ढलाण निसटलेल्या बांधावरल्या दगड मुरुमाच्या बेचक्यात सांजेपासून बसून असलेल्या सागवानी म्हाताऱ्याने आपल्या जास्वंदी नातवाला मांडीवर घेतलं होतं. अंधारून येऊ लागल्यावर पायाला रग लागलेला म्हातारा धोतर झटकत अल्लाद उठला. पुढं होत त्यानं नातवाला उचलून कंबरेवर घेतलं. निघताना नातवानं आज्ज्याला विचारलं, "आबा आता पुन्ना कदी यायचं ?"
गालफाडे आत गेलेला, पांढुरक्या दाढीचे खुंट वाढलेला, खोबणीत खोल गेलेल्या निस्तेज डोळयांच्या कडा पुसत ओठावर हसू आणत जिंदादिल म्हातारा
आपल्या तळहातावरची मखमल नातवाच्या गालावर पसरवत उत्तरला, "उद्याच्याला याचं की ! आभाळापल्याड तुजी आज्जी ऱ्हाती. माजी विचारपूस करायला रोज ती सूर्याला पाठवती. जोवर ती सूर्याला धाडून लावती तोवर आपण येत ऱ्हायचं आणि बांधावर बसून त्याला निरखत ऱ्हायचं. "
आज्जा काय सांगतोय यातलं नातवाला काहीच कळलं नाही. कंबरेत वाकलेल्या आज्ज्याला ते पोर घट्ट करकचून बिलगलं. खुललेल्या आज्ज्यानं त्याचा गालगुच्चा घेतला. आस्ते कदम दोघंही निघाले तेंव्हा त्यांच्या फिकट सावल्या पाहून दिगंताला टेकलेल्या सूर्याला गलबलून आलं !
शोधलं तर हरेक प्रश्नाचं उत्तर सापडतं.
उधाण आलेल्या मातीत नीट निरखून पाहिलं तर आयुष्यभर काबाडकष्ट करून इहलोक सोडून गेलेल्या मायबापाच्या पाऊलखुणाही दिसतात आणि काही वेळापूर्वी पैंजण वाजवत गेलेल्या सखीच्या आवाजखुणाही मातीवर तरंगत्या दिसतात.
फक्त ती नजर पाहिजे आणि ते मन पाहिजे, जे या सर्वांचा अर्थ लावू शकेल !
तुम्ही केलेलं व्यक्तीवर्णन म्हणजे "जगात भारी" असतंय बघा..
उत्तर द्याहटवाअभिप्रायासाठी धन्यवाद...
हटवालोकसत्तामधे येणाऱ्या तुमच्या गावाकडच्या कथा लई आवडीने वाचायचो मी..
उत्तर द्याहटवाधन्यवाद ... लवकरच त्याचे पुस्तक प्रकाशित होईल ...
हटवा