सोमवार, २३ जानेवारी, २०२३

दक्षिणेतील सिनेमांचा उत्तर-दिग्विजय!


एक काळ होता की जेंव्हा आगामी हिंदी सिनेमांची चर्चा सर्व माध्यमांत असायची. येऊ घातलेल्या सिनेमाविषयी अपार उत्कंठा असायची, त्यातली गाणी, त्यातले सीन्स, संवाद, 
ऍक्शन, तांत्रिक अंगे यांची माहिती झळकत राहायची. त्यावर गॉसिप व्हायचं. ही वातावरण निर्मिती सिनेमाच्या पथ्यावर पडायची. हा प्रकार अनेकदा आताच्या पेड मार्केटिंगच्या स्वरूपाचा असायचा, मात्र त्याचे बाह्यरुप बटबटीत नव्हते. पुष्कळदा लोकांनाही याची जिज्ञासा असायची. मुळात सिनेमाविषयी नि त्यातल्या नायक नायिकांविषयी एक कुतूहलयुक्त आदर असे. आता परिस्थिती बदललीय. माध्यमांचा सुकाळ आहे, माहितीचा भडिमार आहे तरीदेखील आगामी काळात कोणते हिंदी सिनेमे प्रदर्शित होणार आहेत याबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता अभावानेच आढळते, उलटपक्षी दक्षिणेकडील कोणकोणते सिनेमे कधी रिलीज होणार आहेत त्यांचा यूएसपी काय आहे याविषयी लोक भरभरून बोलताना दिसतात. आता असे वातावरण झालेय की हिंदी चित्रपटसृष्टीच्या नियमित प्रेक्षकांनाही पुढचा बहुप्रतिक्षित चित्रपट कोणता पहायचा आहे हे आठवावं लागतं. कारण मोजके अपवाद सोडल्यास या वर्षात 
आतापर्यंत जे छोटे-मोठे हिंदी चित्रपट आले आहेत, त्यांचे नशीब गुणवत्तेच्या आणि कलेक्शनच्या बाबतीत सर्वश्रुत आहे. बॉलीवूडचा शेवटचा फील-गुड चित्रपट कोणता होता किंवा ज्याच्या कलेक्शनची खूप चर्चा झाली होती असा चित्रपट लक्षात ठेवणे कठीण झालेय हे वास्तव आहे. त्या तुलनेत जर दक्षिणेच्या चित्रपटांबद्दल बोललो तर लगेचच 'RRR', 'KGF 2' आणि 'पुष्पा: द राइज' ही नावे समोर येतात. या चित्रपटांना मिळालेले व्यावसायिक यश अभिनंदनपात्र का आहे याची अलिकडे सातत्याने चर्चा होतेय. सिनेसृष्टीत दक्षिणोत्तर जे  काही घडते आहे त्यावर व बॉलीवूडमधल्या त्रुटींवर फोकस केला जातोय हे उत्तमच आहे मात्र काही प्रश्न चर्चेतून गायब आहेत जसे की दक्षिणेकडील ज्या चित्रपटांनी सणकून मार खाल्ला असे चित्रपट उत्तरेकडे चांगला व्यवसाय करतील का किंवा दक्षिणेकडे अपयशी ठरलेल्या चित्रपटांचे हिंदी रिमेक्स यशस्वी होतील का? दक्षिणेकडचे सर्वच चित्रपट ब्लॉकबस्टर हिट होताहेत का? तिकडच्या फ्लॉप सिनेमांची टक्केवारी किती आहे? असे मुद्दे चर्चेत नसतात! खरे तर यांची चर्चा झाली तर नेमके चित्र समोर येऊ शकते मात्र आपली माध्यमे अशी चर्चा करण्यात निरुत्साही दिसतात. किंबहुना ही मांडणीदेखील केली जात नाही. बॉलीवूडविरोधात सातत्याने बॉयकॉट मोहिमा चालवत असताना दक्षिणेकडील केवळ छप्परफाड यशाचेच गोडवे गायचे नि तिकडच्या 
समीरबापू
अपयशाविषयी मौन राहायचे असा एक फंडा सर्वत्र दिसतोय. याला राजकीय, आर्थिक, समाजिक नि धार्मिक कंगोरे असल्याने खरे स्वरूप समोर येणे तूर्तास कठीण दिसतेय हे स्पष्ट आहे. दक्षिणेकडेही मोठ्या संख्येने सिनेमे कोसळत आहेत. तिकडच्या सिनेनिर्मात्यांनी धास्ती घेऊन मध्यंतरी थेट ओटीटीवरच प्रदर्शित करण्याचा सपाटा लावला. परिणामी थिएटर्स ओस पडली, चित्रपटसृष्टीच्या तंत्रज्ञ मंडळींनाही फटका बसला; चित्रपट निर्मितीसह वितरणव्यवस्थेतही बेफाम बदल झाले त्यामुळे अपवाद वगळता सगळ्यांचे पेकाट मोडायच्या बेतात आले. याविरोधात आंदोलन उभं राहिलं, चक्क स्टुडिओ बंद ठेवले गेले, महिनाभर चित्रपटनिर्मिती बंद पडली वा पुढे ढकलली गेली. अर्थात ज्या सिनेमांनी तिकीटबारीवर टाकसाळ खोलली होती त्याच्या निर्मात्यांनी सावध भूमिका घेतली. मग काही दिवसांनी सारं सुरळीत झाल्याचा देखावा केला गेला. चित्रपट निर्मिती पुन्हा सुरु झाली मात्र मूळ दुखणे कमीअधिक फरकाने बदललेल्या स्वरुपात तसेच राहिले. हा विषय माध्यमांत फारसा चर्चेस आलाच नाही मात्र ज्या मोजक्या सिनेमांनी अफाट यश मिळवले होते त्यांचीच चर्चा अधिक झाली. दक्षिणेकडील फ्लॉप्सची नोंद घेतली तरीही हिंदी सिनेमाच्या यशाच्या उतरत्या आलेखाची कड घेता येत नाही हे वास्तव आहे.

लोकमानसाला भिडणारा आशय, नावीन्य, अफलातून शैली आणि मास अपील यांमुळे हे यश साऊथच्या सिनेमांना 
लाभलंय. त्यांचे यश कमी लेखता येणार नाही. एस.एस. राजामौलीचा 'आरआरआर', अभिनेता यशचा ऍक्शनपट 'केजीएफ-2' आणि अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' या  चित्रपटांनी देशभरातील प्रेक्षकांच्या हृदयावर जे अधिराज्य गाजवलं तशीच संधी हिंदी चित्रपटांनाही होती मात्र त्यांना संधीचे सोने करता आले नाही. त्यावर लावलेले पैसे पाण्यात गेले. याचा परिणाम अधिकच उलटा झाला! रणबीर-आलियाचा मेगा बजेट 'ब्रह्मास्त्र', अक्षय कुमारचा 'कठपुतली' आणि सैफ-हृतिकचा साऊथरिमेक असलेला 'विक्रम वेधा' हे ओटीटीवर फार वेगाने आले! काही नव्या हिंदी सिनेमांची  बिलकुल चर्चा आढळत नाहीये मात्र ते ओटीटीवर येताहेत तर वाथी, कब्जा, सालार या नव्या रिलीजसह इंडियन, पुष्पा, केजीएफ यांच्या सिक्वेलची चर्चा आताच दिसू लागलीय. हे गुणलक्षण केवळ बिग बजेट साऊथ सिनेमांपुरते मर्यादित राहिले नाही. गतसाली ऑगस्टमध्ये रिलीज झालेल्या निखिल सिद्धार्थच्या 'कार्तिकेय 2' या तेलगू चित्रपटाच्या हिंदी 
आवृत्तीची मागणी अवघ्या पाच दिवसांत इतकी वाढली की, प्रदर्शकाला स्क्रीन्सची संख्या पन्नासवरून पंधराशेपर्यंत वाढवावी लागली. या लो-बजेट चित्रपटाची हिंदी आवृत्ती सुपरहिट घोषित झाली. या चित्रपटाच्या जागतिक कलेक्शनने १०० कोटींचा आकडा पार केला! गेल्या दीड वर्षात असं अनेकदा घडलेय की दक्षिणेकडील चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर आश्चर्यकारकपणे चांगली कामगिरी केलीय. त्याउलट बी-टाऊनमध्ये नाण्यांची टांकसाळ खोललीच नाही, दुसरीकडे दक्षिणेत शिट्ट्या आणि नाण्यांचा जोरदार पाऊस पडत होता. गतवर्षाची सुरुवात 'मास्टर' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटाने झाली आणि अखेर 'पुष्पा: द राइज'च्या देदीप्यमान यशाने झाली. पुष्पाने 365 कोटी रुपये कमवून सर्वांना आश्चर्यचकित केले. हिंदी आवृत्तीने 106 कोटींचा व्यवसाय केला आणि त्याचे श्रीवल्ली… हे गाणे देशभरात गाजले. याच काळात 40 कोटींमध्ये बनलेल्या 'डॉक्टर' या तमिळ चित्रपटाने 100 कोटींची कमाई केली. रजनीकांतच्या 'अन्नत्ते' या तमिळ चित्रपटाला प्रेक्षक आणि चित्रपट समीक्षकांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या नाहीत तरीही त्याने 240 कोटींचा व्यवसाय केला होता. म्हणजेच वाईट कंटेंटची भलावण करणारे प्रेक्षक देशभरात आहेत हे उघड आहे, तरीही हिंदी सिनेमेच अधिक प्रमाणात सपकून आपटत राहिले.

संमिश्र प्रतिसादानंतरही तेलुगू चित्रपट 'अखंड'ने 150 कोटींचा गल्ला जमवला. कन्नड चित्रपट 'रॉबर्ट'नेही 100 
कोटींचा गल्ला जमवला. प्रशंसा आणि पैसा मिळवलेल्या चित्रपटांमध्ये मल्याळम चित्रपट 'नायट्टू' नावाशिवाय पुढे जाऊ शकत नाही, त्याचे बजेट फक्त 4 कोटी रुपये होते त्याने कोरोनाकाळातही 30 कोटी रुपये कमवले. त्यात भर म्हणजे या वर्षी 'RRR' ने जागतिक स्तरावर कमावलेले रु. 1,200 कोटी, 'KGF 2' ने जमा केलेले रु. 1,300 कोटी, 'Vikram' ने गोळा केलेले रु. 432 कोटी आणि 'विक्रान्त रोना' ने गोळा केलेले रु. 131 कोटी असे म्हणता येईल. दक्षिणेकडील सिनेमांचे हे सुवर्णयशच होय. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय), साउथ मीडिया अँड एंटरटेनमेंटच्या अहवालाने देखील याची पुष्टी केली आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की 2021 मध्ये, चित्रपटांच्या अखिल भारतीय बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या एकूण संकलनाच्या 62 टक्के साऊथ चित्रपटांमधून मिळाले. तर गतवर्षी एप्रिलमध्ये साउथ इंडिया मीडिया अँड एंटरटेनमेंटवर सीआयआयने जारी केलेल्या आणखी एका अहवालानुसार 6,000 कोटी रुपयांचा दक्षिण भारतीय चित्रपट उद्योग सुमारे 13 टक्के (CAGR) दराने वाढण्याच्या मार्गावर आहे. हे मोठे चित्रपट सोडले तर दक्षिणेतील अन्य चित्रपट हिंदी पट्ट्यात इतका दमदार व्यवसाय करू शकले नाहीत हेदेखील सत्य आहे. विजय देवरकोंडा अभिनीत तेलगू चित्रपट 'लिगर' बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप झाला. दक्षिणेतील सुपरस्टार चिरंजीवी आणि त्याचा मुलगा राम चरण यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'आचार्य' या चित्रपटाला बजेटचे 140 कोटी रुपये कमावण्यात धापा टाकाव्या लागल्या! साऊथच्या बिग बजेट फ्लॉपच्या यादीत अभिनेता प्रभासच्या 300 कोटींहून अधिक खर्चून बनलेल्या 'राधे श्याम' या चित्रपटाने तर अक्षरशः धूळ चाखली! त्याचप्रमाणे, अभिनेता नाग चैतन्यचा तेलगू चित्रपट 'थँक यू', जो जुलैमध्ये आमिर खानसोबत 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटात मुख्य भूमिकेत आला होता, त्याने केवळ 8.95 कोटी रुपये कमावले, तर चित्रपटाचे बजेट 30 कोटी रुपये होते.

तरीही साऊथच्या मानाने हिंदी सिनेमा पिछाडीवर पडलाय हे मान्य करावे लागेलच. याला बळकटी देणाऱ्या काही घटना अलीकडे घडल्या. गोल्डन ग्लोब पुरस्कारांच्या बेस्ट सॉन्ग 
श्रेणीत 'आरआरआर'ने ‘नाटुनाटु’साठी आपलं नाव कोरलं! ऑस्करसाठीही साऊथने स्वतःची मोहीम उघडलीय! एकीकडे थिएटरमधील अपयशास घाबरून हिंदी सिनेमे अधिकाधिक ओटीटीकडे वळत असताना दक्षिणेचा दिग्विजय जारीच आहे! हिंदी सिनेमांच्या उतरत्या आलेखाची समीक्षा करताना काही मुद्दे ठळकपणे समोर येतात. दक्षिणेतील चित्रपट निर्माते अधिक बुद्धिमान पद्धतीने आणि वेगवेगळ्या शैलीने प्रयोग करताहेत तर हिंदी चित्रपट निर्माते एकाच सूत्रावर चित्रपट बनवतात. वास्तवात 'पुष्पा' हा टिपिकल जॉनर चित्रपटांपैकी एक होता. मात्र तो पूर्णपणे नवीन पद्धतीने प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आला. तमिळ आणि मल्याळम या खूप जुन्या भाषा आहेत आणि या भाषा खूप जुन्या संस्कृतींचा भाग आहेत. कदाचित यामुळेच तिथले चित्रपट निर्माते त्यांच्या चित्रपटाच्या तपशीलावर खूप काम करतात. तसेच कोणताही चित्रपट बनवण्यापूर्वी ते खूप संशोधन करतात. या उलट उत्तरेकडे असा कोणताही चित्रपट बनला नाही जो सामान्य व्यक्तीच्या वास्तव जीवनावर प्रभाव टाकू शकेल. राजकुमार हिरानीचा '3 इडियट्स' हा चित्रपट या अर्थाने वेगळा असला तरी त्यालाही मर्यादा होत्या! दक्षिणेकडील दिग्दर्शक तुलनेने अधिक हुशार आणि प्रतिभावान आहेत. टिपिकल फॉर्म्युल्यांवर काम करुन हिंदी सिनेमाच्या दिग्दर्शनातली प्रतिभा अस्तास जाण्याची भीती वाटतेय. एकच कथाकल्पना विविधतेने, नाविन्यपूर्ण नि लोकांच्या पसंतीस पडेल अशा पद्धतीने सादर करण्याची खुबी हिंदी सिनेमाने आत्मसात करणे हाच एकमेव तरणोपाय सद्यस्थितीत दिसतोय. किमान तेव्हढे जरी केले तरी बुडत्याला काडीचा आधार होईल अन्यथा साऊथच्या सिनेमांचा उत्तरदिग्विजयी कैफ जारी राहील.

- समीर गायकवाड 

1 टिप्पणी: