शनिवार, २ जून, २०१८

रक्त पेटवणारा कवी – नामदेव ढसाळ



विश्वाला कथित प्रकाशमान करणाऱ्या दांभिक सूर्याची खोट्या उपकाराची किरणे नाकारून आपल्या सळसळत्या धमन्यातून वाहणाऱ्या रक्तात अगणित सुर्य प्रज्वलित करून क्रांतीची मशाल पेटवित सर्वत्र विद्रोहाची आग लावण्याची भाषा कुणी कवी जर करत असेल तर त्या कवीच्या धगधगत्या प्रतिभेकडे सगळ्यांचे लक्ष वेधले जातेच. अशा कवीची आणि त्याच्या कवितांची दखल घेणे अनिवार्य ठरते. किंबहुना कोंबडे झाकून ठेवले तरी सूर्य उगवायचा राहत नाही या उक्तीनुसार अशा कवितेस प्रस्थापितांनी डावं ठरवण्याचा यत्न केला तरी व्हायचा तो परिणाम होतोच. नामदेव ढसाळांच्या 'गोलपिठा' या काव्यसंग्रहातली 'रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो.....' ही कविता असाच इतिहास मराठी साहित्यात घडवून गेली. या कवितेसकट समग्र 'गोलपिठा'वर आजवर अनेकांनी चिकित्सा, टीकासमीक्षा केली आहे. रसग्रहण केले आहे. तरीही व्यक्तीगणिक वैचारिक बदलानुसार त्यात नित्य नवे काहीतरी तत्व सत्व सापडतेच. त्यात ही छोटीशी भर ठरावी. विद्रोही कवितांचा विषय निघावा आणि कविवर्य नामदेव ढसाळांचा उल्लेख त्यात नसावा असं होऊ शकत नाही. ढसाळ हे या विद्रोही कवींचे शीर्षबिंदू ठरावेत आणि त्यांचा 'गोलपिठा' हा या कवितांचा प्रदिप्त ध्वजा ठरावा इतपत या विद्रोही काव्यात नामदेव ढसाळांच्या कवितेचा ठसा उमटला आहे.

कवितांचा एक काळ होता ज्यात प्रतीके म्हणून केवळ चंद्र, तारे, रवी, नदी सरोवरे, बागा फुले होती. गुलछबू अन स्वप्नाळू आशय होते. पोकळ आदर्शवाद, रोमान्टीसिझम, भ्रामक उत्कटवाद यांनी कवितेस अक्षरशः ग्रासले होते. अनेक विषयांचे वैविध्य त्यात समाविष्ट नव्हते किंबहुना कवितेला काही विषयांचे जाणीवपूर्वक वावडे होते असे म्हटले तरी वावगे ठरले नसते अशी स्थिती होती. कवितांमधून सजगपणे, सक्षमतेने आणि टोकदार पद्धतीने सामाजिक भानाची मांडणी अपवादानेच घडत होती. साठच्या दशकापासून मात्र या कागदी गुलाबासारख्या कवितांच्या ‘ओरिगामी’ विश्वास सुरुंग लावण्याचे काम दलित साहित्याने केले. समाज ज्या गोष्टी झाकून ठेवत होता, ज्याचा बभ्रा करणं अशक्य होतं, छान छान शब्दांच्या लालचुटूक मऊ गालीच्याच्या खाली जे एक दबलेले, पिचलेले, घामेजलेले, करपलेले अन कोमेजलेले विश्व होते त्याचा तो अभूतपुर्व हुंकार होता. या काव्याची दखल सरकारांनी तर घेतलीच घेतली पण जागतिक स्तरावर या कवींच्या जाणिवांचा उस्फुर्त अविष्कार विविध भाषांतून मांडला गेला. हा हुंकार अनेकांच्या काळजात धडकी भरवून गेला हेही महत्वाचे आहे ; खेरीज त्याहून महत्वाचे हे की गावकुसाबाहेर हजारो वर्षे खितपत पडलेला आणि अनेकांच्या खिजगणतीतही नसलेला समाजाचा एक महत्वाचा घटक आपल्या भावनांना धारदार शब्दात अणकुचीदार आशयाने प्रसवू लागला होता. या साहित्याची निर्मिती होताना तिच्या निर्मिकांनी रूढ असलेल्या सगळ्या तकलादू संहिता मोडीत काढल्या, खोट्या सभ्यतेची सर्व बंधने धुळीस मिळवली अन सारस्वतांच्या शाब्दिक कचकड्यांच्या रिंगणाची त्रिज्या आपल्या धगधगत्या शब्दांनी वेदनांच्या - अपमानांच्या अग्नीकुंडात स्वाहा केली. हा खऱ्या अर्थाने विद्रोहच होता म्हणून या कवितांना विद्रोही कविता संबोधणे अधिक संयुक्तिक ठरते...

नामदेव ढसाळांनी जातिप्रथा, परंपरेच्या जोखडाविरुध्द, सामाजिक अन्यायाविरुध्द, सामाजिक विषमता आणि जातवर्ग वर्चस्ववादाविरुद्ध कवितेतून आवाज बुलंद केला. त्यांच्या कवितेतील प्रत्येक शब्द आजही विद्रोह करतो, शिकवतो आणि रक्तात रोम रोमात भिनवतो. ‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो’ ही त्यांची कविता आजही जातीव्यवस्थेचं आणि स्त्रियांवरील अन्यायाचं उत्कट चित्र मांडते. त्यांच्या ‘गोलपीठा’ला कोणतीही बंधने वा नियम लागू होत नाहीत कारण त्यांच्या कवितेची जडणघडण कुठल्या साचेबद्ध चौकटीत मोजता येत नाही. तिला वाङ्मयीन संहितेच्या छापील आणि घोटीव रचनेशी जोखून त्या तौलनिक दृष्टीकोनातून पाहता येत नाही.

दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे साहित्यविश्वातील प्रयोगशील कवी आणि जागतिक साहित्याचे साक्षेपी भान असणारे समीक्षक म्हणून विख्यात आहेत. 'पोएट ऑफ अंडरवर्ल्ड' या लेखात नामदेव ढसाळांबद्दल ते लिहितात - "टी. एस. एलियट यांच्या ‘द वेस्ट लँड’ला कवितासंग्रहाला इंग्रजी कवितेत जे स्थान आहे, ते ‘गोलपीठा’ या नामदेव ढसाळांच्या कवितासंग्रहाला फक्त मराठीच नाही तर एकूण भारतीय कवितेत आहे. एक दलितच अशी कविता लिहू शकतो. गोलपीठाला कोणतीही वाङ्मयीन पार्श्‍वभूमी नाही. कारण ती सर्व अर्थानं ‘अस्पृश्य’ असलेल्या स्रोतांतून उसळून आली आहे कवितेच्या गालिच्याखाली इतर सगळे जे लपवू पाहत होते, तेच दाखवायचं काम या कवितेनं केलं. या कवितेला आता पंचवीस वर्षं झाली. त्यावरचं हे माझं अत्यंत विचारपूर्ण असं मत आहे. मला अत्यंत ठामपणे हे लिहावंसं वाटतं की नामदेवचं सुरुवातीपासूनचं साहित्य हे नोबेल पारितोषिक मिळवण्याच्या तोडीचं आहे. आतापर्यंत त्याचे सहा काव्यसंग्रह प्रकाशित झालेत. त्या प्रत्येकावर त्याच्या अद्वितिय ‘जिनियसपणा’ची मोहर आहे. मराठी समीक्षक हे त्याच्या समकालीन लेखकांपेक्षा पंचवीस वर्षं तरी मागे चालत असतात. नुकतेच कुठे ते नामदेवच्या मोठेपणाची दखल घेऊ लागलेत, पण पूर्वग्रह ठेवूनच.’

रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो
तूमची आय-बहीण
आजही विटंबली जाते
हाटाहाटातून…
मवाल्यासारखे माजलेले
उन्मत्त नीरो
आजही मेणबत्तीसारखी जाळतात
माणसं
चौकाचौकातून…
कोरभर भाकरी पसाभर पाणी
यांचा अट्टाहास केलाच तर
आजही फीरवला जातो नांगर
घरादारावरून
चिंदकातले हात सळसळलेच तर
छाटले जातात आजही नगरानगरातून
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो,
किती दिवस सोसायची ही
घोर नाकेबंदी
मरेपर्यंत राहयचं का असंच युद्धकैदी?
ती पाहा रे ती पाहा
मातीची अस्मिता आभाळभर झालीय
माझ्या यातनेनं आता
झिंदाबादची गर्जना केलीय
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो,
आता या शहराशहराला
आग लावत चला …

या कवितेत ढसाळांनी सुर्याची धग त्यांना पाहिजे तशी वाकवून आपल्या शब्दात उतरवली आहे. विश्वाने स्वीकारलेल्या सूर्याला ते नाकारतात आणि आपल्या रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांना ते आवाहन करतात. तेही कशाचं तर विद्रोहाच्या ज्वालांचं ! खंगलेल्या, दबलेल्या, पिचलेल्या समाजबांधवांना ते अक्षरशः हलवून टाकतात, त्यांना आपल्या आजूबाजूला पहायला भाग पाडतात. ते रक्त उसळवतात. आपल्या आईबहिणीवर होणारे अत्त्याचार ते टोकदार शब्दातून मांडतात.

जनतेच्या छळवादात अन रोम जळत होते तेंव्हा निरो फिडेल वाजवत होता, त्याची ही कृती म्हणजे तो किती बेगुमान, बेफिकीर, अत्त्याचारी, उन्मत्त आणि मुजोर होता याचं प्रतिक होती. ढसाळ अत्त्याचारी लोकांना निरो संबोधतात तेंव्हा त्यांना अधिक प्रतिमांची गरज पडत नाही, इतके चपखल अर्थविशेष या उपमेतून द्रवतात. ढसाळ निद्रिस्त समाजाला डागण्या देऊनच जागे करतात, चौकाचौकात मेणबत्ती प्रमाणे विनातक्रार आणि सहजगत्या जळून जाणारी माणसे त्यांच्या शब्दात वितळत जातात आणि त्याना जाळणाऱ्या उन्मत्त लोकांच्या चिरेबंदी वाड्यांना आग लावण्याची क्रिया ते स्वतःच सुरु करतात.

जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आणि हक्काच्याही असणाऱ्या वंचितांचा घासाचा अट्टाहासही समोरच्या प्रस्थापितांना पटत नव्हता. जर कुणी या वाटेवर गेलाच तर तो देशोधडीला लागलाच म्हणून समजायचा तो काळ होता. फाटक्या चिंधूडक्या कपड्यातले हात जर समोरच्याशी दोन हात करायची भाषा बोलू लागले तर त्याचे हातच छाटले जायचे, या हातांना आपल्या अजस्त्र शब्दांची वज्रमुठ देण्याचे काम ढसाळ या कवितेतून करतात.

आणि सरते शेवटी मनाच्या द्वंद्वातून बाहेर पडायची साद देतात, सहनशीलतेच्या साखळ्या तोडल्याशिवाय शोषकांच्या गढ्या उध्वस्त करता येणार नाहीत हे ते लोकांच्या मनावर ठसवतात. उपेक्षितांच्या मातीची अस्मिता आभाळभर झालीय असं तिचं बोलकं वर्णनही ते करतात, यातनेचे युगायुगाचे पुळचट रडगाणे सोडून देऊन एल्गार सुरु केल्याचं ते घोषित करतात .या विद्रोहात सामील होण्याचं जळत्या आत्म्याचं आवाहन आपल्या बांधवांना करतात. त्यांच्याही धमन्यातले रक्त विद्रोहाच्या गर्जनेने पेटवून टाकतात. रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांना ढसाळ लीलया आपले बटिक बनवून टाकतात.....

ढसाळ म्हणजे जातीयवादाचे लचके तोडण्यासाठी सर्वशक्तीनिशी झेपावलेला पँथर. केवळ मराठीच नव्हे तर जागतिक साहित्य विश्वावर आपली शैलीदार मोहोर उठवणार्‍या या कवीचा जन्म १५ फेब्रुवारी १९४९ ला पुण्याजवळच्या एका खेड्यात झाला. दलित कुटुंबात जन्मलेल्या ढसाळांचं बालपण मुंबईतल्या गोलपिठा या वेश्यावस्तीत गेलं. मुंबईतल्या वेश्यावस्तीतलं बकालपण, नाकारलेपण आणि उध्वस्तपणाचा उद्रेक घेऊन नामदेव ढसाळांचा ‘गोलपिठा’ हा धगधगीत काव्यसंग्रह मराठी साहित्यात अवतरला आणि त्यानं मराठी विश्वाला धक्का दिला. मराठी काव्याचे मापदंड बदलून टाकले. प्रस्थापित साहित्यप्रांतात दलित आणि लुंपेनवर्गाची जळजळीत, बंडखोर भाषा नव्यानं दाखल झाली आणि मराठी साहित्य विश्वाला नाकारलं गेलेल्या जगाचं प्रतिनिधीत्व कऱणारा ढसाळांच्या रुपात बंडखोर कवी मिळाला.

गोलपिठाच्या प्रस्तावनेत विजय तेंडुलकर म्हणतात की, “ढसाळची कविता आजही मला पुरती समजली आहे असे मला वाटत नाही. पण ती मला जरा जास्त समजू लागली आहे आणि त्याहूनही जास्त आवडू लागली आहे. ढसाळच्या जगात उभे राहून त्याच्या कवितेत डोकावण्याचा प्रयत्न टाकून, मी आता ढसाळच्या कवितेच्या पुलावरून त्याचे जग समजावून घेऊ लागलो आहे. ह्या जगाच्या प्रत्यक्ष आणि ढसाळनेच घडवलेल्या ओझरत्या दर्शनाने या कामी मला चांगली मदत झाली आहे. पांढरपेशा जगाच्या सीमा संपून पांढरपेशा हिशेबांनी 'नो मन्स लँड'-निर्मनुष्य प्रदेश जेथून सुरु होतो तेथून नामदेव ढसाळ याच्या कवितेचे मुंबईतील 'गोलपिठा' नावाने ओळखले जाणारे जग सुरु होते. हे जग आहे रात्रीच्या दिवसाचे, रिकाम्या किंवा अर्धभरल्या पोटांचे, मरणाच्या खस्तांचे, उद्याच्या चिंतांचे, शरम आणि संवेदना जळून उरणाऱ्या मनुष्यादेहाचे, असोशी वाहणाऱ्या गटारांचे, गटाराशेजारी मरणाची थंडी निवारीत पोटाशी पाय मुडपून झोपणाया तरुण रोगी देहांचे, बेकारांचे, भिकाऱ्यांचे, खिसेकापूंचे, बैराग्यांचे, दादांचे आणि भडव्यांचे; दर्ग्यांचे आणि क्रुसांचे; कुरकुरणाया पलंगालगतच्या पोपडे गेलेल्या भिंतीवरच्या देवांचे आणि राजेश खन्नांचे; गांजाच्या खाटल्याचे, त्याच खाटल्यावरल्या कोपऱ्यात झोपलेल्या गोजिरवाण्या मुलाचे. त्या मुलाला 'शरीफ' बनवण्याची महात्वाकांक्षा बाळगीत जवळच्या कुंटणखान्याची रखवाली करणाया क्षयरोगी बापाचे हिजड्यांचे, हातभट्ट्यांचे, अध्यात्मिक कव्वाल्यांच्या तबकड्यांचे आणि कोणत्याही क्षणी पाण्याच्या भावाने वाहणाया ऊन चिकट रक्तांचे, वाफा ओकणा-या पाणचट लालभडक चहाचे; स्मगलिंगचे, नागव्या चाकूंचे, अफूचे. १९४३ साली मुंबईच्या गोदी भागात एक नंगा बाबा ओरडू लागला, माझ्यामागून या, जगबुडीयेणार, माझ्यामागून या. लंगडे, थोटे, भुकेकंगाल, बेकार, रोगी, भोगी, जे कोणी त्याच्यामागून धावले ते या भागात येऊन वाचले म्हणे. कारण गोदीत प्रचंड स्फोट झाला. नंगा बाबाने गोलपिठ्याला आणून सर्वाना वाचवले. ढसाळच्या गोलपिठ्याला. जेथे महारोगी शरीरेही किंमत देऊन रस्त्याकडेला भोगली जातात, संभोगाशेजारी अर्भके रडतात, वेश्या गिहाइकाच्या प्रतीक्षेत गळाभर प्रेमगीते गातात, जेथून कोणी जीवानिशी पळू शकत नाही, पळाले तर परत येते, तो गोलपिठा. दया क्षमा शांती यांचा लागता नसलेला गोलपिठा. ढसाळ सांगतो, 'इथला प्रत्येक हंगाम बेदर्दीच उफराट्या काळजाचा असतो. "हे ढसाळच्या भोवतालचे आणि त्याला कायम वेधून राहिलेले जग. या जगात आला दिवस सापडेल तसा भोगून फेकणाऱ्या कवी नामदेव ढसाळचे रक्त महाराचे आहे. अस्पृश्यतेचा धर्मदत्त शाप ओठ बांधून एखाद्या पवित्र जखमेसारखा जपत आपल्या अस्पृश्य सावल्यांसकट जगले ते ढसाळचे पूर्वज होते.
अस्पृश्य नवबौद्ध बनले, घटनेने दास्यमुक्त झाले, परंतु खेडोपाडी त्यांचे नशीब पालटलेच नाही. आंबेडकर गेले. छळ, जुलूम, पिळवणूक विटंबना संपली नाही. कनिष्ठ वागणूक मिळतच राहिली. शतकाशतकांची जखम भळभळतच राहिली. नामदेव ढसाळ याच्या कवितेचे या जखमेशी अतूट आणि फार आतले नाते वाटते. अदम्य विषाद आणि क्रोध या कवितेच्या शब्दाशब्दावाटे जाळासारखा फुटत राहतो. पोरगेल्या वयातली ही हळवी आणि नाजूक होऊ बघणारी कविता जागोजाग आतल्या दाहाने करपलेली भासते. भोवतालच्या आयुष्यातले उबगवाणे आणि किळसवाणे तपशील ती अलंकारासारखे, एका मुजोरपणे, मिरवताना दिसते. या तपशिलांनी नटते, मुरडते आणि भेसूर होते....यामुळेच नामदेव ढसाळांची कविता चिरंतन विद्रोहाचे दाहक प्रतिक म्हणून आजही ओळखली जाते..”

नामदेव ढसाळांच्या कवितेतून जो लाव्हा प्रसवतो त्याच्या मुळाशी जायचं असेल तर त्यांच्या अंतरंगात खोलवर डोकावणं क्रमप्राप्त ठरते, किंबहुना ढसाळ आणि त्यांची कविता त्याखेरीज खऱ्या अर्थाने उमगत नाही. ढसाळ जरी रूढार्थाने मुंबईत वाढत जगत गेले असले तरी त्यांच्या अंतःकरणात एक गावगाडा आणि एक महारवाडा नांदत होता. कधी तो साखळदंडासारखा वाटे तर कधी ते त्याचे कानकोरणे करून त्यानं आपलं मन टोकरत.

दिवस असे अधून-मधून त्यांना शहरातून गावाकडे घेऊन जात. जिथं आता सावलीचा विटाळ धरत नाहीत, आता तिथल्या महारवाडय़ाचं रुपांतर राजवाडय़ात झालं आहे. सुगीसराई-अलुत्याबलुत्याचे मोसम संपले आहेत. मर्तिकाच्या चिठ्ठय़ा पोहोचवणं, फाटय़ा फोडणं, महसुलाचा भरणा करणं, वीर नाचवणं, शिमग्याची सोंगं घेणं, महाराच्या होळीच्या विस्तवानं गावाची होळी पेटवणं.. आता सर्वच गेलं आहे बदलून. गाववस्ती, नदी-नाले पूर्वीचे राहिले नाहीत गावात गेलो की, महाराचं पोर आलं, असं आता म्हणत नाहीत. गाव किती बदलतं? पण बदलत नाहीत आठवणी. या आठवणी कुणालाच चुकत नाहीत. ढसाळदेखील त्यास अपवाद नव्हते.

वाडी-वस्ती किंवा परिसर म्हटला की, त्यांना त्यांच्या कनेरसरपूर गावची आठवण व्हायची. या गाव-परिसराची मुळं त्यांच्या रक्तात खोलवर रुजलेली. वडाच्या पारंबीमधूनच नवीन झाड जन्माला येतं, तसं कनेरसरपूरच्या पारंबीला ते फुटलेत असं त्यांना सतत वाटायचं. कनेरसरपूर इतक्या खोलवर त्यांच्या ध्यानीमनी सतत जागं असायचं आणि म्हणूनच कधीही वाडी-वस्तीचा विषय निघाला की, त्यांना सगळ्यात आधी कनेरसरपूरच आठवत असे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कनेरसरपूर हे एक गाव नाही. कनेरसर आणि पूर या दोन गावांच्या अद्वैतातून कनेरसरपूर नाव तयार झालं आहे. कारण गावं वेगवेगळी असली तरी त्यांचे व्यवहार, त्यांच्या रीतीभाती, त्यांचेसण-वार सारंच एकत्रितपणे चालायचं. गावंही एकमेकांना खेटल्यासारखीच. एकमेकांच्या सावल्या जणू. त्यामुळे कनेरसरच्या किंवा पूरच्या कुणालाही गावाचं नाव विचारलं तरी तो कनेरसरपूरच सांगतो. त्यामुळे ढसाळदेखील त्यांच्या गावाचं नाव कनेरसरपूरच सांगत. मात्र त्यांचं घर होतं, पूर गावात. वेळ नदीच्या काठावर. नदी ओलांडली की, तिच्या डाव्या हाताला गच्च आमराई लागायची. या आमराईतच त्यांचं घर दडलेलं होतं. याच घरात नि कनेरसरपूर गावात त्यांनी वयाची १२-१३ वर्ष घालवली. फक्त त्यांच्या घराचाच नव्हे तर अख्ख्या कनेरसरपूर गावाचाच परिसर देखणा होता. मुळात गावच अभिजात. हिरव्यागार डोंगरांनी वेढलेलं गाव, गावातून वाहणारी नदी आणि नदीच्या काठावरच्या आमराईत गुडूप झालेलं त्यांचं घर.. सारा माहौल थेट बालकवींच्या औदुंबर कवितेतला.

निसर्गाने आणि गूढरम्य वातावरणाने भारलेला नि भारावलेला गाव. या भारावलेपणात गावाची ग्रामदेवता यमाई भर घालायची. दगडी मंदिरातल्या काळोख्या गाभा-यातील तिची उग्रसुंदर मूर्ती अप्रतिम होती. तिच्या गाभा-याच्या बरोबर समोर मंदिराच्या प्रांगणात यज्ञवेदी होती. या यज्ञवेदीत तेव्हा चैत्रपौर्णिमेला भरणा-या जत्रेच्या वेळी बोकडाचा बळी दिला जायचा. गावाचं हे रूपडं भुरळ घालणारं होतं. एकदम ट्रेडिशनल. गावाची खासियत म्हणजे एरवी महारांची वस्ती गावकुसाबाहेर असायची. पण ढसाळांच्या कनेरसरपुरात महारांची वस्ती आधी लागायची. नंतर सवर्णाची. त्यामुळे आपण गावकुसाबाहेर आहोत, असं त्यांना कधी वाटलंच नाही. पण गावाच्या वेशीने गावकुसाबाहेर टाकलेलं नसलं तरी माणसांनी मात्र टाकलेलं होतं. जातीपातीची ती उतरंड त्यांच्या कोवळ्या मनावर तेव्हाही डागण्या द्यायची. विशेषत: किशोरवयात नामदेवाला बलुत्याच्या घरी भाकर मागायला जावं लागायचं; तेव्हा ते जिणं अगदी नको नको व्हायचं. भाकर मागायला जायचं म्हणजे हातात बलुत्याची घुंगरं बांधलेली काठी घेऊन जावं लागायचं. त्यांच्या वाटयाचं घरं आलं की तिथे काठी वाजवून हाळी द्यावी लागायची - भाकरी वाढ गं माय.. ही हाळी दिली की, ती पूर्ण होण्याआधीच घरातल्या सासुरवाशिणीच्या शिव्या ऐकू यायच्या - ‘लॉथ उलथली याची. मुर्दा भल्या सकाळी आलाय भाकर मागायला..’ हे एवढय़ावरच थांबायचं नाही. शिव्यांची लाखोली सुरू असतानाच भॉ-भॉ करीत आतली माजलेली कुत्री अंगावर धावून यायची. त्या कुत्र्यांपासून बचाव करताना जीव मेटाकुटीला यायचा. धावता धावता पडायला व्हायचं. अंगावरच्या कपडयांचं नुसतं मातेरं होऊन जायचं. सकाळी घरातून निघताना सजून निघालेलो असायचो.

वडिलांनी मुंबईच्या चोर बाजारातनं खरीदून पाठवलेले बूट आणि कपडे ढसाळांच्या अंगात असायचे. पण बलुत्याच्या भाकऱ्या घेऊन ते परत यायचे तेव्हा त्या अवताराचे पार ध्यान झालेलं असायचं. त्यांची आणखी एक आठवण सवर्णांच्या बाराव्या-तेराव्याचं किंवा लग्नाचं चूलबंद जेवणाची होती. या जेवणाचं आवतनही त्यांना नकोसं वाटायचं. आवतन म्हणून जेवायला गेलं, तर तिथे जातीनिहाय पंक्ती बसलेल्या असायच्या. ब्राह्मणापासून चांभारापर्यंत साऱ्यांची जेवणं झाली की, महारांच्या वाटय़ाला उरलंसुरलेलं यायचं. तिथेही वाढपी आगळीक करायचे. वाढता- वाढता शिव्या द्यायचे. कुणी चुकून ताट वर उचललंच तर शिवाशिवीच्या भीतीने त्यांची ‘आधी गांड जमिनीवर ठेव’ ही शिवी ठरलेलीच असायची. या शिव्या ऐकून जेवण घशाखाली उतरायचं नाही. ढसाळांचे वडील तेव्हा मुंबईत कत्तलखान्यात नोकरीला होते. त्यामुळे त्यांची परिस्थिती इतर महारांपेक्षा बरी होती. त्यांच्या आईस तर कुणाच्या बाराव्या-तेराव्याच्या जेवणाला जायला आवडायचंच नाही. त्यामुळे त्या शक्यतो जाणं टाळत असत. पण अशा वेळी ज्याच्या घरचं आवतन असायचं तो राग धरायचा. दुसऱ्या दिवशी घरी येऊन म्हणायचा, ‘काल आली नाहीस जेवायला. बाकीचे सगळे जेवून गेले. पण आमचं बलुतं असलेला महारच नाही आला तर लोक काय म्हणतील !’ ढसाळांचे वडील मुंबईला नोकरीला असल्यामुळे त्यांना व त्यांच्या आईला असं वागताना चालून जायचं. पण इतरांसाठी बाराव्या-तेराव्याच्या जेवणावळी हीच मेजवानी असल्यामुळे त्यांना जावंच लागायचं. या जेवणावळीत महार कुणाकुणाचं नाव सांगून त्यांच्या वाटणीच्या तेलच्या (तेलात तळलेल्या गव्हाच्या पिठाच्या जाडसर पुऱ्या) मागायच्या. तेलात तळलेल्या या तेलच्या दोन-तीन दिवस चांगल्या राहायच्या. पण कधी कधी तर उरलेल्या तेलच्या मागून आणून त्यांचे तुकडे करून ते वाळवून वर्षभरही खाल्ले जायचे. महारकीतलं हे भीषण वास्तव तेव्हा नको वाटायचं. होळीलाही तीच गत. सवर्णाची होळी उकरायचे महार, ती पेटायची महारांच्या होळीतल्या विस्तवाने, त्यांच्या टिपरी नाचासाठी लाकूड तोडून टिप-या बनवायचे महार. एवढंच नव्हे तर त्यांच्या नाचण्यासाठी गाणं-बजावणंही महारच करायचे. पण एवढं करूनही गाणं-बजावणं करताना त्याची झिंग चढून एखादा महार नाचला, तर मात्र त्याचा लगेच बाट लागायचा. कनेरसरपूरच्या वाडी-वस्तीतलं हे वास्तवही जीवघेणं होतं.

.. तरीही त्या दुःख वेदनांच्या डंखात ढसाळांनी त्यांचा परीघ नेमका शोधित त्यात आपला म्हणून एक आनंद वेधला होता. ढसाळ महार असले तरी नाथपंथी होते. त्यामुळे त्यांच्या घरात नाथांचा देव्हारा होता. त्यात नाथांच्या खडावा खापर आणि चिमटा होता. वडील मुंबईला असल्यामुळे या देव्हाऱ्याची पूजाअर्चा त्यांनाच करायला लागायची. त्यांना या साऱ्याचा प्रचंड कंटाळा यायचा. पण त्यांची आई त्यांच्यावर नजर ठेवून असायची. त्यामुळे नाथांची पूजाअर्चा नीट करावी लागायची. नाथांची ही रोजची पूजा परवडायची. पण पौर्णिमा-अमावास्येची पूजा ढसाळांना नकोशी वाटायची. कारण त्या दिवशी साग्रसंगीत पूजा असायची. त्यासाठी खापर, खडावा, चिमटा देव्हा-यातून काढून धुवावा लागायचा. त्याचबरोबर त्या दिवशी नाथांना चिलीमही दाखवावी लागायची. चिलीम दाखवण्याचा हा प्रकार फारच त्रासदायक असायचा.

चिलमीच्या तळाशी खडा टाकून वर तंबाखू-गांजा टाकला जायचा. मग त्यावर निखारा ठेवून फुंकर घालून नाथांना चिलीम दाखवली जायची. पण बराच वेळ फुंकर मारूनही चिलीम पेटायची नाही आणि नाथांची चिलीम असल्यामुळे ती तोंडाने झुरका घेत ओढताही यायची नाही. पण फुंकर मारून मारून ते एवढे त्रासलेले असत की, आईचं लक्ष नाहीसं बघून चिलमीचा एक मस्तपैकी झुरका मारत. त्याबरोबर चिलीम पेटायची आणि त्यांची पूजा संपायची. खेळातही त्यांचा कंपू सवर्णाच्या पोरांना असाच वस्तादपणा दाखवायचा. पोरं पोरं असल्यामुळे खेळताना ते एकत्र यायचे. पण आटयापाटया असो, नाही तर हुतुतू तेच जिंकायचे. ते जिंकताहेत असं दिसताच सवर्णाच्या पोरांना त्यांची जात आठवायची. मग ‘म्हारडे म्हारडे’ म्हणत ते मारामारीला सुरुवात करायचे. त्यांनी मारामारी सुरू केली की, हे घरातून पटकन सुरे लावलेल्या काठया आणत. त्या पहिल्याबरोबर सवर्णाची पोरं गांडीला पाय लावून पळत सुटायची.

.. असं बरंच काही कनेरसरपूरच्या वाडी-वस्तीत ढसाळांच्या लहानपणी घडलं. त्यानंतर ते १२-१३ वर्षाचे असतानाच त्यांचे वडील त्यांना व आईला घेऊन मुंबईला आले. मुंबईत सुरुवातीला कामाठीपु-याजवळच्या अरबगल्लीत ते राहिले. ही गल्ली तेव्हा ‘ढोर चाळ’ म्हणून प्रसिद्ध होती. त्यानंतर ते ताडदेवला आले. लहानाचे मोठे याच परिसरात झाले. तिथल्या समाजवाद्यांच्या चळवळी, कामाठीपुऱ्यातलं भयानक वास्तव त्यांनी जवळून पाहिलं. याच काळात आंबेडकरांच्या विचारांशीही त्यांची नाळ जोडली गेली आणि बघता बघता कनेरसरपूरचा छोटा नाम्या, नामदेव ढसाळ झाला. तो कविता लिहू लागला; तो नेता झाला. माणुसकीची लक्तरं काढणा-या सा-या दुनियेला त्याने फाटय़ावर मारलं. पण या उत्क्रांतीतही त्यांच्या मनातलं कनेरसरपूर मात्र हरवलं नाही. कारण कनेरसरच्या वाडी-वस्तीनेच आपल्याला घडवलं, असं त्यांना वाटायचं. त्या अभिजात गावाची, आमराईतल्या घराची, त्या घरात परंपरेने चालत आलेल्या तमाशातल्या नाच-गाण्याची आणि गाव परिसरातल्या अनुभवांची शिदोरीच कायमच त्यांच्याबरोबर राहिली.

'अजून याद येते गावाची' ही ढसाळांनी व्यक्त केलेली एक ओघवती साठवण आहे. यात गावकीचे कंगोरे आहेत आणि मानवी मनाची त्यात उमटलेली प्रतिबिंबे आहेत. नाम्याचा नामदेव कसा झाला अन त्याने माणुसकीची लक्तरे काढणाऱ्या दुनियेला कसे फाट्यावर मारले याचे टोकदार वर्णन मनाला छिलून काढते. म्हारकीतलं भीषण वास्तव ते सहजगत्या मांडतात. पूजेअर्चेकडे त्यांचे बालमन कसे पाहत होते याचे रंजक वर्णन यात आहे. महारकी करताना अन्नान्नदशेसाठी कसं वंचितांचं जिणं जगावं लागलं याचं भीषण वास्तव आजही मनाला भेदून जाते. ढसाळ जे जे काही जगले, जसं जसं जगले ते ते सर्व कागदावर उतरवत गेले आणि इथंच त्यांच्या शब्दांना फुटलेल्या धुमाऱ्यांची मुळं पंक्तीगणिक गवसत जातात. हे अस्सल बावनकशी सोनं कुठल्या अग्नीपरीक्षेचं मौताज नव्हतं. एका विशिष्ठ वर्गाने त्यांच्या कवितेस अनुल्लेखाने मारलं, तिची दखल घेण्याचं टाळलं, त्यातलं सत्व नाकारण्याचा हा केविलवाणा प्रयत्न त्यांच्या वर्चस्ववादी आणि शोषणवादी वृत्तीस अधिक ठळकपणे अधोरेखित करून गेला. हे यश ढसाळांच्या लखलखत्या कवितेचे आहे.

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा