शुक्रवार, २८ एप्रिल, २०१७

कसदार 'जयवंत' साहित्यिक .....


कोकणच्या लाल मातीला आपल्या दर्जेदार साहित्यातून उत्तुंग शिखरावर पोहोचवणारे साहित्यिक म्हणून ज्यांची ओळख सांगता येतील, ते म्हणजे जयवंत दळवी. जयवंत दळवी यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२५ रोजी झाला. जयवंत द्वारकानाथ दळवी हे मराठी लेखक, नाटककार, पत्रकार होते. ठणठणपाळ या टोपणनावाने त्यांनी वृत्तपत्रीय स्तंभलेखन केले. काही वर्षे ‘प्रभात’ व ‘लोकमान्य’ वृत्तपत्रांचे उपसंपादक म्हणून काम केल्यावर ते युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिसेसमध्ये रुजू झाले. इंग्लिश साहित्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावे, यासाठी त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले.
"काल तुम्ही आमच्यावर अवलंबून होता. आज आम्ही तुमच्यावर अवलंबून आहोत ! हे एक कालचक्र आहे !
आज तुम्ही जे म्हणताय, तेच आम्ही आमच्या तरुणपणी म्हणत होतो. आज आम्ही जे म्हणतोय तेच तुम्ही उद्या तुमच्या म्हातारपणी म्हणणार !
या ‌चक्रातून सुटका आहे का ? निरुपयोगी म्हणून वृद्धांना फेकून देणं योग्य आहे का ?"
याचा शोध घेणारे एक प्रभावी नाटक मराठी रंगमंचावर आलं होतं.
अनेक पारितोषिके पटकाविणारं हे नाटक म्हणजे जयवंत दळवींचे 'रथचक्र'...
रथचक पात्र, संवाद, नेपथ्य आणि दृश्यपरिणामकारकता यांची रेलचेल असलेले नाटक होते तर वृद्ध दांपत्यावर बेतलेले 'संध्याछाया' हे इनमीन चारेक पात्रांचे एकाच सेटवरचे, उदास नेपथ्याचे अन दृश्य परिणामकारकतेचा अभाव असणारे नाटक होते,..
मुले आणि सुना नातवंडे यांच्या शिवाय आपला वृद्धापकाळ व्यतित करणारे एका घरातले दांपत्य ही त्या नाटकाची संहिता होती.
मात्र दळवींनी या संहितेत शब्दप्राण फुंकले अन हे नाटक मराठी रंगभूमीवरचा मैलाचा दगड बनून राहिले.
'संध्याछाया' ही दळवींची अत्यंत लक्षणीय अशी मराठी नाट्यकृती आहे. नीरस व निरर्थक ठरणार्‍या जीवनाच्या जीवघेण्या तोच-तोपणाचे नाट्यात्म दर्शन घडवायचे व या दर्शनाची नाट्यात्मता दोन तास सतत टिकवायची या दोन्ही गोष्टी सोप्या नाहीत. दळवींच्या नाट्यप्रतिभेने ह्या दोन्ही गोष्टी साधल्या हे तिचे अत्यंत उल्लेखनीय असे वैशिष्ट्य आहे. त्यातलं म्हातारं जोडपं पारंपरिक भावनांचं प्रतीक आहे. त्यांना घरगड्याजवळ बोलावंसं वाटतं. पण तो त्यांच्याशी बोलत नाही. यंत्रासारखं काम करून चालता होतो. पुढे येऊ घातलेल्या भावनाहीन पण कार्यक्षम यांत्रिक संस्कृतीचंच प्रतीक तो आहे.

दळवींच्या 'सूर्यास्त' या नाटकाची कथा मात्र हटके अशी होती अन हे नाटक निळू फुल्यांनी रंगभूमीवर असे साकारले की सगळा प्रेक्षकवर्ग मंत्रमुग्ध होऊन गेला. समाजाच्या जीवनात कधीकधी असा एखादा काळाकुट्ट कालखंड येतो की, ज्या वेळी नि:स्वार्थी व्यक्तींचा सारा त्याग मातीमोल होतो आणि सरळ मार्गाने जाणारी सर्वसामान्य माणसे तर केवळ हतबल होतात. स्वार्थी आणि कारस्थानी माणसांनी भरलेल्या या जगात सात्त्विक वृत्तीच्या माणसांची फरपट कशी होते आणि त्यांच्या ध्येयवादी जीवनाला अपयश कसे ग्रासून टाकते, याचे परिणामकारक दर्शन या नाटकात दळवी आपल्याला घडवतात.
एक कुटुंब कसे दुभंगते आणि माणसांच्या मनात कशा भिंती उभ्या राहतात याचे हृदयद्रावक चित्रण दळवींच्या 'संसारगाथा' मध्ये होते. जुनी सहनशील पिढी आणि नव्या पिढीचे बंडखोर विचार यांचा आलेख दळवी आपल्या काळजात रेखाटतात. यशवंत दत्त आणि रोहिणी हत्तंगडी यांच्या कसदार अभिनयाने हे नाटक रंगभूमीवर स्वतःचा ठसा उमटवून गेले होते.

'नातीगोती’ हे त्यांचे विशेष गाजलेले नाटक. मतिमंद मुलांच्या समस्या मांडणारे हे नाटक नव्हे ! मतिमंद मुलगा जन्माला आलेल्या आई-वडिलांचे भावविश्व उकलणारे, हे एक मन व्याकूळ करणारे नाटक आहे. प्रेमाची नातीगोती किती विलक्षण असतात, हे सांगणारे प्रभावी नाटक ! मोहन जोशी, स्वाती चिटणीस, अतुल परचुरे आणि दिलीप प्रभावळकर यांच्या संचात जून १९८९ मध्ये कलावैभवने हे नाटक मंचावर आणताच रसिक प्रेक्षक व समीक्षक दोघांच्याही त्यावर उड्या पडल्या होत्या. हे नाटक रंगभूमीवर येताच या नाटकावर अनेक पारितोषिकांचा वर्षाव झाला होता. 

श्रावण म्हटले की मला जयवंत दळवींच्या “सारे प्रवासी घडीचे” या कादंबरीतील ‘हाफम्याड’ तात्या रेडकर आठवतो. कोकणातल्या छोट्या गावातील निसर्गवेडा तात्या रेडकर. लाजाळूच्या वेलीला कोणी पाय लावला तरी कळवळणारा तात्या. डोंबाऱ्याच्या खेळासाठी बांधलेल्या दोरीने झाड थरथरते म्हणून डोंबाऱ्याच्या अंगावर धावून जाणारा तात्या. प्राण्यांच्या खेळात प्राण्यांचा छळ होतो, म्हणून आडवा येणारा आणि त्यातच मृत्यू पावलेला “हाफम्याड तात्या.” निसर्गासाठी माणसाने किती संवेदनशील असावं, याचं प्रतीक बनून राहिलेला तात्या शाळकरी वयापासून माझ्या मनात घर करून आहे.

आम्ही लहानपणी रेडिओवर एका नाटकाची जाहिरात ऐकत असू. रेडिओवर नाटकाची जाहिरात हे तेव्हा आमच्यासाठी मोठे अप्रूप होते. ती जाहिरात  ‘गुंतता हृदय हे’ या नाटकाची होती. जयवंत दळवींच्या ‘महानंदा’ कादंबरीवर शन्नांचे नाटक आधारलेले होते. दळवी स्वत: गाजलेले नाटककार असूनही आणि त्यांनी त्यांच्या कादंबर्‍यांची यशस्वी नाट्यरूपांतरे केली असूनही, हे नाटक करण्याची अनुमती दळवींनी त्यांना दिली. ‘गुंतता हृदय हे’ ही देवदासी प्रथेवर आधारलेली एक प्रेमकथाच आहे. महानंदा ही देवाला वाहिलेली देवदासी! गावात पाहुणा म्हणून आलेल्या बाबूलच्या प्रेमात पडते. त्याला आपले सर्वस्व अर्पण करते. दोघांना लग्न करायचे आहे, पण गावाचे नियम आड येतात. सगळा समाज, दोघांचेही नातलग या प्रेमसंबंधाला विरोध करतात. पण, खर्‍या प्रेमाला ढोंगी समाज कधीच संपवू शकत नाही. आयुष्याच्या सगळ्या वाताहतीनंतरही ते शिल्लक राहते. दमयंती हीच महानंदा आणि बाबूलच्या प्रेमाची खूण! ती शिक्षण घेण्यासाठी बाबूलसोबत शहरात निघते. देवदासीच्या क्रूर प्रथेचा निदान एका कुटुंबापुरता अंत होतो. नाटक संपते. देवदासीच्या मुलीला आज सन्मानाने या जगात जगता येण्याची सुरुवात शन्नांची दमयंती करते. रंगभूमी हे परिवर्तनाचे साधन आहे. रंगभूमी हे प्रबोधनाचे साधन आहे, असं म्हणतात. पण, त्यासाठी रंगभूमीवरील प्रेमकथेला एक विराट सामाजिक आयाम प्रदान करावा लागतो, हेच शन्ना नवरे ‘गुंतता हृदय हे’ या नाटकातून सिद्ध केलंय. रंगभूमीच्या चौकटीत चटका लावणारी कथेतून इथे सामाजिक बांधिलकीदेखील सिद्ध होते.

जयवंत दळवींच्या  साहित्याबद्दल,त्यांच्याबद्दल कुतूहल वाढवणारं त्यांच लेखन कुठेकुठे विखुरलेल आहे .जे आजतागायत संग्रहित झालेल नाही .अस काही महत्वाच लेखन प्रथमच ह्या "बाकी शिल्लक"संग्रहात प्रकाशित झालं आहे. दळवी म्हणत असत की, "मी मनातलं बोलत नाही कुणाकडे  आणि डायरीसुधां  लिहित नाही. मला वाटत कि माझे जे काही बरे वाईट गुण ते सारे माझ्या साहित्यात आले आहेत. मानसिक कोंडमाऱ्याचा  निचरा साहित्यातच अधिक होतो व म्हणूनच ज्याला मी खरा कसा आहे याचं कुतूहल आहे त्याला मी माझ्या साहित्यात अधिक सापडेन." या पुस्तकात  'वाग्मयचौर्य', 'त्या दोघी एक दत्तू' आणि 'त्याची तीन रूपे पुरुष' ह्या कथा चांगल्या होत्या.

झोपडापट्टी हा मुंबई शहराच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. परंतु १९६२ साली जयवंत दळवींच्या चक्र या कांदबरीतून जेव्हा ती प्रथम मराठी साहित्यात अवतरली तेव्हा सोवळ्या मंडळीला मोठाच धक्का बसला. मुंबई बंदर भागातील एका रहदारीच्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झोपडपट्टीत चक्रचे कथानक घडते. गलिच्छपणा, बेकायदा दारू गाळण्यासारखी आणि इतरही गुन्हेगारी, स्त्री-पुरुष संबंध आणि हिंसाचार यांच्याबद्दलचा रोखठोकपणा, आणि या सगळ्याखाली लपलेली माणुसकीची ऊब- हे नेहमीचे घटक त्या कादंबरीत होते. शिव्यांचा यथेच्छ सुकाळ असलेले लेखन असा शिक्का मारण्याचा प्रयत्नही काहींनी करून पाहिला. याच नावाने पुढे या कादंबरीवर आधारित चित्रपट निघाला होता ज्यातील स्मिता पाटीलच्या भूमिकेची प्रचंड चर्चा आणि अफाट कौतुक झाले होते.

दळवींच्या 'मत्स्यावतार'मध्ये माशांच्या कितीतरी प्रकारांची, बनवण्याच्या पद्धतींची आणि त्यांच्या चवींची वर्णने आलेली आहेत. दळवींच्या मनावर घराचा पूर्वीचा जो ठसा आहे. आपल्या एकूण गावाचा-गावातल्या प्रत्येक व्यक्तीचा-वृत्ती-प्रवृत्तींचा, वासनेचा, उदात्ततेचा, संस्कृतीचा, विकृतीचा, स्वार्थाचा आणि निरीच्छ-नि:पक्षतेचा ठसा त्यांच्या साहित्यातून उमटलेला दिसतो. दळवींच्या महानंदा सिनेमात त्यांच्या आरवलीच्या घराची दृश्ये आहेत. जयवंत दळवींच्या साहित्यात पारदर्शकताच जाणवते. त्यांच्या संपूर्ण साहित्यात त्यांच्या आरवलीच्या घराचे, गावाचे नि एकूणच कोकणातील लोकांचे प्रतिनिधित्व करणा-या माणसांचे चित्रण आढळते. जवळजवळ (कविता सोडून) लेखनाचे सर्व प्रांत काबीज करून आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. त्यांचा स्वत:बद्दलचा प्रांजळपणा त्यांच्या कथा, कादंबरी नाटकांतूनच नव्हे तर त्यांच्या विनोदी लेखनातूनही जाणवतो. त्यांच्या बर्‍याच कथा, कादंबर्‍या, नाटकांतून वेडसर- वेडगळ स्तरावरची माणसे दिसतात. आरवलीच्या घराचा त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वावर गडद परिणाम जाणवतो.

जयवंत दळवींनी कथा, विनोद, प्रवासवर्णन, कादंबरी, एकांकिका, नाटक असे विविध वाङमय प्रकार लिहिलेत, पण साहित्य क्षेत्रातील आपल्या मोलाच्या कामगिरी केली. त्यांनी स्वत: नाटके  लिहिली. लोकांनी त्यांच्या कादंबर्‍यांवर नाटके तयार केली, चित्रपट काढले. मात्र त्यांच्या निकोप मनाला कधी अहंपणा शिवला नाही. भूक, लैंगिक अतृप्ती हे सगळे तपशील जसे भावले तसेच त्यांच्या लेखनात आले. अत्यंत सूक्ष्म तपशील देऊन दळवींनी सुखासमाधानाच्या आड येणार्‍या आणि सामान्य माणसाला माणसातून उठवणार्‍या, उद्ध्वस्त करणार्‍या गोष्टी लोकांसमोर आणल्या. कोकणच्या लाल मातीत जन्माला आलेले अनमोल नररत्न थोर साहित्यिक जयवंत दळवी म्हणजे कोकणचे भूषणच!

जे काही दळवींनी लिहिले ते उदंड होते ; तसेच दर्जेदार होते. १९४८ साली ‘दातार मास्तर’ ही पहिली कथा लिहिल्यावर पुढे १७ कथासंग्रह, १८ कादंब-या, १९ नाटके, १० विनोदी लेखनसंग्रह, ६ चित्रपट कथानके, प्रवासवर्णन, एकांकिका वगैरे एकूण सुमारे ७० हून अधिक साहित्याकृती लिहिल्या. मला वाटते, त्यांचा आवडता साहित्यप्रकार कादंबरी असावा. कादंबरीचा कॅनव्हास मोठा असतो . संध्याछाया, सूर्यास्त, बॅरिस्टर, महासागर, पर्याय, पुरुष, स्पर्श, नातीगोती ही त्यांची नाटके फार गाजली.  त्यांची ही नाटके दोनदोन तीनतीनदा पाहिल्यावरही पुन्हा पहावीशी वाटत. दळवींनी खूप चांगली नाटके लिहिली हे निर्विवाद.  कधी मनात येते, संस्कारानुसार माणूस घडवला जातो असे म्हणतात ; दळवींना कुणी घडवले ? लेखनकलेचे संस्कार होण्यासारखे त्यांच्या आयुष्यात काही घडलेच नाही. उलट बालपणी घरचे वातावरण साहित्य प्रवृत्तीला मारक ठरणारे होते. अभ्यासापलीकडे काही वाचू नये हा मोठ्यांचा उपदेश. मुंबईत शिक्षणासाठी आल्यावरही ललित लेखनाबाबतीत कुणालाही कळणार नाही अशा रीतीने ते लिहित असत. अशा प्रतिकूल परिस्थितीत साहित्यनिर्मितीची प्रेरणा मिळाली कुठून ? कुठल्याही लेखकाचा ठळक वा समग्र प्रभाव दळवींच्या लेखनावर झालेला आढळत नाही. दळवी ते दळवीच !

बहुधा दळवींची जिद्द आणि आतून असणारी प्रखर नैसर्गिक ऊर्मी ही त्यांच्या साहित्यनिर्मितीला कारण असावी. लेखनकार्यासाठी  इतका झपाटलेला माणूस दुसरा कुणी नसेल. लेखनासाठी किती धाडशी निर्णय घ्यावेत ? दळवी खरे टेक्सटाईल इंजिनीअर व्हायचे. त्याकाळी इंजिनियरिंगला मागणी अधिक होती. व्ही जे टी आय ला प्रवेश मिळणे म्हणजे एक दिव्य होते. केवळ लेखनासाठी म्हणून त्यांनी इंजिनियरिंगचा अभ्यास अर्ध्यावर सोडून ते आर्ट्सला गेले. युसिसमधली लठ्ठ पगाराची व सुखाची नोकरी सोडली ती लेखनासाठी. एम. ए. झाल्यावर प्रोफेसर होण्याऐवजी पत्रकाराची नोकरी स्वीकारली ती लेखनासाठी. मला वाटते, दादर सोडून बोरिवलीला लांब रहायला गेले ते कदाचित लेखनासाठी एकांत मिळावा म्हणूनही असेल.

तेथे देखील भेटणा-यांची संख्या वाढली. ” पुढचे तीनचार महिने आपण फक्त लिहिणार आहोत, कुणालाही  भेटायचं नाही असं ठरवलं आहे ” असा हा त्यांनी आपल्या भात्यातला शेवटचा बाण काढला. पण तोही फुसका निघाला. मी एकदा फोन करून विचारले, “दळवी, चातुर्मास संपला का ? भेटायला येऊ का ?” तर दळवी सांगायचे, “कधीही या.”त्यांच्या मनात सातत्याने हे द्वंद्व असावे. गाठीभेटी की लेखन ? लेखन महत्वाचे वाटत असावे तर गाठीभेटीत मन रमत असावे. दळवींना दोन्ही हवे असायचे ; पण वेळेत जमविणे कठीण होऊन बसले. वेळेची बचत व्हावी म्हणून त्यांनी जेवणाची निमंत्रणे नाकारण्याचे ठरवले ; तो निर्णय मात्र त्यांनी पाळला.

जयवंत दळवींना ‘साहित्यिक’ ओळख मिळण्याआधीची पंधरा-सोळा वर्षे वेंगुर्ल्यातील आरवली गावात गेलीत. समुद्रकिनारी असलेला हा अत्यंत सुंदर, लहानसा गाव लाटांच्या गाजेने माणसांना पहाटे जाग आणतो. येथील मुख्य आहार मासे-भात! पाकक्रियेची पाचपन्नास पुस्तके वाचूनही बनवता येणार नाही असा रुचकर व झटपट स्वयंपाक दळवींची आई बनवत. लाल, जाडय़ा तांदळाचा भात, मासळीची आमटी, तळलेली मासळी आणि मासळीचे सुके हेच दळवी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आवडीचे जेवण! भिरडे सोलून त्यापासून तयार केलेल्या सोलांच्या सोलकढीची चव आरवली सोडून इतरत्र कधीच दळवींना अनुभवता आली नाही. ते म्हणत, माझे मासळीचे प्रेम आणि फिश खाणा-यांचे प्रेम यात फरक आहे.

मी अजून ‘आरवलीकर’ राहिलो आहे. ‘मी आरवलीकर’ असल्यामुळेच माझी आवडनिवड वेगळी आहे आणि बरीचशी ऋतुमानाशी निगडित आहे.
दळवींच्या ‘मत्स्यावतारात’ माशांच्या कितीतरी प्रकारांची, बनवण्याच्या पद्धतींची आणि त्यांच्या चवींची वर्णने आलेली आहेत. म्हणूनच आरवली सोडून गेल्यानंतरही आपल्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी त्यांनी स्वत: जपल्या. आपल्या पत्नीच्या स्वयंपाकाची ते तिच्या पुढय़ात स्तुती न करता जाहीरपणे ते लिहितात, ‘आमच्या घरी पाकक्रियांचे पुस्तक पाहून मासळीचे जेवण होत नाही. त्यासाठी ‘हात’ लागतो. आंतरिक जाणिवा समृद्ध व्हाव्या लागतात.’

जयवंत दळवींचे आरवलीचे घर म्हणजे एक ऐसपैस वास्तू. मूळचे छोटे घर गरजेप्रमाणे त्या त्या वेळी वाढवलेले आहे. ते घर जसे अस्ताव्यस्त तसेच त्यांचे एकूण घराणेही अस्ताव्यस्त होते. दळवी म्हणत, ‘मी जेव्हा या घराचा कधी विचार करतो तेव्हा तेव्हा मला माझे वडील आणि काका यांची फारशी आठवण होत नाही. पण आई आणि काकी यांचीच आठवण अधिक होते. याचे कारण लहानपणापासून त्यांनी माझे पालनपोषण केले म्हणून नव्हे, तर त्या कशा झिजत होत्या याची मला लहानपणापासून जाणीव होत होती. माझी समज वाढत होती तसतशी ही जाणीव तीव्र होत होती. स्त्रीमुक्ती, स्त्रियांचे हक्क, त्यांचे स्वातंत्र्य वगैरे कल्पना अलीकडे आल्या. त्या स्त्रियांच्या ‘सफरिंग’ची त्यांना स्वत:ला फारशी कल्पना नव्हती. कल्पना असलीच तर ती दैवगतीच्या नावाने फुकट जात होती. आमच्या घरातला एकही पुरुष व्यसनी नव्हता. स्त्रियांना अन्न, वस्त्र आणि पुरेशा सोन्याची कमतरता नव्हती. तरीही या घरातल्या बायकांच्या नशिबी हे सुख नव्हते. त्यांनी एकामागून एक मुलांना जन्म दिला आणि आयुष्यभर चुलीकडे खस्ता खाल्ल्या. स्वयंपाक करावा लागत असल्याने वृद्धत्वात त्या जमिनीशी समांतर वाकल्या.’

घरची परिस्थिती चांगली असूनही वडीलधा-यांकडून कौतुक हा प्रकार दळवींच्या घरी नव्हता. दळवींचे आजोबा लहान असतानाच वारले. त्यामुळे ते त्यांना नीटसे आठवत नव्हते. आजोबांना पाच मुलगे आणि दोन मुली, एक काका गावातल्याच एका दळवी घराण्यात दत्तक दिले होते. त्यामुळे ते वेगळ्या घरात राहात. तीन काका, तीन काकी, आई-वडील, एक विधवा आत्या. सर्वाची बावीस मुले आणि जवळपासच्या गावातील शिक्षणासाठी आलेली दोन-तीन मुले. नात्यातली  माणसे, दोन-तीन गडीमाणसे अशी चाळीस माणसे घरात वावरत. एवढय़ांसाठी त्यांची आई आणि तीन काकींनी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या. एक मोठी खाणावळ चालवली!

जयवंत दळवींचे वडील अण्णा आणि तीन काका यांचे एकूण चार पंथ हाते. थोरले काका अधिक विक्षिप्त होते. त्यांचे सावंतवाडीला तांबा-पितळेच्या भांडय़ांचे दुकान होते. ते फारसे शिकलेले नव्हते, पण दिसायला फारशी बरी नसलेली, थोडी शिकलेली, बुद्धिमान बायको मिळाली. मात्र दोघांत भांडण नसले तरी बोलणेही नव्हते. धंदा बंद करून हे काका आरवलीला आले. ते कुणाशीच बोलत नसत. घराच्या ओटय़ावर ज्या तीन-चार लाकडी खांब होते त्यापैकी एकाला टेकून ते तासन् तास उभे राहत. दळवींच्या लहानपणी या काकांचे निधन झाले. दुसरे काका मॅट्रिक होते की नाही माहीत नाही मात्र त्यांचे इंग्रजी सुरेख होते. मुंबईला एका जपानी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी होती. त्या काळात ‘टाइम्स ऑफ इंडिया’त त्यांची पत्रे येत. पण अकस्मात मुंबईची हवा मानवत नाही म्हणून बिऱ्हाड गुंडाळून आरवलीला आले. ओटय़ावर डुलणा-या आरामखुर्चीत बसून ते दिवसभर ‘टाइम्स ऑफ इंडिया’ आणि ‘इलस्ट्रेटेड वीकली’ वाचायचे. दळवींचे वडील-अण्णा! देवदेव करण्यात त्यांनी सगळे आयुष्य घालवले. यातून वेळ मिळालाच तर जमिनींचा व्यवहार! गावातील सर्वात अधिक जमीन दळवींच्या घराण्याच्या मालकीची. मात्र ते स्वत: शेती करीत नसत. जमिनी कुळांकडे होत्या. कुळे खंड देत ती भाताच्या आणि रोख पैशांच्या रूपाने वसूल करणे एवढेच अण्णांचे काम होते. सहा सहा महिन्यांचे किंवा वर्षभराचे सामान, वर्षातून एकदा (स्वत:च्या पसंतीची- बायकांच्या नव्हे) बायकांना दोन-दोन लुगडी, मुलांना दोन-दोन खाकी विजारी (अर्ध्या) आणि दोन-दोन खमिसे ते आवर्जून घेत.

धाकटे काका पदवीधर होते. मुंबईला डॉक्टर होते. पण मुंबई मानवत नाही म्हणून तेही आरवलीला आले आणि प्रॅक्टिस करू लागले. सर्वाना आरवलीचे आकर्षण होते याचे कारण राहायला मोठे घर होते. दोन वेळ जेवायला मुबलक होते. पैशांची चणचण होती, पण चैनीचीही कल्पना नव्हती. त्यामुळे रोख पैसा हातात नसला तरी भागत असे. दळवींच्या घरात दरारा, गांभीर्य, शिस्त यांचे एक चमत्कारिक आणि त्रासदायक वातावरण होते. घराचे पुढील दार आणि मागील दार असे भाग होते. पुढील दारी पुरुष आणि मागील दारी बायका. कोणी पाहुणे, नातेवाईक बायका मंडळींसह आले तरी त्यांतल्या पुरुषांनी पुढल्या दारी आले पाहिजे आणि बायकांनी मागील दारी गेले पाहिजे. दोन्ही दारांसमोर प्रशस्त अंगणे आहेत. मागील दाराच्या अंगणातून विहिरीकडे जावे लागे. कोणीही पुरुष मागल्या अंगणातून विहिरीकडे जाऊ लागला की मागील दारी बोलत बसलेल्या बायका एकदम चुपचाप होत आणि जागच्या जागी उठून उभ्या राहत. बायका पुढल्या दारी येत नसत. कोणाला चहा द्यायचा झाला तर मुलांना किंवा नारायण गडय़ाला हाका मारल्या जात.

घरातली सगळी कामे जवळजवळ वाटलेली होती. बायकांना काही सांगण्याचा, मते मांडण्याचा अधिकार नव्हता. गावात रिकामटेकडी माणसे खूप. वेळीअवेळी येऊन ती ओटय़ावर बसत. घरातील गडद काळोख्या माजघराला एक विचित्र लाकडी खिडकी होती. ती सदैव बंद असे. तिच्या दरवाजांना असणा-या व्हॅनिशियन ब्लाइंडसारख्या कायमच्या बंद असलेल्या लाकडी पट्टय़ा तात्पुरत्या वर करून बाहेर ओटय़ावर किती माणसे बसली आहेत हे वारंवार बघून चहा बाहेर पाठवला जाई. त्या चहाला फारसा अर्थ नव्हता. चहाची ‘फकी’ टाकून उकळलेला तांबडा चहा- दुधाच्या टंचाईमुळे आणखी तांबडा. दळवींची आई काकीबाई! घरातल्या बायकांत अंगाबांध्याने मजबूत, दिसायला देखणी. अण्णा आणि काकीबाई यांच्या वयात बारा-तेरा वर्षाचा फरक. असाच फरक रूपात आणि गुणातही. (याचाच परिणाम म्हणजे जयवंत दळवींच्या अनेक कथा-कादंब-यात देखणी बायको आणि कुरूपतेकडे झुकणारा नवरा अशी जोडपी आपोआप येतात.) घरातले तीस-चाळीस जणांचे दोन वेळचे वेगवेगळे जेवण काकीबाई करायची.

वारंवारच्या बाळंतपणामुळे धाकटी काकी मामीबाई फारशी काम करीत नसे. मात्र साखरेचे लाडू, चकल्या आणि साठय़ाच्या करंज्या (नेव-या) हे पदार्थ ती करी. आठ-दहा दिवसांनी आलटून-पालटून घाणे असत. एक वाव रुंदीची बेळाची पाटी (टोपली) होती. एक पाटी भरून चकल्या, करंज्या कराव्या लागत. एका पाटय़ात अडीचशे-तीनशे नग मावत असत. सगळय़ांच्या पंगती होईपर्यंत या चौघींना आपापल्या नव-यांच्या ताटात जेवायला बसायला दुपारचे तीन वाजत. अनेकदा त्यांना मासळीची आमटी उरत नसे. मासळीचा तुकडा मिळाला, न मिळाला, सोलकढी तांब्याभर पाणी घालून वाढवता येत असे. मग या चौघींना भात, सोलकढी आणि लोणचे! साडेतीनच्या सुमारास या चौघी काळोखात चटया टाकून आडव्या पडत. मात्र ताईकाकीला जरासुद्धा आडवे पडण्यास मुभा नव्हती. दाजीकाकांना चार वाजता चहा लागे. शिवाय कोणी रिकामटेकडा चहाला आलेलाच असे. ती उसासे टाकीत अबोलपणे चुलीकडे जायची. एवढे होऊनही या चौघींचे कोणी कधी कौतुक केले नाही.

दळवींचं आजोळ आरवलीपासून मोटारीने किंवा आगबोटीने दोन-तीन तासांच्या अंतरावर-गोव्यात. पण त्यांच्या आईला पाच पाच वष्रे माहेरी जायला मिळत नसे. कारण ती माहेरी गेली की ‘आरवलीची खाणावळ’ कशी चालणार याची घरात चिंता असे. कधीतरी अण्णा तिला माहेरी पोचवायचे नि दोन-तीन महिन्यांनी एखाद्या गडय़ाला तिला आणायला पाठवायचे. जाताना ती खूप खूश असे नि येताना माहेरची सर्व हंबरडा फोडून रडत-त्यांच्या आईसह.

दळवींच्या मनावर घराचा पूर्वीचा जो ठसा आहे तो संपूर्ण निष्क्रियतेचा! आपल्या एकूण गावाचा-गावातल्या प्रत्येक व्यक्तीचा-वृत्ती-प्रवृत्तींचा, वासनेचा, उदात्ततेचा, संस्कृतीचा, विकृतीचा, स्वार्थाचा आणि निरीच्छ-नि:पक्षतेचा ठसा त्यांच्या साहित्यातून उमटलेला दिसतो. ते घरच्यांना कधी लेखक वाटले नाहीत. इतर लेखक आपल्या घरी लेखक दिसतात. आपल्या कुटुंबात लेखक दिसणे म्हणजे काय? लेखक म्हणून त्यांना वेगळी खोली हवी किंवा जिथे तो लिहायला, वाचायला, चिंतनाला बसतो तिथे दुस-या कोणाची ये-जा असता नये. तिथे त्रास होईल एवढय़ा मोठय़ाने कोणी बोलता कामा नये, हसता कामा नये, कोणी बाहेरून आगंतुकपणे त्याच्याकडे येऊ नये. आला तर तासन् तास बोलत बडबडत बसता कामा नये आणि या सर्वापेक्षा हा लेखक आहे असे कुटुंबातल्या सर्वाना आणि बाहेरच्यांनाही वाटले पाहिजे! जयवंत दळवींना आपण लेखक आहोत असे कुटुंबात कधी वाटले नाही.

घरात त्यांच्या पुस्तकांचा विषय फारसा निघाला नाही. कोणते पुस्तक कधी लिहिले हे कोणाला सांगितले नाही. तसेच नाटक बाहेर कितीही गाजले तरी घरात ते कधीच गाजले नाही त्यामुळे घरातल्यांनी बघण्याचा प्रश्नच येत नाही. दळवींच्या ‘महानंदा’ सिनेमात त्यांच्या आरवलीच्या घराची दृश्ये आहेत. तरीसुद्धा तो चित्रपट मुंबईत लागला तेव्हा घरातल्या कोणीही तो पाहिला नाही. त्यांनी कधीच ‘मी लेखक आहे’ अशी ऐट घरात ठेवली नाही. ते स्वत: पत्नी-मुलांमध्ये आपल्या साहित्याविषयी बोलत नसत, परंतु कोणी त्याबद्दल बोलले तर निमूट ऐकून घेत. त्यांचा स्वभाव याला कारणीभूत असेल. अनेकांना आत्मस्तुती आवडते. पण जयवंत दळवींसारख्या मोठय़ा साहित्यिकाला कोणी आपली स्तुती केली तर संकोचल्यासारखे वाटायचे.
जयवंत दळवींच्या साहित्यात पारदर्शकताच जाणवते. त्यांच्या संपूर्ण साहित्यात त्यांच्या आरवलीच्या घराचे, गावाचे नि एकूणच कोकणातील लोकांचे प्रतिनिधित्व करणा-या माणसांचे चित्रण आढळते. जवळजवळ (कविता सोडून) लेखनाचे सर्व प्रांत काबीज करून आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. त्यांचा स्वत:बद्दलचा प्रांजळपणा त्यांच्या कथा, कादंबरी नाटकांतूनच नव्हे तर त्यांच्या विनोदी लेखनातूनही जाणवतो. अरविंद गोखले यांच्या ‘उभा जन्म उन्हात’ या कथेवर त्यांनी नाटक लिहून नाटय़ लेखनाला सुरुवात केली. सांगली, कोल्हापुरातील पाच प्रयोगांनंतर ते मुंबईला लागले. तिकीटविक्री होईना म्हणून पदरचे शंभर- दीडशे खर्चून चार-चार, पाच-पाच जिने चढून फु कट पास वाटले. प्रयोगाला गर्दी जमली.

मंगेश पाडगावकर पासावरचे नाटक पाहूनही कंटाळले, वैतागले आणि ‘दळवी, हे बंद करा!’ नाटक हा तुमचा प्रांत नाही! भाषणे आणि नाटके तुम्हाला जन्मात जमणार नाहीत असे सांगितले. पैकी पहिले खरे होते (दळवींच्या भिडस्त स्वभावामुळे) पण दुसरे दळवींनी खोटे पाडले. ‘सभ्य गृहस्थ हो!’ हे नाटक लिहिले. ते यशस्वी झाले. पण पहिल्या पडलेल्या नाटकाबद्दलचे सगळे आक्षेप, सगळय़ा टीका त्यांनी खिलाडूवृत्तीने स्वीकारल्या.
त्यांच्या ब-याच कथा, कादंब-या, नाटकांतून वेडसर- वेडगळ स्तरावरची माणसे दिसतात. त्यावरही खूप पत्रे, प्रतिक्रिया. सतीश दुभाषी या प्रख्यात नटवर्याने एकदा गंभीरपणे सांगितलंही, ‘दळवी, मी सांगतो म्हणून राग मानू नका!’ पण एके दिवशी तुम्हाला वेड लागेल! तुम्ही सावध राहा! तुम्हाला या वेडय़ा माणसांचे इतके वेड आहे की, ती माणसे एकदा तुम्हाला वेड लावतील. तुम्ही तो नाद सोडा!’ या बोलण्याचा आपल्यावर झालेला परिणाम १९८४च्या कदंब दिवाळी अंकातील आपल्या लेखात अत्यंत विनोद बुद्धीने चित्रित केला आहे. त्यांच्यातील खोडकर व्रात्य मूल त्यांच्या साहित्यातून जाणवते. त्यांची विनोदबुद्धी नि खिलाडूपणा जाणवणे त्याचबरोबर एक साहित्यिक शैली! मृत्यूकडेही त्यांनी त्याच खेळकरपणे पाहिले.

आरवलीच्या घराचा त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वावर गडद परिणाम जाणवतो. त्यांचा स्वभाव, त्यांचे एकूण व्यक्तिमत्त्व बरचंसे बुजरे, संकोची व एकलकोंडे झाले. घरात राजकारणावर चिडून हिंसक विचार व्यक्त करणारे दळवी. गोळी मारून अनेक प्रश्न जागच्या जागी सोडवणारे दळवी, स्वयंपाकघरातून बाहेर पडल्यावर सारे विसरत. बुजरेपणामुळे कुठेही भाषण करण्याचे टाळीत. पूर्णवेळ लेखन-वाचन करण्यासाठी निवृत्तीच्या सात र्वष आधीच चांगल्या पगाराची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला नि अंमलात आणला. दिसण्यात गंभीर आणि आतून विनोदी असल्याने ललित मासिकातील ‘ठणठणपाळ’ हे सदर सलग वीस वर्षे चालले.

जयवंत दळवींनी कथा, विनोद, प्रवासवर्णन, कादंबरी, एकांकिका, नाटक असे विविध वाङ्मय प्रकार लिहिलेत, पण साहित्य क्षेत्रातील आपल्या मोलाच्या कामगिरीबद्दल त्यांनी कोणाशी चर्चा केली नाही. ‘सूर्यास्त’ नाटकाचे दोनशे प्रयोग झाल्यावर एकदा दोन रुपयाचे तिकीट काढून शिवाजी मंदिरच्या गॅलरीत बसले आणि तिथे नातेवाइकांना बघताच नाटक न बघताच घरी परतले.

एकत्र कुटुंब पद्धतीत जगताना आलेली बंधने, लहानपणी महत्त्वाच्या वाटणा-या गोष्टीही न मिळणे याचा त्यांच्या मनावर खूप परिणाम झाला. ओळखी खूप होत्या पण जवळचा मित्र नाही. पहिल्यापासून मागे राहण्याची कृती तरी कसलेच थिटेपण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात नाही. साहित्यात कडवटपणा नाही. प्रसन्न विनोद करण्याकडे कल, त्यामुळे ‘ठणठणपाल’ लोकप्रिय झाला. त्यांनी स्वत: नाटके  लिहिली. लोकांनी त्यांच्या कादंब-यांवर नाटके तयार केली, चित्रपट काढले. मात्र त्यांच्या निकोप मनाला कधी अहंपणा शिवला नाही. भूक, दारिद्रय़, निरक्षरता, लैंगिक अतृप्ती हे सगळे तपशील जसे भावले तसेच त्यांच्या लेखनात आले. त्यांचा परमेश्वरावर विश्वास नव्हता. देवावरही नव्हता. पण वेतोबावर होता. याबद्दल कोणी हटकले तर ते म्हणत, ‘आयुष्याच्या अगदी पहिल्या दिवसापासून तो माझा साथी आहे. वेतोबा! माझा संकल्पनेतला साथी!’’

आपल्यामुळे कुणालाही त्रास होता कामा नये हे तत्त्व आयुष्याच्या अखेपर्यंत तर पाळलेच पण खूप गोष्टी मनातल्या मनात ठेवून मृत्यूनंतरही स्वत:बद्दल आश्चर्यचकित करणारे कुतूहल मागे ठेवले. कायमस्वरूपी!

जयवंत दळवींनी आत्मचरित्र लिहावे असे अनेकांना वाटे. मात्र दळवी आत्मचरित्र लिहिण्याच्या पूर्ण विरोधात होते. स्वत:संबंधी जे जे आठवते ते लिहायचे अशी आत्मचरित्र लिहिण्यामागची लेखकाची कल्पना असते. पण पृष्ठभागावर येणा-या आठवणी म्हणजे आत्मचरित्र नसून अंतरंग खरवडत जाऊन उमटणे हे कठीण कर्म म्हणजे आत्मचरित्र! मनातील सुप्त इच्छा, आकांक्षा, आशा वासना – ज्यांचा सभ्य संस्कृतीत उच्चारही करता येत नाही ते लिहिणे म्हणजे खरे आत्मचरित्र! मात्र आत्मसमर्थनासाठी आत्मचरित्रे लिहिली जातात-ती एकांगी असतात आणि स्वत:च स्वत:ला दिलेली प्रशस्तिपत्रे असतात असे दळवींचे मत होते. प्रांजळपणे सर्व गोष्टी उघडपणे लिहिता येतील अशानेच ते लिहावे, माझ्यात ते धर्य नाही असेही ते सांगत. अत्यंत सूक्ष्म तपशील देऊन दळवींनी सुखासमाधानाच्या आड येणा-या आणि सामान्य माणसाला माणसातून उठवणा-या, उद्ध्वस्त करणा-या गोष्टी लोकांसमोर (प्रेक्षक, वाचक, समीक्षक इ. ) आणल्या. साहित्यातून साहित्यिक उलगडत जात असेल तर बेगडी आत्मचरित्र कशासाठी हा दळवींचा प्रश्न! कोकणच्या लाल मातीत जन्माला आलेले अनमोल नररत्न थोर साहित्यिक जयवंत दळवी! वेतोरेचे भूषण!

लेखन संदर्भ - 'आरवलीचा जयवंत' - लेखिका संध्या तांबे.
जयवंत दळवींविषयी - लेखिका मंगला आठलेकर.

४ टिप्पण्या:

  1. अतिशय सुंदर लेख. हा लेख म्हणजे भारतीय किंवा किमान महाराष्ट्रातील, अगदी कोकणातीलच नव्हे तर प्रांताच्या उर्वरीत भागातील देखील, एकत्र कुटूंबांचे, त्यातील गुणदोषांचे, स्रीयांच्या होणार्‍या पिळवणूकीचे, त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाचे, त्यातूनही होणार्‍या मुलांच्या उत्तुंग जडणघडणीचे, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतूनही त्यांच्या पुढे जाण्याचे, त्यांनी कितीही मोठे यश मिळवले तरी घरातील लोकांनी त्याबद्दल औदासिन्य दाखवण्याचे तसेच त्याला लेखक म्हणून घरात यत्किंचीतही वेगळी किंवा सन्माननिय वागणूक ने देण्याचे लेखकाने अत्यंत अचूक वर्णन केलेले आहे. त्याबद्दल समीर गायकवाड यांचे कितीही अभिनंदन केले तरी ते कमीच पडेल. तू लेखक असला, ४ पुस्तके लिहिलीस म्हणजे तुला फार शहाणपण आले की काय, आम्ही लेखक नसलो तरी सुद्धा आम्हीच तुझ्यापेक्षा शहाणे आहोत, तू जे काही आहेस तोही आमच्यामुळेच आहेस आणि त्यामुळे तुझे यश तू मिळवलेले नसून ते आमचेच यश आहे असा अविर्भाव या उदासिनता,अबोलपणा आणि मूग गिळून गप्प बसण्यामागे असतो. याच्या मूळाशी आपले अपयश झाकण्याचा एक केविलवाणा प्रयत्नही असतो. हे अशा लोकांच्या मनस्वीपणाचे नव्हे तर अतिशय टोकदार अहंकाराचे द्योतक असते. तसेच आपल्या कौतुक करण्यामुळे हा अधिक पुढे तर जाणार नाही ना किंबहुना तो तसा जाऊ नये हा मत्सर आणि सुप्त इच्छा असते.हेच अशा लोकांच्या निष्र्कीय शांततेचे रहस्य असते. संदर्भासाठी ज्या दोन कलाकृृतिंचा आधार घेतला आहे त्या लेखनाला तर तोडच नाही. त्या लेखिकांचेही किती अभिनंदन करू आणि किती करू नको असा प्रश्न आहे. त्या लेखकद्वयींचेही मन:पूर्वक सहस्रश:अभिनंदन. समीर गायकवाड यांचे पुन्हा एकदा अभिनंदन केल्याशिवाय रहावत नाही, कारण, मी कै. जयवंत दळवींचा समकालीन नसलो आणि त्यांच्याइतका मोठा लेखकही नसलो तरी त्यांनी माझ्याच अनेक अनुभवांचे शब्दांकन केले आहे एवढेच मी म्हणेन.

    उत्तर द्याहटवा