रविवार, १५ जानेवारी, २०२३

विहीर..

#sameerbapu
विहीर .. 

तुळसाबाई म्हणजे बज्याबाची बाईल! नांगी तुटलेल्या खेकड्यागत तिरक्या चालीची बाई. तिला काही सांगितलं तर ती वाकड्यात जायची. तांबूस गोऱ्या रंगाची बुटक्या चणीची तुळसा सदानकदा ओसरीवर नाहीतर संत्याच्या पिंपळापाशी बसून असायची. डोईच्या केसांना इतके तेल थापलेले असे की पदर तेलकट वाटायचा! बंद्या रुपयाचं कुंकू तिच्या व्हंड्या कपाळी असायचं. चाफेकळी नाक नसले तरी नाकपुड्या फार काही फेंदारलेल्या नव्हत्या. उतरत्या गालांच्या चेहऱ्याला आखूड हनुवटीची जोड होती त्यामुळे पत्त्यातल्या चौकट राणीसारखा तिचा चेहरा दिसायचा. तिचा रुबाबही राणीसारखा होता, बज्या शेळकेच्या घरी तिचा शब्द अंतिम होता. बज्या तिच्या शब्दाबाहेर नव्हता याची अनेक कारणे होती त्यातली फार थॊडीच गावाला ठाऊक होती. तुळसा अगदी तिरसट आणि तापड होती, बज्याच्या मामाची पोरगी होती ती. मामाने थाटात लग्न लावून दिलेलं, रग्गड पैसाअडका खर्च केलेला. गरीब जावयाचं बोट पिवळंधमक केलेलं, पोरीच्या अंगावर बक्कळ सोनं घातलेलं. आपली पोरगी डोक्यातून गेलेली आहे हे त्या बापाला माहिती होतं म्हणूनच त्यानं भाच्याला पोरगी देताना त्याला पुरतं मिंधं केलं होतं. बज्याचे हात त्या ओझ्याखाली अडकले होते. सासऱ्याच्या मदतीने त्यानं जमीनजुमला घेतला नि तिथून त्याचे दिवस फिरले! सारं होत्याचं नव्हतं झालं.

बज्या शेळकेला चार भाऊ होते. बापाच्या मृत्यूनंतर वडिलोपार्जित सात एकर जमीन त्यांनी आपसात वाटून घेतलेली. बज्या शेवटून दुसरा होता. त्याच्या वाट्याला आलेलं रान मुरमाड होतं, अगदी नापिकी नसली तरी त्या मातीत कसदेखील नव्हता. घरी मयत झाल्यावर वर्षात लग्न केलं गेलं नाही तर तीन साल अंगाला हळद लावायची नाय असा गावाचा भावकीचा अन् गावकीचा संकेत होता, त्याचं पालन करत बज्या आणि त्याचा धाकटा भाऊ वसंत यांचं लग्न एकाच मांडवात झालं होतं. वसंताला गावातलीच मुलगी सांगून आली होती, त्याचं शिक्षण बऱ्यापैकी झालं होतं नि तो थोडाफार हुशार व्यवहारचतुरही होता! गावातला पहिला मॅट्रिक पास तरुण होता तो! त्याचं चांगलं निपटलं. बज्या मात्र नात्यांच्या गुंत्यात अडकून बसला. तुळसाचा स्वभाव त्याला माहित नव्हता असं नव्हतं मात्र त्याच्या आईच्या इच्छेपुढे त्याचे काहीच चालले नाही. एकाएकी बाप गेला, घरात वाटण्या झाल्या, थोरल्याने कावा केला नव्हता मात्र मधल्याने डाव मांडला होता. बापाच्या पाठीमागे घर तुटलं, आई कोलमडून गेली आणि आईच्या मायेत असहाय्य झालेला बज्या नकार देऊ शकला नाही. तुळसाने उंबऱ्यावरचं माप ओलांडल्यापासून घरातली शांती भंग पावली होती. आईकडे बघून तो सारं सहन करायचा. मात्र एका पावसाळ्यात आई गेली आणि बज्याचा आधार गेला. त्यांच्या राहत्या वाड्याचेही हिस्से झाले. छातीत अगणित कळा येत गेल्या मात्र सोशिक असणारा बज्या काहीच बोलला नाही. जे मिळेल त्याला होकार देत गेला. तुळसाने मात्र मोकार तमाशा केला. जावांशी दावा मांडला, झिंज्या उपटून काढेपर्यंत भांडणं केली. शेवटी गावातल्या थोराड मंडळींनी मामला मिटवला. आपल्या बायकोने मोठ्या भावाच्या अंगावर जाणं बज्याला रुचलं नाही, मोठ्या वहिनीचा तिने केलेला पाणउतारा तो कधीच विसरू शकला नाही. ही भांडणं त्याच्या जिव्हारी लागली. घर सोडून तो वस्तीवर राहायला गेला.

बजरंग नावाप्रमाणेच बलदंड होता. चार गड्याचं काम करायचा, एका अंगाला बैल नि एका अंगाला त्याला जुंपलं तर तो बैलाला भारी पडायचा. कसलेला धिप्पाड देह होता त्याचा मात्र व्यावहारिक जगाची फारशी समज नव्हती. सगळं आई आणि बापाच्या मर्जीने चालायचं. भावंडेही प्रेमळ होती, थोरल्या वहिनीने तर आईची माया दिली होती. वडिलांच्या पाठीमागे त्यांच्या घराची लक्तरे वेशीवर टांगण्याचे काम आपल्या बायकोने केले हा डंख त्याला सुखाने जगू देत नव्हता. त्याची तब्येत आस्ते कदम ढासळत गेली. आपल्या पोरीने जावयाचे हाल केले याचा बज्याच्या सासऱ्याला पस्तावा आला. केलेल्या चुकीचे प्रायश्चित्त म्हणून त्याने ओढ्याच्या कडेला असलेली जमीन घेण्यासाठी बज्याला मोठी मदत केली. ती जमीन घेण्यासाठी बज्याने त्याच्या वाट्याला आलेली वडिलोपार्जित जमीन विकली. त्या जमिनीत तो रात्रंदिवस कसू लागला. गावाकडे घरी सुरु असलेली भांडणे त्याच्या दृष्टीआड सुरुच होती, त्यात खंड नव्हता. तांबडं फुटल्यापासून तुळसाच्या तोंडाचा पट्टा सुरु व्हायचा. जावांनी घराची दारं बंद केली ती ओसरीवर येऊन बसायची नाहीतर आळीच्या कोपऱ्यावर राहणाऱ्या संत्याच्या पिंपळापाशी बसून असायची. बसल्या बसल्या दातवण लावत गावाची मापं काढायची. तिच्या निंदेची ज्यांना गोडी होती अशा साळकाया म्हाळकाया तिच्या भवताली रिंगण करुन बसायच्या. तुळसाची कूस उजवून तिच्या पोटी एक गोरंगोमटं पोर आणि एक पोरगी झालेली. तुळसाने आपल्या पोरीवर जीव लावला नाही पण पोराला मात्र लाडाने येडं अन् गुळानं बोबडं करुन ठेवलं होतं! पोरगं अगदी वाया गेलं. बज्याला काही कळत नव्हतं असं नाही पण त्याचं काही चालतच नव्हतं, तो हताश होऊन पाहत राहायचा. कधी त्याने तिच्यावर डाफरण्याचा प्रयत्न केला तर ती वस्सकन अंगावर यायची, चार लोकांदेखत आपल्या बापाने केलेल्या उपकाराचा पाढा वाचून त्याचा पाणउतारा करायची. तो निमूटपणे मान खाली घालून निघून जायचा. मग तिला अजून चेव यायचा. असं करत करत बरेच दिवस लोटले. पोटापाण्याचे भागेनासे झाले तेंव्हा त्याने सासऱ्याच्या मदतीने जमीन घेतली.

आपली हक्काची जमीन विकून त्याने सौदा केला खरं मात्र फासे उलटेच पडले. दरम्यान मुलगी न्हातीधुती झाल्यावर तिच्या लग्नाची गोष्ट निघाली. त्यासाठी थोडा पैसा हवा होता, शिल्लक राहिलेली सगळी रक्कम मुलीच्या लग्नात खर्ची पडली. बज्या कंगाल झाला. ओढ्यालगत घेतलेली निम्मी जमीन रस्त्याच्या कामासाठी सरकारने ताब्यात घेतली नि त्याच्यावर आभाळ कोसळले. तो खचून गेला. त्याने दत्तू पाटलाच्या वस्तीवर सालगड्याचं काम धरलं. पण त्याचं गणित काही केल्या मेळ खात नव्हतं. हप्त्यातून एका दिवसासाठी जरी गावातल्या घरी गेलं तरी भूतकाळ त्याला खायला उठायचा. दरम्यान पोरीचं बाळंतपण जवळ आलं, खर्च मोठा दिसत होता खिसा मोकळा होता. त्याचा पोरगा रामचंद्र हा लग्नाला येऊन निबार दिसू लागला होता. त्याच्या लग्नावरुन तुळसा रोज टोमणे मारू लागली होती. तिच्या रोजच्या किरकिरीला कंटाळून बज्याच्या भावंडांनी दुसरीकडे राहण्याची सोय केली, वाडा विकून टाकला. तुळसाला भांडायला माणूस उरलं नाही आणि तिचे वडीलही वार्धक्याने गेले. बज्या खऱ्या अर्थाने अनाथ भणंग झाला होता. पोराचं लग्न करायला नि पोरीचं माहेरपण करायला त्याच्याकडे फुटका मणी नव्हता. त्याची नड दत्तूची बायको लीलावती हिने अचूक हेरली, तिने एक भयानक सौदा केला. त्याला बज्या आधी तयार नव्हता मात्र त्याची मती कुंठित झाली होती, त्याचा विवेक लोप पावला होता. रामचंद्राच्या वयाचा काशिनाथ हा लीलावतीचा एकुलता पोर होता नि तिला तीन पोरीही होत्या ज्यांची लग्ने झाली होती. दत्तूच्या पहिल्या बायकोपासून झालेल्या मुलाचं खटलं देखील तिथेच होतं. दत्तूपासून तिच्यापोटी शिवा जन्मला होता. त्याच्या जन्मानंतर काही दिवसांतच दत्तूची पहिली पत्नी मरण पावली होती. लीलावतीने सावत्र मुलाचे लग्न लावून दिले मात्र तिच्या मनात असूया होती. लग्नानंतर शिवाचा पाळणा लगेच हलला नि त्याला देखणं पोर झालं. मोठ्या नितळ मनाचा दत्तू नातू झाल्याने हरखून गेला, इकडे काशिनाथाच्या बायकोला मूल होत नव्हतं म्हणून लीलावती तळमळत राहिली. द्वेषाने ग्रासलेल्या लीलावतीच्या डोक्यात कुटीलतेचं जहर फणा काढून होतं, तिने त्यासाठी बज्याला निवडलं. काम ऐकताच त्याचा चेहरा काळाठिक्कर पडला! ओठ कोरडे पडले, नरडं आत ओढू लागलं. आधी त्याने नकार दिला मात्र लीलावतीने आमिष दाखवली त्याला तो भुलला. वस्तीवर कुणी नाही हे पाहून रानात खेळत असणाऱ्या शिवाच्या चिमुरड्या पोराला त्यानं विहिरीत कोंडलं, पायट्याचे धोंडे काढले. तो निघून आला आणि लीलावतीने पुढचे काम पार पाडलं. ते पोर तिने पाण्यात बूडवून ठार मारलं. साळसुदागत ती वस्तीवर येऊन बसली. सांज होता होता पोराचा शोध घेताना एकच गलका उडाला नि बज्याला आपण किती मोठी चूक करुन बसलोय याचा अंदाज आला. त्याचं मन त्याला खाऊ लागलं. रामचंद्राचं लग्न झालं तरी बज्याच्या चेहऱ्यावर ख़ुशी नव्हती. या लग्नानंतर काही दिवसांतच तुळसाने अंथरून धरले. आजाराने अवघ्या काही दिवसांत गंभीर रुप धारण केलं नि त्यातच तिचा मृत्यू झाला. तुळसा मेली तेंव्हा बज्या रडला नाही!

इकडे दत्तू पाटीलही हाय खाऊन मरण पावला. त्याच्या पाठीमागे वंशाची वेल काही केल्या वाढली नाही. काशिनाथला मूलबाळ झाले नाही. लीलावती टाचा रगडून रगडून खंगून गेली. चार दशकाहुन अधिक काळ पाटलांच्या शिवारात सालगडी म्हणून राबणारा बज्या उतारवयात लागीर झाल्यागत वागू लागला. पाटलाच्या शेतांत आणखी आक्रीत घडलं, ज्या विहिरीत शिवाचा मुलगा मरण पावला तिचं पाणी दत्तू जाताच एकाएकी आटलं. त्यानंतर दोन वर्ष सलग दुष्काळ पडला, रान निव्वळ पडीक पडलं. शिवार ओसाड झालं. काशिनाथ बायकोला घेऊन नोकरीच्या गावी गेला, शिवा आणि लीलावती दोघेच त्या भकास वस्तीवर राहू लागले, बज्या त्यांच्या जोडीला येऊन बसायचा. शेतात काम नव्हतं, त्याने कामावर जाऊ नये म्हणून रामचंद्र त्याला खूप अडवायचा पण कितीही मिनतवाऱ्या केल्या तरी बज्या काही केल्या ऐकायचा नाही. तो पाटलाच्या वस्तीवर यायचाच, आटून गेलेल्या विहिरीच्या ढलाणीपाशी जांभळाच्या झाडाखाली येऊन बसायचा. तहानभूक हरपून तासंतास बसून राहायचा. त्याला आता वेगळीच चिंता लागली होती. रामचंद्राच्या लग्नाला वीस वर्ष झाली तरी तान्हुली पावलं अंगणात उमटली नव्हती. आपण पाटलाच्या वंशाचा दिवा विझवण्यात मदत केली म्हणून द्येवानं आपला वंश बुडवला असंच त्याला वाटायचं. आभाळाकडं बघत पुटपुटत राहायचा,कधीकधी विहिरीत उतरून साफसफाई करायचा. नेणत्या लेकरागत हमसून रडायचा. सांज होताच रामचंद्र येऊन त्याला घेऊन जायचा. बज्या रोज उठून पश्चात्ताप करायचा आणि आपल्या रामचंद्राला मुलबाळ व्हावं म्हणून देवापाशी गाऱ्हाणं करायचा. हेच त्याचं आयुष्य झालं होतं.

आणि एका दिवाळीत बज्याची प्रार्थना सुफळ झाली. थोराड झालेली त्याची सून मंदाबाई पोटुशी राहिली. तिचे पाय भारी झाल्याचं कळताच तो ढसाढसा रडला. इतकी आनंदाची बातमी कळली तरी पाटलाच्या वस्तीवर विहिरीपाशी यायला तो काही चुकला नाही. त्या दिवशी त्याला विहिरीतून प्रतिध्वनी आल्याचे भास झाले. विहिरीच्या तळाशी कुणी तरी हाका मारत असल्याचा त्याला भास झाला. ते भास वाढतच राहिले. तो पुरता भ्रमिष्ट झाला. बज्याला वेड लागलंय असं गाव चारी तोंडाने बोलू लागलं. जख्ख म्हाताऱ्या झालेल्या लीलावतीला तर अपार दुःख झालं, तिलाही पश्चात्ताप होत होता मात्र सांगणार कुणाला? ज्याचं पोर आपण मारलं त्या शिवाच्या हातून सेवा करवून घेताना ती रोज तीळतीळ मरत होती. पावसाळा तोंडावर आला होता, सुनेचं बाळंतपण कधीही होईल हे बज्याला एव्हाना उमगलं होतं. आषाढ भरावर आला होता. वारं मुकं झालं होतं. काळयाकुट्ट ढगांनी एकच गर्दी केली होती. सुकून गेलेली झाडं माना टाकून उभी होती. दूरवर कुठं चिटपाखरू दिसत नव्हतं. अंगातून घामाच्या धारा लागलेल्या अवस्थेत बज्या विहिरीच्या तोंडापाशी बसून होता. त्याचं अंग आता थरथरत होतं. भास वाढले होते. डोक्यात कसले तरी आवाज घुमत होते. इतक्यात रामचंद्राच्या हाका त्याच्या कानी पडल्या. तो लांबूनच आरडत धावत येत होता, आबा तुला नातू झालाय! आबा तू आज्जा झालाय! मी बाप झालोय, मंदाला पोरगं झालंय! आबा मंदाला पोरगं झालं!"

काही सेकंदासाठी बज्याच्या चेहऱ्यावर हसू झळकलं! पण निमिषार्धात त्याचा चेहरा भावव्याकुळ झाला. रामचंद्राच्या हाका वाढत गेल्या आणि बज्याला त्याचा आवाज आता क्षीण वाटू लागला, मात्र विहिरीतून येणारा आवाज मात्र अत्यंत वेगाने वाढला होता. त्यातच पावसाची रीपरीप सुरु झाली. रामचंद्राचे पाय ढेकळात अडकू लागले. असेच काही क्षण गेले. बांधावरुन धावत येणारा रामचंद्र बज्याच्या नजरेच्या टप्प्यात येऊनदेखील त्याची नजर शून्यात होती, त्याच्या डोळ्यात विहीर दिसत होती! खोल खोल कोरडी ठाक विहीर! रामचंद्र बज्याच्या जवळ पोहोचला आणि त्याने आनंदाने बापाच्या नावाने आरोळीच मारली! त्याला हात लावून हलवून पाहिलं. त्याचं अंग एकाएकी थंड पडलं होतं. सर्रकन त्यानं हात मागे घेतले आणि निष्प्राण झालेला बज्याचा देह कठडयावरून कलून विहिरीत पडला, दहा परस खोल घडीव विहीर होती. धोंडयांवर पडून बज्याचं डोकं फुटलं. विहिरीचा तळ लाल झाला. त्या रात्रीच त्याचं मर्तिक झालं. काही दिवसांनी काशिनाथ गावी येऊन गेला. लीलावतीने त्याच्यासोबत शहरी जाण्यास नकार दिला. आपल्या थोरल्या लेकीचा मुलगा तिने शिवासाठी दत्तक घेतला. दत्तू पाटलाचं शिवार लहान मुलाच्या आवाजाने पुन्हा डवरलं. आताशा लीलावती वस्तीवर शांत बसून असते, तिला वेध लागलेत मरणाचे, मुक्तीचे. तिला शिवाच्या मांडीवर आपले प्राण सोडायचेत. बज्याच्या मरणाने तिथे आणखी एक बदल झाला. दत्तू पाटलाच्या आटलेल्या विहिरीतले झरे पुन्हा पाझरु लागले. पाटलाची विहीर त्या पावसाळ्यात काठोकाठ भरुन गेली. त्याच विहीरीचे पाणी तुळसाच्या डोळ्यातून वाहत असते ज्याला त्या चिमुरड्या मुलाचा देहगंध आहे!

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा