गुरुवार, ६ एप्रिल, २०१७

एक उनाड दिवस .....


"उंडग्याची व्याली गाय, खांद्यावर वासरुं, जत्रेला जाय..... "
माझी आई, आजी तिच्या संभाषणात ही म्हण अधून मधून वापरायची. तेंव्हा तिचा अर्थ कळत नसे. आता तिचा अनुभव येतो. बेफिकीर उनाड माणसाला कशाचीही काळजी नसते, तो आपलं खुशाल फिरत राहतो. हे वेड त्याच्या डोक्यात इतकं भिनलेलं असतं की गोठ्यात गाय जर व्यालेली असली तर तो पठ्ठ्या तिचं तान्हं वासरू खांद्यावर टाकून जत्रेला जातो. मीही यातलाच एक...

माझ्या अशाच एका उनाड दिवसाची ही कथा. सकाळी घाई घाईत सर्व आवरून सवरून घर सोडलं, सिव्हील कोर्टापाशी मित्रवर्य फारूक, अभिजित माझी वाट बघत थांबले होते. गाडी तिथेच सावलीत लावून अक्कलकोटकडे जाणाऱ्या वडाप जीपने आमचा प्रवास सुरु झाला. काही वेळ ठीकठाक बसण्यातच गेला. दहा पंधरा मिनिटात गाडीने सोलापूर सोडले. घामेजल्या अंगाला मोकळा वारा लागला तेंव्हा कुठे हायसं वाटलं. सहप्रावासीही थोडं अंग मोकळं करून बसले. 

काही अंतर पार झालं आणि मागच्या सीटवरच्या कोपऱ्यात बसलेल्या एका लेकुरवाळया बाईला काही वेळानंतर उचमळू लागलं. तिचं बघून तिच्या बाळालाही त्रास सुरु झाला. ते पाहून त्यांच्या बाजूला बसलेल्या साळकाया म्हाळकायांनी ड्रायव्हरकडे गाडी थांबवण्याचा तगादा लावला. 'त्या बाईला मागे बसवा' असा धोशा सुरु केला. गाडीचा ड्रायव्हर हा बहुधा गाडीमालक असावा, त्याच्या कानावरून वारं गेल्यासारखा तो स्थितप्रज्ञ अवस्थेत होता. त्या बाळाला जेंव्हा जास्तीच त्रास सुरु झाला तेंव्हा यांचा आवाज वाढला. 'त्या बाईला खाली उतरवा नाहीतर आम्ही उतरतो' असा पवित्रा त्यांनी घेतल्यावर ड्रायव्हरने गाडीचा वेग कमी केला, तोवर त्या लेकराचा आणि त्याच्या आईचा जीव घायकुतीला आलेला. भर उन्हात अर्ध्या रस्त्यातच उतरवले तर काय करायचे ही  चिंता तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती. शेवटी मी मध्ये पडलो. ही खोड अंमळ जुनीच, या खोडीमुळेच आई मला नेहमी म्हणत असते , "याला लष्कराच्या भाकऱ्यांची लई हौस, तेव्हढंच ध्यान घरात दिलं असतं तर राजाराणीचा संसार होईल, पण पाय टिकलं तर जाग्येवं! ". गाडीतल्या महिलांना चार शब्द सांगितले,  पुढील प्रवासात ती लेकुरवाळी तिच्या गावापाशी उतरेपर्यंत गाडी निशब्द झाली होती.

काचेच्या खिडक्यातून आत येणारं ऊन एकटंच बोलत होतं आणि वेगाने फिरणारी गाडीची तापलेली चाकं  कान देऊन ऐकत होती. खाच खळग्यांनी भरलेला रस्ता अधून मधून तलम झाला की मध्येच सारंगी वाजवायचा तर मोठाले खड्डे आले की जीवाचा पखवाज होऊन जायचा. बघता बघता प्रवास संपला. एकदाचे अक्कलकोटी पोहोचलो, कामही उरकले आणि गणेश दिवाणजींच्या घराकडे वळलो. दिवाणजी माझ्या सहृदयी मित्रांपैकी एक. मीतभाषी भला माणूस. येणारया प्रत्येक माणसाचं आदरातिथ्य हसत खेळत मोकळ्या मनाने करणारा राजा माणूस. आम्ही येणार याचा निरोप दिलेला असल्याने अक्कलकोटचेच आणखी एक मित्र प्रशांत गुरवही आले. ही सगळी साध्यासुध्या वेशातली मोकळी ढाकळी मंडळी. काय करू आणि काय नको असं त्यांना झालेलं. त्यांच्या कौलारू घरातली थंड सावली अनुभवली. घराबाहेरच्या पडवीत पडलेला लिंबाच्या पानाचा वाळून गेलेला गडद पिवळा पाचोळा वाऱ्यावर उडत होता, सुर्रकन सूर घेत अवतीभवती फेर धरत होता. गायत्रीनं दिलेलं लिंबाचं गोड सरबत गळयाखाली उतरताच तरतरी आली. ख्याली खुशालीची औपचारिकता आटोपली आणि शेताकडची वाट धरली.

सगळी सृष्टी चैत्रागमनाच्या तयारीत होती. अधूनमधून भकास माळरानं लागत होती, बांधावरची नारळाची रेखीव रांगही मधूनच नजरेस पडायची. उन्हाची धग चांगलीच जाणवत होती. रानोमाळ स्तब्ध उभे असलेले मोठमोठाले वृक्ष येणाऱ्या जाणाऱ्या पांथस्थाकडे डोळे लावून बसलले. निळ्यापांढऱ्या आकाशात उंचावर घारींचीच हालचाल दृष्टीस पडत होती. आसमंतात एक नीरव शांतता भरून आलेली. जणू एखादा गदगदलेला वृद्ध, घरी परतणाऱ्या जवान पोरासाठी आतुर होऊन बंधापाशी काठी टेकून बसलेला तसं सगळं वातावरण. मधून एखाद दुसरी वस्ती आणि तिथलं चैतन्य नजरं पडत होतं. हास्य विनोद करत वेळ भुर्रकन निघून गेला, दिवाणजींचे भादुले बुद्रुक गाव जवळ आलं आणि हिरवं पिवळं शेत नजरेच्या टप्प्यात आलं.

एव्हाना उन्हाचं चांदणं मुठीत घेऊन सूर्य रांगत रांगत माथ्याशी आलेला. सावल्यांचा लपंडाव जोमात आलेला. चैतन्याने भरलेले चराचर खुणावत होते आणि आम्ही चुंबकागत त्याच्याकडे ओढले जात होतो. हाडाच्या शेतकऱ्याला दुसऱ्याच्या शेतात गेलं की मातीपासून ते जनावराच्या वाणापर्यंतच्या चौकशा सुचतात. माझ्या डोक्यात गोळा झालेले हे प्रश्न बाहेर पडण्याआधीच दिवाणजींच्या शेतात शेतमजुरी करणारया जोडप्याची चिमुरडी गोड पोर यशोदा धावत समोर आली. तिला पाहून डोक्यातले त्याच त्या शिळ्या विचारांचे गाठोडे एका क्षणात बाजूला ठेवले आणि तिलाच कडेवर घेतले. तिच्याशी गप्पाटप्पा केल्या. अगदी चुणचुणीत पोर होती ती. जवळच्याच निवासी शाळेत शिकते. त्या दिवशी सुट्टीला जोडून हट्ट करून शेतात राहिली होती. तिला शाळाही आवडते आणि शेतही आवडते. शेतातली गुरं वासरं आणि झाडं झुडपं हेच तिचे सवंगडी. कारण आसपास तिच्या वयाचे कोणीच नव्हते. तिच्या घरी टीव्ही म्युझिक सिस्टीम असलं काही नव्हतं. निसर्ग हाच तिचा स्क्रीन होता, शेत शिवार हाच तिचा कॅनव्हास, पानापानातुन वाहणारा मंजुळ वारा हेच तिचं संगीत होतं अन मुके अश्राप जीव हेच तिचे दोस्त. तिच्या घरी अन्य कुठलं चैनीचं साधनही नव्हतं, गरजा कमी असल्या की भौतिक साधनांची आस कमी असते असं तिचं इवलसं विश्व होतं. कडेवरून यशोदा खाली उतरली आणि इकडं तिकडं नजर टाकीत आम्ही पुढे निघालो.

माठातलं गार पाणी पिऊन झाल्यावर एका मोठ्या चिंचेच्या झाडाखाली अंथरलेल्या चवाळयावर बस्तान मांडल्यावर गप्पांना मस्त रंग चढला. पूर्वी पानाची चंची होती जी माणसाच्या हातातून निघून थेट काळजात उतरायची आणि माणसांना बोलतं करायची. आता माणसंच एकमेकाच्या जवळ येत नाहीत त्यामुळे लोकांनी चंची ठेवणं बंद केलीय. सुदैवाने आम्हाला गप्पा मारायला चंचीची गरज पडली नाही. बोलण्यासाठी खंडीभर विषय असल्यावर गावाकडच्या बडबडया माणसांना आणखी काही लागत नाही. मग 'म्हैस धार किती देते इथे पासून ते कालवड किती दिवसाची आहे' इथेपर्यंत प्रश्न विचारले जातात. 'जुंधळा किती होणार, वरल्या रानात सरीचं काम कधी केलं, रोजंदारीला किती मजूर आहेत, मजूर मिळतात का, मजुरी देणं परवडतं का, रानात घरची किती माणसं राबतात, तुमच्याकडे ऊन माइंदळ ज्यास्तीच आहे किंवा कसं, विहिरीला पाणी किती परस शिल्लक आहे, पाण्याची काय सोय आहे, ठिबक किती एकरावर लावलंय, ऊस खोडव्यातला आहे की निडव्यातला, तूरीला भाव किती आला, हरभरा किती लावलाय, गुरांना चाऱ्याची सोय काय, किती पेंड कडबा आहे, मकवण कधी लावलंय अशा एक ना हजार प्रश्नांची देवाणघेवाण झाली. इतर अवांतर गप्पाही झाल्या. गावरान थाटात मस्त पोटपूजाही झाली. पोटपूजा झाल्यावर पुन्हा गप्पांचा फड रंगला. मग जरा अंग मोकळं करण्यासाठी पाय झटकले...

बघता बघता सगळं रान पायाखाली घालून झालं. जित्राबांची पाहणी करून झाली. गणेशजींचे भाऊ संतोष हे त्या शेताचे कारभारी. त्यांच्याकडे पाचेक म्हशी होत्या, प्रत्येकीची नावं गोड होती. मालक तोंडभरून त्यांची स्तुती करत होते आणि त्या देखील दावणीतलं आमुणं सोडून मालकाकडे तोंड वळवून उभ्या होत्या, जणू काही 'एक साथ नमस्ते' ! म्हशी गावरानच होत्या, जाफराबादी अवचिंदी नव्हत्या त्यामुळेच हा लोभ असावा. त्यांची दोन तीन वासरं होती. त्यातले एक तीन चार आठवडयाचे होते. त्यात एक रेडी दिकून होती. वासरापेक्षा रेडीच जास्त चारा खाते असं ते लाडाने सांगत होते. एखाद्या आईला जसे आपल्या पोराबाळाचे अप्रूप असते तसे बळीराजाचे असते, त्याला सगळया गुराढोरांचे फार अप्रूप. त्यांच्या विषयी जरा बोलतं करून बघा त्याचा चेहरा कसा खुलतो तो. गडी रंगात येऊन नुसता खडाखडा बोलू लागतो.

याला संतोषजी कसे अपवाद असणार ? त्या सर्व गुरापैकी एका म्हशीबद्दल त्यांना विशेष आपुलकी होती. त्याचे कारणच तसे होते. ते कोठेही गेले तरी ती त्यांच्या मागे जायची. नुसता हाक द्यायचा अवकाश गोठ्यातून दावं सोडून धन्यासमोर जाऊन उभी राही. त्यांच्या हाताशिवाय तिची कासदेखील सुटत नव्हती. यावरून एक आठवण सांगावीशी वाटते, माझा एक भाचा आहे प्रकाश नावाचा. सुमन त्याची पत्नी. कडेगावला असताना यांच्या घरी एक म्हैस होती, सुमनने हात लावला तरच ती धार देई. ती नसली की हीची कास तुंबलेली. यांची बदली झाल्यावर गाव सोडताना म्हैस दुसऱ्याच्या घरी दिलेली. पण तिथं गेल्यावर म्हैस धार द्यायची बंद झाली. मग त्या नव्या धन्याने निरोप धाडला. ही तिथे गेली, म्हशीने धार द्यायला सुरुवात केली. असं दोन तीन वेळा झालं, म्हशीचे मालक दोनदा बदलून झाले पण सुमनची सवय मोडेपर्यंत तिने काही दुध दिलेच नाही. शेवटी तिसरा गोठा तिला जेंव्हा मानवला तेंव्हा हा प्रश्न सुटला. सुमन मांजरीशी बोलते, पाखरांशीही बोलते. अतिसंवेदनशील असणारया लोकांनाच हे जमते. तसेच इथेही झाले होते. हे मुके जीव मालकाच्या जीवनाचे अविभाज्य घटक झाल्याचे ते बोलके लक्षण होते. बघता बघता गप्पांचा ओघ ओसरला, सूर्यकिरणांचीही आवराआवर सुरु झालेली. एव्हाना घराकडून एक फोन येऊन गेलेला. 'अंधारून यायच्या आधी लवकर या'चा सविताचा नेहमीचा काळजीचा स्वर पलीकडून कानात रुंजी घालत होता.

तटतटलेली जुंधळयाची ताटं अन तरतरून डवरलेलं हिरवं शिवार डोळ्याआड करण्याची वेळ जवळ आलेली. रान तुडवत पुन्हा वस्तीवरच्या घरापाशी पोहोचलो. तिथे जाऊन बघितलं तर यशोदामैय्या झोपी गेलेली. तिची माय माऊली कौतुकाने सांगत होती की, 'दिसभर खेळली बगा आणि पायात कशाचा तरी तुकडा घुसला म्हणून रडत आली आणि रडता रडताच झोपी गेली.' पोटात पाय दुमडून शांतपणे झोपी गेलेल्या यशोदाकडे बघताना सुखात असलेली आणि 'पाहिजे'ची यादी कधीही न संपणारी शहरी मुले काही काळासाठी डोळ्यापुढं तरळली तेंव्हा फार वाईट वाटले. यशोदासारख्या वाडया वस्त्यावरील फुलांचा खरा पालक हा निसर्गच असतो जो त्यांचे जीवन अनुभवाने समृद्ध करतो. मी मात्र करंटा रिकाम्याच हाताने तिच्या घरी गेलो आणि परतताना खूप काही सोबत घेऊन आलो, जे माझ्या हातभर खिशात आणि मुठभर काळजात मावत नव्हते.

जरा पुढे आल्यावर शेताकडून मुख्य रस्त्याला लागताना वाटेत एक गुराखी पोर दिसली. कळकटलेल्या कपड्यातली, धुळीने माखलेली, विस्कटलेल्या केसांची, अनवाणी चालणारी ती पोर पुढे होती आणि तिच्या मागे दोन शेळ्या अन त्यांचं एक करडू रमत गमत टकाटक उड्या मारत चाललेलं. हरणागत उड्या मारणारं ते करडू पाहून त्याला उचलून घेण्याचा मोह झाला नसता तर नवल झाले असते. मग काय अस्मादिकांनी त्याला हळूच उचलून घेतले. छातीशी धरल्यावर ते फार चुळबुळ करत होते. त्याच्या मलमली अंगावरून मायेने हात फिरवला तसं ते शांत झाले. त्याच्यासोबत फोटो काढला आणि त्याला परत रस्त्यावर सोडले तसे ते टणाटण उड्या मारत त्या मुलीच्या मागे धावत गेले. एव्हाना दिवस कलायला लागला होता. किरणे तिरपी झाली होती. त्यात तरंगणारे धुळीकण स्पष्ट दिसत होते. दिवाणजींच्या शेताच्या खालच्या अंगाला मोठी उतरण होती. तिच्यावर सांजेने धुक्याची दुलई पांघरली होती. दिगंताला लाल जांभळे रंग गोळा झाले होते. अस्ताला जाणारा सूर्य उद्या परतण्याचं आश्वासक अंधारचिन्ह मागे ठेवून पश्चिमेत लीन झाला होता.

अक्कलकोटच्या शीवेतून बाहेर पडण्याच्या कोपरयावरती, गर्दीने फुललेल्या बागवान चौकात लज्जतदार चहाच्या एका कँटीनपाशी आम्ही विसावलो तेंव्हा बऱ्यापैकी अंधार झाला होता. दूरवरच्या एका मस्जिदीतुन येणारा अजानचा आवाज तिथल्या वातावरणाला भारून टाकत होता. प्रशांतजी तिथली स्थानिक माहिती देत होते. कुठे काय घडले होते यावर बोलत होते आणि शहरातील ऐतिहासिक बारकावे सांगत होते. माझे कान त्यांच्याकडे होते तर चित्त घराकडे लागले होते. चहाची तलफ पुरी झाल्यावर निघताना त्यांची गळाभेट घेतली. राम लक्ष्मणाची ही जोडी कायम माझ्या स्मुतींच्या कुपीत राहील. 'पुन्हा निवांत भेटीस येण्याचे' आश्वासन त्यांनी माझ्याकडून घेतले आणि मगच निरोप दिला. अक्कलकोट सोलापूर विनाथांबा बसमध्ये बसलो तेंव्हा लक्षात आले की माझी एक बहिण आणि भाऊजी अमित थोरात जे याच गावात राहतात त्यांच्याकडे जायचे राहून गेले. आता त्यांच्याकडे गेलो तर फार परतायला फार उशीर होईल याची खुणगाठ बांधून तिथून काहीशा अपराधी मनाने परत निघालो. खडखडाट करत, खिडक्यांच्या तावदानांचा आवाज करत लाल केशरी रंगाची पत्र्याची गाडी अंधार कापत माझ्या शहराच्या दिशेने निघाली. काही क्षणात ध्यान लागले. छानशी झोप झाली आणि सोलापूर जवळ आल्यावरच जागा झालो. सिव्हील कोर्टापाशी लावलेली दुचाकी घेऊन घराकडे निघालो, तेंव्हा डोक्यावर लख्ख चांदणं चमचमत होतं. कदाचित ते माझ्या मित्रांच्या घरादाराजवळून माझ्या पाठीमागे आले असावं, मला सुखरूप घरी पोहोचवण्याचं आणि  माझी निगराणी करण्याचं काम माझ्या मित्रांनी या लुकलुकत्या चांदण्यांवर सोपवले असावं....

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा