बुधवार, २८ डिसेंबर, २०२२

हम भी अगर बच्चे होते!

सन ऑफ इंडिया 

हिंदी चित्रपटसृष्टीने सर्वच वयोगटातील पात्रांना ग्लॅमर दिलेय, त्यांच्या भूमिकांना स्वतंत्र स्पेस दिलीय. हरेक वयाच्या कलाकारांना किर्ती मिळवून देताना हिंदी सिनेमा नित्य नव्या उंचीवर जात राहिलाय. कलाकारांनी देखील आपल्याला 
चाची 420 
मिळालेल्या संधीचे सोने करत आपल्या वाट्याला आलेल्या कॅरेक्टर्सना न्याय दिला. नायिका, नायकापासून ते खलनायकांपर्यंतच्या आलेखाचा आढावा घेताना बालकिशोरांच जगही सिनेमाने ध्यानात घेतल्याचे दिसते. देशात बालचित्रपटांना जे स्थान मिळायला हवे होते ते मिळालेले नाही हे जरी मान्य केले तरी बालमित्रांच्या जगास बहिष्कृतही केलेलं नाही हे ही खरेय. मुलांवर बनवलेले चित्रपट कमी-अधिक प्रमाणात स्वीकारले गेलेत. इतर भारतीय भाषांपेक्षा हिंदीत बालचित्रपटांची निर्मिती जास्त झालीय. राज कपूरपासून ते आमिर खानपर्यंत निर्मात्यांनी मुलांना केंद्रस्थानी ठेवून बालचित्रपट तयार केले आहेत. हे सिनेमे केवळ मनोरंजनच करत नाहीत तर मुलांशी संबंधित समस्यांकडेही लक्ष वेधतात. 1980 मध्ये 'मिस्टर इंडिया' हा चित्रपट एका अदृश्य माणसावर बनवला गेला होता पण त्या चित्रपटाचा केंद्रबिंदू ही मुले होती. हा सिनेमा ऐंशीच्या दशकातील सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक होता. 'तारे जमीन पर', 'मकडी', 'नन्हे जेसलमेर', 'इक्बाल', 'ब्लू अंब्रेला', 'जजंत्रम ममंत्रम', 'अपना आसमान', 'मेरे प्यारे प्राइम  मिनिस्टर', 'भूतनाथ', 'सिक्रेट सुपरस्टार', 'बम बम बोले' आदी बालचित्रपटांनी बालचित्रपटाची संकल्पना थोडी बदललीय. नव्या संवेदनेवर निर्मिले गेलेले हे चित्रपट शक्यअशक्यतेचा नवा पट उभा करतात. या चित्रपटांमध्ये मानवी नातेसंबंध आणि सहवास भावना, मुलांच्या समस्या मोठ्या वैविध्यपूर्ण आणि सौंदर्याने चित्रित केल्यात. बालपण वेगवेगळ्या पद्धतीने मांडतानाच कधी त्यातली गंमत, कधी त्यांची भीती, कधी त्यांची निरागसता तर कधी त्यांची आंतरिक धडपड चित्रपटांतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. काही चित्रपट असेही आहेत जे विशेषतः मिलेनियल किड्सच्या आधीच्या पिढीशी बोलतात.

विवेक शर्मा दिग्दर्शित बी.आर. चोप्रा दिग्दर्शित 'भूतनाथ' चित्रपटातील बंकू आणि भूतनाथ यांच्या नात्याने संयुक्त कुटुंबाच्या हरवलेल्या संकल्पनेबद्दल आणि भारतीय 
कुटुंबांच्या विभाजित मूल्यांबद्दल जागरुकता निर्माण केली. हिंदी चित्रपटांमध्ये अभिनेता या नात्याने मुलांची उपस्थिती तसेच बालचित्रपटांबद्दलची आपली धारणा 'मकडी' चित्रपटाने बदलली. विशाल भारद्वाजच्या 'ब्लू अंब्रेला'नेही संवेदनांच्या पातळीवर खूप छाप पाडली. इरफान कमालने त्याच्या 'थँक्स माँ' या चित्रपटात मुंबईच्या झोपडपट्टीतील भटक्या आणि अनाथ मुलांमधून अपूर्ण बालपणीची मार्मिक कहाणी मांडण्याचा प्रयत्न केलाय. या चित्रपटात एका अनाथ बालकाची कथा आहे. ज्याला स्वतःला सलमान खान म्हणवायला आवडते. तो अनाथ मुलांसोबत खिसा कापून उदरनिर्वाह करतो. त्याची एकच इच्छा असते की कधीतरी आईला भेटावे. बालगृहातून पळून जात असताना त्याला दोन दिवसांचे नवजात बाळ दिसते. तो त्या निरागस मुलाला घेऊन येतो आणि वाढवतो. त्याच्या मित्रांच्या मदतीने, तो मुलाच्या आईपर्यंत पोहोचण्यात यशस्वी होतो, परंतु जेव्हा त्याला हे सत्य कळते की मुलाला त्याच्या आईने तेथे सोडून दिले होते तेव्हा त्याला धक्का बसतो. चित्रपटानुसार देशात दररोज 270 मुले अनाथ होतात. शहरातील निनावी गल्ल्यांमध्ये या मुलांचे आयुष्य निघून जाते आणि काही मुले उदरनिर्वाहासाठी गुन्हेगारीचा मार्ग पत्करतात.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पाठशाळा' या चित्रपटाच्या माध्यमातून समाज आणि मुलांच्या भवितव्याशी होणारा 
बम बम भोले 
गोंधळ दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. शिक्षक आणि मुलांच्या पालकांसाठी हा डोळे उघडणारा चित्रपट ठरला. शाळकरी मुलांचे ज्वलंत प्रश्न उपस्थित केलेले. सार्वजनिक शाळांतील व्यावसायिक वृत्ती तपासण्याचा प्रयत्न करण्यात केला गेलाय. प्रियदर्शनचा 'बम बम बले' हा चित्रपट मुलांसोबत थोरांनीही मोठ्या प्रेमाने पाहिला. या चित्रपटात दोन लहान भावंडे असतात. एके दिवशी चुकून भावाकडून बहिणीचे बूट हरवतात. आई-वडील गरीब असल्याने ते आपल्याला रागावतील याची त्यांना भीती वाटते. दोन्ही भावंडं मनात एक गोष्ट निश्चित करतात. बहीण सकाळी तेच बूट घालून शाळेत जाते, भाऊ दुपारी तेच बूट घालून शाळेत जातो. दरम्यान कुटुंब आणि शाळा यांच्यातील घुसळण रंजक वळणावर पोहोचते. आंतरशालेय मॅरेथॉन शर्यतीत भावाला प्रथम नव्हे तर तिसरे यायचे असते कारण तिसरे पारितोषिक म्हणजे त्याच्या बहिणीला आवश्यक असलेले शूज. पण मॅरेथॉन शर्यतीत तो पहिला क्रमांक मिळवतो. त्याला पुढील अभ्यासासाठी शिष्यवृत्ती मिळते, पण तो आनंदी नाही. उलट प्रथम क्रमांक मिळाल्यावर आपले स्वप्न आणि गरज असलेले तिसरे पारितोषिक 'शू' मिळू शकणार नाही याचे त्याला दुःख होते. या चित्रपटाचा हा एक अतिशय हृदयस्पर्शी भाग आहे. जिंकूनही तो स्वतःला पराभूत समजतो. प्रसिद्ध चित्रपट निर्माते माजिद माजिदी यांनी या कथेवर 'चिल्ड्रन ऑफ हेवन' बनवला आहे. हिंदीतच खालिद वाई बाटलीवाला यांनी 'सलाम बच्चे' नावाचा हा चित्रपट बनवला आहे. 'कुछ कुछ होता है' या बिगस्टारर चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण होता. यात लहानग्या अंजलीची तिच्या आईबद्दलची तळमळ, तिच्या वडिलांना त्याच्या प्रेमाने पुन्हा जोडण्याचा तिचा प्रयत्न आणि छोटी अंजली तिच्या आजीसोबतचे ऋणानुबंध अशा साध्याच पण महत्वाच्या गोष्टी होत्या. कथानक बालचित्रपटाचे नसले तरीही त्याचा मुख्य धागा छोट्या अंजलीच्या प्रवासाविषयीशी जोडला गेलेला असल्याने अंजलीला जेंव्हा रडू येते तेव्हा थिएटरमध्ये बहुतांश प्रेक्षक डोळे पुसतात!

आमिर खानचा 'तारे जमीन पर' हा चित्रपट डिस्लेक्सियाने ग्रस्त असलेल्या मतिमंद मुलावर आधारित होता. चित्रपटाने अनेक बेंचमार्क सेट केले आणि डिस्लेक्सिया असलेल्या 
तारे जमीन पर 
मुलाचे मानसशास्त्र मोठ्या गांभीर्याने आणि जागरूकतेने चित्रित केले. 'तारे जमीन पर'च्या गाण्यांनीही वेगळी छाप सोडली. 'तहान' आणि 'रामचंद पाकिस्तानी' सारख्या चित्रपटांच्या पटकथेत मुले मागे राहिली. मुलांच्या शिक्षणावर आधारित 'नन्हे जसमेलर'च्या स्क्रिप्टमध्ये काही नाविन्य होते, पण चित्रपटाची कथा बॉबी देओलभोवती फिरते. विशाल भारद्वाजच्या 'ब्लू अंब्रेला'ला तर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राहुल बोसचा 'चेन कुली की मैंन कुली', अनुराग कश्यपचा 'बाल गणेश', 'माय फ्रेंड गणेश', 'रिटर्न ऑफ हनुमान' या चित्रपटांचीही खूप चर्चा झाली. अजय देवगणच्या 'राजू चाचा'नेही चांगली कमाई केली. काही वर्षांपूर्वी संजय लीला भन्साळी यांचा 'ब्लॅक' हा चित्रपट आला होता, ही कथा एका अंध आणि मूकबधिर मुलीची होती. यामध्ये अमिताभ त्या अंध मुलीच्या कडक शिक्षकाच्या रूपात होते, यास अनेक पुरस्कारही मिळाले. या चित्रपटाचेही खूप कौतुक झाले. त्याचप्रमाणे अमिताभ बच्चन अभिनीत 'पा' मध्ये प्रिजेरिया आजाराने ग्रस्त बालक दाखवण्यात आला होते. ज्या मुलांचे पालक गमालेले असतात त्यांची काळजी देव घेईल असा भाबडा आशावाद असणारी कथा 'राजू चाचा'मध्ये होती. यात अजय देवगणपेक्षा बाल कलाकारांना स्पेस जास्ती होती.

पियुष झा यांच्या 'सिकंदर' चित्रपटात काश्मीरमधील तणाव आणि वेदना मुलांच्या डोळ्यांतून पाहण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. सिकंदर ही एका मुलाची कथा आहे ज्याला 
स्टॅनली का डिब्बा
फुटबॉलची आवड आहे आणि त्याला राष्ट्रीय स्तरावर फुटबॉल खेळायचा आहे. पण एके दिवशी त्याला रस्त्यावर बंदूक सापडते, त्यानंतर त्याच्या आयुष्यातील सर्व काही बदलू लागते. या चित्रपटात काश्मिरी मुलांच्या व्यथा पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. 'स्टॅनली का डिब्बा' या चित्रपटाची कथा शाळेत जाणाऱ्या नऊ वर्षांच्या स्टॅनलीची आहे. स्टॅनली त्याच्या मित्रांसोबत अभ्यास करण्यासोबतच सामान्य जीवन जगत असतो. पण एके दिवशी जेव्हा हिंदी शिक्षक बाबूराम यांची नजर त्याच्या आणि सहकाऱ्यांच्या जेवणाच्या डब्यांवर पडते तेव्हा तो अडचणीत येतो. इतकंच नव्हे तर बाबूरामला जेव्हा कळतं की प्रत्यक्षात स्टॅनली डबा आणत नाही, तेव्हा त्याचा त्रास आणखी वाढतो. बाबूराम त्याच्यावर डबा आणण्यासाठी दबाव आणतो आणि म्हणतो की डबा आणली नाही तर त्याला शाळेत प्रवेश दिला जाणार नाही. शेवटी स्टॅनलीच्या डब्याच्या शोधात मोहीम सुरू होते आणि या मोहिमेत घडणाऱ्या घटना हे स्टॅनलीच्या डब्याचे वैशिष्ट्य आहे. 'स्टॅनली का डिब्बा' चित्रपटाच्या शेवटी जेव्हा प्रेक्षकांना कळते की स्टॅनली अनाथ आहे, त्याला आई-वडील नाहीत आणि तो आपल्या क्रूर काकांच्या दयेवर जगत आहे, तेव्हा प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू येतात. 'लकडी की काठी' गाणं असणारा 'मासूम' हा सिनेमा कुणी विसरणं शक्यच नाही. त्यातला निरागस नि मृदु जुगल हंसराज विस्मृतीत जाणं अशक्य आहे.

यूटीव्ही स्पॉटबॉय आणि सलमान खान द्वारे सह-निर्मित 'चिल्लर पार्टी' ही एका निरागस मुलांच्या गटाची कथा होती जी राजकारण्याविरुद्ध उभे राहतात आणि एका भटक्या कुत्र्याचा जीव वाचवून मन जिंकतात. 'आय एम कलाम' चित्रपटाची कथा देशाचे सर्वात प्रसिद्ध राष्ट्रपती आणि 
आय एम कलाम 
मिसाइलमॅन एपीजे अब्दुल कलाम यांना भेटण्यासाठी एक लहान मूल कोणत्या प्रकारचे प्रयत्न करते यावर फोकस्ड होती. दारिद्र्यरेषेखालील छोटू या गरीब राजस्थानी मुलाची ही कथा. जो एपीजे अब्दुल कलाम यांचा मोठा चाहता असतो आणि त्यांना भेटू इच्छितो. छोटू प्रतिकूल परिस्थितीतही आपला उत्साह आणि चैतन्य टिकवून ठेवतो. दिवसभर बालकामगार म्हणून काम केल्यानंतर संध्याकाळचा वेळ पुस्तकांमध्ये घालवून अभ्यास पूर्ण करण्याचा तो आटोकाट प्रयत्न करतो. त्याला खात्री असते की एक दिवस तो कलामांसारखा मोठा व्यक्तिमत्व बनेल. 'मकडी' चित्रपटातली शबाना आझमीची भूमिका विसरणे कठीण आहे. या चित्रपटातील आनंदाचे क्षण आपल्याला मुलांसारखे हसवतात आणि दुःखाचे क्षण आपल्याला रडवतात. 'चाची 420' हा साऊथचा रिमेक होता. यात कमल हासनचा उत्कृष्ट अभिनय होता. 'मिसेस डाउटफायर'वर हा चित्रपट बेतला होता. एका पित्याने आपल्या मुलासोबत जगण्यासाठी केलेल्या संघर्षाची कथा यात होती. 'चुपडी चाची' हे गाणं गाजलं होतं.

विधू विनोद चोप्राचा 'फेरारी की सवारी' ही तीन पिढ्यांमधील बंध आणि समजूतदारपणाची कथा आहे. कौटुंबिक 
मेरे प्यारे पीएम   
नातेसंबंधांचे धागे या चित्रपटात अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आलेत. कलाकारांमुळे हा चित्रपट उल्लेखनीय झालाय. चित्रपटातील मुख्य पात्र रुसी हा त्याचा प्रतिभावान क्रिकेटर मुलगा कायोसाठी काहीही करु शकतो. बेडवर बसून टीव्ही पाहत आजोबा घरातील प्रत्येक घडामोडी जाणून घेतात. आजोबा किशोरवयात क्रिकेटपटू असतात. क्रिकेटमध्ये फसवणूक झालेल्या आजोबांना आपल्या मुलाने क्रिकेटर व्हावे असे वाटत नाही. मुलगा ते मान्य करतो मात्र नातू क्रिकेटर होतो. नातू कायोची लॉर्ड्सच्या विशेष प्रशिक्षणासाठी निवड होणार असते. अडचण एवढीच असते की निवडून आल्यास त्याला दीड लाख रुपये फी भरायची असते. मर्यादित उत्पन्न असलेल्या या कुटुंबासाठी एवढी मोठी रक्कम उभी करणे कठीण काम असते. अत्यंत प्रामाणिक जिद्दी बाप असलेला रुसी आपल्या मुलाच्या भविष्यासाठी तत्वांशी तडजोड करतो. तो प्रामाणिकपणापासून डगमगतो. सचिन तेंडुलकरची लाल फेरारी त्याच्या वडिलांच्या संपर्कातील एखाद्याला काही तासांसाठी उपलब्ध करून दिल्यास त्यासाठी त्याला दीड लाख रुपये मिळणार असतात. मात्र अशा काही घटना घडतात की सचिन तेंडुलकरला न कळवता रुसी त्याची फेरारी घेऊन निघून जातो. फेरारी राईडमध्ये पिता-पुत्राच्या नात्याचे मार्मिक चित्रण आहे. कायोच्या कुटुंबाची अवस्था पाहून डोळे भरून येतात. फेरारी राईडमध्ये मध्यमवर्गीय महत्त्वाकांक्षा आणि ती पूर्ण करण्यासाठीची धडपड दाखवण्यात आली आहे. सचिन तेंडुलकर आणि त्याची लाल फेरारी चित्रपटात अत्यंत प्रतिकात्मक मार्मिकतेने वापरली आहे.

अलीकडील काळात बालचित्रपटातली गाणी अगदी जिभेवर खेळत नसली तरी जुन्या काळातली काही बालगाणी अजूनही लोकप्रियता टिकवून आहेत. 'दादी अम्मा मान जाओ ना..' हे 
मासूम 
गाणे गाऊन आजच्या पिढीतली मुले त्यांच्या आजीचा आनंद साजरा करताना दिसतात. राज कुमार, राजेंद्र कुमार यांचा हा चित्रपट त्या काळातील हिट चित्रपटांपैकी एक होता आणि कदाचित आजही लोकांना हा चित्रपट आठवतो आणि आवडतो.
'हम भी अगर बच्चे होते' हे गाणं हरेकाने आपल्या बालपणी कधीतरी गायलेच असावे इतके याचे नाते घट्ट आहे.
आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या वाढदिवशी वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांमध्ये हे गाणे सर्वात वरच्या क्रमावर असते! घरातील वडीलधाऱ्यांचा वाढदिवस साजरा होतो तेव्हा त्यांच्यासाठी हे गाणे आवर्जून ऐकवले जाते. कारण या गाण्याचे बोल "हम भी अगर बच्चे होते नाम हमारा होता वा बबलू, खाने को मिले लड्डू, तो दुनिया कहती हॅपी बर्थडे टू यू!" असे लोभसवाणे होते.
1960 च्या मासूम चित्रपटातील 'नानी तेरी मोरनी को मोर ले गये' हे गाणे इतके लोकप्रिय आहे की या गाण्यावर लहान मुलांसाठी यमकगीते तयार केली गेलीत. मुले जेव्हा आजी आजोबांना भेटतात तेव्हा हे गाणे पाठ करतात. 
श्री 420 

'नन्हा मुन्ना राही हूं' या गाण्याशिवाय बचपन अधुरे ठरावे. मेहमूद खान दिग्दर्शित 'सन ऑफ इंडिया' या चित्रपटात हे गाणं होतं. आजही जेव्हा आपण आपली मुले किंवा इतरांची मुले शाळेत परेड करताना पाहतो तेव्हा आपोआप आपल्या मनात "नन्हा-मुन्ना राही हूं देश का सिपाही हूं, बोलो मेरे संग जय हिंद जय हिंदी जय हिंद" हे गाणे सुरू होते. मातृभूमीशी आपल्या आठवणी विविध रूपात जोडलेल्या आहेत आणि हे गाणे त्यापैकीच एक आहे.
1955 मध्ये आलेल्या श्री 420 चित्रपटातील सर्व गाणी खूप प्रसिद्ध आहेत. राज कपूर आणि नर्गिसचा हा चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. चित्रपटातील "इचक दाना बीचक दाना" हे गाणं कोडं घालतं. आजही या गाण्याचा स्वॅग अजूनही टिकून आहे!

गेल्या काही दशकात बालकिशोरांवर बरेच चित्रपट निर्मिले गेलेत. या चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला असल्याने 
घराना 
देशातील बालचित्रपट निर्मितीला बळ लाभेल. परदेशाच्या तुलनेत आपल्याकडे बालचित्रपटांना मुख्य प्रवाहात अद्याप गांभीर्याने घेतले गेलेले नाही. बालचित्रपटांनाही मुख्य प्रवाहातील चित्रपटसृष्टीत स्थान मिळाले तर निश्चितच देशातील बालचित्रपटांचे भविष्य उज्वल होईल आणि त्याला नवी दिशा मिळेल. त्यासाठी प्रादेशिक सिनेमांनाही प्रोत्साहन द्यावे लागेल आणि नवीन निर्मात्यांना प्रोत्साहन आणि मदत करावी लागेल.

मुलांबद्दलचे हे चित्रपट केवळ बॉक्स ऑफिसवर  व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरले नाहीत, तर समाजावरही - केवळ मुलांवरच नव्हे तर प्रौढांवरही त्यांचा 
चिल्लर पार्टी 
सकारात्मक प्रभाव पडला आहे. बालमानसशास्त्र आणि मुलांच्या समस्यांशी निगडीत हे चित्रपट मोठ्या प्रमाणात तयार व्हायला हवेत. आतापर्यंत आमच्या समाजाला डिस्लेक्सिया आणि प्रीजेरिया यांसारख्या आजारांची माहिती होती पण 'तारे जमीन पर' आणि 'पा' यांसारख्या चित्रपटांमुळे आम्ही त्यांच्याशी परिचित झालो. या चित्रपटांनी आपल्या विचारसरणीवर खोलवर परिणाम केला आहे. या चित्रपटांमुळे मुलांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला आहे, असे म्हणता येईल. बालचित्रपटांना मुख्य प्रवाहातील चित्रपटसृष्टीत स्थान मिळावे म्हणून हरेक सिनेरसिकाने त्यांना बळ पुरवले पाहिजे. बॉलिवूडने लहानग्यांचा विचार गत शतकापासूनच केलेला आहे ही बाब नक्कीच स्वागतार्ह आहे. बॉलिवूडच्या या गुणग्राहकतेसाठी ते प्रेमास पात्र आहे!

- समीर गायकवाड

२ टिप्पण्या:

  1. बापू ! किती अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद मांडणी.
    खूप छान लेख.

    उत्तर द्याहटवा
  2. बापू ! एक माहिती द्यायची होती तुम्हांला. फोन नंबर मिळेल का तुमचा ? प्रदिप भाडळे. 9881330505 .

    उत्तर द्याहटवा