बुधवार, ५ एप्रिल, २०१७

चिंचपुराण....



प्रत्येकाच्या आठवणींना अनेक मुलामे असतात, अनेक कंगोरे असतात. नानाविध घटना आणि घटकांशी त्या निगडीत असतात. आठवणी जशा सुखाच्या दुःखाच्या असतात तशा विविध चवीच्याही असतात. म्हणूनच संभाषणात म्हटले जाते की. आठवणी या कधी कडूगोड असतात तर कधी आंबटगोड असतात. आंबट आठवणींचा विषय निघावा अन त्यात चिंचेचा उल्लेख होत नसावा असे कुठे घडत नाही. या आंबट आठवणी खाण्यापिण्याच्या सवयीपासून ते प्रेमाच्या आंबटगोड शेवटापर्यंत मनात झिलमिलत असतात. पूर्वी रेडीओवर ‘मधुचंद्र’ चित्रपटातील एक गाणं नेहमी लागायचे त्यात चिंचेच्या झाडाचा वेगळाच उल्लेख होता. “हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी, दिसशी तू नवतरुणी काश्मिरी बघ निळसर पाणी..” अशा काहीशा त्या पंक्ती होत्या. त्यातला नायक सांगतो की हे चिंचेचे झाड त्याला चक्क चिनार वृक्षासारखे दिसते आणि त्यामुळे त्या झाडाखाली उभी असलेली त्याची प्रियतमा ही एखाद्या काश्मिरी नवतरुणीसारखी दिसते आहे.. चिंचेच्या झाडाचे चिनार वृक्षाशी असणारे साधर्म्य याहून देखण्या शब्दात व्यक्त झालेले नाही. असो..

चिंच म्हटले की, तोंडाला पाणी सुटते हा एक सर्वसाधारण अनुभव आहे. त्यात फारसे काही खास वेगळे नाही. मात्र चिंचेशी संबंधित काही शब्द या आंबट चवीची गोडी घालवतात. जसे की, मुंबईतील एका उपनगराचे नाव आहे चिंचपोकळी. किती विचित्र नाव आहे हे ! पोकळ चिंच ही कल्पनाच सहन होत नाही. चिंच कशी गाभूळलेलीच असली पाहिजे ना ! खरे तर त्या परिसरात कोण्या एके काळी चिंच आणि पोफळीची असंख्य झाडे होती पण कालौघात ती बरयाच मोठ्या प्रमाणात नष्ट झाली. कालांतराने त्यातील ‘पोफळी’ जाऊन त्याचे ‘पोकळी’ झाले अन चिंचेवरच अन्याय झाला. तिचे चिंचपोकळी झाले. असेच काहीसे चिंचवडचे आहे. पालघर जिल्ह्यातील वाणगावपासून ९ कि. मी. अंतरावर चिंचणी नावाचे एक गाव आहे. तिथल्या सोमवंशीय क्षत्रिय समाजाच्या, वाडवळी या बोली भाषेत सांगायचं झालं तर त्याचे नाव ‘चिंचण’ असे आहे. चिंचेला नकार देणं खरं तर जीवावर येतं पण या गावाच्या निमित्ताने तशा उल्लेखाची मुभा मिळते. याशिवाय सांगलीवाडीचे देखणे ‘चिंचबाग’मैदान प्रसिद्ध आहे. पण तिथे चिंचेचा बाग म्हटलं जावं इतक्या चिंचा नाहीत. अशा तर्हेने शहरातील चिंचांशी निगडीत स्थळांचा उल्लेख चिंचविरहीत होऊ लागल्याने मन नकळत गावाकडच्या‘चिंचपुराणा’कडे ओढ घेते.

गावाकडच्या चिंचा आणि त्याच्या आठवणीं हा अनेकांच्या दृष्टीने चवदार विषय होऊ शकतो. माझ्या लेखी त्याचे महत्व बालपणाच्या रम्य आठवणीइतकेच अवीट गोडीचे आहे. रटाळ शाळेचे गुऱ्हाळ संपून सुट्ट्या लागल्यावर गावाकडे असताना अनेक वस्तू खुणवत राहायच्या. त्यातही एक खूप खुणवायची, ती म्हणजे आकड्याची काठी. एका बांबूवजा लांबलचक, किंचित लवचिक काठीच्या निमुळत्या शेंड्याकडील बाजूस धारदार लोखंडी पात्याचा आकडा अडकावलेला असे. बुडाकडील बाजूने ही काठी धरून थोड्या दूरच्या अंतरावरील कुठलीही वस्तू खेचणे वा तोडणे सहज शक्य होई. गुरे वळायला ही काठी घेऊन जाताना तिचे दोन फायदे होते. एक म्हणजे, बाटूक गुरं (कमी वयाची गुरे, शेळ्या मेंढ्या) नेताना वाटंनं मधी आडवं आलेल्या वा आडबाजुच्या, सांदाडीत अडकलेल्या खुरटया झुडूपांची वा काटक्यांची भेंडोळी बाजूला सारण्यासाठी तिचा चपखल उपयोग व्हायचा आणि दुसरा उपयोग म्हणजे उंच्यापुऱ्या झाडावरच्या देशी वा विलायती चिंचा काढण्यासाठी !

आमच्या शेताकडे जायच्या वाटेवर एक भले मोठे चिंचेचे झाड होते (अजूनही आहे), त्याला सर्वांगाला चिंचा लखडलेल्या असत. मोठाल्या फांद्यांना झुळझुळू वाऱ्यावर थरथरणारी गुंजपत्त्यासारखी बारीक पानं डवरून गेलेली असत. जिकडं बघावं तिकडं चिंचा दिसत असल्याने दगडधोंडे मारून चिंचा पाडणं खूप सोपं होतं. पण दगडाने चिंच पाडताना बराच वेळा नेम चुकायचा आणि दगड दुसरीकडेच जाऊन पडायचा. त्यात एखाद्या चिंचेला जास्त वेळ लागला की आम्हा भावंडांच्या चाहुलीने तिथली कुत्री भुंकू लागत. या कुत्र्यांचा आवाज उरात धडकी बसवणारा असायचा. त्यांच्या भुंकण्याने सावध झालेले,रागावलेले शेतमालकच आम्हाला न लागेल अशा बेताने आमच्यावर धोंडा भिरकावत. तेव्हढीही उसंत त्यांना मिळाली नाही की मग बाजेवर बसल्या बसल्या त्यांच्या शिव्याचा पट्टा सुरु होई.

त्यामुळे भीतीपोटी चिंच मोहीम गुंडाळून पलायन मोहीम हाती घ्यावी लागे. कधीकधी तिथली कुत्री पाठलाग करत येत तेंव्हा हाती लागलेला चिंचांचा मुद्देमाल तिथेच टाकून देऊन सुं बाल्या करावा लागे. इतका सारा द्राविडी प्राणायाम करून एव्हढ्या मोठया झाडाच्या जेमतेम पाचदहा चिंचाच हाती लागत. मात्र या चिंचपत्थरबाजीत त्या झाडावरील पक्षांचं एखादं घरटं खाली पडलं वा त्यातलं एखादं पाखरू घायाळ होऊन खाली पडलं की फार वाईट वाटे. शिवाय दगडधोंडे भिरकावताना बराच पाला खाली पडे, त्याचबरोबर एखाद्या वाळलेल्या काटकीचा तुकडा उडून कधी कधी तोंडावर येई. शिवाय दगड लागून चिंच जेंव्हा खाली पडायची तेंव्हा बहुतांश वेळा तिचे कडक असणारे पण मुलायम स्पर्शभावाचे आवरण अर्धे अधिक तुटून पडे. त्याचे बारीक तुकडे होत आणि आवरणाआडची लाल चॉकलेटी चिंच दृष्टीस पडे. ही गाभूळलेली चिंच खाणे हा एक स्वर्गीय आनंद असे. तरीही वाईट वाटे कारण चिंचेचे आवरण तुटले की जीव हळवा होई. यामागचे कारण चवदार आणि रसाळ होते. जेंव्हा कधी एखादी पिकलेली, गाभूळलेली चिंच तिच्या पूर्ण आवरणासहीत हाती लागे तेंव्हा अपार आनंद होई.

ही चिंच संध्याकाळी गावाकडे घरी परतताना सुखरूप फडक्यात बांधून नेली जाई. घरी नेल्यावर रात्रीची जेवणं झाल्यावर घरातल्या मोठ्या काकीला लाडीगोडी लावली जायची आणि मग शेतातून आणलेली चिंच हळूच बाहेर काढली जायची. त्या चिंचेच्या टोकाकडील बाजूला वरच्या आवरणास एक बारीक छिद्र पाडले जाई. त्या छिद्रात लाल तिखट मिसळलेले विरजणाचे दुध बारकाईने चमचा चमचा करून ओतले जाई. त्या दुधाने चिंच गच्च भरली जायची. चिंच शिगोशिग भरली की टोकाला दुधाचे ओघळ वाहत. ते ओघळ पुसून त्या भरलेल्या चिंचा पुन्हा फडक्यात गुंडाळून एखाद्या लोटक्यात ठेवल्या जायच्या. तीन चार दिवसांनी जेंव्हा ते लोटके बाहेर काढले जायचे तेंव्हा जे खायला मिळायचे ते स्वर्गीय चवीचे होते.

लाल तिखट घातलेल्या विरजणाच्या दुधाचे चिंचेच्या संपर्कामुळे क्रीममध्ये रुपांतर झालेलं असे. चिंचेची आंबट गोड चव आणि झणझणीत तिखट यांची एकत्र ठसकेबाज चव त्या दह्यात उतरलेली असे. बोट चाटून झाली की चिंच चाटून होई ! मग काही दिवस असे रोज आंबवलेल्या चिंचा खाल्ल्या की दात कळकून जायचे. मात्र त्याची फारशी फिकीर नसायची.

वरचे आवरण न फुटता जास्तीत जास्त चिंचा हाती लागाव्यात म्हणून पुढे पुढे काठीच्या आकडयाची क्लृप्ती कामी आली. भरपूर माल हाती लागू लागला. पण एकदा काठीसहीत पकडले गेल्यावर पाठीत चांगले धबुके बसले होते. या चिंचातले चिंचोके म्हणजे खेड्यातल्या बालपणाचा अमोल ठेवा. पाटावरचे चमकुल असो वा बिल्लस असो वा गजगेचिंचोक्यांचा खेळ असो हे चिंचोके खूप कामास येत. बराच वेळा ते फोडून त्याच्या आतल्या गराचा भुगा करून त्याचे वस्त्रगाळ करून त्याचे विविध उपयोग केले जात. नेम धरून मारण्यासाठी तर चिंचोके खूप कामास यायचे.

गुरं चरायला तळयाकाठी ज्या हाळावर नेली जात तिथे इंग्लिश (विलायती) चिंचांची दोन चार झाडे होती. या चिंचात तिखट आंबट असे काही घालता येत नसे कारण यांचे आवरण जरा नाजूक होते. शिवाय आतला मामला देखील वेगळा होता. ही चिंच कापसासारखी वाटायची, चवदेखील काही फारशी फर्मास नव्हती पण थोडीशी चरबट गोड असा तिचा मिजाज होता. हिचे चिंचोकेदेखील फुसके होते. त्यात विशेष दम नव्हता, बोटाने रगडले की इस्कटून जायचे. त्याला कुठला टणकपणा नव्हता की त्याचे काही उपयोगही नव्हते.

आपल्या गावरान चिंचा आणि या इंग्लिश चिंचांची तुलना मी नेहमी आपल्या देशी गायी आणि जर्सी गायीशी करतो. माया, आपलेपणा आणि स्नेह देशी गायीत ओतप्रोत भरलेला तर जर्सी गाय नुसती भरमसाठ दुध देते पण तिच्यात कुठल्या विशेष भावना जाणवत नाहीत की तिच्याविषयी ओढ वाटत नाही. असो. भाजीमंडईतून आणलेली चिंचोके बाजूला काढलेली चिंच देखील निष्प्राण कातडी सोलून काढल्यासारखी वाटते. ती चाखून बघावी असं मनात येत नाही. साफसूफ करून झाल्यावर काचेच्या हवाबंद बरणीत कुठेतरी कोपऱ्यात ती चोळामोळा झालेल्या अवस्थेत लोळत पडते तेंव्हा अंमळ वाईट वाटते आणि त्याचवेळी माझ्या मनात मात्र आकडे लावून काढलेल्या त्या चिंचांचे अमृताहुनी गोड असे गोष्टीवेल्हाळ चिंचपुराण घोळत जाते, त्याच्या आंबटगोड चवीने वरचेवर रंगतच जाते......

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा