रविवार, १४ फेब्रुवारी, २०२१

पौष...

हरेक मराठी महिन्याला एक वलय आहे. त्याची स्वतःची अशी महती आहे मात्र पौष त्याला अपवाद आहे. पौषची कुख्यातीच अधिक आहे.
चैत्रपालवी असते. वैशाखवणवा असतो. ज्येष्ठाचं व्रत असतं.
आषाढाला पर्जन्योत्सुकतेचा मान लाभलाय.
श्रावणमासाची हिरवाई जितकी ख्यातनाम आहे तितकेच धार्मिक महत्वही आहे.
भाद्रपदातला गणशोत्सव शहरांचा चेहरा झालाय तर भादवा गावकुसासाठी अजूनही महत्वाचा आहे.
अश्विनची नवरात्र विख्यात आहे. कार्तिक दिवाळीमुळे अमर आहे.
मार्गशीर्षातली व्रत वैकल्ये अजूनही भाव खाऊन आहेत.
माघी वारीचं महात्म्य वाढतंच आहे.
 
चैत्र वैशाख मिळून वसंत ऋतू साजरा होतो.
ज्येष्ठ आषाढात ग्रीष्म असतो. तो अंगातल्या घामांच्या धारा वाढवतो तरीही त्याला मानसन्मान आहे.
श्रावण भाद्रपदात वर्षा ऋतूचं तांडव होतं.
अश्विन कार्तिकमधलं शरदाचं चांदणं अजूनही खुणावतं. 
माघ फाल्गुनमध्ये येणारा शिशिर कवी मंडळींचा लाडका आहे. त्यातली पानगळ नव्या पालवीसाठी आपलं जीवन संपवते त्यामुळे तिचं महत्व जीवनदायी असंच आहे.
मार्गशीर्ष आणि पौषात येणारा हेमंत तितकासा चर्चेत नसतो, त्यातल्या त्यात मार्गशीर्षात त्याचं वेगळं अस्तित्व जाणवतं.
 
पौषात त्याचं विशेष काही वाटत नाही !
खेरीज पौषाला कथित शुभ मंगल कार्यासाठी वर्ज्य मानलं गेलंय.
खरं तर याचा संबंध दिनमानाशी असावा. पूर्वीच्या काळी लग्न घरासमोरील मांडवातच होत असे. गावे वाड्या वस्त्या लहान असत आणि तिथे पेठा नसत. सबब लग्नाच्या खरेदीसाठी बाहेर गावी जावं लागायचं. पौष महीन्यात दिवस छोटा असतो. यामुळे घर परतताना अंधार पडायचा आणि वाटमारीची भीती असायची. यामुळे पौषात लग्न करणं शक्य तो टाळलं जात असावं.
या पौषाला नंतर जे वर्ज्यतेचे शिक्के मारले गेले ते आजही कायम आहेत. गावजीवनात पौष महिन्यात शेतीची मोठी कामे काढली जात नाहीत.
 
समाजाच्या कॅलेंडरमध्ये सामान्य माणूस हा पौष महिन्यासारखा आहे.
त्याची ना कुठली महती ना त्याला कुठला मान सन्मान.
तो आपला जगत राहतो. आला दिवस ढकलत राहतो.
त्याची ध्येये मोठी नसतात ना त्याला उत्तुंग स्वप्ने पडतात.
मोठ्या लोकांना ते वर्ज्य असतात, त्यांचं अस्तित्व असून नसल्यासारखं असतं.
तरीही त्यांची गणती केली जाते कारण त्याशिवाय परीघ विस्तारत नाही !
 
एका तऱ्हेने हाच पौष माझ्या लेखनाचा स्थायीभाव आहे जे कुणाच्या खिजगणतीत नसतात त्यांना इथे हृद्य स्थान आहे !
 
- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा