शनिवार, २ जून, २०१८

दया पवार- 'कोंडवाडा' - एक व्यथा ....



'शिळेखाली हात होता, तरी नाही फोडला हंबरडा
किती जन्मांची कैद, कुणी निर्मिला हा कोंडवाडा......'


काही कविता इतिहास घडवून जातात अन कालसापेक्षतेच्या कसोटयांच्या पलीकडे त्यांचे अस्तित्व टिकून राहते. विद्रोही कवितांनी साहित्याची ध्वजा उंच करताना सुखात्म जगात मश्गुल असणारया साहित्य विश्वास समाजभानाचे असे काही चटके दिले की मराठी साहित्यात विद्रोहाची धग प्रखर होत गेली. 

साठोत्तर मराठी कवितेत विद्रोही कवितेस मानाचे ऐतिहासिक स्थान आहे. विविध कवींनी अनुभवलेले दाहक जीवन टोकदार शब्दात व्यक्त होत गेलं आणि सामाजिक विषमतेच्या उतरंडी जमीनदोस्त होत गेल्या, जाती पातीचे गावगन्ना आढळणारे भडक, बीभत्स पोत फिकट होत गेले, बोथट झालेल्या समाजभावना खडबडून जाग्या झाल्या. या विद्रोही कवितांत काही कवींच्या संख्यात्मक परिमाणात एक दोन कविता श्रेष्ठ ठरल्या तर काहींचा अख्खा काव्यसंग्रह ज्वालाग्राही ठरला. मात्र जवळपास सर्वच दलित कवींचे थोडेफार योगदान या विद्रोही काव्य चळवळीस लाभत गेले. त्यातही काही कवींच्या कविता सर्व काव्यगुण लक्षणांच्या पुस्तकी, निर्धारित अन साचेबंद आकृतीबंधाला मोडीत काढणाऱ्या ठरल्या ! 'कोंडवाडा' ही अशा कवितांपैकीच एक कविता होती.

”आज विषाद वाटतो, कशा वागविल्या मणामणाच्या बेड्या
गाळात हत्तींचा कळप रुतावा तशा, ध्येय-आकांक्षा रुतलेल्या
शिळेखाली हात होता, तरी नाही फोडला हंबरडा
किती जन्मांची कैद, कुणी निर्मिला हा कोंडवाडा
कैद्यासारखी ताटवाटी आपणच आपली लखलखीत करावी
नेहमीचा आपला परित्यक्त कोपरा, 
वर तलवार टांगलेली
पुढे सरकावे तर एकाच गहजब, 
याने स्वयंपाक खोली बाटवली
आतल्या आत घुस्मटायचे --- 
आपण कोण? काय आपला गुन्हा?
आलो कुठून? अश्मयुगाच्या घनदाट काळोखात बघावे पुन्हा पुन्हा
खरंच, कशाला झाली पुस्तकांशी ओळख? बरा ओह्ळाचा गोठा
गावची गुरं वळली असती, असल्या इंगळ्या डसल्या नसत्या.?"

'कोंडवाडा'चा अर्थ परिसरातील अशी एखादी बंदिस्त जागा जिथे त्या भागातील भटकी वा बेवारस जनावरे आणून कोंडली जातात. कवितेचं हे शीर्षकच विषयाची कल्पना देऊन जातं.  दया पवार यांची 'कोंडवाडा' याच  नावाने असणाऱ्या काव्यसंग्रहातील ही कविता आहे. कवितालेखनाच्या काळातील सामाजिक परिस्थिती आणि सद्य सामाजिक स्थिती यात फरक पडला असला तरी सामाजिक मानसिकता मात्र अजूनही तिथेच घुटमळत असल्याचे दिसून येते. त्यामुळे साठ वर्षांपूर्वी जो विषाद कवीच्या मनी दाटून आला आज तो तितक्या तीव्रतेने दाटून येत नसला तरी ती प्रक्रिया थांबलेलीही नाही हे ही खरेच आहे. जातीधर्माच्या शृंखला तोडून आम्ही अजून एकमेकांना कवेत घेतलेले नाही हेच खरे.

दया पवार म्हणतात की, 'इतकी वर्षे होऊन गेलीत, आता आयुष्याच्या मध्यात आल्यानंतर आता मनात विषाद दाटून येतोय की आपण हे सारं कसं काय सहन करत गेलो ? दास्यत्वाच्या जातीभेदाच्या अवजड शृंखला आपण कशा काय शिरोधार्ह घेतल्या ? आपण वेळीच बंड कसे काय केले नाही ? आपला विद्रोह जागा होण्यास इतका कालावधी कसा काय लागला ? आपल्यात आलेल्या शिथिलतेमुळे ते गाळात रुतलेल्या हत्तीची उपमा स्वतःला देतात. इतकेच नव्हे तर आपण स्वत्वात कसे अडकून पडलो याचे उत्तरही तेच देतात. आपण स्वतःच्याच मोहात गुरफटत गेलो अन कुठेतरी समाज भान हरवत गेलो याची त्यांना खंत वाटते. वैयक्तिक ध्येय, आशा अपेक्षा याचे मोठे ओझे वाहत राहिलो ज्यामुळे इतरत्र बघण्याची अन त्यातून जाणीवा समृद्ध होण्याची प्रक्रिया घडली नाही. असं स्वमुल्यांकन ते प्रामाणिकपणे करतात. जो स्वतःच्या चुका ओळखू शकतो तोच स्वतःला सुधारू शकतो याची जाणीव असलेले दया पवार त्यांच्या मनातील आत्मभान आणि समाजभान जागृत झाल्यावर मात्र आपल्या शब्दांना आसुडाचे रूप देण्यात यशस्वी झाले.

जेंव्हा आपण स्वत्वाच्या कोषातून बाहेर पडलो तेंव्हा कसे होतो याचे नेमके वर्णन पवार करतात. शिळेखाली हात असावा अन आपण निमूटपणे ते अजस्त्र ओझं सहन करावं अशी आपली अवस्था होती. जातीभेदाची, रूढी परंपरांची, आर्थिक विषमतेची ही शिळा आपल्या मनावर होती अन आपण त्याविरुद्ध ब्र शब्द काढू शकलो नाही याचा मनोमन विषाद पवारांना होत होता. तो त्यांनी या कवितेतून यथार्थपणे व्यक्त केला आहे. हे केवळ ओझे देहावरचे वा मनावरचे ओझे नसून या महाकाय पत्थराखाली आपण कैदच होतो अन आपलं जिणं जणू जनावरासारखं होतं याचं त्यांना शल्य डाचत राहिलं ! याहीपुढे जाऊन ते लिहितात की, 'किती जन्मांची कैद, कुणी निर्मिला हा कोंडवाडा ?'

जेंव्हा आपण कैदेत असतो तेंव्हा आपली कामे आपल्यालाच करावी लागतात त्यात कोणी मदत नाही. मात्र हीच कैद जातीयतेच्या पोलादी भिंतीआडची असेल तेंव्हाची वागणूक अधिक क्लेशदायक असते. इतकी की आपल्याला अस्पृश्य ठरवले जाते, आपल्याला कुणी स्पर्श करत नाही अन आपण स्पर्श केलेली चीजवस्तू देखील अस्पृश्य ठरवली जाते. आपलं नशीब आपल्यालाच बुलंद करावं लागतं, जग आपल्याला हसत असतं अन आपण परत परत पडत उठून उभं रहायचं असतं. जबरदस्त रूपक इथं पवारांनी वापरली आहेत- 'कैद्यासारखी ताटवाटी आपणच आपली लखलखीत करावी !" पवारांच्या प्रतिभाशक्तीला फुटलेले हे धुमारे वाचकाला बेचैन करतात.

खेडेगावात आजही कोंडवाडे आहेत अन दलित वस्त्यांचे वेगळे महारवाडे आहेत, ज्यांना आजकाल राजवाडे असं संबोधलं जातं. संबोधन बदललं मात्र लोकमानस मात्र तिथंच राहिलं अशी आपली विचित्र अवस्था झालीय. यावर मार्मिकतेने बोट ठेवत पवार म्हणतात की ही कैद म्हणजे एक कोंडवाडयातलं जिणं होतं, तिथली एक कैद होती ज्या कैदेत देखील बंधने होती, आवाज उठवण्याची परवानगी नव्हती, अस्पृश्यता होती, इतकंच नव्हे तर प्रत्येकाला एक पसाभर जमिनीची सीमा होत. त्याबाहेर येण्यास, त्या सीमा लांघण्यास अनुमती नव्हती. पतीने सोडून दिलेल्या परित्यक्तेची उपमा ते इथं देतात ! 'आपण जिथं राहत होतो तो जमिनीचा तुकडा म्हणजे केवळ एखाद्या परित्यक्तेचा कैद कोंडवाडा होता असं नव्हे तर तिथं आपल्या डोक्यावर कायम दहशतीची तलवार कायम टांगती असे' असं ते सांगतात तेंव्हा वाचणाऱ्याच्याच मनात विषाद दाटल्याशिवाय राहत नाही.

या परस्थितीत जर कुणी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला वा कुणी इथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर तो सहन केला जात नसे. त्याने गाव बाटवला, देऊळ बाटवले, आड बाटवला, विहीर बाटवली, शेत बाटवले असे आरोप होत. इतक्यावर न थांबता अशा व्यक्तीमुळे अन्न बाटल्याची ओरड होई ! मग त्याला शासन केले जाई. मग त्या तथाकथित 'दोषी' व्यक्तीने आणखी दैन्यावस्थेत जगणं भाग पाडलं जात असे. आपली कोणतीही चूक नसताना त्याला त्या कोंडवाड्यात घुसमटत बसावं लागे.पवारांनी इथे घणाघात घातला आहे, ते म्हणतात या घुसमटण्यातूनच आत्मशोध सुरु होतो. आपण कोण आहोत, आपण इथे काय करतो आहोत, आपल्याला असे बाजूला का काढण्यात आलेय, आपल्याला कशाची शिक्षा दिली जातेय अन आपला यात दोष काय असे प्रश्न स्वतःला ते विचारतात. मनुष्य प्रजातीच्या निर्मितीच्या काळापर्यंत मागे जातात. अश्मयुगाच्या काळोखात डोकावून बघतात. हे सिंहावलोकन करत असताना त्यांच्यातला विषाद अजूनच गडद होतो, इतका की दिवसाढवळ्या दांभिक समानतेच्या बेगडी सूर्यकिरणांना तो ग्रहण लावतो ! हा विषाद इतका अणकुचीदार आहे की अगदी बोथट माणसाच्या अंतरंगाचा तो अचूक ठाव घेतो.

आपल्याला आलेल्या विषादातून पवार आत्मक्लेश व्यक्त करतात. आपण विद्रोह केला, आपण बंड केलं म्हणून आपल्याला अधिकाधिक भोग भोगावे लागले. आपल्या विद्रोहामागे आपले विचार कारणीभूत आहेत. आपले इतर भाईबंद जसा सरधोपट विचार करून गुलामगिरीचं आयुष्य जगले तसं आपण जगलो नाहीत कारण आपल्या जाणीवा धगधगत्या होत गेल्या. आपले अनुभव, आपल्या जाणीवा शिक्षणातून परिपक्व होत गेल्या. जर आपण शिकलोच नसतो तर आपण विद्रोह केला नसता अन शिळेखाली असणारा हात तसाच ठेवला असता. बंडाचे निशाण फडकावले नसते. आपण मुकाटपणे कुठे तरी गुरे वळायच्या कामावर निर्बुद्धांसारखे जात राहिलो असतो अन त्या गुराप्रमाणेच आपणही कोंडवाड्याचे मूक घटक होऊन राहिलो असतो. पवारांचा हा विषाद मनाला झिंजोडतो यातच त्यांचे यश आहे. दया पवार जे जीवन जगले त्यालाच शब्दात मांडत गेले त्यामुळे त्यांचे साहित्य बावनकशी तेजाने झळकत गेले. 'कोंडवाडा'चं मुखपृष्ठच खूप काही सांगून जातं. त्यात एक दारं खिडकी नसलेली दगड-विटांनी बांधलेली कोंडवाड्याची एक भिंत आहे आणि त्या भिंती शेजारून चालत जाणारा एका ठिपक्याएवढा दिसणारा माणूस असं चित्र आहे. त्या भिंतीच्या आकारात त्याचं अस्तित्व आणखी खुजं वाटू लागतं. याच भिंतीबाहेर पडण्याचं काम त्यांच्या कवितांनी भिंतींनाच सुरुंग लावून केलं.

दया पवारांचं खरं नाव ’दगडू मारुती पवार’. स्वत:च्या ’दगडू’ या नावापासूनच त्यांनी आपल्या अस्तित्वाचा शोध घ्यायला सुरुवात केली. विद्रोही व दलित साहित्य चळवळीतले एक महत्वपूर्ण लेखक म्हणून ते सर्वांना परिचित आहेत. पवारांचा जन्म अकोला जिल्ह्यातील धामणगावात इथे झाला. त्यांचं १०वी पर्यंतचं शिक्षण संगमनेर इथल्या शाळेत झालं .घरच्या दारिद्रयामुळे व जातिव्यवस्थेतून निर्माण झालेल्या जाचक व प्रतिकूल परिस्थितीमुळे सतत संघर्ष करतच त्यांना आपल्या आयुष्याचा मार्ग चोखाळावा लागला. नोकरीच्या शोधात त्यांनी मुंबई गाठली. परळ इथल्या पशुवैद्यक महाविद्यालयात त्यांनी सहाय्यक म्हणून काम पहायला सुरुवात केली आणि त्यातून मिळणाऱ्या कमाईवर आपले शिक्षण पुढे चालू ठेवले. तिथे एनॉटोमी विभागात काम करताना मेलेल्या प्राण्यांची कातडी सोलून त्यांचे शरीर जतन करण्यासाठी त्यांच्या शिरांमधे अल्कोहोलचं इंजेक्शन देण्याचं काम त्यांच्या वाट्याला आलं. अर्थातच हे काम करत असताना त्यांच्या सृजन मनावर अनेक आघात होत गेले अन जगण्याच्या लढाईत ते हे काम करत गेले. या नंतरच्या काळात महाराष्ट्र बौद्ध साहित्य सभा, प्रगत साहित्यसभा या संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध आला. त्यातूनच प्रेरणा घेऊन १९६८ पासून दलित साहित्य चळवळीत ते सक्रिय सहभागी झाले होते.प्रारंभीच्या काळात त्यांनी ‘अस्मितादर्श’ या नियतकालिकात लेखन केले आणि आपली चुणूक दाखवली.

दया पवारांची खरी ओळख मराठी साहित्याला आणि पर्यायाने महाराष्ट्राला झाली ती 'बलुतं'मुळे ! त्यांचं हे आत्मकथन अफाट गाजलं. यात त्यांनी संवादी शैलीचा वापर केला आहे. ’दगडू’नं दयाला सांगितलेलं हे आत्मकथन. आपणच आपली ओळख धुंडाळत फिरताना समोरासमोर भेटावं अशा तऱ्हेने ते व्यक्त होतात. ”आयुष्यात किमान एकाला तरी घडलेलं सगळं सांगावं” या आईनं दिलेल्या शिकवणीशी प्रामाणिक राहून घडलेलं ’सगळं’ त्यांनी सांगितलं आहे. उंच हवेल्या बांधण्यासाठी एखादी झोपडपट्टी उद्ध्वस्त करावी आणि तेथील गोरगरीब माणसे हुसकावून काढावीत. ह्या महानगरातील नेहमीच्या दृश्यांतून त्यांचे 'सिद्धार्थनगर' साकारले आहे तर जातीय दंगलीची जी घुसमट असते त्यातून ते 'ब्रोकन मेन' लिहून गेले आहेत. त्यांनी सदासर्वदा 'विद्रोही'च कविता लिहिली आहे असे नाही, अंतर्मुख होऊन आपल्या समाजाचे अंतरंगही तपासले आहे. कोंडवाडा ह्या काव्यसंग्रहाचे हे आणखीन एक वैशिष्ट्य आहे की ह्या कवितांच्या निमित्ताने कवीने आपल्या एकूणच काव्यप्रवासावर एक दृष्टिक्षेप टाकला आहे. आपण कवी म्हणून कसे घडत गेलो हे त्यांनी मनमोकळेपणे सांगितले आहे. यात कोणताही आडपडदा न ठेवता सारं सत्य कथन करताना त्यांनी कुणाची भीडभाड बाळगली नाही तसेच कुणाला वाईट वाटेल याची पर्वा केली नाही. हे आत्मकथन वाचल्यावर वाचकाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल याचीही तमा त्यांनी बाळगली नाही. ते फक्त स्वतः ला लोकांपुढे मांडत गेले. पुस्तकाच्या शेवटी ’दया’नं लिहिलेलं एक प्रकटन आहे त्यात ही कथा कुणाची आहे यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर भेटत गेलेली माणसे आणि मनात उठलेले विचारांचे वादळ या दोन्ही बाजूंना न्याय देत हे कथन वाचून पूर्ण होते, तेंव्हा अस्वस्थ वाटायला लागते. हे लिहिताना आत्मप्रौढीचा लवलेशही कुठे आढळत नाही ही पवारांची जमेची बाजू होय.

आपलं वास्तव मांडताना ते केवळ समाजाला नग्न करतात असं नव्हे तर आपल्या घरातलं, परिसरातलं सगळीकडचं जहर समोर आणत राहतात. जन्मदात्याबद्दलहे ते तटस्थतेने लिहितात. त्यांचं वैयक्तिक जीवन पाहून आपणच चकित होऊन जातो अन मनात प्रश्न येतो दारू आणि स्पिरिटचे व्यसन असणारे वडील, त्यांच्या जाण्यानंतर काबाडकष्ट करून शिकवणारी प्रचंड जिद्दीची आई, तसेच समाजात सतत वाटयास येणारी उपेक्षा अन पोटाची खळगी भरण्यासाठी करावी लागणारी कामे या सर्व जीवघेण्या विश्वात पवारांच्या मनातला संवेदनशील कवी, लेखक कसा काय तेवता राहिला याचं उत्तर त्यांच्या आत्मभानात येतं. त्यांच्या नावाप्रमाणे त्यांचं आयुष्य बंद दगडी चिऱ्यांचं झालं असतं पण त्यांच्यातल्या प्रज्ञेने त्यांच्यातील सृजन जागा केला ! त्यामुळेच त्यांच्या 'चिलया' या कवितेत आजुबाजूच्या निष्ठुर जगाची कैफियत समोर येते.

'....चिलयाची गोष्ट सांगू लागली
देव येवढे का दुष्ट का असतात.
चिलयाचे रक्त, मांस मागतात
मी ऊरी दुभंगतो
अक्राळ विक्राळ देवांचा जबडा
चिमणीचा का घास घेतो ? '
चिलयाबाळाच्या आडून पवार माणसांबरोबरच दांभिक भाकडकथा व दैववादाचे कर्मकांड यावर मोजक्या शब्दात प्रहार करतात. आपल्याला सुद्धा विचारप्रवृत्त करतात. 'कोंडवाडा' मधल्या त्यांच्या कविता दुःख आणि अन्याय या दोन्ही पातळ्यांवर व्यक्त होणाऱ्या आहेत. आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव, आपल्या समाजाच्या उन्नतीसाठीची त्यांची तगमग यातून जाणवत राहते, नुसतंच लेखन करून न थांबता ते समाजातील साक्षर, निरक्षर सर्वच तरुणांना थेट आवाहन करतात. हे करत असताना ते स्वतःचे व समाजाचे दोष उणीवा निर्भीडपणे मांडतात. यात केवळ सामाजिक विषमतेचा संघर्ष आहे असे नसून एका संवेदनशील माणसाच्या अंतर्मनाचा पारदर्शी संघर्षही आहे. शिक्षणामुळे जशा जाणीवा विस्तारत जातात तसेच एक शहाजोगपणाची छटा असलेला पांढरपेशी बोथटपणा देखील येतो याचा पवार स्वीकार करतात. यामुळे कधी कधी आपण समाजाकडून दूर जातो की काय अशी भावनाही त्यांच्या लेखनातून व्यक्त होत जाते.

'दु:खानं गदगदताना हे झाड मी पाहिलेलं
तशी याची मुळं खोलवर बोधिवृक्षासारखी
बोधिवृक्षाला फुलं तरी आली,
हे झाड सार्‍या ऋतूंत कोळपून गेलेलं....'
या कवितेतील त्यांच्या वेदना जन्मभर त्यांच्या मागे होत्या असं म्हणायला हरकत नाही कारण सामाजिक व्यवस्थेच्या प्रभावामुळे त्यांना वैयक्तिक आयुष्यात कायमच दु:ख, वेदना, अपयश, शारीरिक व मानसिक हालअपेष्टा यांचा सामना करावा लागला. हे कधीही न संपणारं; कमी न होणारं दु:खच त्यांची प्रेरणा बनून गेलं.

राष्ट्रीय पातळीवरील सामाजिक, सांस्कृतिक, वाङमयीन चळवळींमध्ये त्यांचा सातत्याने सहभाग राहिला मात्र त्यांच्या विचारांचे लेखनाचे जे मोल व्हायला पाहिजे होते ते झाले नाही. पवारांचा परभाषिक साहित्याचा व्यासंग दांडगा होता, तसेच त्यांच्याकडे समीक्षकाची विजीगिषु, विश्र्लेषक वृत्ती होती त्यांच्या अंगी होती. त्यांना आयुष्यात काही मानसन्मान मिळूनही ते वंचितांचेच जगणे जगले हा मोठा दैवदुर्विलास म्हणावा लागेल. 'अछूत' (बलुतं’चा हिंदी अनुवाद), 'कोंडवाडा', 'धम्मपद' हे कवितासंग्रह आणि 'चावडी', 'पासंग', 'जागल्या' हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. 'पाणी कुठंवर आलं गं बाई...' 'विटाळ' हे वैचारिक लेखसंग्रह होत. त्यांच्या ’बलुतं’चा जेरी पिंटो यांनी इंग्रजी अनुवाद केला आहे. तर 'बीस रुपये' या नावाने 'विटाळ’चा हिंदी अनुवाद प्रसिद्ध आहे. ही सर्व साहित्यसंपदा त्यांच्या प्रतिभाशक्तीचा उत्कट परिचय देते. दया पवारांच्या मागे त्यांच्या कन्या प्रज्ञा यांनी वडिलांच्या प्रतिभेचा वारसा ताकदीनिशी पेलला आहे हे देखील नमूद करावेसे वाटते. पवारांच्या आयुष्यात वेदनेने इतके ठाण मांडूनही त्यांनी लिहिलेल्या कविता चेतनेचा अविष्कार घडवताना धमन्यातील रक्त सळसळवत गेल्या. दया पवारांचे हे काव्यवैशिष्ट्य त्यांचे वेगळेपण दाखवण्यास समर्थ आहे. त्यांच्या या पंक्ती आजही मुठी वळण्यास उद्युक्त करतात.

”प्रखर तेजाने तळपणारा सूर्य केव्हाच अस्तास गेला आहे
ज्या काजव्यांचा तुम्ही जयजयकार केलात
ते केव्हाच निस्तेज झाले आहेत
आता तुम्हीच प्रकाशाचे पुंजके व्हा
अन क्रांतीचा जयजयकार करा.”

'बलुतं' ह्या दया पवारांच्या आत्मचरित्रास दलित आत्मकथनांचा पाया मानलं जातं. आज ही चळवळ कुठल्या वळणावर आली आहे याचा धांडोळा कुणालाच घ्यावा वाटत नाही हे चित्र निराशाजनक आहे. विशेषतः अपवाद वगळता बहुतांश वर्तमानपत्रास, नियतकालिकास वा वृत्तवाहिनीस यावर विशेष काही करावं वाटत नाही हे बधीरपणाचे लक्षण होय.  

बलुतंच्या प्रारंभी एक महत्वाचे विधान पवार करतात - "हा दगड इमारतीच्या बांधकामातून निकामी केलेला .."
खरे तर हाच दगड पवारांनी उचलला आणि आत्ममग्न झालेल्या समाजावर आणि व्यवस्थेवर मारला. मात्र पुढे नंतर असे हात उठलेच नाहीत ही खंत आहे.

(टीप - लेखन संदर्भ जालावरून साभार) 
................................................................................

दया पवारांच्या काही निवडक कविता -

जळुन गेल्या आकांक्षा
अन राख उरे स्वप्नांची
कोंडवाडा कुणी बांधिला
कैद किती जन्मांची

किती यातना सोसाव्या
मी मुक रहावे किती
जन्मोजन्मी बलुते मागत
झोळी तरीही रिती

फुले फळे ही त्यांची
आम्हा साथ फक्त काट्यांची
ही कैद किती जन्मांची

मणा मणाच्या बेड्यापायी
माथ्यावर तलवार
पदोपदी अपमान विखारी
त्यावर अत्याचार

शितल छाया कुठे दिसेना
जळे आग प्रश्नांची
ही कैद किती जन्मांची..............

................................................................................

हे महाकवे -
बा वाल्मिकी,
रामराज्याची स्तुती तू गाव
कारण तू कवींचा महाकवी
क्रौंच पक्ष्याची हत्या पाहून
तुझे कारुणिक मन आक्रंदून उठले

तुझा जन्म झाला गावाबाहेर
उपेक्षित वस्तीत... जिथे दुःखच जन्मले
तिथले विषण्ण चेहरे... काळजीने नांगरलेले
फळाफुलांनी नाही कधी बहरले
मुक्तीसाठी त्यांनी टाहो फोडलेले
खरंच का न ऐकले?

तुझ्याच रक्ताचा एखादा शंबूक
तटतटून संतापाने पेटून उठला.
रामराज्याची स्तुती गाणा-या
हे महाकवे--
तिथेही अमानुषतेचा कडा कोसळला.

हे महाकवे,
तुला महाकवी तरी कसे म्हणावे!
हा अन्याय, अत्याचार वेशीवर टांगणारा
एक जरी श्लोक तू रचला असतास...
... तर तुझे नाव काळजावर कोरून ठेवले असते!

................................................................................

दु:खानं गदगदताना हे झाड मी पाहिलेलं

तशी याची मुळं खोलवर बोधिवृक्षासारखी
बोधिवृक्षाला फुलं तरी आली,
हे झाड सार्‍या ऋतूंत कोळपून गेलेलं.
धमनी धमनीत फुटू पाहणार्‍या यातना
महारोग्याच्या बोटांसारखी झडलेली पानं
हे खोड कसलं? फांदीफांदीला जखडलेली कुबडी
मरण येत नाही म्हणून मरणकळा सोसणारं
दु:खानं गदगदताना हे झाड मी पाहिलेलं...

................................................................................

देवांच्या भाकड कथांचा समुद्र
गढूळ्लेल्या अपऱंपार लाटा
गुडघाभर पाण्यात उभी चिमणी
नाकातोंडात जाते पाणी
कालपऱवा शाळेतून ती आली
चिलयाची गोष्ट सांगू लागली
देव येवढे का दुष्ट का असतात.
चिलयाचे रक्त, मांस मागतात
मी ऊरी दुभंगतो
अक्राळ विक्राळ देवांचा जबडा
चिमणीचा का घास घेतो ?
................................................................................

बाई मी धरण धरण धरण बांधते
माझं मरण मरण मरण कांडते
झुंजू मुंजू गं झालं पीठ जात्यात आटल
कणी कोंडा गं कोंडा गं कोंडा गं रांधिते
दिस कासऱ्याला आला जीव मागं घोटाळला
तान्हं लेकरू लेकरू लेकरू पाटीखाली घालते
काय सांगू उन्हाच्या झळा घाव खाली फुटे शिळा
कढ दाटे कढ दाटे पायी पाला मी बांधिते
पेरा पेरात साखर त्याचं पिकलं शिवार
घोटभर पाण्यासाठी सारं रान धुंडळाते
येल मांडवाला चढे माझ्या घामाचे ग अढे
माझ्या अंगणी अंगणी अंगणी पाचोळा ग पडे

............................................................................

८ टिप्पण्या:

  1. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. How I have become hugh fan of your writings Sameerji , and the kind of information you share opens up so many different faces of this society, people and our country

    उत्तर द्याहटवा