रविवार, २ डिसेंबर, २०१८

रेड लाईट डायरीज - सोय ..



कौरव पांडवांच्या द्यूतात बोली लागलेल्या 
द्रौपदीसारखे भाग्यही काहींना नसते,  
कपडे उतरवण्यासाठीच जिथे जन्म घ्यावा लागतो,  
तिथे श्रीकृष्ण कायमस्वरूपी रजेवर असतात. 
देवांच्या भाकडकथा विरल्या की 
भयाण वास्तवातून प्रसवतो वेदनांचा कभिन्न काळ.
जिथे उस्मरत्या दिशांच्या भिंतीत देहाची कलेवरे 
राजरोसपणे चिणली जातात 
पंक्चरल्या अवयवांवर मेकअपचे भडक लेप थोपतात  
धगधगते जिवंत शरीर त्यात गोठत जाते... 

खोक्ल्यांच्या उबळा, बिड्या सिगारेटींचे धूर, 
रॉकेलच्या उग्र दर्पात भकभकणारया स्टोव्हचा राखाडी धूर 
गंजेडयांच्या उचक्या अन जुगाऱ्यांचे हिशोब. 
अधाशी नजरा, चुरगळलेले गजरे, 
जिन्यांच्या हँगरला लटकणारी अर्धउघडी 
काही काळपट काही हेमांगी शरीरं 
देवांच्या सुंद पडलेल्या तसबिरी अन 
त्यावरचे माना गळून पडलेले ओशाळवाणे धुळकट हार. 
झिजून गेलेले उंबरठे अन ओरखडे उठलेली कायागारे.

रखरखत्या उन्हातदेखील विवस्त्र करून जाणारी रासवट दुपार 
शृंगाराच्या मणामणाच्या साखळ्या घेऊन येणारी निर्दयी सांजवेळा 
धुमसत जाणाऱ्या, घुसमटणाऱ्या, चेंदामेंदा करणाऱ्या काळ्यानिळ्या रात्री           
डोळ्यांच्या झुंबराना मालवून टाकणाऱ्या मतलई उत्तररात्री. 
थकल्या शरीरांना निरखत जाणाऱ्या रडक्या पहाटवेळा  
अजूनी मरण नच आल्याचा निर्लज्ज निरोप घेऊन 
पुन्हा पुन्हा येणारी देवभोळेपणाचा आव आणणारी कपटी सकाळ !
सगळं रसायन एकजीव झालं की तयार होते 
पुरुषी श्वापदांच्या शय्यासोबतीसाठीची सोय ! 
  
कौरव पांडवांच्या द्यूतात बोली लागलेल्या द्रौपदीइतकेही भाग्य काहींचे नसते,
सोयीसाठी जिथे कपडे उतरवले जातात 
तिथे सर्व जातधर्मातील देवांनाच स्त्रीत्वाची शिक्षा द्यावीशी वाटते ... 
  
- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा