मंगळवार, ५ जून, २०१८

जुना पाऊस..


प्रत्येक पावसाळा तिची आठवण घेऊन येतोच.  
खिडकीतून दिसणारया शाममेघांत तिचा भास  होतोच......
"भिजलेली ती आणि तिला भिजवण्यात आनंद मानणारा रमत गमत पडणारा पाऊस. 
रुणझुणत्या पावसात छोट्याशा हातगाड्यावर सुगंधी चॉकलेटी वाफाळता चहा
पिताना तिच्या किनकिणाऱ्या बांगड्या, तिनें मान डोलवली की हेलकावे खाणाऱ्या इअररिंग्ज.
ओलेते कपडे नीटनेटके करताना कपाळावर पुढे येणाऱ्या कातिल बटा.
 
गालावरून ओघळून मानेवर रूळताना लाजून चूर झालेले पाऊसथेंब.
ओठाच्या नरम गुलाबी पाकळ्यांवर दवबिंदुंगत चमकत असलेले आपल्याच मस्तीत चूर असलेले जलबिंदू.    
तिच्या पापण्यात जीव रुतून बसलेले काही हट्टी थेंब आणि 
तिच्या कोरीव धनुष्याकृती भुवयांखालचे काळजावर घाव करणारे मासुळी पाणीदार डोळे. 
तलम रेशमी गळ्यातली ओली झालेला लालधवल मोत्यांची माळ, 
नाजूक मनगटावरच्या नाजूक घड्याळाची धूसर काच पुसताना न थांबणारा काळ. 
केसांत जागोजागी खिळून असलेले मोत्यासम चकाकणारे थेंब.    
हातातल्या शबनम बॅगेवरून उगाच हात फिरवताना चोरट्या नजरेने माझ्याकडे पाहणारी ती आणि तिच्याकडे चोरून पाहणारा मी. 
जोराच्या पावसाने उलटलेल्या छत्रीच्या काड्या सरळ करताना माझ्याकडे पाहत खळाळून हसणारी ती आणि 
निसरड्या रस्त्यावरून तिचा पाय घसरताना नकळत तिला हात देणारा मी. 
सहजच हात पकडणारी ती आणि नंतर बावरून जात सावध होणारी ती. 
तिला पावसात काही तरी गरमागरम खाऊ घालायची मनीषा मनी असणारा मी आणि 
माझ्या रित्या खिशाचा अंदाज राखत उपवासाचा बहाणा करणारी ती. 
पावसाचा आडोसा म्हणून बसस्टॉपवर तिच्या शेजारी उभं असताना खुणावणारी तिच्या पाठीवरून रुळणारी वेणीची काळीभोर नागीण,
मुलायम पाठीला रिझवणारा मखमली रेशीमगोंडा ! 
मृदगंधासही ज्याने कैफ चढावा असा तिचा नशीला देहगंध.     
रिमझिम पावसात झालेले तिचे अर्धेअधुरे तरेही खूपसे गहिरे स्पर्श आणि त्याने उठलेले शहारे. 
हा पाऊस कधीच थांबू नये असं मनोमन वाटत असलेला मी आणि माझी मनोकामना पुरी व्हावी अशी मनीषा असणारी ती. 
मात्र तो जुलमी पाऊस स्वतःचं मन भरलं की हळूच थांबायचा आणि मग घराकडे निघताना ती सायोनारा करण्यासाठी हात डोलावायची, 
लगबगीने पुढे जाताना रस्त्याच्या कोपऱ्यावर मागे वळून बघणारी ती आणि तेंव्हा तिच्या डोळ्यातल्या पावसाच्या पाण्यातूनही अश्रूंना वेगळा ओळखणारा मी... "

हरेक सालच्या मोसमात तिचे पाणीदार डोळे आठवतात आणि माझ्या डोळ्यातून तो जुनाच बेभान पाऊस पुन्हा नव्याने आस्ते कदम वाहू लागतो... 
हा जुना पाऊस वाट्यास आला नसता तर आयुष्याच्या इंद्रधनुष्यात एक रंग फिकाच राहिला असता, 
त्याला पूर्णत्व आलंच नसतं... 

- समीर गायकवाड.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा