मंगळवार, २ फेब्रुवारी, २०२१

नागम्मा @रेड लाईट डायरीज - लॉकडाउन स्टोरीज

नागम्माचं मूळ नाव नागपार्वती.
हैदराबादमधील बशरतनगर मध्ये तिचं किरायाचं घर होतं.
काला पत्थर रोड परिसरात हा भाग येतो.
ती सादमूद हेमामालिनी सारखी दिसे. सौंदर्याहून अधिक जादू तिच्या रसिल्या आवाजात होती.
तिला तेलुगू, कन्नड चांगलं येई. काही हिंदी भजनं देखील ती गायची. ठुमरीवर तिचा विशेष जीव होता.
उमर ढळलेली असूनही तिच्या अदा कातिल होत्या.

सत्तरी पार केल्यानंतर तिची गात्रे साहजिकच शिथिल झाली होती. तिच्या ढिल्या झालेल्या कातडीने कैक मौसम झेलले होते.
नागम्मा तिच्या तरुणपणात अगदी जहरी कहर असणार यात काहीच शंका नव्हती.
ओल्ड हैदराबादमधलं तिचं वास्तव्य तीस वर्षापासूनचं होतं.
त्याआधी ती समुद्रतटाशी लागून असलेल्या कृष्णा जिल्ह्यातील मछलीपटणमध्ये वास्तव्यास होती.
तिच्या डोळ्यात एक तहानलेला समुद्र दिसे.
तिची गुजराण कशावर चाले हे काहींसाठी कोडे होते मात्र त्यात तथ्य नव्हते. ती स्वाभिमानाने जगणारी बाई होती.
कमालीची संवेदनशील आणि निश्चयी.

लॉकडाउनमध्ये तिचे खूप हाल झाले.
तिच्या घराच्या छतावर कबुतरांचा मोठा थवा बसलेला दिसे. त्या कबुतरांचे वैशिष्ट्य असे होते की तिने टाकलेल्या दानापाण्यावरच ते गुजराण करत.
जूनच्या सुमारास उपासमारीने काही कबुतरे मरण पावली.
हळव्या मनाच्या नागम्माला याचा मोठा धक्का बसला.
सरकारने देहविक्री करणाऱ्या बायकांना मोफत अन्नधान्य देऊ केलं, त्यातलं काही नागम्मापर्यंत पोहोचलं . पण तोवर उशीर झाला होता.
अखेरच्या काळात तिचा आजार बळावला होता. तिला घशाचा कर्करोग झाला होता.
नागम्माचं गाणं त्यामुळे खुंटलं होतं.

आजूबाजूच्या परिसरातल्या मशिदींचे उंच मिनार, जुनाट झाडांच्या मोठमोठाल्या फांद्या, झाडाखालची वर्दळ, माणसांची गर्दी, बायकांचे भोग, बाईपण, देवधर्म, गायकी सिनेमा कशावरही ती बोले. तिचं बोलणं मधाळ होतं.
तिच्या केशरी रसाळ ओठात नक्कीच कसली तरी गहिरी जादू होती.
नागम्माने धंदा केला की नाही हे नक्की सांगता येत नाही, तिच्याकडे येणारे आशिक सगळे वयस्कर असत. त्यांच्या मनावरच्या खपल्या निघालेल्या असत, नागम्मा त्यावर फुंकर घालण्याचं काम करे.
इतकं सारं असूनही तिचं फारसं नावगाव नव्हतं याला कारण तिचं विक्षिप्त वर्तन असावं.
कधी कधी महिनाभर ती स्वतःला कोंडून घेई.
तिचं कुणाबरोबरच लफडं नव्हतं की तिचा कुणी यार दलाल ही नव्हता.

दोन खोल्यांच्या घरात तिचं राज्य चाले.
कॉटनच्या साडया. मीनावर्क असलेले सैल गळ्याचे ब्लाऊज. गौरगळ्यात रेंगाळणारी नारिंगी मण्यांची माळ. नाकात मोरणी. उजव्या हाताच्या मनगटात कसले तरी काळे धागेदोरे गुंफलेले. शिडशिडीत बांधा. चेहऱ्याची ठेवणं गौराईसारखी मनस्वी लाघवी नि प्रसन्न. ती पाठमोरी होताच तिच्या रुंद पाठीवरचा एकमेव तीळ नजरेत भरे. तिच्या घरात मंद अत्तराचा दरवळ सदैव जाणवे.
एका खोलीत बैठक आणि दुसऱ्या खोलीत सगळं सामानसुमान. हिशोब साधा होता. तिथं बिछानाच नव्हता !

ऑक्टोबरमध्ये नागम्मा घर सोडून निघून गेली. जाण्याआधी तिने घातलं सगळं सामान सुमान कबाडवाल्याला फुकट देऊन टाकलं. खोल्या टक्क मोकळ्या केल्या.
जिथे कधी काळी कबुतरे बसत त्या कुंब्यावरच्या फुलांच्या कुंड्या काढून टाकल्या.
भिंतीवर टांगलेली चित्रे मात्र तशीच ठेवली.
तिच्यापाशी एक चित्र होतं रवीवर्माच्या चित्राशी साम्य असणारं. राजकुमारीच्या गळ्यात हार घालणाऱ्या राजकुमाराचं. ते तेव्हढं जागेवर नव्हतं.
घरमालकाला मामला लक्षात यायला काही दिवस लागले.
ती गेल्यानंतर काही दिवसांनी मिसिंगची तक्रार नोंद झाली.

नागम्माचं एफआयआरमधलं नाव बिल्किस आहे.
ती मुस्लिम नाव धारण करून राहत होती हे खूप कमी लोकांना ठाऊक होतं. तिला ते आवडायचं. परवीन सुलतानासारखा उभट गंध लावणारी नागम्मा लाखो कोटी लोकांच्या माणसांच्या सागरात कुठे तरी हरवून गेली.

मला वाटते तिने समुद्र जवळ केला असावा. त्यानेही आपल्या दमलेल्या खंगलेल्या लेकीस पोटाशी घट्ट धरून ठेवले असावे.
तिच्या गायकीने तोही मंत्रमुग्ध झाला असावा
.
नागम्मा बालदेवदासी होती ही ऐकिवातली बात. तिच्या गतकाळाविषयी ती कधीच खुलून बोलत नसे.
मृत्यूनंतर आपल्या देहावर कुठल्याच प्रकारचे जातीधर्माचे अंतिम संस्कार तिला नको होते.
शब्दाला जागणारी बाई होती. तिने अखेरचा वायदा नक्कीच तिला हव्या त्या पद्धतीने हव्या त्या वेळी पुरा केला असणार.

'कौन गली गयो श्याम बन बन बोले कोयलियां' हे ती खूप तन्मयतेने गायची.
आता ती कुठं गेलीय हे कुठली कोकिळ वा कुठलं पाखरू सांगणार नाही कारण तिचा दर्द फक्त त्या मुक्या जीवांनाच नेमका ठाऊक होता.
जग तिचं गाणं बजावणं ऐकायचं तर भवताल मात्र त्या गाण्याआड लपलेलं तिचं दुःखभरलं काळीज अनुभवायचं !

- समीर गायकवाड

#रेड_लाईट_डायरीज.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा