शनिवार, २२ एप्रिल, २०१७

सौतन - पडद्यामागची करुण कथा ...




1967 चे वर्ष होते. तरुण सावनकुमारला चित्रपट सृष्टीत आपलं नाव कमवायचं होतं, इतरांपेक्षा वेगळं काही करून दाखवायचं होतं. अभिनेता संजीवकुमारला नायकाच्या भूमिकेत ठेवून त्याने ‘नौनिहाल’ हा आगळा वेगळा सिनेमा निर्मिला मात्र बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा सपशेल पडला. सावनकुमार दुःखी झाला. मात्र तो हार मानणाऱ्यापैकी नव्हता. त्याने एक कथा लिहिली होती, त्यावर त्याला सिनेमा बनवायचा होता नि त्याचे दिग्दर्शनही स्वतःच करायचे होते. त्याच्या मित्राने कथा ऐकली नि त्याला सांगितले की या कथेसाठी नायिका म्हणून मीनाकुमारीच सर्वश्रेष्ठ ठरेल. दुसऱ्याच दिवशी सावनकुमारने मीनाकुमारीला फोन केला. मीनाच्या बहिणीने फोन उचलला. सावनने आपलं काम सांगितलं. त्याच दिवशी दुपारी मीनाने त्याला घरी बोलवलं. घरी जाताच त्याने आपली ओळख करून दिली आणि आपलं कामही सांगितलं. मीनाकुमारी थक्क झाली कारण तिच्यापेक्षाही वयाने लहान असणारा आणि केवळ जुजबी अनुभव असणारा तरुण तिला कथा ऐकवत होता. कथा ऐकून आणि त्या तरुणाविषयीच्या अकस्मात भावना आकर्षणातून तिने होकार दिला. सिनेमाची तयारी पूर्ण झाली. चित्रिकरण सुरू झाले. या दरम्यान त्यांच्या दोघांमध्ये एक प्लेटोनिक नाते तयार झाले जे देह आणि लैंगिक जाणिवांच्या पुढचे होते. सिनेमाचे शुटींग सुरू झाले नि मीनाकुमारीची तब्येत वरचेवर बिघडू लागली. 2 डिसेंबर 1971 ला मीनाकुमारीवरतीच अखेरचा शॉट शूट झाला. त्यानंतर तिची प्रकृती इतकी खालावली की तिच्या मृत्यूच्या वावड्या उठू लागल्या. तिच्या आयुष्यातील अखेरच्या काळात याच सावनकुमारने तिची सेवा सुश्रूषा केली. तिच्या रक्ताच्या उलट्या तो हाताने साफ करायचा. सिनेमा पूर्ण होऊनदेखील रिलीज होण्यास आर्थिक अडथळे येत होते. मीनाकुमारीने तिच्या नावावर असलेला बंगला विकून त्याला पैसे दिले. 31 मार्च 1972 रोजी तिचे देहावसान झाले. सावनकुमार अतिव दुःखात बुडाला. मीना त्याची पत्नी नसली तरी त्याचे सर्वस्व होते, त्याच्यासाठी तीच देव होती; तीच मसिहा होती. मीनाच्या मृत्यूनंतर आठ महिन्यांनी 22 नोव्हेंबर 1972 मध्ये हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाचे नाव होते ‘गोमती के किनारे’! सिनेमा दणकून आपटला! सावनकुमारला याचे विलक्षण दुःख झाले. मीना आणि त्याच्या प्रेमभावनेविषयी त्याने कविता लिहिली. त्यातलंच एक गीत त्याला अजरामर करून गेलं! त्यासाठी आपल्याला आणखी एक दशक पुढे जावे लागेल!

1982 चा सुमार असावा. फिल्मसिटीत 'सौतन'चे शुटींग चालू होते. आपली लाडकी पत्नी रुकू (टीना मुनीम) हिच्यापासून दुरावला गेलेला श्याम (राजेश खन्ना) सैरभैर होऊन जातो. आपल्या मनातले वादळ शांत करण्यासाठी ऑफिसमध्ये स्टेनो म्हणून कामावर असणाऱ्या मुलीला राधाला (पद्मिनी कोल्हापुरे) तिचे वडील गोपाल काकांच्या (श्रीराम लागू) घरी भेटायला येतो असा सीन शूट होत होता. काही केल्या राजेशला तो सीन देता येत नव्हता. सलग तीन दिवस त्याने त्या सीनसाठी घालवले. दिग्दर्शक सावनकुमार टाक नाराज झाले. चौथ्या दिवशी ते राजेशच्या ड्रेसिंग रूममध्ये गेले तर त्याने तिथेच हलका मद्यपानाचा 'डोस' लावायला सुरुवात केली होती. सावनकुमारनी त्याला स्वतःला सावरायला सांगितलं. काही वेळ निशब्द शांततेत गेले. त्याचे डोळे गच्च भरून आले होते, चेहरा विमनस्क झाला होता, केस अस्ताव्यस्त झाले होते. तो हलकेच उठला आणि सावनकुमारना काही कळण्याआधी त्यांना घट्ट मिठी मारली. तो लहान मुलांसारखा ढसाढसा रडला. त्याला शांत व्हायला बराच वेळ लागला. त्या नंतर काही मिनिटांत तो बाहेर आला आणि एका फटक्यात त्याने शॉट ओके केला. कुणाशीही न बोलता सेटवरून तडकाफडकी निघून गेला.
 
या छोट्याशा सीननंतर स्क्रीन-प्ले मधले दृश्य असे होते की, श्याम बाहेरून दार वाजवतो आणि राधा दाराआड असूनही दार उघडत नाही. श्याम खूप गयावया करतो, "आज माझ्या मनातले वादळ शांत झाले नाही तर माझ्या आयुष्याची नौका कधी तरणार नाही" असं रडवेल्या स्वरात आर्जव करतो पण रुकू आपल्यावर रागावेल आणि आपल्यामुळे श्यामचा संसार उध्वस्त होईल म्हणून राधा काळजावर दगड ठेवते. ओलेत्या डोळ्याने थिजून उभी राहते पण काही केल्या दार उघडत नाही. पुढच्या तीन सीनमध्ये श्याम तिथेच घराभोवती फिरत राहतो असे दृश्य होते. यानंतर दोन दिवसांनी सावनकुमारनी फक्त 72 तासांत या सीन सिक्वेन्सला जोडून असणारं संपूर्ण गाणं कोणतेही रिटेक न होता शूट केलं. या गाण्याचे शुटींग सुरु असताना राजेश खन्ना खूप अस्वस्थ होता, त्याला प्रत्येक सीननंतर काही सुचत नसे. तो एकदम अबोल होऊन जायचा. स्वतःत मग्न होऊन राहायचा. त्याची ड्रेसिंग रूम शुटींगच्या ब्रेक-टाईममध्ये सिगार स्मोकच्या धुराडयात कन्व्हर्ट होऊन जायची.

अखेर काही महिन्यांनी 'सौतन' पूर्ण झाला. 3 जून 1983 ला चित्रपट थाटात रिलीज झाला. सिनेमा सुपरहिट झाला पण राजेश खन्नाला याचा फारसा फरक पडला नव्हता. या मागचे कारणच तसे होते. तो या काळात प्रचंड तणावाखाली होता. त्याचे आणि डिम्पलचे, पती पत्नीचे नाते उसवले होते; खेरीज त्याचे सिनेमे एका पाठोपाठ एक करून पडत होते. त्याला त्याच्या सुपर-स्टारडमची फिकीर नव्हती मात्र सच्च्या मायेचा, प्रेमाचा आधार हवा होता. दमलेलं मस्तक टेकवायला छाती हवी होती, हिट सिनेमे नसले तरी चालेल पण हक्काचं माणूस जवळ हवं होतं. या दरम्यानचा कालक्रम सांगतो की, 1982 मध्येच अनिता आडवाणी त्याच्या अत्यंत निकट आली. राजेश तिच्यासोबत त्याच्या 'आशीर्वाद' या आलिशान बंगल्यामधे राहू लागला आणि डिम्पलने वेगळी चूल मांडली. पुढे 1983 मध्ये ‘सागर’ सिनेमाद्वारे तिने इंडस्ट्रीत कमबॅक देखील केले. 'सौतन'मध्ये जे सिनेमात दाखवले गेले होते ते त्याच्या आयुष्यात थोड्याफार फरकाने प्रत्यक्षात घडले होते. नेमके तेच त्याला सहन होत नव्हते. आणि ज्या सीनला तो अडखळत होता कारण त्यानंतरचे जे गाणे होते ते त्याच्या काळजावर वार करून गेले होते. उषा खन्ना यांनी संगीतबद्ध केलेलं नि किशोरदांनी आपल्या अप्रतिम आवाजात गायिलेले ते अजरामर गीत होतं -"ज़िन्दगी प्यार का गीत है इसे हर दिल को गाना पड़ेगा.."

या गाण्यातील प्रत्येक शब्दातून त्याच्या अन्तःकरणाला हजारो दंश होत होते, त्यामुळे खचून गेलेल्या राजेशकडून सॉन्ग सिक्वेन्सच्या आधीचा हा सीन काही केल्या नीट होतच नव्हता. पण ज्या दिवशी त्याने सावनकुमारला मिठी मारली त्या दिवशी त्याच्या मनातले मळभ दूर झाले. त्याच्या मनावरचे ओझे थोडेफार का होईना पण कमी झाले. मग तो उर्वरित शुटींगला आत्मविश्वासाने सामोरा गेला. एकटेपण वाईट असतं. आपल्या मनातील भावना बोलून दाखवण्यासाठी किमान एक तरी जवळचं माणूस प्रत्येकाजवळ अखेरपर्यंत असावं. राजेश खन्नाला हे भाग्य लाभलं नव्हतं. खायला उठणारा एकांतवास आणि पडता काळ हेच त्याचे सर्वात मोठे मित्रसोबती झाले होते. राजेशच्या अखेरच्या दिवसात डिम्पल त्याच्या जवळ आली खरी पण त्यांची मने इतकी दुभंगली होती की, त्याने अनिताला आपल्या आयुष्यातून बाहेर काढले नाही आणि डिम्पलला काळजाच्या उंबरठा पुन्हा ओलांडून आत येऊ दिले नाही. 1969 ला ‘आराधना’ ब्लॉकबस्टर हिट झाला आणि त्यानंतर हा देखणा गुणी अभिनेता एकांताच्या जीवघेण्या सापशिडीतून कसा खाली येत गेला हे कोणाला कळलेच नाही.

‘सौतन’ चित्रमंदिरमध्ये रिलीज झाला होता. अलिशान बादशाही थियेटर असं याचं वर्णन केले जाई ते काही अंशी खरे वाटे कारण थियेटरमधलं अप्रतिम शाही लुक असणारं बांधकाम आणि इंटेरिअर खूप भाव खाई. चित्रमंदिरमध्ये राजेशखन्नाचे बरेच सिनेमे लागले हा योगायोगच. राजेशचे रुबाबदार श्रीमंती थाटातल्या भूमिकांचे इथे वेगळे फील येत. राजेशच्या स्पेशल चाहत्यांचे इथे हमखास दर्शन होई. तरुणींसह पोक्त महिला वर्गाची उपस्थिती नजरेत भरेल अशी असे. त्या मानाने टुकार पोरे कमी असत. कॉलेजकुमारांचा भरणा बऱ्यापैकी असे. बाल्कनीचे पब्लिक वेगळ्या क्लासचे असे. ड्रेस सर्कल बारमाही फुल्ल असे. हेच सिनेमे मॅटिनीला लागल्यावर मग तर कहर होई. लष्कर, दत्तचौक भागातले काही चाहते तर होर्डिंगला मोठाले हार घालत आणि एन्ट्रीला भरघोस चिल्लर उधळत. सुपरहिरो होता तो, त्याच्यावर सर्व वर्गातले लोक जीव टाकत. खन्नाचा रोमँटीसिझम सोलापुरी पब्लिकसाठी ड्रिम डेस्टिनेशन होता. असाध्य स्वप्ने त्यात पाझरली होती. राजेशखन्नाचं उतरत्या वळणाचं आयुष्य सोलापुरी माणसाला अधिक हळवं वाटत असावं कारण इथे प्रगती आणि समृद्धीच्या शिड्या खूप कमी लोकांच्या वाट्याला आल्या. ‘सौतन’चे दुःख मात्र अनेकींच्या वाट्यास आलेले. कारण इथली गरिबी, बेरोजगारी, बकालपणा आणि नाती फुलवण्यासाठी हव्या असलेल्या बहराची गैरहजेरी ! त्यामुळेच की काय ‘सौतन’ने इथे सिल्व्हर ज्युबिली साजरी केलेली !!

- समीर गायकवाड.

लेखन संदर्भ - 'द लोन्लीनेस ऑफ बिइंग राजेशखन्ना' - ले.गौतम चिंतामणी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा