शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१

गोष्ट एका मास्तरांची ...


मराठीला धुमाळ मास्तर होते. पोरांना जाम कुटून काढायचे. कवितेची कुठलीही ओळ म्हणायचे आणि पुढची ओळ वाच म्हणून बोटात पेन्सिल घालून बोटं पिरगाळायचे. समास शिकवताना चिमटीत कान पिळण्याची 'संधी' ते सोडत नसत, त्यांच्या मारझोडीच्या 'क्रियां'ना कुठलेही 'पद' चाले ! पोरांना शेलकी 'विशेषणे' लावून हाक मारण्यात त्यांचा हातखंडा होता, लिहिताना 'कानेमात्रे' एक झाले तर आईबहीण एक करत ! मागच्या बाकावर बसलेल्या अवगुणी 'विशेषनामां'ना ते नेम धरून डस्टर फेकून मारत ! कोणत्या पोराने मागच्या चाचणीत माती खाल्ली होती याविषयीचा त्यांचं 'भूतकाळ' स्मरण चांगलं होतं. कोणतं पोरगं दुपारचा डबा कचकून खाऊन सुस्तावलं आहे आणि ते कधी डुलक्या घेणार आहे याविषयीचा 'चालू वर्तमानकाली'न अंदाज एकदम खत्रूड असे. पोरांचे आईबाप सहामाही परीक्षेनंतर प्रगतीपुस्तक पाहायला आले की ते आपलं भलं मोठं तोंड वासून पानाची पिचकारी टाकून सांगत की, 'पोरगं हमखास गचकणार बघा, एकदम खानदानी नापास होणार !' त्यांची 'भविष्यकाळ' दर्शवणारी 'मधुर' आवाजातली ती 'गुरुवाणी' ऐकताच पोरांचे आईबाप तिथंच सुरु होत, त्यात धुमाळ मास्तर हात धुवून घेत. एकदोन पोरं त्यांनी चड्डीत मुतवली होती. 'नाम' आणि 'सर्वनाम' यातला फरक सांग म्हणत पाठीवर गुद्दे घालताना त्या पोराचा 'स्वर' वरचा लागलेला असे. धुमाळ मास्तरांच्या तोंडातल्या पानामुळे बऱ्याचदा अगम्य उच्चार होत. एकदा त्यांनी 'व्यंजन' म्हटल्यावर वर्गातला व्यंकट अचानक झोपेतून जागा होत 'हजर सर' म्हणून मोकळा झाला, मास्तरांनी त्याला जाम बुकलून काढला ! 'अव्ययीभाव' शिकवताना त्यांच्यातला 'तत्पुरुष' जागा व्हायचा, मग त्यांचं आणि पोरांचं 'द्वंद्व' सुरु व्हायचं, एकदा लोहाराच्या सुन्याची गंमत झाली. "अरे गाबड्या बहुव्रीही म्हटलं रे मी भवरीही म्हटलं नाही.. लागला भवऱ्याची जाळी दाखवायला... थांब तुझ्या भोवऱ्याची आरीच तोडतो..." असं म्हणून मास्तरांनी खाली कुच्चा हाणला... सुन्या जाम विव्हळला. त्याचं 'लिंग'बदल होता होता राहिलं ! धुमाळ मास्तरांना मधूनच हुक्की आली की ते नाकातून उच्चार करत, "अनुनासिक म्हणजे काय सांग रे .. तू सांग रे शिंद्या.." त्यानं चुकीचं उत्तर देताच धुमाळ मास्तरांनी कहर केला होता, "तुझा बा नाशिकच्या कुंभमेळ्यातला तर नव्हता ना ! गधड्या मी अनुनासिकबद्दल विचारतोय आणि तू नाशिकबद्दल सांगतोय." यमक शिकवताना त्यांच्यात साक्षात यम परकाया प्रवेश करी. चित्रविचित्र कठीण शब्द सांगून त्याची फोड करून यमक जुळणारे शब्द ते विचारत. वर्गात अलंकार हॉटेल - लॉजवाल्याचं पोरगं होतं, धुमाळ मास्तरांनी अलंकार शिकवताना त्याचा खरपूस समाचार घेत त्याच्या बापाच्या लॉजमध्ये काय धंदे चालतात यावर खतरनाक आभाळ पेललं. अलंकारवाला सुऱ्या गोरामोरा झाल्यावर मास्तर वरमले. "अरे सुऱ्या मी 'अतिशयोक्ती' शिकवत होतो, मनावर घेऊ नको रे बाबा. नाहीतर बापाला जाऊन सांगशील..." ख्या ख्या ख्या ... हसत हसत त्यांनी सुऱ्याला गोंजारलेलं. उपमा उपमेय शिकवताना सद्याला उभं करून ओठातली थुंकी उडवत मास्तर उद्गारले होते - "हा आंबा जणू साखरच ! या वाक्यातील उपमा उपमेय काय आहे ते सांगा रे..." नंतर पोरापैकी कुणी एकाने उत्तर दिल्यावर एकदम खुनशी हसत सद्याकडे बघत मास्तरांनी टाचणी लावून फुगा फोडावा तसा सद्याला फोडला होता. "हा आंबा जरा ईजळलेला आहे ही गोष्ट वेगळी बरं का पोरांनो !"सद्याच्या बापाने धुमाळ मास्तरांची हेडमास्तरांकडे तक्रार दिली होती तेंव्हापासून धुमाळ मास्तर सद्याला खाऊ की गिळू करत. मडक्यांच्या सुलीला उभं करून मास्तरांनी 'श्लेष' शिकवला होता तो कधी विसरता येणार नाही - "कुस्करू नका ही सुमने ll जरी वास नसे तिळ यास, तरी तुम्हास अर्पिले सु-मने l" अगदी लडिवाळ पद्धतीने मास्तरांनी हे पद गायलं आणि डाव्या गालावर उजव्या हाताची नख वाढलेली करंगुळी फिरवत मास्तरांनी छद्मीपणाने हसत सुलीला सुनवलं - "सुले अगं पण ह्या फुलांना वास मारतो गं... जरा पावटे कमी खात जा ना .. बापाचं यार्डात दुकान आहे म्हणून तू रोज खाऊ नका ना.. ( डाव्या नाकपुडीत चिमुटभर नास कोंबून) नाकातले केस जळतात माझ्या !" मास्तर आपल्या भयंकर विनोदावर विकट हसत. खरं तर धुमाळ मास्तर वर्गात यायच्या आधी त्यांच्या तपकिरीचा उग्र दर्प यायचा ! कर्ता, कर्म. कर्तरी, अकर्मक, सकर्मक शिकवताना ते कमालीचे आक्रमक होत. पोरांनी गृहपाठ करून आणलेला नसेल तर त्याचं माकड नाहीतर कोंबडा करीत. बाकावर उभं करून ठेवत. 'संदर्भासह स्पष्टीकरण' हा त्यांचा आवडता प्रांत. कधीकधी गोष्टीही सांगत, त्यावेळी धुमाळ मास्तर वेगळेच भासत. पोरांना 'सुलेखना'चे धडे गिरवणाऱ्या धुमाळ मास्तरांचे अक्षर फारच गिचमिड होतं. मात्र त्यांचं मन साधंसरळ निर्मळ होतं. कविता शिकवताना मास्तर हरखून जात. 'गायी पाण्यावर काय म्हणून आल्या..' म्हणताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असे. 'एका तळ्यात होती बदके पिले...' शिकवताना धोतराचा सोगा चोरून डोळ्यांना लावत. 'ऐलतटावर पैलतटावर हिरवाळी घेऊन निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातून...' शिकवताना त्यांच्या डोळ्यात अद्भुत चमक येई. तुकोबांच्या अभंगांपासून ते मोरोपंतांच्या केकावलीपर्यंत सारं त्यांना तोंडपाठ होतं. गद्य शिकवताना ते एका रंगतदार लयीत धडे वाचून दाखवत. त्यांनी शिकवलेले अख्खे धडे आजही लक्षात आहेत. पत्रलेखन शिकवताना आईला पत्र लिहायला सांगत, मायना सांगून झाला की खुर्चीवर रेलून बसून टेबलाच्या मधल्या टेकणीवर पाय ठेवून त्यांच्या आईच्या आठवणीत रमून जात, पोरांचा गलका वाढला तरी त्यांना भान येत नसे. मास्तरांचं हरवलेलं मातृप्रेम गालावर ओघळलेलं असे. धुमाळ मास्तर अनाथ होते. त्यांनी आई कधी बघितलीच नव्हती. 'कमवा आणि शिका' योजनेसारखी योजना तेंव्हा नव्हती. ते मोलमजुरी करून शिकलेले असल्याने पै न पैच्या किंमतीविषयी ते कमालीचे जागरूक असत. एमए बीएड झालेल्या धुमाळांनी मास्तरकीच्या कंडापायी जिच्यावर जीव होता तिचं स्थळ नाकारलं होतं, कारण सासऱ्याच्या अटी मास्तरकी विरोधातल्या होत्या. धुमाळ मास्तरांनी अखेरपर्यंत लग्न केलं नव्हतं. मागच्या दशकात मसरे गल्लीतल्या वाड्यात एक खोलीच्या घरात राहत घरात मास्तर वारले. त्याच्या पुढच्या एका आठवड्यात त्यांच्या घराला लागून असलेलं उंबराचं झाड एकाएकी सुकून गेलं, झडून गेलं. धुमाळ मास्तरांचा जीव खरेच 'औदुंबरा'त असावा. काही दिवसापूर्वी गावाकडे गेल्यावर शाळेच्या जुन्या पडक्या वर्गात गेल्यावर मनसोक्त रडून घेतलं. तिथल्या परिसरातून बाहेर पडताना का कुणास ठाऊक पाठीवर मायेचा हात फिरल्याचा भास झाला. स्पर्श ओळखीचा होता, मायमराठीच्या सुपुत्राचा ! धुमाळ मास्तरांचा !
काही माणसं कधीच मरत नसतात, ती काळजात जगत असतात... - समीर गायकवाड

६ टिप्पण्या:

  1. मनातलेच बोललात सर, खरेच आहे. काही माणसे कधीच मरत नाही. काळजात कायमचं घर करतात.

    उत्तर द्याहटवा