Thursday, March 30, 2017

'शोले', आरडी आणि जिना लोलोब्रिजीड - एक अनटोल्ड स्टोरी...खाली दिलेल्या लिंकमधील कृष्णधवल फोटोची गोष्ट 'शोले'शी संबंधित आहे आणि यातील उजव्या बाजूच्या स्त्रीविषयीची माहिती अत्यंत रम्य आहे. पण त्या आधी हा सर्व काय प्रकार होता याची थोडीशी माहिती घेतली तरच सर्व नीट उमजेल..... १९७५ ला 'शोले' रिलीज झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसला अशी आग लावली की ऑलटाईम ब्लॉकबस्टर मुव्ही लिस्टमध्ये अजूनही तो अग्रस्थानी आहे. 'शोले'बद्दल अनेकांनी अनेकवेळा लिहिलंय कारण त्यात प्रचंड कंटेंट ठासून भरलेलं आहे. 'शोले'तलं हेलनवर चित्रित केलेलं 'मेहबूबा मेहबूबा' हे अप्रतिम गाणं अफाट गाजलं होतं. आरडींना हे गाणं आधी आशाजींकडून प्लेबॅक करून हवं होतं.


त्यांनी त्यासाठी होकारही दिला होता पण तेंव्हा आरडींची एक अट होती. 'आशाजींकडून हे गाणं पन्नाशीत पोहोचलेल्या जिप्सी स्त्रीचा आवाज जसा उतरलेला असतो तशा काहीशा भसाडया आवाजात प्लेबॅक करून हवं' ही अट आरडींनी घातली होती. आशाजींना यावर निर्णय घ्यायला वेळ लागला कारण अशा स्वरात गाणं म्हटल्याने वोकल कॉर्डसना ताण पडू शकतो शिवाय त्यामुळे आवाज बसला तर प्लेबॅकसिंगींगच्या वेळापत्रकातील इतर गाण्यांवर परिणाम होऊ शकतो म्हणून त्यांनी विचारपूर्वक नकार दिला. (ही माहिती त्यांनी स्वतः 'आरडीरिमिक्स'मध्ये दिली आहे.) आशाजींनी नकार दिल्यावर आरडी अगदी चकित झाले होते कारण आशाजी आणि हेलन असं कॉम्बिनेशन गृहीत धरून फिमेल प्लेबॅकच्या हिशोबाने हे गाणं त्यांनी लिहून घेतलं होतं. आरडींनी आशाजींची मनधरणी करून पाहिली पण काही फरक पडला नाही.

दोन तीन दिवस तसेच गेले. चौथ्या दिवशी त्यांचं आनंद बक्षींशी बोलणं झालं. 'मेहबूबा मेहबूबा' बक्षींनी लिहिलं होतं. वास्तविक पाहता या गाण्याची धून आरडींकडे आधीच तयार होती. आरडींनी आनंद बक्षींना धून ऐकवली होती आणि त्या धूनला साजेसं ठरेल व चित्रपटातील जिप्सींच्या सीनसिक्वेन्सला सूट होईल असं गाणं बक्षींना लिहून द्यायला सांगितलं होतं. पूर्वीच्या सिच्युएशननुसार पडद्यावर हेलनजीच हे गाणं गाणार होत्या. त्यामुळे या गाण्यात फिमेल सिंगरसाठीचे बोल होते. आता आशाजींनी नकार दिल्यावर त्यात काही सुधारणा करून गाण्याचा मतितार्थ आणि ट्यून तीच ठेवून त्यांनी बक्षींकडे हेच गाणं मेल प्लेबॅकसाठी लिहून मागितलं. एकाच बैठकीत आनंद बक्षींनी गाणं लिहून दिलं आणि विचारलं की, "बदल का केला गेलाय ? हेलनजी नही है क्या ?" आरडींनी सगळी कथा ऐकवली त्या सरशी आनंद बक्षींनी विचारलं की, "आता कोण गाणार आहे हे गाणं ? " आरडी काही क्षण गप्प राहिले आणि उत्तरले "मीच गाणार आहे !" चकित होण्याची वेळ आता आनंद बक्षींची होती. गाणं हातात पडल्यावर ही गोष्ट आरडींनी जीपी सिप्पींच्या कानावर घातली. त्यांनी एकदा आरडीकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि घशाला हात लावत विचारलं, "ये काम करेगा क्या ?" आरडींनी उत्तर दिले "गाना तो मै ही गाऊंगा लेकीन आवाज मेरी नही होगी !" चकित होण्याची वेळ आता सिप्पींची होती. आरडींनी त्यांना समजावून सांगितले की मी चाळीशी पार केलेल्या एका भसाडया आवाजाच्या जिप्सी पुरुषाच्या स्वरात हे गाणं गाणार आहे, तो आवाज माझा आहे असं कोणालाच वाटणार नाही... " सिप्पींनी सांगितलं की, "तू जे काही करशील ते विचारपूर्वकच करशील याची मला खात्री आहे."

जलाल आगा आणि हेलनवर हे गाणं चित्रित झालं आणि अबालवृद्धांच्या तोंडी हे गाणं लोकप्रिय झालं. वीजेच्या चपळाईने नाचणारी, आपल्या मादक अदांनी घायाळ करणारी, अंगाला देखणे हिसके देणारी, आरडीच्या संगीतावर ठेका धरून नाचणारी, हेलनची फ्रेम माझ्या डोक्यात तर गच्च रुतून बसलेली आहे. दाढीचे खुंट वाढलेला, भांग अस्ताव्यस्त झालेला, तंबाखू खाऊन दात विटून गेलेला, कळकट कपड्यातला अन करारी नजरेचा गब्बरसिंग बाजेवर डाव्या अंगाला रेलून बसलेला आहे. त्याच्या शेजारी धगधगती शेकोटी पेटलेली आहे. आजूबाजूला सगळे डाकू धुंद होऊन गेलेले आहेत आणि बंजारयांची टोळी आपलं कोणतं कसब दाखवणार याकडे लक्ष आहे. गब्बरच्या अड्ड्यावरच्या सगळ्या राहुट्या, तंबूसमोरचे जिप्सी (बंजारे) बेफाम झालेले आहेत. रात्रीच्या त्या अंधारात एक अनामिक नशा भरलेली. माथ्याला लालपिवळा रुमाल बांधून दिलरुबा वाजवणारा जलाल आगा गुडघ्यावर बसून दिलखेचक संगीत पेश करतो आणि मासुळी अंगाची हेलन डाव्या पायाने रेती उडवत उडवत गब्बरच्या दिशेने नाचत नाचत पुढे सरकते. आणि थियेटरमध्ये कल्लोळ होतो. पब्लिक मेहबूबा मेहबूबावर शिट्ट्या वाजवत नाचत राहतं. हे दृश्य अजूनही डोळ्यात जसेच्या तसे तरळते. 'शोले'मधला हेलनचा हा डान्स आणि मेहबूबा मेहबूबा गाणं या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे व्हिस्की आणि बर्फासारखं आहे, एकमेकासाठी अर्पण होणारं अन दीर्घकाळ मेंदूतल्या संवेदनेत जिवंत राहणारं असं !

ड्रम, कोंगो बोंगो या वाद्यांचा अप्रतिम वापर आरडींनी या गाण्यात केला होता. मात्र या गाण्याची जन्मकथा वेगळीच आहे. त्यासाठी आणखी थोडं मागे जावं लागेल. दक्षिणपूर्व युरोपला लागून असणाऱ्या भूमध्य सागराच्या बेटसमूहातील गायक, संगीतकार असणारया मिशेल्स व्हायोलेरीस या गायकाने १९७३च्या पूर्वार्धात सायप्रसचं 'टा रिआलिया' हे प्रसिद्ध लोकगीत नवीन वाद्यमेळाच्या ट्यूनवर गायले आणि युरोपमध्ये धमाका झाला होता. सायप्रीऑटीक ग्रीक भाषेतलं हे गाणं इटली आणि ग्रीसमध्ये चार्टबस्टर ठरलं. अनेक ठिकाणी मैफलीत हे गाणं मादक अदांनी सजलेल्या रोमन जिप्सींच्या पारंपरिक वेशभूषेतील मदनिका सादर करू लागल्या. अनेकांचे कलेजे खलास झाले. 'शोले'मधली 'मेहबूबा मेहबूबा'साठीची हेलनजींचीही वेशभूषा देखील डीक्टो अशीच होती. हे गाणं आरडींकडे कसे आले ? याच्या खोलात शिरण्याआधी आणखी एक मजेशीर नोंद घ्यावी लागते.

१९७३ च्या अखेरीस डेमिस रुसेस या गायकाने याच गाण्यावर रिमिक्स शैलीतल्या गाण्यावर काम सुरु केलं. हा डेमिस म्हणजे एक अवलिया माणूस होता. नवनवी वाद्ये वापरणे आणि गायकाच्या स्वराच्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी वापरून वेगळं काही तरी रसिकांना देणे हा त्याचा आवडता उद्योग. तर या डेमिस रुसेसने 'टा रिआलिया'वर बेतलेलं 'से यु लव्ह मी' हे गाणं गायलं. जाझ, ट्रम्पेट आणि इजिप्शियन, अरेबिक संगीताचा हा माणूस किती वेडा होता हे या गाण्यावरून लक्षात येतं. आरडींनी जेंव्हा 'मेहबूबा मेहबूबा' स्वतःच्या आवाजात गायलं तेंव्हा त्यातला हेल आणि भसाडेपणा हा बहुतांशी डेमिस रुसेसच्या याच गाण्यासारखा होता. आरडींना खरं तर असं डुप्लिकेशन नको होतं. त्यांच्या डोक्यात त्या ग्रीक जिप्सी मदनिकांचा नाच होता आणि जोडीला डेमिस रुसेसच्या गायकीच्या धर्तीवरचं तशाच जाड्याभरडया आवाजातलं फिमेल प्लेबॅक हवं होतं. पण आशाजी तयार झाल्या नाहीत आणि आरडींनी अगदी ढंगदार शैलीत हे गाणं गायलं. 'टा रिआलिया'ची ट्यून, 'से यु लव्ह मी'च्या ढंगाची गायकी आणि रोमन जिप्सींची मादक नृत्यशैली हे सर्व बॉलीवूडला पचेल अशा पद्धतीने आणि भारतीय चित्रपट रसिकांच्या पचनी पडेल अशा शैलीने मांडणे ही एक अवघड कसरत होती. मात्र आनंद बक्षींच्या साह्याने आरडींनी ती पूर्ण केली. हेलनजींनी त्यावर चार चांद चढवले. मात्र एक प्रश्न अनुत्तरीत राहतो की, हे सर्व मटेरियल आरडींच्या जवळ कसे पोहोचले ? याचे उत्तर आहे जिना लोलोब्रिजीड ही इंटरनॅशनल सेक्ससिम्बॉल प्लस इटालियन हिरॉईन प्लस फोटोजर्नॅलिस्ट प्लस शिल्पकार महिला !!

जिना लोलोब्रिजीड ही एक भन्नाट बाई ! २०१३ मध्ये ती पुन्हा चर्चेत आली होती कारण तिने तिची सगळी ज्वेलरी विकून त्यातून आलेल्या पाच मिलियन डॉलर्सची देणगी स्टेम सेल फौंडेशनला दिली होती. ही अवलिया स्त्री, तिचं सौंदर्य, तिचे किस्से आणि तिची आगळी वेगळी विचारसरणी हा एका स्वतंत्र पोस्टचा विषय आहे. जिना लोलोब्रिजीडने साकारलेल्या काही चित्रपटातील भूमिका गोल्डन ग्लोब आणि बाफ्टासाठी नॉमिनेट झाल्या होत्या ही विशेष नमूद करण्याजोगी बाब. असे असूनही १९७०च्या सुमारास तिनं चित्रपटातलं लक्ष कमी केलं. कारण तिच्या दृष्टीनं त्यातलं नाविन्य संपलं होतं. तिनं फोटोजर्नॅलिस्टचं काम सुरु केलं. १९७१ च्या सुमारास ती अरब राष्ट्रांच्या दौऱ्यावर आली होती तेंव्हा तिच्या कानावर आरडींचे संगीत पडले. ही बाई अगदी चोखंदळ आवडीनिवडीची असल्याने आणि तिचं करिअरही फिल्मी असल्याने तिला आरडींशी संपर्क साधायला काही अडचण पडली नाही. आरडी म्हणजे संगीताचे वेड आणि संगीत म्हणजे आरडी असे समीकरण असल्याने नवनवीन माणसं आणि नवनवीन संगीतप्रयोग याचा प्रचंड ध्यास त्यांना होता. त्यामुळे त्यांच्या व्यक्तीसंग्रहात कलासक्त जिना लोलोब्रिजीडची भर पडली....

रात्रीच्या वेळी जग झोपी गेलेले असताना तासंतास रेडीओ कानाला लावून बसणे हा आरडींचा आवडता छंद. एके रात्री 'टा रिआलिया' त्यांच्या ऐकण्यात आलं. या गाण्याने त्यांच्यावर असं काही गारुड केलं की त्यांनी रेडीओ ऐकताना सवयीप्रमाणे ते रेकॉर्ड केलेलं असल्याने दिवसभर ती ट्यून त्यांच्या ओठी खेळत राहिली. अधिक माहितीसाठी त्यांनी गिनाशी संपर्क केला आणि तिने पुढचे काम सोपे केले. त्या नंतर तिने 'टा रिआलिया'वर बेतलेलं डेमिस रुसेसने 'से यु लव्ह मी' हे गाणं आणि त्यातल्या जाड्या आवाजातल्या गीताचा अर्थ समजून सांगताना या गाण्यावर रोमन जिप्सीचे कॉम्बिनेशन कसे खुलून दिसेल हेही आरडींच्या मनावर ठसवले. याच काळात योगायोगाने सिप्पींच्या 'शोले'त गब्बरच्या अड्ड्यावर जय-वीरू हल्ला करायला येतात तेंव्हा व्हॅम्पवर चित्रित केलं जाणारं गाणं स्टोरी सिच्युएशनमध्ये हवं होतं. आरडींनी त्यांच्या डोक्यात घोळत असलेल्या ट्यूनला बक्षींनी प्रोव्हाईड केलेल्या'मेहबूबा मेहबूबा'च्या पूर्ण भारतीय रुपात पेश केले आणि चित्रपट अधिक जानदार झाला. 'शोले'ची सक्सेस पार्टी जेंव्हा झाली होती तेंव्हा उपस्थित विदेशी पाहुण्यांच्या यादीत साहजिकच जिना लोलोब्रिजीडचं नाव होतं. सोबतच्या तसबिरीत डावीकडून आनंद बक्षी, आरडी आणि जिना आहेत. बॉलीवूडच्या एका मधाळ आणि मादक गाण्याचे शिल्पकार !!

- समीर गायकवाड.

(परिश्रमपूर्वक माहिती गोळा करून लिहिलेल्या लेखांचे शेअरींग करताना मूळ लेखकाच्या नावासहीत शेअर केलं जावं ही प्रामाणिक अपेक्षा)

No comments:

Post a Comment