मंगळवार, २९ मे, २०१८

प्रणवदांच्या भेटींचे अन्वयार्थ...


राजकारण करताना अनेक बाबी मुद्दाम दुर्लक्षिल्या जातात तर जाणीवपूर्वक काही बाबींचे चुकीचे चित्र निर्माण केले जाते. एखाद्याचा वापर करायची वेळ येते तेंव्हा अनेक घटकांचं विस्मरण केलं जातं. आरएसएस आणि त्यांचे समर्थक कायम आणीबाणी काळातील घटनांवरून काँग्रेसला आरोपीच्या पिंजरयात उभं करण्याची संधी शोधत असतात.

ज्या प्रणव मुखर्जींना संघ कार्यक्रमात आणल्याचा गवगवा केला जातोय ते आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधीच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाचे सदस्य होते. दडपशाहीसाठी त्यांना जबाबदार ठरवले गेले होते. पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. इंदिरा गांधींनी सत्तेत परतताच हा गुन्हा मागे घेतला होता. आता प्रणव मुखर्जींना संघ बोलावतोय तो माजी राष्ट्रपती म्हणून नव्हे तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणूनच ! मग आता प्रणवदांची ही बाजू खटकत नाही का ? 

या प्रश्नांचे उत्तर काहीही असो, या ताज्या गदारोळामुळे पेट्रोल दरवाढीचा मिडीयाचा लंबक आपसूक बाजूला होण्यास सरकारला मदत होतेय त्यामुळे सर्व वाहिन्यांवर या बातमीची हेडलाईन करत अनेक कंड्या पिकवल्या जाताहेत. 'सुत्रांचा हवाला' या नावाखाली फेकाफेकीला ऊत आलाय. प्रणव मुखर्जी संघाच्या कार्यक्रमात जाताहेत याचे अनेक अर्थ काढता येतील. पण एक साधासोपा अर्थ आहे, तो वाहिन्या मुळीच सांगत नाहीत. प्रणवदांना युपीए- दोनमध्ये पंतप्रधान व्हायचे होते ही बाब तेंव्हा लपून राहिली नव्हती. या साठी त्यांनी १० जनपथविरुद्ध दंड थोपटण्याचे नियोजन केले होते. पण त्यांना काँग्रेसजनांची साथ लाभली नाही कारण ते ज्या बंगालमधून येत होते तिथेच मुळात काँग्रेसचा नंबरगेम झिरो होता. त्यामुळे आता अडवाणीजी जसे सुस्कारे सोडत जमेल तेंव्हा मोदींच्या पायात छोटा का होईना साप सोडायचा प्रयत्न करतात तसा उपद्व्याप प्रणवजी करत असत. पण सोनिया गांधींनी त्यांची लक्ष्मणरेखा आखून दिली होती. 

युपीए-दोन सत्तेत असताना २०१२ मध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक होईल तेंव्हा प्रणवदा दावेदार असतील हे मनमोहन सिंह दुसरयांदा पंतप्रधान झाले तेंव्हाच निश्चित होते. मात्र प्रणवदा यावर पुरेपूर खुश नव्हते. पीएम पद त्यांना अधिक खुणावत होते. पण आपण याला देखील अधिक आढेवेढे घेतले तर आपला पत्ता कट होऊन सुशीलकुमार शिंदेंना हायकमांड पसंती देऊ शकते हे ओळखून त्यांनी अखेर होकार भरला. पण राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून देशभरात गाठीभेटी घेण्याचा त्यांनी तडाखा लावला. त्यांचे हे पाऊल काँग्रेस श्रेष्ठींना आवडले नव्हते. याचे उल्लेख प्रणवजींच्या पुस्तकातही आहेत.

२०१२ च्या राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी आपण महाराष्ट्राच्या दौरयावर होतो तेंव्हा ‘मातोश्री’वर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना भेटलो होतो. त्यामुळे सोनिया गांधी आपल्यावर नाराज झाल्या होत्या, असे प्रणवदांनी आपल्या ‘कोएलिशन इअर्स : १९९६ - २०१२’च्या तिस-या खंडात नमूद केले आहे. बाळासाहेबांनी मुखर्जी तेव्हा मुखर्जीना पाठिंबा दिला होता.
प्रणव मुखर्जी यांनी लिहिले आहे की, 'मी बाळासाहेबांची भेट न घेतल्यास ते त्याला अपमान समजतील, असे मला शरद पवार यांनी सांगितले होते. (पवारांचा डाव बघा, किती लक्षणीय होता !) त्यामुळे सोनिया यांची नापसंती माहीत असूनही बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्यास गेलो. ज्या व्यक्तीने आपल्या रालोआमध्ये असूनही मला पाठिंबा दिला, त्याचा अपमान होऊ नये, असे मला मनापासून वाटले होते.
मी पवारांना विनंती केली की, त्यांनी मला विमानतळावरुन ठाकरे यांच्या घरी घेऊन जावे. पवार त्यासाठी तयारही झाले. ही भेट अतिशय प्रेमळ आणि मनमिळाऊ होती. आपल्या खास शैलीत बाळासाहेब म्हणाले होते की, 'रॉयल बंगाल टायगरला मराठा टायगरने पाठिंबा देणे स्वाभाविक आहे.' बाळासाहेब ठाकरे यांना मी एक सांप्रदायिक दृष्टिकोनाचा नेता म्हणून ओळखत होतो. पण, त्यांचा पाठिंबाही विसरणे मला शक्य नव्हते.
पवार हे यूपीए - २ चे सहयोगी होते. मी बाळासाहेबांची भेट घ्यावी, असा त्यांचा आग्रह होता, असे सांगत आपण घेतलेली भेट योग्यच होती, असा दावाही मुखर्जी यांनी या पुस्तकात केला आहे. आपल्या १३ जुलै २०१२ च्या मुंबई दौ-याचा उल्लेख करून मुखर्जी लिहितात की, सोनिया गांधी व पवार या दोघांना मी विचारले होते की, बाळासाहेबांची भेट मी घ्यावी का? सोनिया गांधी या भेटीच्या बाजूने नव्हत्या. शक्यतो ही भेट मी टाळावी, असे त्यांना वाटत होते. बाळासाहेबांविषयीचे सोनिया यांचे मत त्यांच्या राजकीय विचार व धोरणांवर आधारित होते.
शिवसेनेने २००७ मध्ये प्रतिभा पाटील यांना यांना पाठिंबा देण्याचे कारण समजण्यासारखे होते. प्रतिभाताई महाराष्ट्रातीलच होत्या. पण ठाकरे यांनी माझ्या बाबतीत विचारपूर्वक आणि जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांचे आभार मानणे माझे कर्तव्य आहे, असे मला वाटत होते. मी दिल्लीला परतल्यावर गिरिजा व्यास मला भेटल्या आणि म्हणाल्या की, ठाकरे यांच्या भेटीमुळे सोनिया गांधी व अहमद पटेल नाराज आहेत. मी त्यांच्या नाराजीचे कारण समजू शकतो. पण, मला असे वाटते की, मी जे काही केले ते योग्य होते.

या आत्मकथेमध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण गौप्यस्फोट केले आहेत. पंतप्रधान न होण्याबाबत मोठा खुलासा केला यात आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीचा उल्लेख त्यात आहे. प्रणब मुखर्जी सांगतात की, ''माझी हिंदी भाषा कमजोर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जनतेशी संवाद साधण्यात अडचणी होत्या, त्यामुळे पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मी नव्हतो. जो नेता सर्वसामान्य जनतेच्या भाषेत त्यांच्याशी संवाद साधू शकत नाही, तो पंतप्रधान होऊ शकत नाही'', वास्तवात हे कधीच खरे कारण नव्हते. प्रणव मुखर्जी अतिमहत्वाकांक्षी आहेत हे हायकमांडनी आधीच ओळखले होते. त्यामुळेच पीएम पदाचा सोपान त्यांना चढू दिला गेला नाही.

या पुस्तकात प्रणवदा लिहितात की, "माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग खूप चांगले पंतप्रधान होते. मी स्वतःला कधीही पंतप्रधान बनण्यास पात्र समजलं नाही कारण माझ्याकडे जनतेसोबत संवाद साधण्याचं कोणतंही साधन नाही. संपूर्ण देशात हिंदी बोलणारे आणि समजणारे सर्वाधिक लोकं आहेत आणि माझी हिंदी भाषा चांगली नाही." दरम्यान, प्रणब मुखर्जी यांच्या आत्मकथा प्रकाशनावेळी डॉ. मनमोहन सिंग यांनीही म्हटले होते की, "पंतप्रधान पदासाठी प्रणब मुखर्जी योग्य होते." या वेळची मनमोहन सिंगांची देहबोली खूप काही सांगून गेली होती.

मुखर्जी असेही म्हणाले होते की, "मनमोहन सिंग खूप चांगले आहेत आणि ते एक चांगले पंतप्रधानदेखील होते. मी यापूर्वी म्हटले होते आणि आजही सांगेन की डॉ. मनमोहन सिंग आताच्या काँग्रेस नेत्यांपैकी सर्वात चांगले नेते आहेत. सोनिया गांधी यांनी योग्य व्यक्तीला पंतप्रधान बनवलं होतं. त्यावेळी सोनिया गांधी याच पंतप्रधान होतील, अशी अपेक्षा होती. यूपीएच्या घटक पक्षांनीही त्यांच्या नावाला मान्यता दिली होती. मात्र त्यांनी पद स्वीकारण्यास नकार दिला. त्यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांच्याशिवाय पर्याय नव्हता." प्रणव मुखर्जी यांचे मनमोहन सिंह यांच्याबद्दलचे हे मत संघाला आणि त्यांच्या समर्थकांना मान्य आहे की नाही याचा उहापोह करण्याची गरज नाही कारण सच्चाई सगळ्यांना ज्ञात आहे. आता संघ आणि त्यांचे समर्थक मुखर्जींच्या नावाचा गवगवा करत आहेत. पण मुखर्जींची 'ही' मते ते कधीही सांगणार नाहीत, की त्यांच्या या मतांशी ते सहमतही होणार नाहीत.

प्रणव मुखर्जी देखील या घटनेच्या निमित्ताने राजकारणच करत आहेत. ज्या काँग्रेसने आपल्याला हवे असलेले पद दिले नाही तिला अप्रत्यक्षपणे दुखवण्यासाठी संघ कार्यक्रमात सामील होण्यापेक्षा आणखी मोठी संधी असूच शकत नाही हे मुखर्जी पुरेपूर जाणून आहेत. याचाच परिपाक म्हणून अनेक काँग्रेस नेत्यांनी मुखर्जींना पत्र पाठवून आपली नाराजी जाहीर केलीय. हे मुखर्जींना अभिप्रेत असणार आहेच. काँग्रेस दुर्बल अवस्थेत असताना आपल्या तथाकथित मारल्या गेलेल्या इच्छांचे उट्टे काढण्यासाठी प्रणव मुखर्जी उत्सुक असतील. या कार्यक्रमाने शह काटशहाचे त्यांचे राजकारण अंतिम टप्यात जाईल. तर कॉग्रेसमध्ये वैचारिक गोंधळ माजवण्यासाठी आणि मिडीयासह लोकांना इंधनदरवाढीच्या मुद्द्यापासून हटवण्यासाठी या मुद्द्याचा पुरजोर वापर करण्यास भाजप आणि संघ सरसावून आहे.

मित्रहो प्रत्यक्षात हे सगळे राजकारण आहे, सोंगढोंग आहे, यात ज्याचा त्याचा अजेडा आहे. सामान्य माणसांनी दैनंदिन जीवनातील अनेक मोठ्या समस्यांकडे दुर्लक्ष करत अशा मुद्यांचे चिपाड चघळत बसावे अशीच सरकारची इच्छा असते, या पलीकडे याला फारसे महत्व नसते.

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा