बुधवार, १९ नोव्हेंबर, २०२५

पंडित नेहरूंना मंटोंचे पत्र.


जागतिक किर्तीचे, विख्यात लेखक सआदत मंटो हे फाळणीनंतर पाकिस्तानात स्थायिक झाले. याआधी ते मुंबईत राहत होते आणि चित्रपटांसाठी लिहित होते. त्यांच्या कथांवर अश्लीलतेचे आरोप झाले होते आणि त्यांच्यावर खटलेही दाखल झाले होते.आपल्या मृत्यूच्या चार महिने बावीस दिवस आधी, ऑगस्ट 1954 मध्ये मंटोंनी नेहरुंना एक पत्र लिहिलं होतं. ‘बगैर उनवान के’ (उनवान म्हणजे शीर्षक) या लघुकथा संग्रहात मंटोंनी नेहरूंना लिहिलेले पत्र प्रस्तावनेत सामील केले गेले. त्या पत्राचा हा स्वैर मराठी अनुवाद!
___________________

अस्सलाम अलैकुम, पंडितजी

तुम्हाला लिहिलेलं हे माझं पहिलं पत्र आहे. माशाअल्लाह, तुमचं नाव पाश्चात्य समाजातही रूपवान आणि विद्वान म्हणून घेतलं जातं. पण मीही काही फार मागे नाही असं मला वाटतं. जर नशिबाने मला अमेरिकेपर्यंत पोचवलं असतं, तर कदाचित सौंदर्याच्या मोजपट्टीवर मीही काही कमी ठरलो नसतो. पण तुम्ही आहात भारताचे प्रधानमंत्री, आणि मी पाकिस्तानचा कथाकार! या दोन भूमिकांमध्ये खूप अंतर आहे. तरीही एक धागा आहे जो आपल्याला जोडतो, तो म्हणजे कश्मीर! तुम्ही नेहरू आहात, मी मंटो. आणि कश्मीरी असण्याचा दुसरा अर्थच आहे सौंदर्य, जे मी अजून डोळ्यांनी पाहिलेलं नाही, पण जाणवतं मात्र खोलवर.

माझी बऱ्याच दिवसांची इच्छा होती की तुमची भेट व्हावी. माझे पूर्वज तुमच्या पूर्वजांना अनेकदा भेटले, पण माझं नशिब तितकं भारी नव्हतं. दुर्दैवाने, आजवर तुम्हाला प्रत्यक्ष पाहण्याचं भाग्यही लाभलं नाही. फक्त एकदा रेडिओवर तुमचा आवाज ऐकला होता — आणि तोही क्षणभरासाठीच.

पंडितजी, ही भेट व्हावी अशी ओढ होती, कारण आपल्या दोघांच्या रक्तात कश्मीर आहे. पण आता वाटतं, भेटीची गरज तरी काय? एक कश्मीरी माणूस शेवटी दुसऱ्या कश्मीरीला आयुष्याच्या एखाद्या वळणावर भेटतच असतो.

तुम्ही नहरजवळ जन्मलात, म्हणून तुम्ही नेहरू झालात. मी अजूनही विचार करतो, मी मंटो कसा झालो? माझे काही मित्र सांगतात की कश्मीरी भाषेत 'मंटो' म्हणजे 'दीड शेर मापाचा दगड'. तुम्ही ती भाषा जाणता, म्हणून मला एकदा जरूर सांगा, माझ्या नावामागे काही अर्थ आहे का?

जर मी खरोखर दीड शेराचाच असलो, तर तुमच्याशी तुलना कसली? तुम्ही नहर आहात, मी फक्त छोटा दगड. तरीही आपण दोघे कश्मीरी, म्हणजे अशा बंदुका, ज्या उन्हात ठोठो करतात, ही म्हण ऐकून माझं मन संतापतं, पण तिच्यात थोडासा विनोदही आहे. कदाचित म्हणूनच पत्रात याचा उल्लेख करतोय, मन मोकळं करण्यासाठी.

पंडितजी, कश्मीरी माणूस कुठल्याही मैदानात हरत नाहीत. राजकारणात तुम्ही, कुस्ती आणि शायरीत आमचे लोक, सर्वत्र कश्मीरचं वर्चस्व आहे. पण जेव्हा ऐकलं की तुम्ही आमच्या नदीचा प्रवाह थांबवत आहात, तेव्हा मनात खुपलं. मी विचार केला जर मी दीड शेराऐवजी अवजड विशाल दगड असतो, तर स्वतःला त्या प्रवाहात झोकून दिलं असतं, तेही फक्त एवढ्यासाठी की काही काळ तरी तुम्ही त्याला अडवता अडवता थांबला असता.

मला ठाऊक आहे, तुम्ही मोठे व्यक्ती आहात. एका देशाचे पंतप्रधान. पण तरीही वाटतं, तुम्ही माझ्यासारख्या एका छोट्या आणि तुमच्या इतक्याच नम्र कश्मीरी माणसाच्या मनाचा विचार कधी केला नाही.

माझे वडील, जे कश्मीरी होते, ते जेव्हा बाजारास आलेल्या कुठल्याही ग्राहकाला पाहायचे, त्यांना घरात बोलावून नमकीन चहा आणि कुलचा द्यायचे. त्यानंतर हसत म्हणायचे — “मीही काशर (कश्मिरी) आहे.”
वडिलांच्या त्या आठवणींनी माझ्या मनात आपोआप उब मिळते.

तुम्हीही कश्मिरी आहात, पंडितजी. आणि ईश्वर साक्ष ठेवून सांगतो, जर तुम्ही माझा प्राण जारी मागितला तरी मी नम्रपणे देईन. कारण मला ठाऊक आहे, कश्मीरशी तुमचं प्रेम राजकारणाचं नाही, ते रक्ताचं आहे. जसं प्रत्येक कश्मीरीला असतं तसं, अगदी त्याने कधी कश्मीर जरी पाहिलं नसेल तरीही!

जसं मी आधी सांगितलं की मी कश्मीरला जाऊ शकलो नाही, फक्त बानिहालपर्यंतच गेलो आहे. तिथे सौंदर्यासोबतच गरिबीही पाहिली. जर तुम्ही ती गरिबी दूर केलीत तर कश्मीर तुमच्याच हाती राहो! पण मला खात्री आहे, तुम्हाला एवढी फुरसत नसावी.

तुम्ही एक काम करा, मला बोलवा, तुमचा कश्मीरी पंडित भाऊ म्हणून. आधी मी तुमच्या घरी 'शलजम की शबदेग' खाईन, आणि नंतर कश्मीरचे प्रश्न हाताळीन. हे बख्शी वगैरे लोक यांचं काही खरं नाही, चाप्टर आगाऊ माणसं आहेत. तुम्ही त्यांना मान दिलात, पण का? तुम्ही राजकारणी असाल, मी नाही; पण त्यामुळे मी काही अडाणी नाही.

तुम्ही इंग्रजीत भाषेतील लेखक आहात, मी उर्दूमध्ये. ही तीच भाषा आहे जिला मिटवण्याची धडपड आता तुमच्या हिंदुस्तानात सुरू आहे. तुमची भाषणे मी ऐकतो, तुमच्या इंग्रजी भाषणांची सगळेजण स्तुती करतात, तुम्ही जेव्हा उर्दूमध्ये बोलता तेव्हा वाटतं की तुम्हालाही उर्दू आवडते. पण जेव्हा विभाजनानंतर रेडिओवर तुम्ही उर्दूत बोललात, तेव्हा ती भाषा तुमच्याकडून जणू उपरी वाटत होती. शब्द जिभेवरून सहज येत नव्हते, अडखळत होते.

इंग्रजी लिपीमध्ये उर्दू शब्द लिहून दिल्यासारखं वाटलं ते! अशी लिखावट मान्य करुन, असं भाषण करणं तुम्हाला कसं स्वीकारार्ह वाटलं? ही गोष्ट माझ्या आकलना पलिकडची आहे. त्या वेळी रॅडक्लिफनं हिंदुस्थानच्या नकाशाचे दोन तुकडे केले, जणू भारताची रोटी दोन तुकड्यांत विभाजली होती, पण अजूनही ती भाजली नाहीये. तुम्ही एका आगीजवळ आहात आणि आम्ही दुसऱ्या आगीपाशी! दोन्ही आगठ्या बाहेरच्या आगीने पेटल्यात हे दोन्ही तुकडे एकत्र आले तर काही वेगळे घडेल असं तुम्हाला वाटत असेल पण दुर्दैवाने तसं फार काही बदलू शकलं नाही.

पंडितजी, सध्या बगू गोश्यांचा (खास कश्मिरी खाद्य पदार्थ) हंगाम आहे. गोशे तर खूप खाल्ले, पण त्या बगू गोश्यांची चव आठवते. बख्शीने (कर जमा करणारे अधिकारी) इतके वर्चस्व निर्माण केलंय की कुणालाही थोडेसेही बगू गोशे मिळत नाहीत. भले तो स्वर्गात जावो पण गोशे सुखात राहोत, इतकी त्यांची ओढ आहे!

मी खरंच तुम्हाला विचारतोय की, तुम्ही माझी पुस्तके वाचली आहेत का? जर वाचली असतील तर मला यासाठी वाईट वाटेल की तुम्ही एकदाही दाद दिली नाही; आणि जर वाचली नसतील तर अजून वाईट वाटेल कारण तुम्हीही एक लेखक आहात.

पंडितजी, माझ्या लेखनावर अश्लीलतेचे आरोप झाले, अनेक खटलेही भरले गेले. पण सगळ्यात मोठा अन्याय म्हणजे दिल्लीतील प्रकाशकानं माझ्या पुस्तकाचं नावच ठेवलं ‘मंटो के फोहश अफसाने’.
ही तर माझ्या आयुष्याची कथा आहे, आणि त्या कथेची भूमिका म्हणजे हेच पत्र, जे तुम्हाला लिहिलंय.

जर ही पुस्तकंही तुमच्या शहरात बिनपरवानगी छापली गेली, तर खुदा कसम मी स्वतः दिल्लीला येईन आणि तुमच्या सोबत राहिल्याशिवाय परतणार नाही. मग दररोज सकाळी तुमच्याकडे येऊन म्हणेन की, “नमकीन चहा द्या, आणि जोडीला कुलचा पण द्या.” खेरीज आठवड्यातून एकदा तरी 'शलजम की शबदेग' देखील हवी.

हे पुस्तक छापल्यावर मी तुम्हाला प्रत पाठवेन. आशा आहे की पुस्तक मिळताच तुम्ही उत्तर लिहून पाठवाल, आणि मनापासून अभिप्राय सांगाल.

कदाचित तुम्हाला या पत्रातून जळलेल्या मांसाचा वास येईल. पण जाणून घ्या, कश्मीरमध्ये गनी काश्मीरी नावाचा एक शायर होता. एकदा ईरानचा एक शायर त्याच्याकडे आला, पण गनी घरी नव्हता. त्याने म्हटलं होतं, 'माझ्या घरात असं काय आहे की, काय म्हणून मी दरवाजे बंद ठेवू? मीच जर घरात असेन, तर बंद करतो, कारण मीच माझं धन आहे.
त्या ईरानी शायरने एक अधूरा शेर लिहून ठेवला होता,
ज्याचा मिसरा सानी होता — “कि अज़ लिबास तो बू-ए-कबाब भी आयद”
नंतर जेव्हा गनी परतला, त्याने वर मिसरा लिहिला —
“कदाम सोख्ता जाँ, दस्त जो बदामानत.”

(या पंक्तींचा अर्थ - एक व्यक्ती जो प्रेमात जळून बरबाद झालाय, तो आपल्या प्रेमिकेच्या जवळ जायलाही घाबरतो कारण त्याच्या जळलेल्या मांसाचा दर्प त्याच्या कपड्यांना लिप्त असू शकतो, आणि हा गंध त्याच्या करपून गेलेल्या दग्ध हृदयाची आठवण ताजी करू शकतो!)

पंडितजी, मीही तसाच ‘सोख्ताजाँ’ — म्हणजे दग्ध हृदयाचा माणूस आहे. माझा हात जणू मी तुमच्या छातीशी ठेवतोय, कारण हे पुस्तक मी तुम्हालाच समर्पित करतोय.

ही आहे सआदत हसन मंटोंची व्यंग, व्यथा आणि ओढ यांचा संगम असलेली पत्रकथा - राजकारणाच्या पलीकडे, एक कश्मीरी मनाचं दुसऱ्या कश्मीरी मनाशी बोललेलं संवादपत्र.
_______________________________________________________

या पत्रात मंटो स्वतःशी बोलतात आणि नेहरू फक्त एक आरसा ठरतात. त्या आरशात मंटो आपलं हरवलेलं स्वप्न पाहतात. पत्राचं स्वरुप जरी काहीसं नर्मविनोदी, टोमणे देणारं आणि टोकदार असलं, तरी त्यामागे खोल उदासी आहे, जी हसऱ्या डोळ्यांच्या कोपऱ्यात नकळत दडलेल्या अश्रूंसारखी आहे.

मंटो या पत्रात थेट राजकारणावर लिहित नाहीत; पण त्यांच्या प्रत्येक वाक्यात राजकारणाचा माणसावर झालेला परिणाम दिसतो. 'नदी थांबवू नका' ही त्यांची आर्त विनंती आहे, पण ती फक्त पाण्याबद्दल नाहीये. नदीचा प्रवाह थांबवू नका, मानवतेचं नातं अडवू नका, असं त्यांचं म्हणणं आहे.

मंटो स्वतःला दीड शेर वजनाचा दगड म्हणवून घेतात, म्हणजे ते स्वतःला हलक्यात घेतात, पण त्या उपहासात खोल आत्मभान आहे. मंटोचा हा विनोद खरं तर स्व-निंदेतून आलेला सत्याचा स्वर आहे. जसा एखादा विदूषक राजदरबारात सत्ताधाऱ्यांना हसवतो, पण हसण्यातूनच सत्याचे भाले टोचवतो.

पत्रभर “कश्मीरी” हा शब्द एका भावनिक प्रतीकासारखा उभा राहतो. त्याचं आणि नेहरूंचं नातं केवळ जातीय किंवा प्रादेशिक नाही, तर ओळख हरवलेल्या मनाचं आहे. मंटो म्हणतात, 'मी कधी कश्मीर पाहिलं नाही, पण मला ते कणाकणात जाणवतं.'
हे जाणवणं म्हणजेच त्यांच्या आत्म्यातला कश्मीर — सौंदर्य, वेदना, आणि विस्थापन यांचा संगम.

ते म्हणतात, 'तुम्ही नदी थांबवत असाल तर मी विशालकाय शिळा होऊन त्यात उडी मारेन.”
ही ओळ फक्त राजकीय प्रतिकार नाही, तर एक आत्मसमर्पणाची कविता आहे. जणू एक कश्मिरी आत्मा स्वतःला अर्पण करतो, जेणेकरून माणसांमधली भिंत थोडीशी तरी तुटावी.

पत्राच्या उत्तरार्धात मंटो स्वतःच्या लेखनावरील खटले, अश्लीलतेचे आरोप यांचा उल्लेख करतात. पण तिथेही ते स्वतःच्याच व्यंगातून मानवी विवेकावर बोट ठेवतात - समाजाने ज्याला लाजिरवाणं म्हणतो त्याच गोष्टी ते आरशासारखं दाखवतात. आणि म्हणतात, 'हा आरसा मी कधीच गढवला नाही, तुम्हीच तयार केला आहे.'

पण पत्राचं सर्वात हृदयद्रावक सौंदर्य शेवटच्या भागात आहे, जिथे तो काश्मीरी शायर गनी काश्मीरीचा किस्सा सांगतो.
हा शेर म्हणजे मंटोंच्या आयुष्याचे, त्याच्या लिखाणाचे आणि या पत्राचे सार आहे. ते स्वतःचं दग्ध मन नेहरूंच्या हाती सुपूर्त करतात, विरोधाच्या नव्हे तर नात्याच्या भावनेने.

सआदत हसन मंटो यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंवर काश्मीरमधील गरिबी दूर करण्यात अपयशी ठरल्याचा, जुनागडवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचा आणि हैदराबादमध्ये मुस्लिमांची हत्या केल्याचा आरोप केला होता हे इथे लक्षात घेण्यासारखे आहे.

हे पत्र म्हणजे राजकारणावरचे भाष्य नाही; एका विस्थापित मनाचा हा कबुलीजबाब आहे. मंटो इथे लेखक म्हणून नाही, तर माणूस म्हणून बोलतात. ज्यांना दोन देशांच्या सीमांपेक्षा माणसांच्या अंतरांची जास्त वेदना होतेय.

हे पत्र वाचताना सुरुवातीला थोडंसं हसू येतं परंतु त्या हास्यात एका अनामिक तगमगीची धग आहे! कारण मंटो आपल्याला दाखवून देतात की सत्य नेहमीच सहज सुलभ नसतं, आणि हसणंही नेहमी आनंदाचं नसतं.
________________________________________________

'काली सलवार', 'खोल दो', 'तोबा टेक सिंग', 'थंडा गोश्त', आणि 'बू' सारख्या लोकप्रिय कथा लिहिणारे मंटो 18 जानेवारी 1955 रोजी वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी लाहोरमध्ये निवर्तले. प्रेमचंदांप्रमाणेच, मंटो देखील खूप लोकप्रिय झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा