गुरुवार, १३ एप्रिल, २०१७

द्रौपदीसी बंधू शोभे नारायण ....अत्रेंच्या कविता


सिनेमागृहातल्या पडद्यावर दृश्य दिसतेय - 'देव्हारयासमोर बसलेली तिशीतली ती प्रसन्न मुद्रेतली तेजस्वी स्त्री निरंजनासाठी, समईसाठी कापूस वळून त्याच्या नाजूक वाती तयार करत्येय. कानातली कुंडले, गळ्यात काळ्या मण्यांची सर, सैल अंबाडयात खोवलेले फुल तिच्या सध्या सोज्वळ व्यक्तिमत्वास खुलून दिसते आहे. तिच्या समोरच्या लाकडी देव्हारयातील देवांच्या मूर्तींवर पिवळसर आभा पसरलेली आहे. समईची मंद ज्योत तेवते आहे, तिचा उजेड सारया खोलीत पसरलेला आहे. तिच्या मागे असणारया भिंतीवर देखील देवांच्या तसबिरी डकवलेल्या आहेत. तिच्या शेजारी एक विधवा वृद्धा एका मुलाचे डोके मांडीवर घेऊन बसलेली आहे. काही वेळापूर्वीच तिथे भावंडांत पाय दाबण्यावरून भांडण झालेलं आहे, 'घरातली सगळी लहान सहान कामे एकानेच का करायची ? एकानेच का ऐकायचे ?" असा सवाल एका गोजिरवाण्या मुलाने केला आहे. इतक्यात आपला अभ्यास संपवलेला दुसरा एक साजिरा मुलगा त्या वृद्धेस लाडाने म्हणतो की, "ए आजी एखादं गाणं म्हण की गं !". त्यावर ती वृद्धा हसून म्हणते की, 'मी जर गाणं गायलं तर सगळी आळी गोळा होईल हो ! मग त्या सुहास्यवदनेकडे बघत ती म्हणते, "यशोदे तूच म्हण की गं गाणं !" आणि ती विचारते, "ते चिंधीचं गाणं म्हणू का ?"तो गोजिरवाणा सोडून सारे जण तिला होकार देतात आणि ती गाऊ लागते- 'द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, भरजरी गं पितांबर दिला फाडून..." आता खोलीत बसलेले सगळेच जण एका तालात हळुवार टाळी वाजवून तिला साथ देतायत...' सिनेमागृहात हे दृश्य पाहणारया सर्वांच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागलेल्या असतात. साल होते १९५३. चित्रपट होता 'शामची आई'. हे अवीट गोडीचं गाणं लिहिलं होतं आचार्य प्र.के.अत्रे यांनी !

आजही आचार्य अत्रेंचं नाव जरी उच्चारलं तरी मराठी माणसाच्या गालावर हास्याची खळी पडते इतकं अत्रे आणि विनोद यांचं नातं दृढ आहे. वास्तवात त्यांनी विविध आशयाची अन विषयाची कविता लिहिली आहे. मात्र 'किती पांडुरंगा वाहू संसाराचा भार ? लक्ष चौर्‍याऐंशींची ही नको आता येरझार...' असं सात्विक काव्य लिहिणारे अत्रे विडंबन काव्यासाठीच जास्त प्रसिद्ध झाले.

भरजरी गं, पितांबर, दिला फाडुन
द्रौपदीसी बंधु शोभे नारायण

सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहिण
विचाराया गेले नारद म्हणून
बोट श्रीहरिचे कापले ग बाई
बांधायाला चिंधी लवकर देई
सुभद्रा बोलली, “शालु नि पैठणी
फाडुन का देऊ चिंधी तुम्हास मी ?”
पाठची बहिण झाली वैरिण !

द्रौपदी बोलली, “हरिची मी कोण ?
परी मला त्याने मानिली बहीण
कळजाचि चिंधी काढून देईन
एवढे तयाचे माझ्यावरी ऋण
वसने देउन प्रभू राखी माझी लाज
चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज !”
त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून

प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
जैसि ज्याची भक्ती तैसा नारायण
रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम
पटलि पाहिजे अंतरीची खुण
धन्य तोचि भाऊ, धन्य ती बहीण
प्रिती ती खरी जी जगी लाभाविण
चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न

१९५३ मध्ये प्रदर्शित झालेल्या साने गुरुजींच्या 'शामची आई' या पुस्तकावरून याच नावाने निर्मिलेल्या चित्रपटाने समीक्षकांसह रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या गाण्यात आशा ताईंच्या सुरेल आवाजास वसंत देसाई यांनी करुण साज चढवले होते. 'भरजरी गं पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण..’ या गाण्यामध्ये श्रीकृष्ण आणि द्रौपदी या भावा-बहिणीच्या नात्याचं वर्णन केलं आहे. कृष्ण हा द्रौपदीचा सखा होता. एकदा कृष्ण, सुभद्रा आणि द्रौपदी राजमहालात बसले होते. सुभद्रा ही कृष्णाची सख्खी धाकटी बहीण. नारदमुनीही तिथे होते. सगळ्यांचा फलाहार चालला होता. फळं कापत असताना कृष्णाचं बोट कापलं गेलं आणि त्यातून भळाभळा रक्त वाहू लागलं. नारदमुनींनी सुभद्रेकडे कृष्णाचे रक्त थांबवण्यासाठी तिच्या साडीची चिंधी फाडून मागितली. पण तिची साडी भरजरी होती. ती साडी फाडायला काही तयार होईना आणि दास-दासींना बोलावण्यासाठी उठून गेली. द्रौपदीने मात्र एका क्षणाचाही वेळ न करता, तिच्या भरजरी साडीचा पदर या टोकापासून त्या टोकापर्यंत फाडला आणि कृष्णाच्या जखमेवर बांधला. त्यामुळे रक्त वाहणे लगेचच बंद झाले. आणि अशा प्रकारे कृष्ण-द्रौपदीमध्ये बहीण-भावाचा बंध निर्माण झाला. जेव्हा पांडवांनी द्यूतामध्ये अखेरीस द्रौपदीला पणाला लावलं आणि ते द्यूत हरले, तेव्हा दु:शासनाने द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रसंगी श्रीकृष्ण तिच्या हाकेला धावून गेला आणि तिला सगळ्यांसमोर लज्जित होण्यापासून वाचवलं. आपल्या बहिणीचं असं संरक्षण करून त्याने एका भावाची जबाबदारी पार पाडली. म्हणूनच हे नातं रक्षाबंधनाचं महत्त्व दर्शवतं. असं काहीसं या गोष्टीचं वर्णन करणारं, हे सुंदर गाणं आहे. अशी बालगीते गुणगुणतच अनेक जण लहानाचे मोठे झाले. वनमाला, माधव वझे, दामूअण्णा जोशी आदींच्या सहजसुंदर अभिनयाने आणि वसंत देसाई यांच्या संगीतामुळे चित्रपटाचे लावण्य वाढले होते.

आपल्या भावाचं दुःख न बघवणाऱ्या द्रौपदीने आपल्या अंगावरच्या भरजरी पीतांबरास क्षणार्धात फाडले अन त्याची चिंधी करून त्याच्या जखमेवर गुंडाळली. सुभद्रा जी माधवाची सख्खी बहिण होती ती मात्र भरजरी वस्त्राच्या प्रेमात गुरफटून राहिली. अत्रे लिहितात - पाठची बहिण तिचं कर्तव्य पार पाडायचं सोडून जणू वैरीण झाली होती. जो आपला धर्म निभावत नाही, आपली जबाबदारी पार पाडत नाही तो इतरांसाठी वैरीच ! आपल्या भावाच्या भलभळत्या जखमेवर बांधण्यासाठी कुणी साधी चिंधी देऊ शकत नसेल तर त्याचे अंतर्मन हे वैरयाचेच असणार हे इथं अभिप्रेत आहे.त्याउलट श्रीहरीची मानसभगिनी असणारी द्रौपदी मात्र निमिषार्धात उत्तरते की, 'हरीसाठी मी काळजाची चिंधी करून देईन, वस्त्र काय चीज आहे ? त्याचे माझ्यावर तितके ऋण आहेत (अन त्याची जाणीव मला सदैव आहे). माझी लाज त्याने अनंत वसने देऊन राखली होती तेंव्हा इथे एका भरजरी वस्त्राचं काय घेऊन बसलात ?' अत्रे इथं लिहितात की त्रैलोक्य मोलाचं आपलं वस्त्र तिनं फाडून दिलं.

अत्रेंनी लिहिलेलं साहित्य जाणण्याआधी थोडंसं हास्यविनोदाविषयी जाणून घेणं गरजेचे आहे. भारतीय साहित्यात विविध कवितेच्या शेवटच्या कडव्यात प्रेम आणि नात्यांची महती त्यांनी अगदी रसाळ शैलीत दिली आहे. रक्ताचे नाते असले तरच प्रेम वा आस्था असते असे काही नाही, जो जसे नाते ठेवतो तसं तो भरून पावतो. मग हे नातं त्या विश्वनिहंत्या श्रीकृष्णाशी का असेना ! मनोभावे केलेलं प्रेम, माया आणि सच्ची आपुलकी या बदल्यात केशव देखील तेच देतो. पण त्या साठी या हृदयीचे त्या हृदयी होता आले पाहिजे, एकमेकाच्या अंतरंगातले भाव जाणता आले पाहिजेत. लाभ,मोह, स्वार्थ त्यागून केलेली माया अखेरपर्यंत टिकून राहते. तिथं राहते ते केवळ आणि केवळ प्रेम ! अशी भावंडे धन्यच म्हणायला पाहिजेत. जे एकमेकाचे सुखदुःख जाणतात अन प्रेमभाव दृढ करत राहतात. अशांनी मनापासून दिलेली चिंधी पाहून हरीही प्रसन्न होतो त्याला आणिक काही लागत नाही !

आजही जर कुठे रेडीओ वा दुरचित्रवाणीवर हे गाणं लागलं की मन भूतकाळात जातं आणि आपणही आपल्या आईच्या वा आजीच्या मांडीवर डोके टेकून शांतपणे झोपी जावे अशी उर्मी मनी दाटून येते. इतकं देखणं काव्य लिहिणारे अत्रे मराठी माणसाच्या गळ्यातले ताईत बनले होते यात नवल ते काय ! मात्र यातील बरीचशी प्रसिद्धी विनोदाच्या अंगाने होती.

राज्यात विविध प्रादेशिक व बोलीभाषांतील साहित्यनिर्मितीची प्रक्रिया अविरतपणे सुरु आहे. भाषा जरी वेगवेगळ्या असल्या तरी सर्व भाषांतील साहित्यात नवरसाचीच अभिव्यक्ती असते. साहित्यातील नऊ रसात शृंगार,वीर, करूण, रौद्र, हास्य, भयानक, बीभत्स, आणि शम (शांती) हे सामील आहेत. यातील हास्य रसांत अनेक उपांगे आहेत. भरतमुनींच्या मते अंगविक्षेपातून, दुस-याची नक्कल केल्याने, निरर्थक बडबड केल्याने, किंवा दुस-याचे उणे दुणे काढल्यामुळे आपल्याला गंमत वाटते, आणि त्यामधून हास्यरस उत्पन्न होतो. आता याप्रकारे विनोदाची चिरफ़ाड करणे कितीही ’विनोदी’ असले, तरी शास्त्रीय दृष्टिकोनामधून हास्यरस समजून घेण्यासाठी हे आवश्यक आहे असे मला वाटले. मुळात हे रससंकल्पना ही नाट्यासाठी पुढे आणली असल्या गेल्याने भरतमुनींनी चेह-याच्या अभिनयामधून हास्याचे वर्णन केले आहे. हास्याचे प्रकार, प्रयोजन, कारण इत्यादि घटक लक्षात घेऊन खुदकन हसणे, स्मित करणे खो खो हसणे, सातमजली हसणे, विकट हसणे, हसून हसून बेजार होणे, हसतमुख असणे, असे हसण्याचे काही प्रकार पडतात.
 
मात्र हसणे आणी विनोद, हे एकच नाहीत. विनोद याचा मूळ अर्थ मनोरंजन असा आहे. त्यामुळे जे जे मन रमवते, ते ते सर्व "विनोदामध्ये" मोडते. विनोद हास्यापेक्षा जास्त व्यापक आहे. आपण साहित्यामध्ये विचारात घेतो त्या विनोदी कल्पना. त्यामुळे हास्य तर उत्पन्न होतेच, पण त्याबरोबर त्या काही निखालस मनोरंजन करण्यास समर्थ असतात. आपण येथे हास्य कविता आणि विनोदी कविता हे समानार्थी शब्द म्हणून वापरतो. तर कोणताही विनोद निर्माण होण्यासाठी दोन महत्त्वाचे घटक आवश्यक असतात. ते म्हणजे वाचकाला ते लिखाण बुद्धीला आणि मनाला दोन्ही ठिकाणी पटले पाहिजे, भावले पाहिजे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे केशवकुमारांच्या कविता! ज्यामध्ये बुद्धीची चुणुकही तितक्याच प्रकर्षाने जाणवते.इथे त्याच्या काही कवितांचा उहापोह करण्यात आलाय मात्र तो प्रातिनिधिक ठरावा. त्याचबरोबर हेही आवर्जून नमूद करावे वाटते की अत्रेंनी केवळ विडंबनकाव्यास प्राधान्य दिले होते असे नव्हे तर त्यांनी नवरसांनी परिपूर्ण अशी साहित्य निर्मिती केली व मराठी साहित्यात स्वतःचे अढळस्थान निर्मिले. त्यांच्या एका गीताचे रसग्रहण जे विडंबनगीत नसून एक आर्त प्रार्थनास्वरूप गीत आहे. या गाण्याने अत्रे अबालवृद्धांपर्यंत पोहोचले कारण हे गीत 'शामची आई' या चित्रपटातलं होतं !

मराठीतील अष्टपैलू साहित्यिक, शिक्षणतज्ञ, चित्रपटनिर्माते-दिग्दर्शक, वृत्तपत्रकार, वक्ते आणि नेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले व्यक्तिमत्व म्हणजे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९८ला पुणे जिल्ह्यातील सासवडजवळच्या कर्हा नदीच्या काठावर वसलेल्या कोडीत या गावी झाला. त्यांचे वडील म्यॅट्रिकपर्यंत शिकलेले होते. त्यांचं घराणं शिवकालीन ऐतिहासिक घराण्यांपैकी एक वतनदार घराणं होतं. बापू हे अत्र्यांचं लहानपणचं टोपणनाव. अत्र्यांचं प्राथमिक शिक्षण सासवड इथे झालं. अत्र्यांची आई कलासक्त होती. तिच्यामुळेच त्यांना विविध कलांची, विशेषता नाटकाची आवड लागली. शिवाय सासवड आणि परिसरातील सामाजिक-सांस्कृतिक वातावरण, ऐतिहासिक पार्श्वभूमी त्यांच्या बालपणाच्या जडणघडणीस पोषक ठरली. वयाच्या नवव्या वर्षीच त्यांनी एक विनोदी कविता लिहिली आणि आपल्यातील विनोदी लेखकाची चुणूक दाखवून दिली. वाचनाची आवड त्यांना तिथल्या वातावरणातच लागली.

१९११ साली पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. त्या काळात कला, विद्या, आणि ज्ञान यांचं माहेरघर असलेल्या पुण्याने अत्र्यांच्या व्यक्तिमत्त्वाला खर्या अर्थाने आकार दिला. भावे हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. तिथे त्यांना काशिनाथ नारायण पटवर्धन, 'दर्पणकार' चिपळूणकर, पुरुषोत्तम लेले, विद्याधर वामन भिडे असे काही दिग्गज लेखक शिक्षक म्हणून लाभले. नाटकाविषयीची गोडी त्यांना इथल्या वातावरणामुळेच लागली. इथल्याच नाटकांतून त्यांना मराठी रंगभूमीवर प्रवेश करण्याची संधी मिळाली. शालेय वयातच त्यांना राम गणेश गडकरी, बालकवी, तात्यासाहेब कोल्हटकर, गोविंद बल्लाळ देवल, रे. टिळक अशा दिग्गज साहित्यिकांचा सहवास लाभला. गडकरयांनी त्यांच्या कविता वाचून त्यांना पसंतीची पावतीही दिली. शालेय वयातच अत्र्यांनी 'महाराष्ट्र मोहरा' ही कादंबरी लिहिली आणि 'प्रेमोद्यान' मासिकातून ती क्रमश: प्रसिद्धही झाली. अत्र्यांचं प्रसिद्ध झालेलं हे पहिलं लिखाण. पुढे त्यांनी गोष्टीही लिहायला सुरुवात केली आणि त्या विविध मासिकांत प्रसिद्ध होवू लागल्या. याच काळात त्यांना वक्तृत्त्व कलेचीही आवड लागली. अनेक भाषणं मुखोदगत करत त्यांनी विविध स्पर्धा गाजवल्या.

भावे हायस्कूलमधून म्यॅट्रिकची परीक्षा पास होताच महाविद्यालयीन शिक्षणासाठी अत्र्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथेही त्यांच्या जडणघडणीस समृद्ध असं वातावरण लाभलं. इथे त्यांना कविता आणि क्रिकेट या दोन गोष्टींविषयी जिव्हाळा वाटू लागला. या काळात त्यांचं राम गणेश गडकरी यांच्या घरी येणं-जाणं होऊ लागलं. गडकर्यांनी त्यांना आधुनिक कवितेचा मार्ग दाखवला. केशवसुत-गोविदाग्रज-बालकवी यांच्या कवितांची मोहिनी त्यांच्यावर होतीच. त्यामुळेच कॉलेजच्या त्रैमासिकात त्यांनी 'मकरंद' या टोपण नावाने कविता लिहायला सुरुवात केली. त्यांच्या कवितांचे बरंच कौतुक त्यावेळी झालं. पुढे त्याकाळी प्रतिष्ठित असलेल्या 'मासिक मनोरंजन' या नियतकालिकात त्यांची 'चांदणी' ही कविता प्रसिद्ध झाली. त्याच बरोबर 'उद्यान' नावाच्या प्रसिद्ध असलेल्या मासिकातही त्यांच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. कॉलेजच्या काळातच त्यांच्याभोवती प्रसिद्धीचं वलय तयार झालं. कॉलेजच्या विविध साहित्यिक उपक्रमांतही ते हिरिरीने सहभाग घेत असत. रॅंग्लर परांजपे, प्रा. हरिभाऊ लिमये, डॉ. पांडुरंग दामोदर गुणे, प्रा. खाड्ये, वासुदेव बळवंत पटवर्धन अशी नामवंत शिक्षकमंडळी त्यांना इथे लाभली. कॉलेजच्याच वाडिया ग्रंथालयात अत्रे यांना मुबलक साहित्य वाचायला मिळालं. विशेषत: इंग्रजी भाषेतील काव्यं, कादंबरया, नाटकं त्यांनी अधाश्यासारखी वाचून काढली. त्यांच्या आयुष्यातल्या लेखनाची ही पूर्वतयारीच ठरली .

याच काळात त्यांच्या वडिलांचं निधन झालं. १९१९ मध्ये त्यांचं दैवत असलेले राम गणेश गडकरी यांचंही निधन झालं. हे दोनही आधार कोसळल्यामुळे अत्रे असहाय झाले. त्यांचं बी. ए.च्या अभ्यासाकडेही दुर्लक्ष झालं. त्याचा परिणाम होऊन ते ही परीक्षा १९१९ साली अक्षरश: काठावर पास झाले. त्यानंतर नोकरीच्या शोधात ते मुंबईत आले. सुरुवातीला काही छोट्या नोकर्या केल्यानंतर त्यांना १९२० साली न्यू हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. त्याच काळात वडिलांची आपल्या मुलाने वकील व्हावं ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी कायदा शिक्षणाच्या पदवीसाठीही प्रवेश घेतला. पण पुढे १९२१मध्ये प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबई सोडावी लागली आणि ते परत पुण्यात परतले. त्यामुळे त्यांनी वकील व्हायची वडिलांची इच्छा अपुरीच राहिली.

पुण्यात आल्यावर कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत त्यांची हेडमास्तर म्हणून महिना ३५ रुपये पगारावर नेमणूक झाली. या शाळेत त्यांनी अनेक शैक्षणिक बदल करून शाळा नावारूपाला आणली. त्यामुळे ही शाळा 'अत्रे यांची शाळा' म्हणून ओळखली जाऊ लागली. दरम्यान, अध्यापनशास्रातील बी. टी. (मुंबई) आणि पुढे लगेच टी. डी. (लंडन) या पदव्या त्यांनी सन्मानपूर्वक प्राप्त केल्या. लंडन इथे त्यांना जागतिक कीर्तीच्या शिक्षणतज्ज्ञांचं मार्गदर्शन लाभलं. त्यातूनच त्यांना नवशिक्षणाचा विचार मिळाला. त्याचा आपल्याकडच्या शिक्षणपद्धतीत प्रचार-प्रसार करण्याचं त्यांनी ठरवलं. त्यातूनच अत्रे यांनी प्राथमिक शाळांसाठी 'नवयुग वाचनमाला' आणि माध्यमिक शाळांसाठी 'अरुण वाचनमाला' वि. द. घाटे आणि कवी गिरीश यांच्या सहकार्याने सुरू केल्या. या मालांच्या उच्च गुणवत्तेमुळे महाराष्ट्र शासनाने त्यांना अधिकृत मान्यता दिली आणि हीच क्रमिक पुस्तकं शाळांतून शिकवली जाऊ लागली. विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण करण्यासाठी मराठीतील अद्ययावत व जिवंत वाड्मयाची व विचारांची ओळख करून देण्याचा हा प्रयोग राबवणं हे अत्र्यांनी केलेलं फार मोठं आणि महत्त्वाचं शैक्षणिक कार्य मानलं जातं. पुढे त्यांनी पुण्यात धनराज गिरी हायस्कूल आणि मुलींचं आगरकर हायस्कूलही सुरू केलं.

साहित्याच्या प्रांतात १९२१ नंतर त्यांनी केशवकुमार या नावाने कविता लिहायला सुरुवात केली. १९२३च्या आसपास पुण्यात सुरू झालेल्या रविकिरण मंडळाच्या कवींची कविता लोकप्रिय होत होती. अत्रे यांनी माधव ज्युलियन आणि या मंडळातील इतर कवींच्या कवितांची विडंबनं लिहावयास सुरुवात केली. या मंडळातील कवींच्या काव्यावृत्तींचा उपहास करणारी ही विडंबनं खूप लोकप्रिय झाली. त्याचाच 'झेंडूची फुले' (१९२५) हा विडंबनपर कवितांचा संग्रह प्रसिद्ध झाला. त्यांच्या सर्वव्यापी अनुभवाचे सार रोकड्या शब्दात, यात व्यक्त झालेले आहे. हे पुस्तक मुळातच वाचनीय आहे. त्यातच 'आम्ही कोण' ह्या केशवसुतांच्या कवितेचे हे विडंबन दिलेले आहे. विडंबनाची व्याख्या, वापर आणि मर्यादा ह्यांबाबत त्या पुस्तकाचे संपादक श्री.स.गं.मालशे, स्वत: आचार्य अत्रे आणि त्यांचे गुरू साहित्याचार्य श्रीपाद कृष्ण उर्फ तात्यासाहेब कोल्हटकर यांचे विचार ह्या पुस्तकात ग्रथित केलेले आहेत.

झेंडूची फ़ुले मधील अनेक कविता विडंबनात्मक आहेत. विडंबने हा विनोदी कवितांचा एक महत्त्वाचा भाग. विडंबन म्हणजे खरे म्हणजे चेष्टा, नक्कल, वेडावून दाखवणं! विडंबनाबाबत झेंडूची फ़ुले च्या प्रस्तावनेत लिहिलेय की, " इंग्रजी मध्ये विकृतानुकरणाला burlesque, carricature, parody हे शब्द मोघमपणे योजतात. पण burlesque हे कृतिविडंबन असते, त्याचा उपयोग नाटककार अधिक करतात; carricatureहे रूपविडंबन आहे, त्याचा उपयोग व्यंगचित्रकार अधिक करतात; आणि parody हे शैलीविडंबन आहे, त्याचा उपयोग विडंबनलेखक अधिक करतात. शैलीविडंबनाचे प्रकार किंवा स्तर विविध प्रकारे दाखविता येतिल. "

विडंबन कविता मराठीत आणायचं श्रेय अत्रे यांनाच दिलं जातं. त्यांनी शालेय-महाविद्यालयीन काळात लिहिलेल्या कवितांचा 'गीतगंगा' (१९३५) हा कवितासंग्रहही प्रसिद्ध झाला. चांगुणा, मोहित्यांचा शाप या कांदबरीचे लेखन त्यांनी केले. इ.स. १९२३ साली अत्र्यांनी 'अध्यापन' मासिक सुरू केले. इ.स. १९२६ मध्ये 'रत्नाकर' व इ.स. १९२९ साली 'मनोरमा', आणि पुढे इ.स. १९३५ साली 'नवे अध्यापन' व इ.स. १९३९ साली 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली. १९ जानेवारी १९४० साली त्यांनी नवयुग साप्ताहिक सुरू केले.

अत्रेंचे 'मी कसा झालो' (१९५३) आणि ’क-हेचे पाणी’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. यातून केवळ अत्रे या व्यक्तीचे चरित्र आलं नसून तत्कालीन काळ, माणसे आणि घटना यांचंही वैविध्यपूर्ण चित्रण आलं आहे. अशा गोष्टी अशा गंमती, कावळ्यांची शाळा, फुले आणि मुले, बत्ताशी आणि इतर कथा ही कथासंग्रहाची पुस्तके त्यानी लिहिली. त्यांनी लिहिलेली 'सूर्यास्त- (पं. नेहरू), ऑस्कर वाइल्ड, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले, अब्राहम लिंकन, विनोबा ही चरित्रंही महत्त्वाची आहेत. याचबरोबर भ्रमंती (१९५६), मुद्दे आणि गुद्दे' (१९५६), केल्याने देशाटन (१९६१). समाधीवरील अश्रू (१९६९), आषाढस्य प्रथम दिवसे (१९६९), अध्यापक अत्रे (१९८५), हुंदके (१९८९) इत्यादी पुस्तकंही महत्त्वाची आहेत. त्यांच्या गाजलेल्या भाषणांचेही अनेक संग्रह प्रसिद्ध आहेत. त्याबरोबरच इतका लहान एवढा महान, क्रांतिकारकांचे कुलपुरुष, चित्रकथा भाग-१, चित्रकथा भाग-२, दलितांचे बाबा, दूर्वा आणि फुले, मराठी माणसे, मराठी मने, महापूर, महाराष्ट्र कालचा आणि आजचा, मी कसा झालो? ह्या त्यांच्या काही उल्लेखनिय कलाकृती. प्रथम ‘मकरंद’ व नंतर ‘केशवकुमार’ या टोपणनावांनी काव्यलेखन त्यानी मराठीत गाजवली. झेंडूची फुले हा त्यांच्या विनोदी व विबंडन-कवितांचा संग्रह. त्यात जुन्या वळणाचे कविता यांतील लकबांचे व वैगुण्यांचे विडंबन केलेले आहे. आधुनिक मराठीतील विडंबन काव्याची परंपरा उपयुक्त काव्यसंग्रहापासून मानण्यात येते. बालकवी व गोविंदाग्रज यांच्या कवितांचा ठळक परिणाम दाखविणारी त्यांची अन्य स्फुट कविता गीतगंगा (१९३५) या संग्रहात आहे.

महाविद्यालयीन काळातच राम गणेश गडकरी या थोर नाटककाराचा सहवास त्यांना लाभल्यामुळे त्यांना नाट्यलेखनकलेचं रहस्यही उमगलं. गडकर्यांच्या तसंच त्यांच्या इतर समकालीन नाटककारांच्या नाटकांमुळे अत्रे विशेष प्रभावित झाले. नाटकांमध्ये त्यांनी भूमिकाही केल्या. सुरुवातीला शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी त्यांनी 'गुरुदक्षिणा', 'वीरवचन' व 'प्रल्हाद' अशी नाटकं लिहिली. १९३३ साली 'बालमोहन संगीत मंडळी'चे मालक दामूअण्णा जोशी यांच्या विनंतीवरून अत्र्यांनी 'साष्टांग नमस्कार' हे नाटक लिहिलं. १० मे १९३३ रोजी पुण्याच्या विजयानंद थिएटरमध्ये त्याचा प्रयोग झाला. त्यांचं हे पहिलंच विनोदी नाटक चांगलंच यशस्वी झालं. पुढच्या काळात त्यांनी आलटून-पालटून विनोदी, प्रहसनात्मक, गंभीर नाटकं लिहिली. घराबाहेर (१९३४), उद्याचा संसार (१९३६), पराचा कावळा (१९३८), वन्दे मातरम (१९३७), मी उभा आहे(१९३९), जग काय म्हणेल(१९४०), पाणिग्रहण(१९४६), कवडीचुंबक(१९५०), आणि शेवटच्या काळात (१९६२ ते १९६९) तो मी नव्हेच, मोरूची मावशी, बुवा तेथे बाया, मी मंत्री झालो, डॉक्टर लागू, प्रीतिसंगम, ब्रम्हचारी ही त्यांची नाटकं रंगभूमीवर आली व लोकप्रिय ठरली. १९३० नंतर चित्रपटांकडे वळलेल्या प्रेक्षकाला रंगभूमीकडे खेचून आणण्यात अत्र्यांच्या नाटकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मराठी रंगभूमीला त्यामुळे पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली. 'तो मी नव्हेच' (१९६२) हे पहिल्यांदाच फिरत्या रंगमंचाचं तंत्र वापरून त्यांनी सादर केलेलं नाटक त्यातल्या समकालीन सत्य घटनेच्या ताज्या संदर्भामुळे विशेष गाजलं. त्यामुळे नाट्यतंत्रातही क्रांती झाली.
 
नाटकांच्या बरोबरीने त्यांनी विनोदी लेखनही भरपूर केलं. साखरपुडा (१९४२), ब्रॅंन्डीची बाटली (१९४४), वामकुक्षी (१९४९) हे त्यांचे विनोदी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांची चांगुणा (१९५४) ही कादंबरीही प्रसिद्ध आहे. याचबरोबर त्यांनी चित्रपटलेखनही केलं. १९३७ ते १९३९ या काळात त्यांनी बाबुराव पेंढारकर आणि मास्टर विनायक यांच्या 'हंस पिक्चर्स'करिता धर्मवीर, प्रेमवीर, ब्रम्हचारी, बेगुनाह (हिंदी), ब्रान्डीची बाटली व अर्धांगी अशा चित्रपटांसाठी पटकथाही लिहिल्या. पुढे १९४० साली मुंबईत कायमस्वरूपी स्थायिक झाल्यानंतर त्यांनी स्वत:चीच 'अत्रे पिक्चर्स' ही कंपनी सुरू केली. साने गुरुजींची ‘श्यामची आई' म्हणजे मराठी साहित्यातील एक सोनेरी पान, असे मानले जाते. त्यावर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी १९५३ साली चित्रपट बनविला. १९५४ साली या चित्रपटाला पहिले राष्ट्रपती पदक मिळाले. या बरोबरच त्यांनी 'महात्मा फुले' हा ही एक दर्जेदार चित्रपट त्यांनी निर्माण केला. या चित्रपटाला १९५५ मध्ये रौप्यपदक देऊन गौरवण्यात आलं.

नाशिक येथे १९४२ मध्ये भरलेल्या २७ व्या महाराष्ट्र साहित्य-संमेलनाचे ते अध्यक्ष होते. याशिवाय ३८ वे नाट्यसंमेलन, बेळगाव, १० मराठी पत्रकार-संमेलन आणि बडोदा, इंदूर व ग्वाल्हेर येथील प्रादेशिक साहित्यसंमेलने यांची अध्यक्षपदेही त्यांनी विभूषित केली आहेत. अत्र्यांनी केलेल्या विविध विषयांवर लेखनात अनेक चरित्रे, व्यक्तिदर्शने, मृत्यूलेख, प्रवासवर्णने, वृत्तपत्रीय लेख, साहित्यविषयक लेख आणि भाषणे, शालेय पाठ्यपुस्तके इत्यादींचा समावेश आहेत
मराठी साहित्यात त्यांचे अनेकांशी वाद झाले. अत्रे-भावे वाद, अत्रे-फडके वाद, अत्रे-वरेरकर वाद असे वाद प्रसिद्ध आहेत. पुरोगामी दृष्टिकोन आणि भूमिकेतून त्यांनी हे वाद लढवले.
मराठी वृत्तपत्रकारितेतही अत्र्यांनी महत्त्वपूर्ण ठसा उमटवला. याचा प्रारंभ त्यांच्या राजकीय क्षेत्रातील प्रवेशाने झाला. १९३७ साली त्यांनी कांग्रेस पक्षात प्रवेश केला. त्या वर्षीच्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरून ते निवडूनही आले. १९३८ ते १९३९ या काळात ते स्टॅंडिंग कमिटीचे चेअरमन झाले. या काळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या सुधारणा केल्या. कांग्रेसच्या राजकारणाचा पुरस्कार करण्यासाठी त्यांनी 'नवयुग' साप्ताहिक सुरू केलं. त्यातील 'अत्रे उवाच' या अग्रलेखांमुळे आणि पुढे दत्तू बांदेकरांच्या विनोदी सदरामुळे 'नवयुग' अतिशय लोकप्रिय झाले. 'जय हिंद' नावाचं सायंदैनिकही त्यांनी काही काळ चालवलं. भारत-पाकिस्तान फाळणीमुळे अत्र्यांनी कॉंग्रेसचा निषेध केला आणि त्यांनी कॉंग्रेस सोडली. पुढच्या काळात ते कॉंग्रेसचे कट्टर विरोधक बनले. १९५५ साली सुरू झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचं नेतृत्व अत्र्यांनी केलं. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रसारासाठी त्यांनी १९५६ मध्ये 'मराठा' नावाचं दैनिक सुरू केलं. 'नवयुग' आणि 'मराठा'तून प्रखर जहाल लिखाण करून अत्र्यांनी या चळवळीचा विलक्षण झंझावाती असा परिणामकारक प्रचार-प्रसार केला. या दोन्ही वृत्तपत्रांतून वैविध्द्यपूर्ण विषयांवर त्यांनी विपुल लेखन केलं. त्यातील काही लिखाण पुढे पुस्तकरूपानं प्रसिद्ध झालं.

सर्वसामान्य जनतेच्या आशा-आकांक्षा, सुख-दुखं, भाव-भावना, जीवनविषयक समस्या त्यांनी आस्थेने समजून घेतल्या आणि त्यासबंधी भरपूर लेखन केलं. प्रसंगी समाजातील दोषांवर घणाघाती हल्ला चढवण्यासही त्यांच्यातील लेखक-पत्रकार-वक्त्याने कुणाची भीडभाड बाळगली नाही. निवडणुकीच्या रिंगणात उतरून दोन वेळा विधानसभेवर आमदार म्हणून ते निवडून आले. तिथेही त्यांनी विविध सामाजिक-राजकीय प्रश्नांवर आवाज उठवला. १९६७ साली ते लोकसभेच्या निवडणुकीलाही उभे राहिले पण त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते राजकारणापासून अलिप्तच राहिले.
एवढ्या सगळ्या क्षेत्रांवर हुकमत गाजवलेले अत्रे खर्या अर्थाने गाजले ते एक झुंजार पत्रकार आणि लेखक म्हणून. अत्र्यांच्या सर्वच लेखनातून विनोदाचा झरा खळाळताना दिसतो. मानवी वर्तनातील, स्वभावातील विसंगती त्यांनी विनोद हे माध्यम वापरून त्यांच्या लिखाणातून टिपली. त्यांचा विनोद अनेकदा अनेकांना बोचणारा ठरला. कधी कधी त्यात व्यक्तिद्वेष, बाष्कळपणा, शिवराळपणाही जाणवतो, परंतु ताजेपणा आणि जिवंत उत्स्फुर्तता यामुळे त्यात एक नावीन्यही सामावलेलं आहे. हा विनोद त्यांच्या फर्ड्या भाषणातही होता. अत्र्यांचं एकूणच व्यक्तिमत्व धाडसी आणि आक्रमक होतं. लेखक, पत्रकार, वक्ते, विनोदकार म्हणून अत्रे प्रचंड लोकप्रिय ठरले त्याचं रहस्य कदाचित त्यांच्या या आक्रमक वृत्तीत सामावलं असावं.

आयुष्यात अनेक मानसन्मान त्यांच्याकडे चालून आले. मराठी माणूस आणि मराठी भाषा ज्यांचा मानबिंदू होता, काव्य, नाटक, शिक्षण, पत्रकारिता, चित्रपटनिर्मिती, दिग्दर्शन, राजकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रांत ज्यांनी आपल्या असामान्य कर्तुत्त्वाने अमिट असा ठसा उमटवला अशा आचार्य प्र. के. अत्रे यांचं १३ जून १९६९ रोजी मुंबईत निधन झालं.

'कऱ्हेचे पाणी' ह्या आत्मवृत्ताच्या प्रस्तावनेत अत्रे लिहितात, "आयुष्यात मी काय वाटेल ते केले असेल, पण ढोंग कधी केले नाही. ढोंगाचा मी पहिल्यापासून शत्रू. माझ्या नाटकांतून, चित्रपटांतून आणि वृत्तपत्रांतून ढोंगाचे मी क्रूरपणे वाभाडे काढलेले आहेत. गेली पन्नास वर्षे समाजाच्या सर्व अंतरंगांमधून मी वावरलो आहे. मजुरापासून तो महाराजापर्यंत, शाळामास्तरापासून तो गिरणीमालकापर्यंत आणि कंगालापासून तो कुबेरापर्यंत मी अनिरुद्ध संचार केलेला आहे. त्यामुळे समाजाच्या बहिरंगामध्ये आणि त्याच्या अंतरंगामध्ये केवढी फारकत आहे, ह्याची जाणीव माझ्या इतकी दुसऱ्या कुणालाही असणे शक्य नाही. आज जीवनाच्या सर्व क्षेत्रात दंभाचा आणि ढोंगाचा जो बुजबुजाट झालेला आहे त्याचे कारण सत्य काय आहे हे जाणण्याचे आणि सांगण्याचे फार थोड्या लोकांत धैर्य आहे. ते धैर्य दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे."

अत्रेंच्या कविता आजच्या कालमानासही लागू पडतात. त्यामुळेच आजही त्या रसिकांच्या स्मरणात आहेत. मुंबईत झालेल्या हिंदू -पठाणांच्या दंग्यात गारद झालेल्या एका पठाण विरास उद्देशून रचलेली 'हा कोण इथे पडलेला ! 'कादरखां काबुलवाला'' ही विलापिका' खूप प्रसिद्ध आहे. 'आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक, देई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुणा ठाउक' या गीतातली ओढी आजही बालपणाची रम्य आठवण समोर उभी करते. 'शाई, कागद, टांक, रूळ, रबरे इत्यादी लेखायुधे (काड्या आणि विड्या तशा!) जमवुनी खोलीत तो बैसला' या कवितेत त्यांनी बेगडी साहित्यिकांची चिरफाड केली आहे. 'आम्ही कोण?' म्हणून काय पुसता दाताड वेंगाडुनी? 'फोटो' मासिक पुस्तकात न तुम्ही का अमुचा पाहिला?' या कवितेतून त्यांनी केशवसुतांच्या कवितेचं केलेलं विडंबन अख्ख्या महाराष्ट्राची दाद घेऊन गेले. 'परिटा येशिल कधी परतून? काल दिलेल्या कपड्यांमधले दोन चार हरवून! परिटा' ही कविता वा 'कवीची 'विरामचिन्हे' ('विरामचिन्हे' चे विडंबन) जेव्हा काव्य लिहावयास जगती प्रारंभ मी मांडिला' या दोन्ही कवितांतून त्यांनी ट ला ट वाल्या कवींवर कठोर प्रहार केले. 'कषाय-पेय-पात्र-पतित मक्षिकेप्रत अयि नरांग-मल-शोणित-भक्षिके' आणि 'तू छोकरी, नहि सुन्दरी । मिष्कील बाल चिचुन्दरी काळा कडा मी फत्तरी । तू काश्मिरांतिल गुल-दरी (श्यामले)' या कवितांतून त्यांच्या उच्च प्रतिभाशक्तीचे अन विडंबन कौशल्याचे प्रत्यय येतात. 'प्रेमाचा गुलकंद' मधून त्यांचा खट्याळपणा अधिक भावतो. 'उगवला चंद्र पुनवेचा !', 'यमुनाजळि खेळू खेळ कन्हैया, का लाजता…', 'मज आवडते मनापासुनी शाळा', 'कवि आणि कवडा' या गीतांतून त्यांचे वेगळेपण अधिक ठळक जाणवते. अशी बहुविध काव्य रचना करून आचार्य अत्रेंनी मराठी कवितेस आणखी समृद्ध केले.
 
असे असूनही एका गोष्टीची खंत प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे ज्याप्रमाणे केशवसुत, बालकवी, मर्ढेकर यांच्या कवितांचा वारसा पुढच्या पिढीत घेऊन जाणारे बिनीचे शिलेदार मराठी कवितेस लाभले त्याप्रमाणे केशवकुमारांच्या कवितांचा वारसा सांगणारे कवी पुढच्या पिढीत निर्माण झाले नाहीत. त्यातूनही कवी अशोक नायगांवकर यांनी आपल्या परीने विडंबन आणि हास्य कवितांना न्याय देण्याचा जोरकस प्रयत्न केला. हा एक सन्माननीय अपवाद वगळता अत्रेंच्या काव्यप्रतिभेचा वारसदार म्हणावा असा कवी उदयास आला नाही.


- समीर गायकवाड.
 
........................................................................................

अत्रेंच्या इतर काही रसिकप्रिय कविता -

[मुंबईत झालेल्या हिंदू -पठाणांच्या दंग्यात गारद झालेल्या एका पठाण विरास उद्देशून सदरहू 'विलापिका' रचिली आहे ]



हा कोण इथे पडलेला ! 'कादरखां काबुलवाला' ! धृ.
धिप्पाड देह हा अडवा ! पसरला सहा अन् फूट !


पालथे पलिकडे पडले ! विक्राळ खिळ्यांचे बूट !
चुणिदार चोळणा आतां ! फाटून होय चिरगूट !
बैसला पठाणी बडगा ! बाजूला दूर निमूट !

चिखलांत बुडाले कल्ले !
त्यां ओढिति चिल्लें-पिल्लें !
खिसमीस खिशांतिल उरलें
कुणी मारि तयावर डल्ला ! 'कादरखां काबुलवाला' !.....।।१।।

अफगाण दर्‍यांतिल आतां ! डुरकाळ्या फोडिति शेर !
बुरख्यांतुनि कंदाहारी ! उठलासे हाहा:कार !
तो शर्बत पीतां-पीतां ! दचकेल मधेंच अमीर !
'क्या हुवा!' ओरडुनि ऐसें ! बडवतात सगळे ऊर !

ते हेरतचे अक्रोड
ते बदाम-पिस्ते गोड
रडरडुनी होती रोड
अल्बुखार अंबुनि गेला ! 'कादरखां काबुलवाला' !....।।२।।

तो हिंग काबुली आतां ! विकणार यापुढें कोण ?
व्याजास्तव बसुनी दारीं ! गरिबांचा घेइल प्राण ?
खाणार कोण यापुढतीं ! तीं कलिंगडें कोरून?
सजवी नूर नयनांचा ! कीं सुरमा घालुनि कोण ?

रस्त्यावर मांडुनि खाटा
हुक्क्यासह मारिल बाता-
हिंडेल कोण वा आतां
घालून चमेलीमाळा ? ! 'कादरखां काबुलवाला' ! .....।।३।।

करुं नका गलबला अगदीं ! झोंपला असे हा वीर !
जन्मांत असा पहिल्यानें ! पहुडला शांत गंभीर !
राहणें जितें जर, मागें ! व्हा दोन पावलें दूर !
हा बसेल मानगुटीला ! ना तरी होउनी पीर !

जा पळा-पंचनाम्याला
तो आला डगलेवाला,--
अडकवील कीं साक्षीला,
मग म्हणाल "पुरता भंवला ! 'कादरखां काबुलवाला' !....।।४।।
 
.......................................................................................

आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक,
देई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुणा ठाउक;
त्याची टिक टिक चालते न कधिही, आहे मुके वाटते,
किल्ली देई न त्यास ती कधि, तरी ते सारखे चालते

"अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी,"
जेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी
साडेपाचही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी
"बाळा झांजर जाहले, अरवला तो कोंबडा, उठ की !"

ताईची करण्यास जम्मत, तसे बाबूसवे भांडता
जाई संपुनियां सकाळ न मुळी पत्त कधी लागता !
"आली ओटिवरी उन्हे बघ!" म्हणे आजी, "दहा वाजले !
जा जा लौकर !" कानि तो घणघणा घंटाध्वनी आदळे.

खेळाच्या अगदी भरांत गढुनी जाता अम्ही अंगणी
हो केव्हा तिनिसांज ते न समजे ! आजी परी आंतुनी
बोले, "खेळ पुरे, घरांत परता ! झाली दिवेलागण,
ओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन !"

आजीला बिलगून ऐकत बसू जेव्हा भुतांच्या कथा
जाई झोप उडून, रात्र किती हो ध्यानी न ये ऐकता !
"अर्धी रात्र कि रे" म्हणे उलटली, "गोष्टी पुरे ! जा पडा !'
लागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा

सांगे वेळ, तशाच वार-तिथीही आजी घड्याळातुनी
थंडी पाऊस ऊनही कळतसे सारें तिला त्यांतुनी
मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले?
गाठोडे फडताळ शोधुनि तिचे आलो ! तरी ना मिळे
 
........................................................................................

शाई, कागद, टांक...
शाई, कागद, टांक, रूळ, रबरे इत्यादी लेखायुधे
(काड्या आणि विड्या तशा!) जमवुनी खोलीत तो बैसला!
स्फूर्तीचा झटका असा न जबरा आला कधी त्याजला-
"काव्याची उठवीन मी दसकडी या बैठकीला!" वदे!
टाकी बंद करून सर्व खिडक्या-जाळ्या, झरोके तसे
दारालाही तशीच लावित कडी आतूनबाहेरुनी!
दोस्ताला कुठल्यातरी बसविले दारावरी राखणी;
"काव्याची बघतो मिजास!" वदला अस्पष्ट काही असे!
आता कंबर बांधुनीच कवने 'पाडावया' तो बसे
वार्ता ही वणव्यासमान पसरे गल्लीत चोहीकडे!
आले धावुनि लोक सर्व! दुसरे कोणा सुचावे कसे?
चिंताक्रान्त मुखे करूनि बसले निःस्तब्ध दारापुढे !
झाला तब्बल तास! चाहुल परी काही न ये आतुनी,
सर्वांचा अगदीच धीर सुटला! कोमेजले चेहरे!
भाळी लावुनि हात कोणी वदती "मजी प्रभूची बऽऽरे!"
दृष्टी खिन्नपणे नभी वळवुनी निःश्वास टाकी कुणी!
गंभीर ध्वनि तोच आतुनि निघे! उंचावली मस्तके!
श्वासोच्छ्वास क्षणैक थांबत! मुखे रुंदावली कौतुके!
डोकावूनि बघे फटींतुनि कुणी-तो त्या दिसे अद्‌भुत!
होता बाड उरी धरून पडला निश्चित तो घोरत!!
डोळ्यांदेखत घालुनी दरवडा आम्ही कुबेराघरी!

या कवितेखाली एक तळटीप आहे: या ठिकाणी दर्शवलेल्या अवग्रहाबद्दल ताना घेण्याचा कोणी प्रयत्न करू नये. कवने " पाडायला" बसलेल्या तथाकथित कवीचे चपखल वर्णन यामध्ये आले आहे. आणि कवितेचा उच्च बिंदु, म्हणजे तो कवी एवढ्या लांबलचक कर्मकांडानंतर काही तरी आता बोलणार, म्हणुन सर्वांनी मस्तके उंचावली, तो, कवी तर निद्रादेवीच्या कधीच आधीन झालेला!

.............................................................................................................................................

आम्ही कोण?

'आम्ही कोण?' म्हणून काय पुसता दाताड वेंगाडुनी?
'फोटो' मासिक पुस्तकात न तुम्ही का अमुचा पाहिला?
किंवा 'गुच्छ' 'तरंग' 'अंजली' कसा अद्यापि न वाचला?
चाले ज्यावरती अखंड स्तुतिचा वर्षाव पत्रांतुनी?
ते आम्ही - परवाङ्मयातील करू चोरुन भाषांतरे,
ते आम्ही - न कुणास देऊ अगदी याचा सुगावा परी!
त्याचे वाग्धन वापरून लपवू ही आमुची लक्तरे!
जे जे दृष्टित ये तयावर 'करू का काव्य?' वाटे मला,
काव्याची भरगच्च घेउनि सदा काखोटिला पोतडी,
दावू गाउनी आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामधे,
दोस्तांचे घट बैसवून करु या आम्ही तयांचा 'उदे'
दुष्मानावर एकजात तुटुनी की लोंबवू चामडी!
आम्हाला वगळा-गतप्रभ झणी होतील साप्ताहिके!
आम्हाला वगळा-खलास सगळी होतील ना मासिके!

......................................................................................................................................

कवीची 'विरामचिन्हे' ('विरामचिन्हे' चे विडंबन)
जेंव्हा काव्य लिहावयास जगती प्रारंभ मी मांडिला,
तारा, चंद्र, फुले, मुले किति तरी वस्तू लिहाया पुढे,
अर्धांगी पुढती करून कविता नावे तिच्या धाडिली,

तेव्हा 'स्वल्पविराम' मात्र दिसतो स्वच्छंद चोहीकडे !
झाले काव्य लिहून - यास कुठल्या धाडू परी मासिका?
याते छापिल कोण? लावू वशिला कोठे? कसा नेमका?
रद्दीमाजि पडेल का? परत वा साभार हे येईल?
सारे लेखन तेधवा करितसे मी 'प्रश्नचिन्हा' कुल!
शिंकुनि अहह! देइल त्यापुढे,

अर्धे काम खलास होइल अशी साक्षी मनी वाटली !
कैसा हा फसणार डाव? कविता छापून तेव्हाच ये !
केला 'अर्धविराम' तेथ; गमले तेथून हालू नये !
केले मी मग काव्यगायन सुरू स्वच्छंद ज्या त्या स्थळी !
झाली मासिकसृष्टि सर्व मजला कालांतरे मोकळी,
त्या काळी मग होतसे सहजची 'उद्गार' वाची मन !
माझे 'गायन' ऐकताच पळती तात्काळ श्रोतेजन !
ही एकेक समर्थ आज असती न्याया स्मशानांतरी -
डेंग्यू, प्लेग, मलेरिया, ज्वर तसे अन् इन्फ्लुएन्झा जरी
सर्वांचा परमोच्च संगम चिरं जेथे परी साधला,
देवा, 'पूर्णविराम', त्या कविस या देशी न का आजला?

.....................................................................................................................................

परीटास........
परिटा येशिल कधी परतून?
काल दिलेल्या कपड्यांमधले दोन चार हरवून! परिटा...
सद‍र्यांची या इस्तरिंने तव चाळण पार करुन! परिटा...
कोट रेशमी लग्नामधला मानेवर उसवून! परिटा...
उरल्या सुरल्या गुंड्यांचीही वासलात लावून! परिटा...
बारिकसारिक हातरुमाला हातोहात उडवून! परिटा...
रुमाल जरीचे आणि उपरणीं महिनाभर नेसुन! परिटा...
खमिसांची ही धिरडी खरपुस भट्टीमधें परतून! परिटा...
तिच्या भरजरी पैठणीची या मच्छरदाणी करुन! परिटा...
गावांतील कपड्यांची सगळ्या गल्लत छान करुन! परिटा...
सणासुदीला मात्र वाढणे घेई तुझे चोपुन!
कषाय-पेय-पात्र-पतित मक्षिकेप्रत
परिटा येशिल कधी परतून?

....................................................................................................................................

अयि नरांग-मल-शोणित-भक्षिके,
गात स्वैर फिरतात सुलक्षणी
जनु-विनाशक-जंतु-सुरक्षिके!
असु-परीक्षित-हारक-तक्षिके,

'क्या हुवा अफसोस!' मक्षिके
या प्रभातसमयास मंगल,
चमकती दंवमौक्तिक निर्मल,
गात पक्षिगण हा गगनी फिरे,

पण दशा तव काय अर-अरे!
ओसरीवरुनि या तव मैत्रिणी
करीत 'दत्तु-भट' काय तपासणी
परि तुला न बघती मुळि ढुंकुनी

'संकटी जगि कुणा न असे कुणी!'
मंडई नव्हति का तुज मोकळी
की मिठाइ 'मघुरा-भुवनांतली,
नव्हति का 'उपहार-गृहे' खुली,
म्हणुनि आलिस शहरातिल बोळ ते,

मनुजवस्तित आलिस का इथे!
म्हणुनि घाबरुनि आलिस तू झणी!
तेवि खालिवर जासि अयाई!
शर्कराकण येथिल सांडले

सेवुनी न तुज सौख्य जाहले?
की 'यमी' करिंचे गुळखोबरे,
शमवि भूक न काय तुझी बरे?
पेय बोलुनिचालुनि घातकी,
बुडविते बघ भारतियास की l

या अशा व्यसनात विलायती,
अडकता फळ दारुण शेवटी !
नर जसा बुडतो भवडोही
काडि वाचवि जरी बुडत्याला,
अहह, आम्रफल-मोसम येईल,

काडिचा न परि आश्रय गे तुला!
स्थिति तुझी करुणास्पद ही अशी.
बघु तरी उघड्या नयनी कशी?

अंगि तेवि भरले भयकापरे,
आणि त्यात निवला न चहा बरे!
हाय! सोडुनि जाशिल ना अम्हा,
छे, सले नुसती मनि कल्पना?

समिप पाउसकाळहि पातला,
आणि तू निघुनि जाशिच आजला!
अम्हि असू परि तू नसशील
पेयपृष्ठि उठली इतुक्यात,

फेकु सालटि चोखुनि चोखुनि,
तुजविना पण जातिल वाळुनी
तुजविना कवि-मुखे दिसतील की,
भृंगहीन कमळांसम ती फिकी,

कौन्सिलात, सभासद आणी,
मारतील कवणा तुजवाचुनी?
राजकारण रोज नवे नवे,
राष्ट्रभक्त करण्यास तयार हे.

त्या इशारत कोण तरी गडे?
यापरी नव-तरंग मनात
येउनी ह्रदय होय कंपित.
मंद -श्वास,-लहरीसह लाट!

..............................................................................................................


फड फड फड पंखा हालवी ती तराया,
तडफड बहु केली जाहले कष्ट वाया,
मिटवुनि इवलेसे पाय, ती शांत झाली,
अहह, तडक आणी खालती खोल गेली!
टाकुनी लांब सुस्कार, उमाळा दाबुनी उरी,
चहा तो शांत चित्ताने प्राशिला वरचेवरी.
...........................................................................................................


श्यामले -

तू छोकरी, नहि सुन्दरी । मिष्कील बाल चिचुन्दरी,
खग्रास चंद्र मलीन मी । तू कोर ताशोव सिल्व्हरी !
काळा कडा मी फत्तरी । तू काश्मिरांतिल गुल-दरी !

पाताळिंचा सैतान मी । अल्लाघरींची तू परी,
तू मद्रदेशिय श्यामला । मी तो फकीर कलन्दरी !

मैदान मी थरर्पाकरी । तू भुमि पिकाळ 'गुर्जरी,
अरबी समुद्रहि मी जरी । तू कुद्रती रसनिर्झरी !

आषाढिंचा अन्धार मी । तू फाल्गुनी मधुशर्वरी !
पँटीस तू, कटलेट मी । आँम्लेट मी, तू सागुती,

बेसूर राठ 'सुनीत' मी । कविता चतुर्दश तू खरी,
'हैदोस' कर्कश मी जरी । 'अल्लाहु अक्बर' तू तरी!

माजूम मी, तू याकुती । मी हिङ्ग काबुलि; तू मिरी,
अन् भाङ्ग तू चण्डोल' मी, । गोडेल मी, तू मोहरी !

मी तो पिठ्यातील बेवडा । व्हिस्कीतली तू माधुरी,
काडेचिराइत मी कडू । तू बालिका खडिसाखरी

जरी मूल हे कमरेवरी । तरी तू मला छकुल्यापरी !
कांदे-बटाटे-भात मी । मुर्गी बिर्‍यानी तू परी !

अक्रोड मी कन्दाहरी । तू साहर्‍यातील खर्जुरी,
इस्तम्बुलीय अबीर मी । नेपाळची तू कस्तुरी !

मी घोङ्गडे अन् लक्तरी । मख्मूल तू मउ भर्जरी,
बेडौल वक्र त्रिकोण मी । तू लम्बवर्तुळ गे परी ।

तू वाढली कितीही जरी । मज वाटसी पण छोकरी,
गाम्भीर्य आणि वयस्कता । जरि ही तुझ्या मुखड्यावरी,

घे माडगे, घे गाडगे । घे गुलचमन् घे वाडगे,
स्मरते मला तव सानुली । मूर्ती मनोहर पर्करी !

लव हासरी, लव लाजरी । लव कावरी, लव बावरी,
चिनिमातिची जणु बाहुली । मउ शुभ्र, सफेत नि पांढरी !

चल सोनुले, छकुले, घरी । वात्सल्य गे दाटे उरी,
निर्दोष तो देशील का । पापा छुपा फिरुनी तरी?


तू दोन इच्च जरी दुरी । फलाङ्ग भाससि गे परी,
चल श्यामले, म्हणूनी घरी ! बसु खेटुनी जवळी तरी !

ताम्बूल घे, आम्बील घे, । घे भाकरी, घे खापरी !
दोघेही दिनरात्र ना खरडतो काहीतरी आपण,

किति थाम्बु मी? म्हण 'होय' ना । खचली उमेद बरी उरी,
झिडकारुनी मजला परी । मत्प्रीतिचा न 'खिमा' करी !

(वृत्त - तुङ्गभद्रा, मिथुनराशी, राक्षसगणी)

......................................................................................................................


'माझे अक्षर का कुणास उमगे-आला जरी तो खुदा
ब्रह्याच्याहि पित्यास का समजणे काव्यार्थ तूझा कदा!
येती कागद जे समीप करणे त्यांची मला नक्कल
तूही ना नकला अशाच करिसी-लागे न ज्या अक्कल!


आणे, पै, रुपये हिशेब करितो-ज्यांचे न हो दर्शन,
नाही पाहियली तरी करिसि ना ताराफुले वर्णन?
पोटाचे रडगान मी रडतसे वेळी अवेळी जसे
चाले संतत काव्यरोदन तुझे तीन्ही त्रिकाळी तसे!'
'मित्रा, हे सगळे खरे,' कवि वदे, 'तुझ्याप्रमाणे पण-
प्रेमाचे हे मार्ग गुलबी जाणती नवतरणे

.........................................................................................................................


प्रेमाचा गुलकंद …
बागेतुनी व बाजारातुनी कुठुनी तरी ‘त्याने’
गुलाबपुष्पे आणून द्यावीत ‘तिज’ला नियमाने

कशास सान्गू प्रेम तयाचे तिजवरती होते?
तुम्हीच उकला बिन्ग यातले काय असावे ते!

गुलाब कसले प्रेम पत्रीका लाल गुलबी त्या
लाल अक्षरे जणू लिहलेल्या पाठोपाठ नुसत्या
प्रेमदेवता प्रसन्न हो! या नैवद्याने

कधी न त्याचा ती अवमानी फ़ुलता नजरणा
परी न सोडला तिने आपुला कधीही मुग्धपणा
क्षणात घेउन ये बाहेरी कसलीशी बरणी

या मौनातच त्यास वाटले अर्थ असावे खोल
तोही कशाला प्रगट करी मग मनातले बोल

अखेर थकला ढळली त्याची प्रेमतपश्चर्या
रन्ग दिसे ना खुलावयाचा तिची शान्त चर्या

धडा मनाचा करुन शेवटी म्हणे तिला ‘देवी’
दुजी आणखी विशेषणे तो गोन्डस तिज तो लावी

“बान्धीत आलो पुजा तुज मी आजवरी रोज
तरी न उमगशी अजुन कसे तू भक्ताचे काज

गेन्द गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले
सान्ग सुन्दरी फ़ुकट का सगळे गेले?”

तोच ओरडून त्यास म्हणे ती “आळ ब्रु था हा की
एक पाकळी ही न दवडली तुम्ही दिल्यापैकी”
हे बोलूनी त्याच पावली आत जाय रमणी

म्हणे “पहा मी यात टाकले तुमचे ते गेन्द
आणि बनवला तुमच्या साठी इतुका गुलकन्द

का डोळे असे फ़िरवता का आली भोन्ड
बोट यातले जरा चाखुनी गोड करा तोन्ड”

क्षणैक दिसले तारान्गण त्या परी शान्त झाला
तसाच बरणी आणि घेवुनी खान्द्यावरी आला

“प्रेमापायी भरला” बोले “भुर्दन्ड न थोडा
प्रेमलाभ नच, गुलकन्द तरी कशास हा दवडा?”

याच औषधावरी पुढे तो कसातरी जगला
‘दय थाम्बुनी कधीच ना तरी असता तो’ खपला!

तोन्ड आम्बले असेल ज्यान्चे प्रेम निराशेने
प्रेमाचा गुलकन्द तयानी चाखूनी हा बघणे

उगवला चंद्र पुनवेचा !
मम हृदयी दरिया ! उसळला प्रीतिचा !
दाहि दिशा कशा खुलल्या,

वनिवनी कुमुदिनी फुलल्या,
नववधु अधिर मनी जाहल्या l

कोठे गुंतलासी राया, कोणाला ताराया ?
प्रणयरस हा चहुकडे ! वितळला स्वर्गिचा ?


संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – बकुळ पंडित
नाटक – पाणिग्रहण (१९४६)
राग – मालकंस (नादवेध)

.................................................................................................................................

किती पांडुरंगा वाहू संसाराचा भार ?
लक्ष चौऱ्याऐंशींचा नको आता येरझार

लोखंडाचे गुणदोष बघे का परिस
लेकराची कासावीस माहीत आईस !

पाण्यामाजी तूच देवा, तारीले पाषाण
ब्रीद तुझे दीनानाथा, पतितपावन !

कठीण तो मायापाश सुटेना कोणास
कपाळीचा टळेनाही कोणा वनवास !

अनाथांचा नाथ तुला बोलतात संत
काकुळती आलो आता नको बघु अंत

प्रेम हे वंचिता । मोह ना मज जीवनाचा !
पंढरीच्या राया, तुझ्या दंडवत पाया !

संगीत – वसंत देसाई
स्वर – ज्योत्सना मोहिले
नाटक – प्रीतिसंगम (१९७१)

...........................................................................................

प्रिती सुरी, दुधारी !
निशिदिनि सलते जिव्हारी !

सुखवी जिवास भारी !
मधुर सुखाच्या यातना,

व्याकुळ करिती सतत मनाला !
अमृताहुनी विषारी !


संगीत – श्रीनिवास खळे
स्वर – बकुळ पंडित
नाटक – पाणिग्रहण (१९४६)

...........................................................................................
 
द्या कुणि आणूनी । द्या मला प्याला विषाचा !
प्रीतिचा फसवा पसारा,

भरली इथे नुसती भुते,
कोणि नाही जगि कुणाचा !
...........................................................................................
 
यमुनाजळि खेळू खेळ कन्हैया, का लाजता ?
हलती कशा या लाटा, फुलतो शरीरी काटा

का हो दूर रहाता ? प्रेमगंगा ही वाहाता
घ्या उडी घ्या, का हो पाहता ? चला ना !
बहुमोल अशी ही वेळ अरसिका का दवडिता ?

संगीत – दादा चांदेकर
स्वर – मीनाक्षी
चित्रपट – ब्रम्हचारी (१९३८)

..........................................................................................
कवि आणि कवडा -
 
माडीच्या खिडकीमधे कवि कुणी होता सुखे बैसला
'भिक्षांदेहि' करावयास कवडा आला कुणी त्या स्थळा!
हातांत घालूनी हात तयांच्या राहू ||
'का हो काव्य नवीन काय लिहिता?'
त्याते पुसे खालुनी सांगे नाव कवी;
हसून कवडा हो चालता तेथुनी!
चार दिवसांनी मासिकात येई
काव्य कवड्याचे; नाव तेच त्याही!
रसिक म्हणती, 'वा! और यात गोडी!'
कवि हासुनि आपुले काव्य फाडी!

(एक खरी गोष्ट)
................................................................................................................

मज आवडते मनापासुनी शाळा |
लावीते लळा हि..जसा माउली बाळा ||
हासर्‍या फुलांचा बाग जसा आनंदी |
ही तशीच शाळा, मुले इथे स्वच्छंदी ||
हासुनी, हासुवुनी, खेळुनी सांगूनी गोष्टी |
आम्हांस आमुचे गुरूजन शिक्षण देती ||
हे प्रेम कराया किती भोवती भाऊ! |
येथेच बंधूप्रेमाचे, घ्या धडे |
मग देशकार्या करण्याला, व्हा खडे ||
पसरवा नाव शाळेचे, चहूकडे |
मग लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा ||

जी देशासाठी तयार करीते बाळा |
लावीते लळा हि..जसा माउली बाळा
मज आवडते मनापासुनी शाळा ||
........................................................................................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा