मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१८

#रेड लाईट डायरीज - मुन्नीबाई ...


अशीच एक दास्तान मुन्नीबाईची आहे. ती मराठवाडयातल्या नांदेडची. बाप लहानपणीच मेलेला. पाच भावंडे घरात. चुलत्याने आईला मदत केली पण रखेलीसारखं वागवलं. चार पोरी आणि एक अधू अपंग मुल यांच्याकडे बघत ती निमूट सहन करत गेली. माहेरची परिस्थिती इतकी बिकट की तेच अन्नाला महाग होते. मग ही पाच तोंडे घेऊन तिकडे जायचे तरी कसे. त्यापेक्षा मिळेल ते काम करत देहाशी तडजोड करत मुली मोठ्या होण्याची वाट बघण्यापलीकडे तिच्या हातात काहीच नव्हते. एकदा चुलत्याने आईपाठोपाठ मुलीवरही हात ठेवला.

ती अजून न्हाती धुती देखील झाली नव्हती. घाबरलेल्या आईने त्याला हाकलून दिले. पण हे मरणच होते केंव्हा न केंव्हा येणारच होते. मग मुन्नीनेच यातून मार्ग काढला. ती घर सोडून पळून आली. तिने मुंबई गाठली. मुंबईने तिला धंद्याला लावले.

बाराव्या वर्षी लाईनमध्ये आलेल्या मुन्नीला कधीही घरी परत जावे असे वाटले नाही. आईची आठवण आली की तोंडात चादरीचा बोळा कोंबून रडायची. पोटभर दारू प्यायची. मनात आलं तर घरच्या पत्त्यावर पैसे पाठवायची नाहीतर महिनाभराची कमाई अक्षरशः फुकून टाकायची.

कसलंच सत्व तिच्या जीवनात नव्हतं, ना कुठली इच्छा न कुठली दिशा. तिला जीव लावणाराही कुणी कधी भेटला नाही की कधी तिला हळुवार कुरवाळणाराही कधी लाभला नाही. ती सदैव आसुसलेलीच राहिली. ती इतकी निर्ढावली होती की बऱ्याच वेळा विवस्त्र होऊन बसायची. तिच्या या वागण्यामुळे ती चेष्टेचा विषयही झाली होती.

सिगारेटचे चटके दिले तरी हसणारी मुन्नी जर कधी बेफाम झाली तर समोरच्या व्यक्तीचं काहीच खरं नसे. मग ती कुणाच्याच आवाक्यात नसे. नंतर नंतर तिने गावठी दारू प्यायला सुरुवात केलेली. तिचं तारुण्य संपलं, तिच्यातली मजा संपली. गात्रं ढिली झाली. स्तन ओघळून गेले, गालाची खपडे झाली, अंगावरची कातडी लोंबू लागली. मग गर्दुल्ले, भिकारी, साफसफाईवाले तिला मावा गुटख्याच्या मोबदल्यात भोगू लागले. कुणी क्वार्टर आणून दिली तर ती त्याच्यासाठी काहीही करण्यास तयार होई.
अन्नाच्या चार घासास मौताज झालेल्या मुन्नीला आईने घास भरवल्याचं स्वप्न एकदा पडलं आणि शेजारच्या अड्ड्यातल्या सलिमाच्या तान्हुल्या पोरीस तिने रात्रीतून आपल्या स्तनाला लावलं. त्यावेळी तिच्या छातीतून दुध आलं की नाही माहिती नाही पण तिला मोठ्या प्रमाणात अंतर्स्त्राव झाला.

मग तो त्रास कायमच होऊ लागला. एका पावसाळ्यात तिची खोली सोडून ती निघून गेली. कुठे गेली कुणाला माहित ? इथं एक बरं असतं. या रेडलाईट एरियातून कुणी निघून गेलं तर कुणीच त्याचा शोध घेत नाही. जिवंत आहे की मेली आहे याचीही कुणी वास्तपुस्त करत नाही. बाकीच्या दुनियेला तर इथल्या दुनियेशी काहीच घेणंदेणं नसतं. इथं माणसं जगतात हेच मुळात त्यांना ठाऊक नसतं, नव्हे मान्यच नसतं. त्यामुळे या अंधारलेल्या दुनियेतला एक जीव कमी झाला तर कुणाला फरक पडत नाही. तिची जागा भरायला नवी योनी हजर असते.

इथल्या देहाचे मूल्यच मुळात अवयवात होते. जीव नंतर. भावना वगैरे गैरलागू गोष्टी. जगण्याचा हक्क इत्यादी गोष्टी खिजगणतीतही नसतात. त्यामुळे मुन्नी गेली त्याचं कुणाला काही वाटलं नाही. मुळात मुन्नीचं अस्तित्व किती जणाला ज्ञात होतं हा ही एक मुद्दा आहे, ज्याचं उत्तर शून्यवत आहे.

एकदा अपघातानेच तिची माहिती मिळालेली. मिरजेतल्या रेड लाईट एरियाच्या उकिरडयानजीकचा तिचा पत्ता.
सावधपणे तिच्यापाशी गेलो. गुटख्याच्या पुडीची माळ काढून बाजूला ठेवली. ब्लेंडर्स प्राईडची बाटलीही काढली. बाटली घेताना दलाल सांगत होता, तिच्यावर इतके पैसे नका घालवू, देशी दारूतही काम होईल. मला वेडा समजून तो हसला असणार.

माझ्या हातातलं फोर स्क्वेअरचं पाकीट पाहून तिच्या चेहर्‍यावर मंद स्मित झळकलं. बऱ्याच काळानंतर ती हसली असावी. इथे येण्याआधी तिला बरेच प्रश्न विचारण्याचं निश्चित केलं होतं पण तसं घडलं नाही.
तू इथं कशी आली, कधी आली, कुणाची आहे ही खोली, केंव्हापासून इथे आहे असे अनेक प्रश्न मनातल्या मनात गिळून टाकले आणि बोटांनी खाणाखुणा करून तिला विचारलं,
"कशी आहेस ?"
अनंत पावलांचे ओझे पडल्याने छिलून गेलेल्या लाकडी उंबरठयाकडे तिने बोट दाखवलं.
काळीज लककन हललं.
त्या उंबरठयावर जितकी येजा झाली होती तितकी देहभूक तिने सोसलेली.
माझा पडलेला चेहरा पाहून तिच्या भेसूर मुखाला शोभणार नाही इतकं नाजूक हसली ती.
"कुठे होतीस इतके दिवस ?"माझा पुढचा प्रश्न.
कळकट भांड्यात ठेवलेल्या अर्धवट जळलेल्या सिगारेटच्या थोटकांच्या ढिगातून एक थोटूक उचलून तिने ओठास लावत सर्रकन काडी पेटवून शिलगावलं, धुराची वलये हवेत सोडत त्याकडे तिने अंगुलीनिर्देश केला.
त्या धुम्रवलयागत ती घुमली फिरली असावी..

तिच्या उजव्या हाताच्या अनामिकेची दोन्ही पेरं कापल्याचे स्पष्ट दिसत होते.
"परत जायचे का ?"- आणखी एक प्रश्न.
हलकेच हसत सिगारेटचा एक धगधगीत चटका तिने आपल्याच तळहाताला दिला.
"तुझी काहीच इच्छा नाही का ?" सगळेच प्रश्न तिने खुणांनी पूरे केलेले.
या प्रश्नासरशी ताकदीने हाताला खस्स्कन धरून पिचकाऱ्यांनी लालभडक झालेल्या बेसिनकडे तिने ओढत नेलं, तोंडात खरारा बोटं घातली. कितीतरी वेळा तसं केलं पण काही केल्या तिला उलटी झाली नाही !
तिच्या खरबरीत हाताचा स्पर्श खूप काही सांगून गेला. तिच्या खडबडीत बोटांची हाडे टोचली.

तिची खोलीत जाळ्या जळमटांनी भरलेली. कुबट वासाने तिथं घर केलेलं, अस्ताव्यस्त सामानाने ते गच्च भरलेलं. भिंतींच्या रंगाचे पोपडे उडालेले. आरशातला पारा उडून जावा तशी तिची खोली उजाड होऊन गेलेली.

मी गेल्यावर तिला खूप आनंद झाला होता, मागील सहा महिन्यात तिच्याकडे कुणीच आलं नव्हतं.
माझा हात खिशाकडे जाताच तिने ब्लाऊजच्या बटनांना हात लावला होता. मुळात त्याला वरची एक आणि खालची एक अर्धी तुटलेली गुंडी होती. बाकी गुंड्या तुटून गेलेल्या तिच्या आयुष्यासारख्या. ब्लाऊजच्या आतून तिच्या गोऱ्या बरगडयावर साठलेलं मळीचं किटन स्पष्ट दिसत होतं.

मी नुसताच निरीक्षण करतोय, मला ‘तसलं’ काही करायचं नाही हे लक्षात येताच आता तिचा चेहरा पडला.
सोबत नेलेली क्वार्टर, फोर स्क्वेअरचं पाकीट तिच्या हाती दिल्यावर गालावरील रेषा हलल्या.
मी पँटच्या खिशातल्या पाकीटास हात लावल्यावर तिने डोळ्यात पाणी आणलेलं, पण एकही नोट तिने घेतली नाही.
ती पुरती हतबल झाली होती पण तरीही भिकारीण झाली नव्हती.

मादीपणाचा शाप मिळालेली ती एक मुकबधिर बाई होती. होय मुकबधिरच ! तिच्यातल्या या अपंगत्वामुळेच कदाचित घर सोडून आल्यानंतरही तिचा शोध तिच्या कुटुंबीयांनी कधीच घेतला नसावा. त्यामुळेच तिच्या देहाची अकाली लक्तरे होण्याइतकी तिची धूळधाण करणं जगाला सोपं गेलं असावं.

जगातील बहुतांश सर्वांची सर्व इंद्रिये काम करतात पण तिची दोन इंद्रिये काम करत नव्हती याची भारीभरकम शिक्षा ती भोगत होती. ती म्हणजे ज्यांची जननेंद्रिये अधिक वळवळतात त्यांची भूक भागवण्याची !...
बराच वेळ तिथे बसून होतो.

तिने मन तृप्त होईपर्यंत दारू रिचवली, अधाशागत चपाती भात खाल्ला. एकापाठोपाठ एक सिगारेट भकाभका ओढून अख्खं पाकीट संपवून टाकलं. ती अधून मधून खाकरत होती, खोकत होती. ठसकत होती. मोठी उबळ आल्यावर बाजूलाच एका कपड्याच्या तुकड्यात थुंकत होती. एक भयानक दर्प तिथल्या वातावरणात का भरून होता याचे उत्तर आता मिळाले होते.

डोळ्यातलं पाणी कसोशीने लपवत तिचा निरोप घेतला. बाहेर येऊन धाय मोकलून रडावं म्हटलं तर ते शक्य नव्हतं. गल्लीच्या कडेला असलेला हापसा मारला तोंडावर पाण्याचे सपकारे मारले. किती रडलो आणि कसा रडलो कळलेच नाही. सदरा ओला झाला. बाह्या ओल्या झाल्या. पाणी भरायला आलेल्या मुलीने हात धरून बाजूला केले तेंव्हा भानावर आलो.

तिची काळजी घ्यावी म्हणून सांगलीच्या निशांत कॉलनीतल्या शासकीय रुग्णालयात नोंद दिली. तिची पुढची सगळी तजवीज झाली.
ही मुन्नीबाई डोक्यात घर करून गेली.
तिला लवकर मरण यावं म्हणून घरी परतल्यावर देवापुढे प्रार्थना केली.
देवाला पंचेद्रिये असतात का ?
असतील तर तो काहींना अशा अवस्थेत का जन्माला घालतो आणि वर त्यांच्या आयुष्याचे असे धिंडवडे का काढतो ?
या प्रश्नाचे उत्तर काही मिळाले नाही.
काही दिवसांतच निरोप आला. एका पहाटे मुन्नीबाई झोपेतच गेली होती. सुटली बिचारी.

मी पुन्हा प्रार्थना केलीय की तिला कधीही स्त्री देहाचा जन्म मिळू नये...

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा