे काय करायचे ते सांगू शकतील! द्विधा मनस्थितीत तो घराबाहेर पडतो.

बायकोचा मृतदेह असलेली जड सुटकेस घेऊन तो थेट डॉक्टरांकडे जातो. वाटेत त्याचे मन बदलते. आपण आपल्या गुन्ह्याची कबुली दिली पाहिजे असं त्याला राहून राहून वाटू लागतं. तो शॉकमध्ये गेलेला असला तरी हळूहळू त्याला वास्तवाची जाणीव होऊ लागते. आपण पोलिसांकडेच जाऊ आणि अपराध कबूल करू पण त्याआधी डॉक्टरांची मदत घेऊ अशा भावनेने तो दाखल होतो. 

तो डॉक्टरांच्या घरी जातो.पण परिस्थिती एक विचित्र गूढ भयप्रद वळण घेते. डॉक्टर सूटकेस उघडतात तेव्हा ते थक्क होतात, 
त्यांना ती एक शक्तिशाली देह कलाकृती वाटते. ते पोलिसांना फोन करण्याऐवजी आपल्या फोरेन्सिक  क्यूरेटर मित्राला, डोनोरियोला फोन करतात. डोनोरियोही सहमत होतो: “अद्भुत! भय आणि सौंदर्य! काय संयोजन!” किती कुशलतेने हे सारे कापले गेलेय असे ते दोघे म्हणू लागतात!

त्यांच्या फॉरेन्सिक नॉलेजमधले ते सर्व बेस्ट कट्स आहेत सं त्यांना वाटू लागतं. ते जवळपास हरखून जातात. आधी हे सर्व अतिरंजित वाटू लागतं, मात्र जो सराईतपणा त्यांच्या बोलण्यातुन प्रसवू लागतो तो आपल्या परिचयाचा वाटू लागतो, मग आपणही त्याचा आनंद घेऊ लागतो हे थक्क करणारे वास्तव इथे आकळते!

डॉक्टर आणि त्यांचा मित्र दोघे मिळून ठरवतात की, हा मृतदेह बॉडी कटींग परफॉर्मन्स आर्ट म्हणून प्रदर्शित करायचा! ते त्या कलाकृती''(!)ला नाव प्रदान करतात - व्हॉयलन्स! हिंसा! त्यांची बडबड ऐकून दिग्मूढ झालेला बेनाव्हिडेस गांगरून जातो. तो वारंवार आपला गुन्हा कबूल करायचा प्रयत्न करतो, आपला जघन्य अपराध सांगतो, पश्चात्ताप व्यक्त करतो! पण त्याचे शब्द दुर्लक्षित केले जातात. भूल देणारी औषधे देऊन त्याला शांत केले जाते. त्याच्या गिल्ट्ला आणि पश्चातापाला ते व्यवस्थित हाताळतात.

अखेरीस त्यांनी ठरवल्या प्रमाणे एका भव्य कला-प्रदर्शनात बेनाव्हिडेसला त्या मृतदेहासह सादर केले जाते. त्या देहाचे आकार आणि कट्स यांची कलात्मक चर्चा केली जाते. बेनाव्हिडेसची कबुली हे या सर्व कालेविषयीचे कलात्मक विधान समजले जाते. मोठ्या संख्येने उपस्थित असलेले प्रेक्षक टाळ्यांच्या गजरात त्याला दाद देतात. यासाठी खास उपस्थित असलेले निरीक्षक देखील उभं राहून सलामी देतात! स्टँडिंग ओवेशनने तो दडपून जातो! एव्हढा मोठा जमाव आपल्या गुन्ह्याचे उदात्तीकरण करुन आपल्याला टाळ्यांच्या गजरात गौरवतोय याने तो अचंबित होतो!

खरे पाहता त्या प्रचंड गर्दीतही तो स्वतःला एकाकी महसूस करतो. माणसांनी खचाखच भरलेल्या हॉलमध्ये बेनाव्हिडेस एकाकीच असतो, त्याच्या गुन्ह्यात, त्याच्या पश्चात्तापात, आणि त्या भीषण जीवघेण्या कलाकृतीच्या सावटात तो एकटाच असतो! इथे कथा संपते!

वास्तवात त्याने खून करूनही तो एकटाच तिथे एकाकी वेगळा असतो कारण त्याला एकट्याला या साऱ्या गोष्टींचा पश्चाताप होतोय, आपण चुकत असल्याची भावना त्याच्या एकट्याच्या मनात आहे. बाकी गर्दी त्या मृतदेहातही आपल्याला हवे ते शोधतेय!

समंथा श्वेब्लीन ह्या अर्जेटिनाच्या प्रयोगशील लेखिका. त्यांचं 
साहित्य जगभर वाचलं जातं. माऊथफुल ऑफ बर्ड्स हा त्यांचा कथासंग्रह 2008 मध्ये प्रकाशित झाला. यातल्या सर्व कथा भिन्न आशय विषयाच्या आहेत. बेनाव्हिडेसची वजनदार सुटकेस The Heavy  Suitcase of Benavides ही कथा याच कथासंग्रहातली आहे.

जगभरात मानवी हत्यांचे गांभीर्य कमी होत चाललेय. क्रूर आणि अमानुष पद्धतीची हत्या, अत्याचार असला तरच  त्याला थोडीफार प्रसिद्धी मिळते बाकी अपराध गुन्हे संख्यांच्या आकडेवारीखाली दबून जातात. आपण त्यांची मजा घेऊ लागतो. त्या आकडेवारीकडे आपण एक डाटा म्हणून पाहू लागतो, त्याचाही एक वेगळा आनंद घेऊ लागतो. त्या प्रकटनात आपण हे विसरून जातो की जेव्हा हत्या, बलात्कार होत होते तेव्हा आपण शांत होतो, गप्प बसून होतो. आपण सरकारला यंत्रणेला जाब विचारत नव्हतो, जे मेले वा ज्यांचे शोषण झाले त्यांच्याविषयी आपल्याला काहीच देणेघेणे नव्हते. आपण तमाशबीन झालो होतो आणि आहोत. त्याहीपेक्षा पुढे जाऊन या हत्या आणि हे अपराध आपण हळूहळू जायज ठरवत आहोत, त्यास मान्यता देत आहोत. वाईट गोष्ट अशी की काही प्रमाणात त्याचा गौरवही करत आहोत. मग अशा परिस्थितीत श्रेष्ठ कोण आहे? तर ज्या व्यक्तीला आपल्या कृत्यांचा पश्चाताप होतोय आणि आपल्या अपराधाची कबुली द्यावीशी वाटते तो व्यक्ती या गर्दीपेक्षा श्रेष्ठ होय.

आपल्याकडेही हीच स्थिती आहे. रोज शेकडोनी होणारे खून बलात्कार यांचे आपल्याला काहीही सोयरसुतक उरलेले नाही. कधीतरी यातलीच एखादी सनसनाटी अशी घटना घेऊन आपण त्याविषयी बोलू लागतो, व्यक्त होऊ लागतो, जणू काही मधल्या काळात अशी घटनाच घडली नव्हती या आवेशाने आपण व्यक्त होऊ लागतो. अशा घटनांची आकडेवारी देऊन आपल्या देशात किती अपराध वाढले आहेत यावर चर्चा करू लागतो. वास्तवात आपल्याला हे दाखवून द्यायचे असते की, पहा मी कशी यावर चर्चा करू लागलोय! मग ज्याची चर्चा अधिक रसदार, तो अधिक कलात्मक संवेदनशील वगैरे! मात्र प्रत्यक्ष गुन्हे घडत असतात तेव्हा आपण सरकारला, यंत्रणेला जाब विचारत नाही. आणि जे असे जाब विचारू पाहतात त्यांनाच आपण गुन्हेगार ठरवतो! आपली मोठी गोची झालीय असे कुणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे, आपण शतप्रतिशत गायीचे कातडे पांघरलेले लांडगे, कोल्हे झालो आहोत ज्यांना या सर्व घटनांची चटक लागलीय!

आपल्या सगळ्यांपाशीच बेनाव्हिडेसची ती वजनदार सुटकेस आहे, आपण ती कधी लपवून ठेवतो तर कधी तिचे प्रदर्शन मांडतो, मात्र आपण हे विसरून गेलोय की कधीतरी तशाच एखाद्या सुटकेसमध्ये आपलाही देह असू शकेल! मात्र लोक त्याविषयी दुःख खंत संताप व्यक्त करणार नाहीत याचा आपल्याला विसर पडलेला असतो, आपलेही तेच होईल जे बेनाव्हिडेसचे झालेय!

भवताली जे काही चुकीचे घडते त्यावर बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे!

- समीर गायकवाड

#facebook #समीरगायकवाड #trending #blogger #mustread #goodread #threads #art #life #literature #साहित्य #sameergaikwad #blog #vlog #humanity #mankind #support #search #sameerbapu #समीरबापू #साहित्य #instagram #कविता #kavita #poetry 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा