Tuesday, June 12, 2018

जात्यावरच्या 'ओवी'चं आशयसंपन्न विश्व - #ओवी_गाथा !#ओवी_गाथा - १

पंढरीची वाट ओली कश्यानं झाली,
न्हाली रुखमीण केस वाळवीत गेली..

पांडुरंगाची भक्ती अत्यंत साध्या सोप्या शब्दात व्यक्त करताना त्याच्यासोबत असणारी आपुलकी आणि जवळीक खूप देखण्या रूपकात रंगवली आहे. भक्तांच्या आनंदरसात रुक्मिणी अशी काही न्हाऊन निघाली आहे की त्यात ती नखशिखांत ओली झाली. मग या ओलेत्या रुक्मिणीचे केस पंढरपूरच्या भक्तीमार्गावरूनच सुकत गेले, त्यामुळे पंढरपूरचा रस्ता शोधताना कुणाला तसदी होणार नाही कारण या रस्त्याला रुक्मिणीच्या केसांचा सुगंध आहे जो भक्तांच्या भक्तीने भरून पावला आहे.

 ______________________________________

#ओवी_गाथा - २

बाप माझा वड, आई माझी फुलजाई
काय सांगू बाई, दोघांच्याही वेडजाई..


कोणत्याही स्त्रीला आपल्या माहेरबद्दल विचारले की अभिमानाने आणि मायेने तिचा ऊर भरून येतो. या ओवीतल्या स्त्रीला जेंव्हा तिच्या माहेरच्या माणसांविषयी विचारलं गेलं तेंव्हा तिचं आनंदाचं झाड झालं. मग तिने उत्तरही तिच्या मूडला सांजेसंच दिलं. ती म्हणते माझे वडील एखाद्या विशालकाय वटवृक्षासारखे आहेत जो स्वतः ऊन वारा पाऊस झेलत सदोदित सावली देत असतो. जो अस्मानी वाढून सुद्धा पारंब्याच्या रूपाने मातीच्या दिशेनेही वाढत असतो. तर आई मात्र जाईच्या फुलासारखी मोहक आणि नाजूक आहे. जाईच्या मंडपात जो सुगंध दरवळ आणि जी लीनता आहे ती आईच्या अंगीही आहे असे ती सुचवते. या दोघांच्याही आम्ही वेडजाई आहोत असं ती आनंदाने सांगते. 
________________________________________ 

#ओवी_गाथा - ३

"वाटंवरची बाभूळ तिला लांबलांब शेंगा,
निसंगली नार तिला उमजुन सांगा.. "

निसंग होणे म्हणजे सर्व नाती गाती सोडून एकट्याने जगणं. एखाद्या स्त्रीचा पती मरण पावला वा एखाद्या मुलीचा बाप तिला सोडून गेला वा भाऊबंद तिला एकाकी टाकून गेले तर तिला कुणी वाली उरत नाही असं चित्र ग्रामीण भागात आजही दिसतं. मग अशी स्त्री एकाकी जीवन जगू लागते. त्यातून तिच्या मनात नात्यांच्या बद्दल अढी तयार होते. ती जगालाही जुमानत नाही, प्रसंगी तिचं मन बंड करून उठतं. बहुतांशी ती एकांतवासाचे जिणं जगू लागते. यामुळे तिच्यावर इतर लोकांची वाईट नजर पडू शकते. त्यामुळे आजही ग्रामीण भागात स्त्रीला एकटं राहू दिलं जात नाही. बाईने एकटीने राहू नये तिला कुणाचा तरी संग हा असावाच जो तिला जगण्याचा आधार देऊ शकतो ही या मागची ढोबळ भूमिका. 

जात्यावरच्या ओव्यात लाखो रचना आढळतात त्यात याविषयीचं खूप काही हाती लागतं. या ओवीतली रचना हाच भाव स्पष्ट करते. यातली स्त्रीसाठी वापरलेली उपमा मात्र तोंडात बोट घालायला लावणारी आहे. आडवाटेलाच बाभळी असतात गावाच्या माथ्यावर वा भाळावर त्या उगवत नसतात. बाभळीचा काटा म्हणजे खोलवर सल देणारा. हा सल अनेक दिवस टिकून राहतो. त्याच्या वेदना कधी कधी बराच काळ राहतात. याच बाभळीला लांबलांब शेंगा असतात ज्या तिच्या मायेचं प्रतिक आहेत. या शेंगांनी लगडलेल्या फांद्या मातीकडं झुकू लागतात. शेळ्या मेंढरं उड्या मारून मारून त्यांचा फडशा पाडतात अन ऊन डोईवर आल्यावर बाभळीच्या कमअस्सल सावलीत बांधावर सुस्त बसून राहतात. निसंग स्त्रीचं असंच होतं, तिच्या आडवाटेनं (एकट्यानं) राहताना तिचं रक्षण कुणी करू शकत नाही (अगदी तिचे काटे सुद्धा) मात्र तिला असणाऱ्या लांबलांब शेंगावर तुटून पडायला दूरवरून जित्राबं येतील. यात तिचं नुकसान होईल, इच्छा असूनही कुणी तिची मदत करू शकणार नाही. म्हणून जात्यावर दळणारी माही भईन म्हणते - "वाटंवरची बाभूळ तिला लांबलांब शेंगा, निसंगली नार तिला उमजुन सांगा...."


आता काळ बदललेला आहे आता जातीही राहिली नाहीत अन स्त्रियांना जसं पूर्वी अबला समजलं जायचं तसंही आता काही उरलेलं नाही. कुठल्याही शाळेत न गेलेल्या अशिक्षित स्त्रियांच्या या सहजसुलभ ओघवत्या रचना मात्र कमालीच्या गोड आणि आशयघन होत्या हे नक्की....

________________________________________

#ओवी_गाथा - ४

"माया आई वानी न्हाई कोणत्या गं गोताला
जणू जिरुन गेलं तूप साळीच्या गं भाताला !"

गावाकडं आजी जात्यावर पीठ दळताना अनेक ओव्या गायची. त्यात एक विषय दिलेला असायचा, त्यावरून सुरुवात करत तिच्या सूना जात्याचा दांडा या हातातून त्या हातात देताना त्याची पुढची कडी गायच्या. हे काव्य उस्फुर्त होते, त्यात नैसर्गिकता होती, माया होती, प्रेम होते. अंतःकरणापासूनची आपुलकी होती.
आईच्या मायेबद्दलची ही ओवी अगदी साधीसोपी आहे पण तिचा अर्थ विशाल आहे, त्यातली आर्तता अथांग आहे.


आई सारखी माया अन्य कोणत्या नात्यात नसते. 'आईचं जगणं कसं होतं' हे सांगताना दळणारी माय माऊली म्हणते, 'पोराबाळांच्या संसारात ती स्वतःला अशी काही विरघळवून टाकते की एक स्त्री म्हणून तिचं वेगळं अस्तित्वच जणू लोप पावते.'
या अर्थाचे अत्यंत सुंदर रूपक ओवीत वापरलेय. मायचं जगणं कसं होतं तर जणू भातात ओतलेलं तूप त्या साळीत जिरून जातं आणि त्याचं अस्तित्व लोप पावतं...

आई सारखी माया कोणत्या गोताला नाही हे त्रिकालाबाधित सत्य एका साध्या ओवीतून रोजच्या जगण्यातील सामान्य उदाहरणातून सांगणाऱ्या माझ्या माय माऊल्या खरंच तितक्याच धन्य होत्या जितकी मला जन्म देणारी माऊली धन्य होती....
________________________________________


#ओवी_गाथा - ५ 

सोन्याची तुळस, मोत्याची मंजुळा
सरताच दिस, दिवा लागतो देवळा.

यातील 'देवळा' हा शब्द देऊळ अशा अर्थाचा नसून गावातल्या पूर्वीच्या घरी दाराबाहेरील बाजूस भिंतीत देवळ्या होत्या, घरातल्या प्रत्येक खोलीतही एकेक देवळी होती. सर्वात छोटी देवळी तुळशीच्या वृंदावनात होती आणि अजूनही आहे. सांज झाली की सगळा आसमंत पिवळसर तांबडा होऊन गेलेला असे आणि घरातल्या देवघरातला दिवा लागताना तुळशी वृंदावनातल्या देवळीत लखलखता दिवा लागे. मग त्या तुळशीचा आणि तिच्या मंजुळांचा थाट नेमका कसा असेल ? तर तो सोन्याची तुळस आणि मोत्याची मंजुळा असाच होता. शब्दांच्या मोहक रचनेमुळे दोन ओळीत एक देखणा भावार्थ व्यक्त करणारी ही ओवी एखाद्या कवितेहून अधिक बोलकी आणि जवळची वाटते.....
________________________________________

#ओवी_गाथा - ६

"चंदन चंदन सहाण बाईला झटतो
अुटया लेणारा नटतो."

चंदन सातत्याने सहाणेवर घासले जाते, त्याला झिजवले जाते, त्यातून उटी तयार केली जाते. याचे रंगतदार वर्णन अनेक ठिकाणी मोठ्या चवीने केले जाते. चंदनाचा मोठेपणा सांगितला जातो. पण सहाणेचं काय ? सहाणसुद्धा झिजतेच की ! पण तिची दखल घेतली जात नाही. उलट सहाण बोटाने पुसून साफ सुफ करून पुन्हा नव्या उटीसाठी तयार करून घेतली जाते, पण तिचे साधे ऋणदेखील कोणी मानत नाही. उलट त्या सहाणेवरून घेतलेली उटी इतरेजणांपैकीच दुसराच कुणी तरी उपटसुंभ आपल्या भाळी लावतो आणि ऐट मिरवत फिरतो. चंदनाचे कौतुक होते, मिरवणारा मिरवून घेतो पण सहाण मात्र कोनाडयातच पडून राहते. चंदन (पुरुष), सहाण (स्त्री) आणि इतरेजन (समाज) अशी मार्मिक रूपके वापरून ओंवीला समृद्ध केलं आहे. इथे दोन ओळीत मोठा अर्थ व्यक्त झालाय. याचं श्रेय माझ्या गावाकडच्या अशिक्षित पण संवेदनशील मनाच्या माताभगिनींना जाते. ज्यांनी अगदी ओघवत्या शब्दात या ओव्या रचल्या, गायिल्या आणि आपल्या मनातलं आभाळ अगदी अल्वारपणे रितं केलं...मी फक्त मांडलंय ... मराठीत चांगलं उरलंच नाही अशी एक कोल्हेकुई आजकाल सातत्याने ऐकायला मिळते त्यांनी या ओव्या जरी ऐकल्या, वाचल्या तरी त्यांचा दृष्टीकोन बदलू शकतो.
________________________________________

#ओवी_गाथा - ७

"बाप म्हणे, लेकी माझ्या आंजूळ मंजूळ
आधी भरील वंजूळ, मग टाकील तांदूळ !"

प्रत्येक पित्यास वाटत असते की त्याच्या मुली मंजुळेसारख्या पवित्र आहेत. त्या जशा जीवाला जीव लावणा-या अन जीवाला ओढ लावणा-या (अंजुळ) आहेत तशाच मंजूळही आहेत. त्यांच्या गुणांचे वर्णन करायला शब्द कमी पडावेत इतक्या त्या गुणी आहेत असं त्याला वाटत असते, मुली म्हणजे बापाचं काळीजच जणू. आपलं काळीज काढून तो दुसऱ्याच्या हातात सोपवतो. याचं त्याला अपार दुःख होत असणार. कोणत्याही पित्याला वाटत असतं की आपल्या लेकीबाळींचे हात पिवळे व्हावेत, त्यांच्या लग्नाचा मांडव दारी उभा राहावा. जेंव्हा हे स्वप्न प्रत्यक्षात उतरते, तेंव्हा मात्र हा वधूपिता घायाळ हरिणीसारखा कासावीस होतो. लग्नाची घटिका समीप येऊ लागते आणि याच्या जीवाची घालमेल सुरु होते. अंतरपाट धरला जातो आणि याच्या डोळ्यातून धारा वाहू लागतात. अशा वेळी मग त्याच्या शेजारी उभा असलेला त्याचा जिवाभावाचा सोयरा त्याला तांब्याभर पाणी आणून देतो. आपले ओलेते डोळे लपवण्यासाठी तो तोंड धुतो, डोळ्यावर पाण्याचे सपकारे मारतो. आपल्या दुःखाची ओंजळ आधी भरुन घेतो मग ओल्या चेह-याने अन मोठ्या जड हाताने लग्नाच्या अक्षता तो मुलीवर आणि जावयावर टाकतो. लग्न लागते. जेवणावळी होतात आणि मुलगी निघायची वेळ झाली की त्याच्या अश्रुचे बांध फुटतात...


शहरी जीवनात हे चित्र थोडंसं धूसर होत चाललेय पण गावाकडच्या मातीत लग्नं अशीच होतात आणि तिथला बाप अजूनही असाच टाहो फोडतो. आपल्या अंजुळ मंजुळ पोरींसाठी तो जलमभर झटतो.

पोराचे लग्न होऊन गेलं आणि त्याचा संसार मार्गी लागला की तिथले त्याचे लक्ष कमी होते पण आपली पोर जिथे असेल तिथे त्याचे मन झेप घेतेच ... 'घार उडते आकाशी तिचे लक्ष पिलापाशी' असंच बापाचे आणि लेकीचे नातं असतं.

माझ्या गावाकडच्या जात्यावरच्या ओव्यातली ही एक सुरेख ओवी लक्षात आहे, ज्यात बापलेकीचे भावबंध अवघ्या दोन ओळीत चितारले आहेत...
________________________________________

#ओवी_गाथा - ८

"लेक अखितीला घरा आली, मायबापाला भेटाया.
हरीण गळ्याची सुटंना, पाणी डोळ्याचं थांबेना..."

आजही अक्षय तृतीयेच्या दिवशी गावाकडे बहिणीबाळी आपल्या मायबापाच्या, भावाच्या घरी येतात. तिच्या लग्नाला नुकतेच काही महिने झालेले असतील अन माहेरवाशीणीचं सुख अगदीच जेमतेम वाटयाला आलेले असेल तर या छोट्याशा सणाचं (अखितीचं) निमित्त होतं आणि तिचे चित्तपाखरू उड्या मारू लागते. केंव्हा एकदा घरी जाईन असं तिला होऊन जातं. मग अंगाची काहिली करणा-या उन्हात खड्डयाखुड्डयाच्या रस्त्यावरून एसटीचा धडाडणारा प्रवास करून ती गावाकडे येते. तिचा ल्हाना भाऊ तिला न्यायला हमरस्त्यावर आलेला असतो. भावासोबत घरी जातानाची दहा मिनिटेदेखील तिला सालागणिक वाटतात. घर येऊपर्यंत भावाकडून घरादाराची अन गावातील गावकीची सगळी माहिती ती पांदीतल्या रस्त्यावरून जाताना अधाशारखी कानात जीव आणून ऐकत राहते. तृप्त होते. अखेर एकदाचे घर येते. ती गाडीवरून उतरून अक्षरशः धावतच घरात शिरते. आत जाताना उंब-याला ठेचकाळते. अन सुरकुतलेल्या चेहरयाच्या आईच्या गळ्यात पडते. तिला करकचून मिठी मारते. आईचा खांदा अश्रूंनी चिंब होतो तरी तिची हरीण मिठी सुटता सुटत नाही... बाजूला उभे असलेले केसाची चांदी झालेले वडील तिच्याकडे बघत हळूच नकळत धोतराच्या सोग्याने डोळे पुसून घेतात. ल्हाना भाऊ तिच्या साडीच्या नीरयांना धरून स्तब्ध उभा असतो...

अक्षय तृतीयेचे अनेक अर्थ असतील पण माझ्या लेखी या सणाचे महत्व नव्या माहेरवाशिणीच्या अश्रुंसारखे आहे, माहेरच्या आठवणींसरशी टचकन डोळ्यात येणारं पण (सासरच्या जोखडापायी) गालावरही न ओघळता डोळ्यातच विरघळून जाणारं असं !

हरीणमिठी म्हणजे काय ? जेंव्हा एखादे पाडस घायाळ होते आणि त्याची आई हरिणी तिच्याजवळ असेल तर ते पाडस पायाची फतकल मारते. हरिणी तिच्याजवळ येते. आपले मागचे पाय दूर सारून त्या पाडसाला पोटाशी आवळून राहते. एकतर ते पाडस शांत तरी होते किंवा त्याचा जीव निमून जातो. पण ती हरीणमिठी काही केल्या सुटत नाही ...
________________________________________

#ओवी_गाथा - ९

गया परीगा ग केली, बया काशी खंड खरी
माय गाव वारुळाचं तीर्थ, तळीयाचं भारी !!

प्रयागचं तीर्थ केलं, त्रिवेणीसंगम झाला. काशी झाली, गंगेचं दर्शन झालं. भूमीखंडावरचे सर्व तीर्थ झाले. पण समाधान काही म्हणून मिळाले नाही !!

खरी तृप्ती आईच्या चरणी डोकं टेकवून मिळाली. आई म्हणजे वारूळ ज्यात अख्खं गाव वासेलेलं असतं. माय वारुळागत देहाला छिद्र पाडून पोरंबाळ जन्मास घालते, वारुळाने जीव जतन करावेत तसं चिल्यापिल्यांना अंगाखांद्यावर खेळवते. उन्हपाऊस अंगावर झेलून मातीच्या आत पोरंबाळं जपते. स्वतःला जमिनीत गाडून घेते पण पाण्याची,सावलीची बेगमी करून ठेवते. इतर कुठल्या तीर्थात हे गुण अनुभवास येत नाहीत. म्हणून मायचं तीर्थ हेच खरं तीर्थ होय. माय म्हणजेच देव आणि माय म्हणजेच काशी !!
________________________________________

#ओवी_गाथा - १०

"संगत करं नारी दुरल्या देशीच्या पकशा
खडीच्या चोळीवर त्याच्या नावाचा नकशा."

एखाद्या स्त्रीने गावाबाहेरील वा बिरादरीबाहेरील परपुरुषाशी सूत जुळवले तर ते संबंध लपून राहत नाहीत. त्या 'दूर देशाच्या पक्षाचं' नाव गाव तिच्या मनावर कोरलं गेल्याने तिच्या चोळीत देखील त्याचं प्रतिबिंब उमटते. तिचं न्हाण झाल्यावर खडीवर वाळत घातलेल्या तिच्या चोळीवर त्याच्या नावाचा नकाशाच पाहायला मिळतो !!
________________________________________

#ओवी_गाथा - ११

"गुणाच्या माणसा गुण केलेस माहेरी
धन्याची कोथिंबीर वास मळ्याच्या बाहेरी."

रानात धने पेरले तर त्याची कोथिंबीरच उगवते. रानात उगवलेली कोथिंबीर कितीही झाकून पाकून ठेवली तरी तिचा वास दूरवर जातो आणि माणूस लांबूनच ओळखतो की मळ्यात धनं पेरलंय. त्यासाठी कुणाच्या कानात सांगावं लागत नाही ते कळतंच. तसेच एखाद्या स्त्रीचे / पुरुषाचे लग्नाआधी काही गुण उधळून झाले असले तरी ते उघड होतातच. त्याचा दरवळ कधी ना कधी होतोच ...
________________________________________

#ओवी_गाथा - १२

"ऊठवळ नार बसती इथतिथ
भरताराला पुस आपल्या भोजनाच कसं"

संसारात नीट लक्ष नसणारी केवळ नट्ट्यापट्ट्यावर ध्यान असणारी स्त्री 'उठवळ बाई' म्हणून ओळखली जाते. ही उठवळ बाई आपलं घरदार सोडून जगाची दारं पिटत बसते. त्यातून वेळ मिळाल्यावर घरी येथे आणि उपाशी बसलेल्या आपल्या नावऱ्यालाच विचारते की आता जेवणाचं काय / कसं करायचं ?
________________________________________

#ओवी_गाथा - १३

"पिकली पंढरी पंढरी, दिसते लई हिरवीगार
देवा इठ्ठालाच्या तुळशीला, सदाचाच बहर ....."
________________________________________

#ओवी_गाथा - १४

रुक्मिणीची चोळी, अभंगाने भरली दाट
देवा विठ्ठलाला जवा, लाविला हरिपाठ..
________________________________________

#ओवी_गाथा - १५

इंद्रायणीचा देवमासा, देहूला रे आला कसा
जात नव्हती माशाला, होता भक्तीचा वसा.
________________________________________

#ओवी_गाथा - १६

कुणबी निघालं शाहू, मला वांग्याचा तोडा
थोरलं माझं घर, मला येईना एक येढा,
काहूर नाही तरी, मनी आनंदाचा ओढा !

दैवाने काहीही सांगितले असले तरी माझे पती हे कुणबी निघाले. थोडक्यात माझ्या नशिबी कष्टच आलॆ. अशा वेळी धनी तरी काय करणार ? कधी चुकून दागिने मागितले तर जास्तीत जास्त तो वांग्याचा तोडा देईल. माझा पती घरातला सर्वात थोरला आहे म्हणून की काय त्याच्या वाट्याला कष्ट जास्ती आले आहेत, आम्ही नुसतेच श्रम करतो आहोत. अन आजतागायत त्याने मला सोन्याचा एक वेढा (सर) देखील दिलेला नाही. पण म्हणून काय मी नाखूष नाही, मी माझ्या संसारात सुखी आहे.
________________________________________
"लई चांगुलपण घेते पदराच्या आड
बाळायाची माझ्या सूर्यावाणी परभा पडं..'

माझे बाळ खूप लोभस आहे, खूप देखणे आहे. त्याचबरोबर त्याच्या अंगी खूप सद्गुण आहेत. पण कधीकधी अति देखणं असणं किंवा चांगलं असणं अंगाशी येऊ शकतं म्हणून त्याला लोकांपासून वाचवण्यासाठी मी त्याला पदराआड घेते. पदराआड घेतले की तो छातीला बिलगून शांतपणे झोपी जातो. त्याला पदराआड ठेवल्याचे कुणाला कळलेही नसते पण तसे होत नाही. कारण माझ्या बाळाचं तेज इतकं आहे की त्याची प्रभा पदराआडून बाहेर येते आणि माझ्या सर्वांगावर विलसते ....

________________________________________


#ओवी_गाथा - १८

बाळाला म्हण बाळ बाळ दिसत बेगड

सांगते बाई तुला फुटली अंगणी दगड

काही बायका माझ्या बाळाच्या देखणेपणावर मत्सर भाव मनात राखून टोमणे मारतात. खरे तर त्यांना माझ्या बाळाचा चांगुलपणा, त्याचं कमालीचं सुंदर रुपडं सहन होत नसतं. त्या उद्विग्नतेतून त्या काहीबाही बोलत राहतात. मग एखादी माझ्या बाळाला बेगड (खोटं नाटं सौंदर्य) म्हणतात. पण काय सांगू तुम्हाला, तिने असं टोचून बोललेलं देवालाच सहन होत नाही. तिच्या बोलण्यावर तो नाराजी दाखवतो आणि तिचे बोलणे पूर्ण होते नाही होते तोवर अंगणातला मोठाला आपसूक दगड फुटतो. जणू काही तो तिला सांगतो की, 'बये, तोंड आवर, बाळाला नावं ठिवू नकासा'....
________________________________________

#ओवी_गाथा - १९

काजवे फुलले फुलले बाई लाख लाखाचं
सांगते बाई बाळायाच माझ्या मुख राजसाचं

माझ्या बाळाचे तेज कसे आहे म्हणून सांगू तुम्हाला ? त्याचा प्रकाश माझ्या मुखी पडतो हे तर मी सांगितलेच आहे. पण जगाला कसं सांगू की नेमका प्रकाश आहे तरी किती आणि कसा ? तर, सांगतेच. ऐका, माझ्या बाळाचा मुखडा खूप लोभस आहे. तो राजस आहे. त्याच्या तेजाची तुलना करायची झाली तर अंगणी लाख लाख काजवे प्रकाशमान झाल्यावर जितका उजेड पडेल तितकी आभा त्याच्या चेहऱ्याची आहे. मग माझे बाळ किती तेजस्वी आहे याचा तुम्हीच अंदाज घाला ...
________________________________________

#ओवी_गाथा - २०
कावळ्यानी केलं कोट बाभळीच्या खोडी, 
अस्तुरी जात येडी माया पुरुषाला थोडी !

कावळे नेहमी फांद्यांवर घरटी करत असतात, पण क्वचित प्रसंगी पानं झडलेल्या बाभळीच्या खोडात ते भक्कम घरटं (कोट = किल्ला = भक्कम घर) उभं करतात. या बाभळीच्या घरटयात कोकिळा येते आणि तिची अंडी घालते, त्या अंड्यात कावळ्याचेही अंडे असते !
फांद्या झडल्या तरी ते घरटे कावळ्यांच्या मायेची निशाणी म्हणून तसेच राहते. विशेष म्हणजे कावळ्याच्या अंडयासही कोकिळा मायेची उब देते. 
ते पिलू जन्मल्यावर पुन्हा कावळ्याच्या घरटयापर्यंत कसे येते हा रंगतदार प्रवास आहे. पण कोकिळा असो की कावळा त्या पिलांना जीव लावतात.


स्त्रीचेही तसेच असते, आपल्या पोटी जन्माला आलेलं अपत्य असो वा दुस-या कोणाचं अपत्य असो, ती दोहोंना माया लावते. म्हणून अस्तुरीचे (स्त्रीचे) जातकुळ (जडणघडण या अर्थाने) मायेचे आहे. पुरुष मात्र अशी माया करू शकत नाही ! दोन ओळींच्या एका साध्या ओवीत दडलेला हा अर्थ खोलवर प्रभाव करून जातो ....

________________________________________

#ओवी_गाथा - २१

बाईचा जलम नको देऊ देवराया
रस्त्यानी चालता निंदा करीती आईबाया

वरवर पाहता ही ओवी अगदी सर्वसामान्य वाटते. कुणा एका स्त्रीची एक कैफियत इतकंच तिचं स्वरूप समोर येतं. पण आशयचित्र असं नाहीये. जात्यावर ओव्या म्हणताना एकामागून एक विषयावर एक सलग ओव्या त्या मायबहिणी गात असतात. भक्तीपासून संसारापर्यंतचे विषय येऊन जातात आणि जेंव्हा स्त्रीच्या व्यथांचा विषय येतो तेंव्हा प्रत्येक जण ओवीमधून आपलं मत मांडू लागते. पण यातलीच एक चतुर असते, ती नकळत सर्व स्त्रियांनाच टोमणे मारते. ती म्हणते बाईचा जन्म देऊ नकोस. आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष ? हे मागणं आजकाल केवळ ग्रामीण स्त्रियांच्याच तोंडी आढळतं असं काही नाही, तर अनेक शहरी स्त्रियांच्या तोंडून देखील हे वाक्य ऐकायला येते. या ओवीतली खरी गंमत पुढच्या पंक्तीत आहे. ती म्हणते, बाईचा जन्म का नको तर रस्त्याने चालताना आईबायाच एकमेकीची निंदा करतात. पुरुषांनी बाईची निंदा करायची गरजच पडत नाही स्त्रियांची इतकी निंदा स्त्रियाच करत असतात. मग त्यात जन्मदात्री आई देखील इतर उठवळ स्त्रियांच्या सोबत असते ! आई आणि बाया हे शब्द एकत्र जोडून विलक्षण अर्थ साधला आहे, केवळ यमक जुळवणे इतकेच या ओवीचे कसब नसून स्त्रीमनाची यथार्थ खंत व्यक्त करणे हा देखील हेतू आहे... कुठलंही शिक्षण न घेतलेल्या गतकाळातल्या माझ्या मायबहिणी खरोखरच प्रतिभाशाली आणि विचारी होत्या... 

_______________________________________


निळ्या सावळ्या आभाळाची मिठी सैल झाली
काळ्या मातीच्या ऐन्यात कंच शेतं अंकुरली
कुण्या पुण्याईने कुणब्याच्या पोटी जन्म उद्धारली
ओवी मातीत जन्मलेली ओठी मेघांच्या बहरली
कोण कौतिक हिरवाईचे शब्दे कविता पाझरली
हात राबता रानामध्ये सारी सृष्टी की तरारली
नाचे पानोपानी श्रीरंग घुमे रानोमाळी बासरी
पिके मोत्याचे शिवार वारा गाई त्याची गाणी
झुले गंधवेडया सावलीत बांधावरची बाभूळराणी
येता उधाण धरतीला थिटे पडती हात दोन्ही !


________________________________________

#ओवी_गाथा - २२
आली आगोटी रेटूनी घेते अधुली हातात
डेाई बियाची पाटी मैना जाती शेतात

मनासारखा पाऊस सगळीकडे झाला की बळीराजा पेरणीच्या कामांची घाई करतो. त्याची कारभारीण देखील त्याच्या हातात हात घालते. बळीराजा रामप्रहरीच उठून रानात जातो, त्याच्या मागोमाग त्याची कारभारीण देखील बेगीनं घरातली कामं आवरून जाते. घरातली कामं वेळेत पुरी करण्यासाठी ती दोघं लवकर उठलेली असतात. सकाळीच तिचा स्वयंपाक आटोपलेला असतो. मुलांच्या आंघोळी पांघोळी उरकून ती एका फडक्यात भाकरी गुंडाळून घेते, चुलीला नमस्कार करून तिच्या पोटातली आगटी आत सारते, समोर साठलेल्या राखेला मागे सारून त्यावर थोडं पाणी शिंपडते. स्वतःचं आवरून घेते आणि कोनाड्यात ठेवलेली अधुली (शेर, पायलीसारखे माप) हातात घेते. शेजाऱ्याला घराकडे लक्ष द्यायला सांगून डोक्यावर उतळी घेऊन ती शेताकडे झपाझप पावले टाकू लागते. तिच्या डोक्यावरच्या उतळीत (दुरडी / पाटी) पेरणीचं बियाणं आणि दुपारसाठीची भाकरी असते. वाटंनं येणाऱ्या जाणाऱ्याकडे न बघता ती तडक शेत गाठते आणि कारभाऱ्याला कामात मदत करू लागते. 
पावसानंतर पेरणीची लगबग सुरु होताच पूर्वी खेडोपाडी हे चित्र ठरलेले असे. आता काळ पुष्कळ बदललाय पण सुविधा आल्यात, शेतीची पद्धतही बदललीय पण त्या काळात जी अवीट गोडी होती ती या शेतीतही नाही, पिकातही नाही, गावकुसात नाही आणि आताच्या माणसांत तर नाहीच नाही. जात्यावरच्या या ओव्यातून गतकालीन स्मृतींना पुन्हा पुन्हा जगता येतं हे ही काही कमी सुख नाही ! होय ना ?
_______________________________________                                       
( मागील दोन वर्षात #_ओवीगाथा या tag मधून अनेक जुन्या ओव्या आणि त्यांचे अर्थ लिहून झालेत. याचे पुस्तक काढावे का, याचे पुस्तकरूप कुणी प्रकाशित करेल का आणि मुख्य म्हणजे या पुस्तकाचे वाचन होईल का या प्रश्नांवर थोडासा गोंधळून गेलोय. आजवर इतकं विविध लिहून झालंय पण पुस्तक काढणे यावर गांभीर्याने विचार केलेला नाही. आता विचार करतोय तर अनेक विषय आणि त्यानुरूप केलेलं लेखन एकदमच समोर येऊन उभं ठाकतंय. गावाकडच्या जात्यावरच्या ओव्या जात्या पाठोपाठ कालबाह्य झाल्या पण त्यातला अर्थ आणि गोडवा कधीच कालबाह्य न होणारा आहे. यामुळे या दुर्लक्षित विषयावरही बऱ्यापैकी लिहून झालंय. ही शब्दशिदोरी पुढे कशी पोहोचवायची याचे नेमके उत्तर मात्र माझ्याकडे नाही.)