गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१

न झुकलेला माणूस..


चुकीच्या आणि अन्याय्य गोष्टीपुढे न झुकण्यासाठी निडर बाणा हवा, मुख्य म्हणजे कोणतीही किंमत मोजायची तयारी हवी. मग तो विरोध, तो संघर्ष आभाळाहून मोठा होतो. ही हकीकत अशाच एका सामान्य माणसाची. तो एक सामान्य लोहार होता. तो काही शूरवीर योद्धा नव्हता ज्याला विविध शस्त्रे चालवता येत होती. तो एक सामान्य माणूस होता, तरीही त्यानं एक असं काही असामान्य कर्तृत्व करून दाखवलं की त्याच्या मायदेशी बेलारूसमध्ये आजही त्याच्या पुतळ्यापुढे लोक नतमस्तक होतात. त्याच्या स्मारकाचं नाव अगदी विशेष आहे - 'द अनकॉन्कर्ड मॅन' - शरण न गेलेला माणूस ! न झुकलेला माणूस !
२२ मार्च १९४३ रोजी बेलारूसमधील लोगॉईस प्रांतातील मिन्स्क भागातल्या खतीन नामक खेड्यातील सर्व नागरिकांचे नाझी सैन्याकडून शिरकाण करण्यात आले होते. दुसऱ्या महायुद्धात बेलारूसमध्ये हत्याकांड ही सामान्य बाब झाली होती इतक्या मोठ्या प्रमाणावर माणसं मारली गेली. अधिकृत आकडेवारीनुसार बेलारूसमध्ये ५२९५ वस्त्या / गावं बेचिराख केली गेली. एकट्या विटबॅक्स भागात २४३ गावं अशी होती की ती दोनदा जाळण्यात आली, तर ८३ गावं अशी होती की ती तीनदा जाळण्यात आली. तर २२ गावं अशी होती की तीन वेळा जाळून देखील ती पुन्हा उभी राहिली आणि नाझी सैन्याने ती चवथ्यांदा जाळली. २०९ शहरांचा विध्वंस करण्यात आला आणि तब्बल ९२०० खेड्यांची स्मशाने झाली ! नाझी आक्रमकांचा कब्जा असलेल्या तीन वर्षात बेलारूसमधली बावीस लाख तीस हजार माणसं मारली गेली. हा आकडा तिथल्या तत्कालीन लोकसंख्येच्या एक चतुर्थांश होता. युद्धे संपली. युद्धांच्या जखमा सोसलेली ती पिढीदेखील काळाच्या पडद्याआड गेली. रशियाचं विघटन झालं आणि बाजूच्या अनेक राष्ट्रांनी आणखी मोकळा श्वास घेतला. बेलारूसमध्ये काही दशकांनी समृद्धी आली आणि युद्धाच्या झळा अनुभवलेल्या या देशाने शांती आणि संयमाचा पाठपुरावा केला. बेलारूसमधील सर्व हत्याकांडात खतीनचं बेचिराख होणं एक वेगळा संदेश घेऊन आलं. कारण त्या गावातला एकही प्रौढ व्यक्ती यात जीवित राहिला नव्हता, केवळ एक अपवाद होता तो म्हणजे युजिफ (जोसेफ) कामिनेस्की ! नाझी सैन्याने हल्ला चढवला. बायका पोरींना नासवलं. घरं जाळून टाकली. माणसं ही जिवंत जाळली. अनेकांना तोफेने उडवलं. बंदुकांमधून जणू अग्निवर्षाव झाला. पाच किशोरवयीन मुलं आणि युजिफ कामिनेस्की जिवंत राहिले. रात्र उलटून गेल्यावर बेलारूशियन सैन्य गावात आलं तेंव्हा त्यांनी जे दृश्य पाहिलं ते काळजावर ओरखडे आणणारं होतं. बावन्न वर्षांचा कामिनेस्की निश्चल उभा होता आणि त्याच्या हातात त्याचा कोवळा मुलगा होता, ज्याचा देह छिन्न विच्छिन्न झाला होता. आपल्या कोवळ्या निरागस निष्पाप मुलाचं कलेवर हाती घेऊन ताठ मानेने उभा असलेला कामिनेस्की निडरपणाचं प्रतिक मानला गेला. खतीन गाव पुन्हा वसवलं गेलं नाही कारण गावातलं कुणी उरलंच नव्हतं. १९६९ मध्ये इथे एक स्मारक उभं करण्यात आलं जिथे कामिनेस्कीचा पुतळा उभारण्यात आला. या स्मारकात १८५ थडगी आहेत ज्यावर १८५ गावांची नावे लिहिली आहेत जी पुरती नामशेष झाली, ज्यांनी अनन्वित अत्याचार झेलले. इथे कायम स्मशान शांतता असते मात्र दर तीस सेकंदाला इथे बारीक घंटानाद होतो. बेलारूसमधले जितके लोक मारले गेले त्यांच्या संख्येच्या प्रमाणात या घंटानादाचे सूत्र आहे. बेलारूसच्या जनतेनेही तेंव्हा आपल्यावरील अत्याचारास सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. दोन्हीकडून बंदुका चालल्या मात्र कामिनेस्कीच्या मुलाचा दोष काय होता हे आजवर कुणीच सांगू शकलं नाही. किंबहुना भविष्यात देखील याचं नेमकं आणि खरं उत्तर कुणी देणार नाही खास करून अशी माणसं तर कधीच याचं उत्तर देऊ शकणार नाहीत ज्यांच्या अंगात युद्धाची खुमखुमी असते. आता पुन्हा बेलारूस अस्वस्थ आहे, संघर्षाच्या नव्या टप्प्यावर उभा आहे. तिथल्या सरकारची गाठ आता तिथल्या तरुणाईशी आहे जिचा आदर्श आहे कामिनेस्की ! हाणा, मारा, कापा, खलास करा, संपवून टाका असं म्हणणं कधीही सोपं असतं मात्र मानवतेसाठी काहीतरी भव्योदात्त निर्माण करा वा तशी निर्मिती करूया असं म्हणणं कायम कठीणच असतं. रिकामटेकडी जनता, निष्क्रिय बेरोजगार तरुण आणि धगधगत्या सीमा हे राजकीय नेतृत्वाचे भांडवल असतं. ही पेटंट गिऱ्हाईकं असतात, यामुळे नेहमी शासकांची गादी बळकट होते आणि जनता भुकेकंगाल होते. मात्र एका पिढीचा सर्वनाश झाल्यावरच जनतेला हे सत्य उमगते कारण युद्धज्वराने त्या जनतेला पुरते ग्रासलेले असते ! आपल्या डोक्यावर आपण कुणाला स्वार होऊ द्यायचे हे आपल्या हातात असते मात्र त्यासाठी आपला विवेक जागा असायला हवा नाहीतर आपण स्वतः युजिफ कामिनेस्कीचं जिगर राखलं पाहिजे ! - समीर गायकवाड

सोबतच्या फोटोत - आपल्या मुलाचं कलेवर हाती घेऊन ताठ कण्याने उभं असलेल्या कामिनेस्कीचं भव्य स्मारक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा