शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१

मौनातलं तुफान...

ना तो तिच्याकडे कधी जातो नि ती त्याच्याकडे कधी येत नाही
दोघे कधी भेटत नाहीत की बोलत नाहीत
तरीही त्यांच्यात असतं एक नातं, बेशक त्याला नाव मात्र कुठलं नसतं
भेटलेच जरी दोघे कधी तरी नजरेस नजर देत नाहीत
खरेतर दोघांच्या नजरा शोधत असतात परस्परांना

समोर येताच मात्र डोळ्यांना डोळे त्यांचे भिडत नाहीत
एकमेकाचे लक्ष नसताना चोरून मात्र पाहत असतात
दोघांपैकी जो आधी निघून जातो त्याचे डोळे असतात पाणावलेले
मागे थांबलेला डोळे भरून पाहतो त्या पाठमोऱ्या देहाकृतीकडे

त्याला जाणून घ्यायचं असतं, तिच्या ख्यालीखुशालीविषयी
तिला असते जिज्ञासा त्याच्याविषयी, त्याच्या संसाराविषयी
दोघेही विचारत नाहीत परस्परांना. मात्र
मात्र चौकशी आस्थेने करतात इतरेजनांपाशी !

चुकून कधी परस्परांच्या घरी आलेच
तर तो भेटतो तिच्या पतीला आणि त्याच्या जागी स्वतःला ठेवून पाहतो
ती जेंव्हा भेटते त्याच्या पत्नीला
डोळे भरून संसार पाहते त्याचा, आपण असतो तर तर घर कसे ठेवले असते याचा विचार करते
क्षणिक एकांत जरी मिळाला तिथे, तरी बोलायचं टाळतात

खरं तर त्यांना खूप काही बोलायचं असतं
डोळेच त्यांचे बोलतात. ओठ नुसतेच हलतात, शब्द उमटत नाहीत
दोघांना ती भाषा कळते, आसावल्या डोळ्यात पाझरते
सारंच काही बोलून दाखवायचं नसतं, थोडं मनात ठेवायचं असतं
आदिम काळापासूनच मौनामध्ये असतं तुफान काळजात साचलेलं...

- समीर गायकवाड
  

६ टिप्पण्या: