Monday, June 11, 2018

लालूप्रसाद यादव - बिहारी बाबूंचा जिव्हाळयाचा माणूस ...


वक्त का पता नही चलता अपनों के साथ,
पर अपनों का पता चलता हैं वक्त के साथ…

बिहारी जनता अजूनही लालूंवर प्रेम करते. 
हा माणूस सगळीकडे आपल्या बोलीत, आपल्या लेहजात बोलतो. साधं राहतो याचंसगळं दिनमान आपल्यासारखं आहे याचं बिहारच्या ग्रामीण जनतेस अजूनही अप्रूप आहे. बिहारी माणूस लालूंचा अजूनही पुरता द्वेष करत नाही, कुठे तरी सिम्पथी अजूनही आहे. लालू प्रसाद यादव यांचा जन्म ११ जून १९४८ चा. आपल्या भावाबहिणींत सर्वात लहान असलेले लालू लहानपणीही गोलमटोल होते, यामुळेच घरच्यांनी त्यांचे नाव लालू ठेवले होते.


लालूंनी गावातील शाळेतच शालेय शिक्षण घेतलं. पुढील शिक्षणासाठी पाटणा येथे आपल्या मोठ्या भावाकडे राहायला आले. भावाच्या चपराशी क्वार्टरमध्ये ते राहत असत. विद्यापीठाच्या बी.एन. कॉलेजमधून राज्यशास्त्रात एमए केले. यानंतर त्यांनी एलएलबीची पदवी मिळवून राजकारणात पाऊल ठेवले आणि जेपींच्या आंदोलनाशी जोडले गेले. या आंदोलनात नीतीश कुमार, रामविलास पासवान आणि सुशील कुमार मोदी त्यांचे साथीदार होते.

१९७० च्या दशकाच्या प्रारंभी लालू हे पाटणा विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे महासचिव बनले. वयाच्या पंचविशीत १९७३ मध्ये विद्यार्थी नेता असतानाच त्यांनी चौदा वर्षाच्या राबडीदेवी सोबत लग्न केलं. या दांपत्यास सात मुली आणि दोन मुलं अशी नऊ अपत्यं झाली. ही सगळी अपत्यं या चपराशी क्वार्टरमध्ये झाली हे विशेष. लालूंच्या अफलातून व्यक्तीमत्वाचा आणि देहबोलीचा जनतेवर इतका प्रभाव पडला की १९७७ मध्ये ते लोकसभेवर निवडून गेले. त्या नंतर १९८० आणि १९८५ मध्ये ते विधानसभेवरही निवडले गेले.

१९९० च्या निवडणुकात बिहारमध्ये जनता दलास मोठा विजय मिळाला तेंव्हा व्ही.पी. सिंग यांनी सीएम पदासाठी रामसुंदर दास यांची बाजू घेतली होती. तर चंद्रशेखर हे रघुनाथ झा यांच्या बाजूने होते. आणि चाणाक्ष लालूंनी चौधरी देवी लाल यांच्याकडे कैफियत मांडली, जी कामी आली आणि त्यांनी या पदासाठी अंतर्गत निवडणूक घ्यायला लावली. कर्पुरी ठाकूर यांच्या निधनानंतर विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत असलेले लालू स्वतःला या पदाचा सक्षम दावेदार मानत होते आणि झालेही तसेच. लालू बिहारचे सीएम झाले. १९९० ते १९९७ सात वर्ष ते मुख्यमंत्री पदावर होते. मुख्यमंत्री होण्याआधी चार महिन्याच्या कालावधीपर्यंत ते पाटण्याच्या त्याच चपराशी क्वार्टरमध्ये निवास करत होते.

गरिबीच्या अंधारातून आयुष्याचे प्रकाशपर्व सुरु केलेल्या लालूंची सुरुवातीची परिस्थिती इतकी वाईट होती की त्यांच्या घरात साधा कंदील देखील नव्हता. लालूंनी पुढे जाऊन हाच कंदील आपलं निवडणूक चिन्ह म्हणून निवडला होता. बालपणी लालू आपल्या घरचीच न्व्हे तर इतरांची गुरेही चरायला घेऊन जात. यामुळे गायीम्हशींचा त्यांना खूप लळा होता. हे नातं इतकं अजब झालं की मुख्यमंत्री निवासस्थानी लालूंनी म्हशी पाळल्या होत्या आणि त्यांना ते चारा खाऊ घालत. पुढे जाऊन त्यांनी चाऱ्यात भ्रष्टाचार केला जो नियतीलाही पटला नसावा, त्यामुळेच त्यांना त्याची फळे भोगावी लागताहेत. तरीही बिहारी जनतेची त्यांना सहानुभूती आहे.

लालूंच्या कुमार वयात घरातली परिस्थिती इतकी बिकट झाली की शाळेची फी भरण्यासाठी त्यांना सायकल रिक्षा चालवावी लागली. सीएम झाल्यावर त्यांनी पाटण्यातील एका सायकल रिक्षावाल्याची सफारी केली होती आणि नंतर पैसे देताना त्याला त्यांनी विनंती केली होती की मी ही तुला सायकल रिक्षाची सफर करवून आणतो, तयार होशील का ? लालूंचे सामान्य माणसात मिसळून जाण्याचे अद्भुत कसब लोकांच्या मनावर इतके गारुड करून जायचे की लोक त्यांना आपला मसीहा मानू लागले. बिहारमध्ये विकासाचे निशाण फडकले नाही मात्र सर्वत्र अपराधांचे जंगलराज झाले तरी बिहारी जनता लालूंना नजरेआड करायला तयार नव्हती. लालूंना या प्रेमाचा नेमका अर्थ कळला नाही पण एके काळी त्यांचे सहकारी असलेले नितीश यांना मात्र तो कळला आणि त्यांनी हळूच आपला याराना तोडला.

तरीही लालू बेफिकीर आणि बेगुमान राहिले. ते इतक्या भ्रमात राहिले की बेमुर्वतखोर बनत गेले. २००३च्या पावसाळयामध्ये बिहारमध्ये प्रचंड मोठा पूर आला होता. बिहारचे बेहाल झाले, तरीही सरकार ढिम्म आणि जनतेचा आक्रोश नाही, जो काही कोलाहल होता तो मीडियात होता. अखेर केंद्राने लालूंना विचारणा केली तेंव्हा लालूंचे उत्तर अत्यंत उद्धट होते - 'इतके पाणी तर माझी म्हैस पिते, तुम्ही पुराचे काय घेऊन बसला आहात !' हे स्टेटमेंट त्यांनी सार्वजनिक रित्या दिलेलं होतं. त्यावर गदारोळ झाला तरीही लालू आपल्याच नादात मश्गुल राहिले.

लालूंना आपल्या मायबोलीचे आणि मातीचे अफाट प्रेम आहे हे कोणीच नाकारणार नाही. त्यांच्या लकबीची अनेकांना भुरळ आहे, अजूनही त्याचा जलवा टिकून आहे. लालूंचे हे मातीप्रेम इतके शिरजोर झाले की ते केंद्रात रेल्वेमंत्री असताना २००९ मध्ये त्यांनी रेल्वेत चहा विक्री करणाऱ्यांना मातीचे छोटे बाऊल (कुल्हड) सक्तीचे केले. याचा काहींना छप्पर फाड फायदा झाला तर काहींना अफाट तोटा झाला. नंतर यातली अव्यवहार्यता समोर आली आणि हा प्रयोग लालूंसोबतच गुंडाळला गेला. लालूंना बोलतानाही आचपेच राहत नसे. हेमा मालिनीच्या गालासारखे बिहारचे रस्ते गुळगुळीत करून दाखवीन असं म्हणत त्यांनी नसता वाद ओढवून घेतला होता. अजूनही बिहारमध्ये लालूंची कुठे सभा असली की चुटके आणि शालजोडीतले फटके यांची बरसात असते ज्यावर बिहारी बाबूंचा खूप जीव आहे.

अतिरंजित युक्तीवादासाठी लालू ओळखले जातात, बिहारपासून झारखंड अलग करून नव्या राज्याच्या निर्मितीची चळवळ जोर धरत होती तेंव्हा लालूंनी कडवा विरोध केला होता. माझ्या मृत्यूनंतरच झारखंड होऊ शकेल असे विधान करून त्यांनी टाळ्या मिळवल्या होत्या. पण त्यांच्या हयातीतच झारखंडची निर्मिती झाली देखील आणि त्याच झारखंडमधे त्यांच्यावरील भ्रष्टाचाराचे खटले चालले. नियतीने त्यांना इथेही नमवले पण लालूंनी अजून हार मानलेली नाही, आपला मुलगा तेजस्वीच्या रूपाने त्यांनी पुढचे फासे टाकलेत आणि परवाच्या पोटनिवडणुकीत ते जेते सिद्ध झालेत. ज्या नितीशना त्यांनी कधी गळाभेटी दिल्या होत्या, ज्या सुशील मोदींसोबत राजकारणाचे धडे गिरवले होते, ज्या राम विलास पास्वानांना एका कोनाड्यात बांधणी करून ठेवले होते त्या तिघांनाही चीत करण्याचे नवे डावपेच आखण्यासाठीच ते जेलमधून पॅरोल घेऊन घरी आले. आजही शरद यादवांची लालूंना भक्कम साथ आहे. या घडीला शरद यादव यांना मधे घेऊन प्रसंगी ते स्वतः कोपऱ्यात जातील पण नवा डाव मांडण्याचा यत्न नक्की करतील.                                                                                                      
बिहारी बाबूंच्या जिव्हाळयाचा माणूस असलेल्या लालूंचा आज वाढदिवस आहे. 'पुढच्या वाढदिवसापर्यंत बिहारचे चित्र बरेचसे बदललेले असेल' असं त्यांनी सांगितलंय. लोकांत रमलेल्या या लोकनेत्याचे आणि त्याच्या चळवळीचे काय करायचे हे न्यायालय ठरवणार नसून बिहारचे लोकच ठरवणार आहेत हे नितीश आणि सुशील मोदींना उमगत नसेल असे म्हणणे धाडसाचे ठरेल. लालूंना 'भीमसेनी', 'जरासंधी', 'जांबुवंती' कुस्ती भलेही येत नसेल पण प्रतिस्पर्ध्याच्या ताकदीचा नेमका अंदाज घेऊन युक्तीने शक्तीवर मात करायच्या 'हनुमंती' कुस्तीचा दांडगा अनुभव आहे हे नितीश विसरले नसतील.      

- समीर गायकवाड.  
#laluyadav's_birthday..     

1 comment:

 1. खूप छान माहिती अतिशय मार्मिक शब्दांत व्यक्त केली गेली आहे. प्रत्येक व्यक्तीला भारताचा विशेषतः मराठी व्यक्तींना आपला महाराष्ट्राचा इतिहास माहिती असणे खूप आवश्यक आहे. आपल्या पूर्वजांनी काय केले होते, काय हाल सोसले होते तरीपण त्यांनी आटकेपार झेंडे कसे लावले होते ह्या सर्व बाबींची माहिती फक्त इतिहासामुळेच प्राप्त होऊ शकते.

  नमस्कार ,
  '१०० पुस्तकांपेक्षा १ उच्च प्रतिचे माहिती देणारे पुस्तक नेहमीच चांगले' या तत्वांला अनुसरून आम्ही VISION UPSC MPSC PO ह्या संपूर्ण मराठीमोळ्या YouTube चॅनेलची निर्मिती केली आहे.
  गरजू व हुशार विद्यार्थी मित्रांना व मैत्रिणींना Private Classes च्या जाळ्यातून मुक्त करून Quality Free Education देण्याच्या उद्देश्याने तसेच त्यांच्या मूल्यवान वेळात अतिशय महत्वाची माहिती एकत्रितपणे देणे हेच आमचे ध्येय आहे.
  माझ्या चॅनेलच्या काही विडीओची लिंक खाली दिली आहे , एकदा आपण video पाहून स्वतः विडीओमधील माहिती आपणांस किती उपयुक्त ठरणारी आहे हे ठरवावे.
  Telegram Channel name : @visionump
  Youyube channel name : VISION UPSC MPSC PO
  Website : www.learnsubject.in (लवकरच माहिती upload केली जाईल)

  प्राचीन भारताचा इतिहास - कालक्रम https://youtu.be/ozUiFABdydA

  मध्ययुगीन भारताचा इतिहास - कालक्रम : भाग १ https://youtu.be/a67cdfA3Svk

  मध्ययुगीन भारताचा इतिहास- कालक्रम : भाग २ https://youtu.be/wl9Vg5KhvIA

  आधुनिक भारताचा इतिहास- कालक्रम (इ.स.१६००-१८५७) https://youtu.be/h_0syxLPsbw

  आधुनिक भारताचा इतिहास - कालक्रम (इ.स.१८५७–१९४७) https://youtu.be/ee79-cm1_C0

  आधुनिक भारताचा इतिहास - कालक्रम (इ.स.१९४७-२०००) https://youtu.be/rbMQzjLJSIU

  तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.

  ReplyDelete