![]() |
कवी अनिल आणि ख्यातनाम लेखिका, तथा त्यांच्या जीवनसंगिनी - कुसुमावती देशपांडे |
17 नोव्हेंबर 1961. एक हळुवार वाऱ्याची झुळूक आली आणि तिची प्राणज्योत मालवून गेली. आयुष्याभराची सांगाती अशी अचानक निघून गेली, त्याला हा धक्का कसा सहन झाला असेल? त्याच्या मनात काय विचार आले असतील? त्यावर त्याने एक अप्रतिम कविता लिहिली -
“अजुनी रुसून आहे,... खुलता कळी खुले ना...मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना !”
हळव्या मनाचा तो कवी म्हणजे कवी अनिल होत. आत्माराम रावजी देशपांडे उर्फ अनिल. आणि ती म्हणजे कुसुमावती देशपांडे. पूर्वाश्रमीची कुसुम रामकृष्ण जयवंत.
डिसेंबर 1961. अनिलांचा 'सांगाती' हा काव्यसंग्रह मौज प्रकाशनने प्रकाशित केला. त्यामध्ये ही कविता समाविष्ट केली गेली. या कवितेची पार्श्वभूमी असली तरी 'या कवितेचा कालखंड ऑगस्ट १९६१चा असून त्यांच्या पत्नीला उद्देशूनच मात्र तिच्या हयातीत ती लिहिली असल्याचे'ही काही जाणकार सांगतात. पण यावर एकदा दस्तुरखुद्द कुमार गंधर्वांनीच पडदा टाकल्याचे वाचल्याचे स्मरते.
अजुनी रुसून आहे,... खुलता कळी खुले ना...मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना..
आपण जिच्यावर जीवापाड प्रेम केले. जिचा चाळीसएक वर्षे सहवास लाभला. ती निघून गेलीय. तिचा निष्प्राण देह शेजारी आहे. तिच्या त्या म्लान चेहऱ्याकडे बघून अनेक आठवणींचे काहूर मनात माजते. तो विचार करतो ही अशी का रुसून गेली आहे? हा असला कसला रुसवा? तिचा चेहरा असा का म्लान झाला आहे? तिच्या चेहऱ्यावर नेहमीची ती दिलखुलास कळी खुलत नाहीये. ओठांच्या हळुवार पाकळ्या मिटून गेल्या आहेत अन त्या खुलता खुलेनात! काय झालेय तिला?
पुढच्या पंक्तीत तर ते आणखी भावविभोर होऊन जातात. मी समजूत करावी म्हणून तू रुसायचीस. मी, हास म्हणताच तू रडता रडताही हसायचीस, हा आपल्या रुसव्याफुगव्याचा प्रेमाचा शिरस्ता होता. पण आज तसं काही होत नाहीये. माझं समजावणं तुला आज पटत नाहीये. आज तू असा काही अबोला धरलायस की तुझ्याच्याने काहीच कसे बोलवेना!!
नंतरच्या पंक्तींत त्या दोघांमधील उत्कट, निरागस, गहिऱ्या अन् हळव्या प्रेमाच्या अल्वार श्रावणझडीच्या प्रत्ययाने आपल्या डोळ्यात नकळत अश्रू येतात. अश्रुंचा बांध डोळ्यात फुटला आहे, पण हे अश्रू देखील आता अनंताच्या सागरात कुठे तरी विरणार आहेत म्हणूनच का पापण्याचा आडोसा घेऊन तु दूर आहेस? जीवाची अक्षरशः तगमग होतेय, मनाची तडफड होतेय. काही चुकले तर नसेल ना अन् त्या चुकीची अढी तर मनात राहिली नसेल ना, याचे अटीतटीचे पोटतिडकीचे द्वंद्व मनात चालू आहे. यावर आता उत्तर काहीही येवो पण आपल्या दोहोंमध्ये हे जे काही अंतर नियतीने पाडले आहे ते अंतर मिटविल अशी मिठी काही मला मारता येईना! हे नियती मी किती दुर्दैवी आणि हतबल आहे की, मी इतकेही करू शकत नाही....
शेवटी ते परमेश्वरालाच विचारतात की, हा तुझा तर काही गूढ डाव नाही ना? ज्यामध्ये तु हे रुसव्याचे दृश्यभास माझ्यापुढे उभे करत आहेस. माझ्या काळजाचा ठाव घेण्यासाठी, माझ्या अंतरंगात डोकावून माझ्या प्रेमाची एखादी कसोटी तर तु घेत नाहीयेस ना? अंतिम पंक्तीत ते पुन्हा तिला विचारतात, हा असा कसा रुसवा धरला आहेस, हा कसला अबोला आहे की ज्यात तुला आपले कोण कळेना ( तु त्या विश्वनिहंत्याच्या नादाला लागू नकोस, तु रुसवा सोड परत ये, तुझा आपलं माणूस मी आहे. तो नाही. तुला आपलं माणूस कळायला पाहिजे) तेंव्हा तु हा रुसवा सोड. उसने अवसान आणून मी हे म्हणतोय खरे पण तु अजुनी रुसून आहेस अन तुझी कळी काही केल्या काही खुलत नाहीये.....
कवितेतील प्रत्येक शब्द काळजाचा ठाव घेऊन जातो, अथांग प्रेमाची शांत शीतल अनुभूती देऊन जातो. कसलाही आक्रस्ताळेपणा नाही. ना कुठले अवडंबर ना शब्दांचे आकांडतांडव. जीवनातल्या अंतिम सत्याचे इतके मुग्ध शब्दांकन करून दिग्मूढ करणारे हे काव्य म्हणजे प्रेमकवितेतल्या भावभावनांचे सकळ आणि निर्मळ प्रकटीकरण आहे. नकळत डोळे कधी पाणावतात काही कळत नाही व आपणही कुठे तरी स्वतःला हरवून जातो..
कवी अनिल यांच्या ‘सांगाती’ला रसिक वाचकांनी डोक्यावर घेतले. त्यातही ‘रुसवा‘ या कवितेला लोकांनी आपल्या हृदयाच्या कप्प्यात हळुवारपणे आजही जतन करून ठेवलेले आढळते. या नितांतसुंदर कवितेला भावगीतात प्रस्तुत करण्याविषयीच्या चर्चा सुरु झाल्यावर आनिलांनी अक्षरशः हट्ट धरला की पंडित कुमार गंधर्वच हे गातील अन्यथा विषय बाजूला राहू द्या. पंडितजींनी होकार दिला, गाणे गायलेसुद्धा. स्वतःच त्याला संगीत दिलेलं. अशा रीतीने मराठी भावगीतांच्या माळेत गुलबकावलीचे हे भावगंधित सुमन गुंफले गेले.....
रुसवा ......
अजुनी रुसून आहे...
खुलता कळी खुले ना...
मिटले तसेच ओठ,
की पाकळी हले ना..
.
समजूत मी करावी,
म्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगताच,
रडताहि तू हसावे,
ते आज का नसावे,
समजावणी पटे ना
धरीला असा अबोला,
की बोल बोलवेना ।
का भावली मिठाची,
अश्रूंत होत आहे,
विरणार सागरी ह्या
जाणून दूर राहे ?
चाले अटीतटीने,
सुटता अढी सुटेना,
मिटवील अंतराला,
ऐसी मिठी जुटे ना।
की गूढ काही डाव,
वरचा न हा तरंग,
घेण्यास खोल ठाव,
बघण्यास अंतरंग ?
रुसवा असा कसा हा,
ज्या आपले कळेना ?
अजुनी रुसून आहे,
खुलता कळी खुले ना ।
कवी अनिल यांच्या अनेक कविता ह्या शीतल ज्योतीसम आहेत ज्यात त्यांच्या हळव्या मनाचे अन् भावोत्कटतेचे, शीतल दर्शन होत राहते.
'बैस जवळि ये, बघ ही पश्चिमकोमल रंगी फुलली अनुपम',
'केळीचे सुकले बाग, असुनिया पाणी कोमेजलि कवळी पाने, असुनि निगराणी',
' कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कोकिळा ?
रात्री तरी गाऊ नको, खुलवू नको अपुला गळा...
सांगाल का त्या कोकिळा, की झार होती वाढली आणि द्याया दाद कोणी रात्र जागुन काढली'…‘,
'पावसा पावसा थांब ना थोडा
पिळून काढुन न्हालेले केस बांधु दे
एकदा सैल अंबाडा'…’
‘मला आवडते वाट वळणाची दाट झाडीची नागमोडीची ही अलिकडची,नदीच्या थडीची…’
या व अशा देखण्या कविता लिहून मराठी कवितेत आपले एक स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या अनिलांची ओळख मुक्तछंदाचे प्रवर्तक म्हणून असली तरी त्यांनी प्रचलित केलेला 'दशपदी' हा काव्यप्रकार देखील तितकाच मनोरम्य ठरला. सुनीत ज्याप्रमाणे चौदा ओळींचे असते, तशाच धर्तीवरचे दहा काव्यपंक्तीत गुंफले गेलेले काव्य म्हणजे दशपदी !
एका संस्कारक्षम वयात काही वाचन होणे अनिवार्य असते, त्याशिवाय जीवनातील विविध अर्थ आणि सामाजिक जाणिवांच्या लक्षवेधी संवेदना याची खरी अनुभूती येत नाही. अशा वाचनाचा अविभाज्य अंग म्हणजे कविता. मला अशा कविता वाचायला मिळाल्या आणि त्यातून मी घडत गेलो हे माझे भाग्य समजतो. या अद्वितीय प्रतिभावंत कवीस त्रिकाल नमन. त्यांनी लिहिलं आणि पिढ्या मागून पिढ्या त्यावर वाढत गेल्या घडत गेल्या...
मराठी साहित्यात "कुसुमानिल' हा कवी अनिल आणि कुसुमावती देशपांडे यांच्यातल्या पत्रांचा संग्रह प्रसिद्ध आहे. त्यांच्या लग्नाच्या आधीची पत्रे यात समाविष्ट आहेत आणि 1972 ला तो प्रकाशित झाला होता. कवी अनिल आणि कुसुम जयवंत यांची पहिली दृष्टभेट 2 जुलै 1921 रोजी झाली आणि अनिल यांनी आपल्या प्रियेला लिहिलेल्या पहिल्या पत्राची तारीख होती- 2 जुलै 1922. आजच्या मोबाईल आणि चॅटिंगच्या जमान्यात प्रेमपत्रे किंवा चिठ्ठी याचे महत्व आजच्या पिढीला कळणार नाही. प्रेम भावना किती हळुवारपणे आणि नितळ शैलीत व्यक्त करता येतात याचे हे एक आदर्श उदाहरण आहे. कवी अनिल सुरुवातीस या पत्रसंग्रहाच्या प्रकाशनाच्या विरोधात होते. आपल्या प्रेमभावना सार्वजनिक व्हाव्यात हे त्यांना पटले नव्हते. प्रकाशक ह.वि. मोटे यांनी त्यांचे मन वळवले आणि मग ते राजी झाले. 'कुसुमानिल'ची नवी आवृत्ती संगीतकार कौशल इनामदार यांच्या मराठी अस्मिता सांस्कृतिक प्रतिष्ठान या संस्थेने नव्या रुपात प्रकाशित केली आहे. आज कवी अनिल यांचा 43वा स्मरणदिन! त्या निमित्ताने हे स्मरणरंजन!
-- समीर गायकवाड.
दोन नोंदी -
नोंद क्र. 1) कवी अनिल यांची ओळख आधुनिक मराठी कवी अशीच आहे. त्यांचे पूर्ण नाव नाव आत्माराम रावजी देशपांडे. ‘अनिल’ या टोपण नावाने त्यांनी काव्यलेखन केले. त्यांचा जन्म मुर्तिजापूरचा. बी.ए.,एल्एल्. बी. झाल्यावर न्यायाधीश म्हणून काम केले. नंतर नागपूरला समाजशिक्षण-विभागाचे संचालक. पुढे दिल्लीला नॅशनल फंडामेंटल एज्युकेशन सेंटरचे संचालक म्हणून नेमणूक. प्रसिद्ध मराठी लेखिका व टीकाकार कुसुमावती देशपांडे या त्यांच्या पत्नी होत. 'फुलवात' हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह (1932). त्यात 1920 ते 1931 या कालखंडातील त्यांच्या कविता आहेत. या कवितांत प्रेमजीवनातील उत्कट अनुभूतींचा गूढ व प्रतीकात्मक आविष्कार आढळतो. 'प्रेम आणि जीवन' (1935), भग्नमूर्ति (1940) व 'निर्वासित चिनी मुलास' (1943) ही त्यांची खंडकाव्ये मुक्तच्छंदातच रचिलेली आहेत. 'पेर्ते व्हा' (1947) या काव्यसंग्रहात अनिलांच्या 1932 ते 1947 मधील स्फुट कविता आहेत. 1947 ते 1961 मधील कविता ‘सांगाती’ (1961) ह्या काव्यसंग्रहात आहेत. प्रेमजीवनाची उदात्तता, सामाजिक उद्बोधन व व्यापक मानवतावाद हे त्यांच्या आशयाचे विशेष आहेत. त्यांच्या काव्यात रविकिरण मंडळाच्या काव्यसंकेतांविरुद्ध झालेली प्रतिक्रिया आढळते आणि काव्यविचारात अशा प्रतिक्रियेबरोबर नवकाव्यातील काही प्रवृत्तींचा निषेध दिसून येतो. मुक्तच्छंद हा अनिलांच्या पुरस्काराचा, प्रयोगशीलतेच्या व जिव्हाळ्याचा विषय आहे. ‘मुक्तछंद’, ‘मुक्तछंदः वादाचा थोडा इतिहास व विचार’ आणि ‘मुक्तछंदाची आवश्यकता’ हे त्यांचे या संदर्भातील महत्त्वाचे लेख. 'भग्नमूर्ती' या खंडकाव्याच्या दुसऱ्या आवृत्तीत (1965) ‘मुक्तछंदाचे वाचन’ व ‘मुक्तछंद का म्हणून ?’ या विषयांवरील परिशिष्टे आहेत. त्यांचे समीक्षालेखन थोडे आहे व ते काही लेखांतून व भाषणांतून विखुरलेले आहे. 1966 मधील विदर्भ साहित्य संमेलनाचे व 1958 मधील मालवण येथील महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 1964 पासून ते साहित्य अकादेमीचे सभासद होते. या संस्थेने त्यांच्या 'भग्नमूर्ती' या खंडकाव्याची अन्य भारतीय भाषांतील अनुवादासाठी निवड केली होती. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळाचेही ते सभासद होते.
नोंद क्र. 2) कवितेच्या पार्श्वभूमीबद्दलची नोंद - डिसेंबर 1961 मध्ये अनिल यांचा ‘सांगाती’ हा काव्यसंग्रह मौज प्रकाशनने प्रकाशित केला. त्यामध्ये ही कविता समाविष्ट केली गेली. या कवितेचा कालखंड ऑगस्ट 1961 चा असून त्यांच्या पत्नीला उद्देशूनच मात्र त्यांच्या हयातीत ती लिहिली असल्याचेही काही जाणकार सांगतात. पण यावर एकदा दस्तुरखुद्द कुमार गंधर्वांनीच पडदा टाकल्याचे वाचल्याचे स्मरते. मात्र अलीकडेच प्रकाशित झालेल्या माहितीनुसार असा अर्थाअर्थीही संबंध नव्हता. 'सांगावा' कवितेबद्दल भिन्न मत मांडणारी माहिती 7 सप्टेबर 2019 रोजीच्या दैनिक लोकसत्ता मध्ये प्रकाशित झाली. डॉ. गीता भागवत यांच्या या लेखात म्हटलंय की, "कुसुमावतींचं निधन झालं दिल्लीमध्ये 17 नोव्हेंबर 1961 ला आणि अनिलांनी आपली ही ‘रुसवा’ कविता लिहिली होती यवतमाळमध्ये 5 ऑगस्ट 1947 या दिवशी. कुसुमावतींच्या निधनापूर्वी तब्बल चौदा वर्ष आधी. कुसुमावतींच्या निधनापूर्वी काही दिवस अगोदर प्रसिद्ध झालेल्या ‘सांगाती’ या अनिलांच्या कवितासंग्रहामध्ये ती समाविष्ट आहे.....
मग प्रत्यक्षात या कवितेचं जन्मरहस्य काय? खरंच का 1947 च्या ऑगस्ट महिन्यात अनिलांची प्रिया, कुसुमावती, त्यांच्यावर रुसली होती आणि प्रियकराच्या समजावणीनंही तिचा राग-रुसवा विरघळत नव्हता? तसंदेखील काहीही नव्हतं. वस्तुस्थिती काय होती ते कळलं की आपल्याला आश्चर्याचा आणखी एक धक्का बसतो. काय झालं होतं नेमकं त्यावेळी? मनातील भावना कवितेत उतरवण्यासाठी नेमके शब्द सुचत नाहीयेत, जणू प्रतिभाशक्ती रुसून बसलीय अशा मनोवस्थेत त्या फुरंगटलेल्या प्रतिभाशक्तीला उद्देशून लिहिलेले ते शब्द आहेत!
कवी अनिल यांच्या नातलगांनी या माहितीवर शिक्कामोर्तब केलेलं असल्याने ही माहितीच खरी मानली जावी.
*********************************************************
अनिल यांच्या काही कविता -
पावसा पावसा किती येशील ? -
पावसा पावसा किती येशील?
आधीच ओलेत्या रातराणीला
किती भिजवशील?
पावसा पावसा थांब ना थोडा
पिळून काढुन न्हालेले केस
बांधु दे एकदा सैल अंबाडा
पावसा पावसा लप ढगात
सागफ़ुलांची कशिदा खडीची
घालु दे तंगशी चोळी अंगात
पावसा पावसा ऊन पडु दे
वाळाया घातला हिरवा शालू
चापूनचोपून तिला नेसू दे
पावसा पावसा पाहा ना जरा
जांभळ्या फ़ुलांचा देवबाभळीने
वेणीत घालाया केला गजरा
पावसा पावसा आडोश्यातुन
साजरा शृंगार रानराणीचा
दुरून न्याहाळ डोळे भरून …
कवी – अनिल
______________________________
केळीचे सुकले बाग, असुनिया पाणी-
केळीचे सुकले बाग, असुनिया पाणी
कोमेजलि कवळी पाने, असुनि निगराणी
अशि कुठे लागली आग, जळति जसे वारे
कुठे तरी पेटला वणवा, भडके बन सारे
किती दूरचि लागे झळ, आंतल्या जीवा
गाभ्यातिल जीवनरस, सुकत ओलावा
किती जरी घातले पाणी, सावली केली
केळीचे सुकले प्राण, बघुनि भवताली
गीत – अनिल
____________________________
सारेच दीप कसे मंदावले आता
सारेच दीप कसे मंदावले आता
ज्योती विझू विझू झाल्या
की झड घालून प्राण द्यावा पतंगाने
असे कुठेच तेज नाही !
थिजले कसे आवाज सारे?
खडबडून करील पडसाद जागे
अशी कुणाची साद नाही?
या रे या ! द्या जीव या बाणीवर
अशी वाणी निघत नाही
भावनाना चेव नाही
यौवना आव्हान नाही
संघर्ष नाही झुंज नाही
जावे ज्या मागे बेधड़क
असा झुंजार वीर नाही
कामी यावा देह जिथे
असा रणसंग्राम नाही !
प्रेतेही उठतील अशा
मंत्राचा उदघोष नाही !
आशांचा हिरमोड
आणि बंडांचा बिमोड
सारीकडे तडजोड
होऊन, सारे कसे सर्दावले आता?
सारेच कसे थंडावले आता !
साऱ्याच आघाड्यावरी ही अशी हो सामसुम !
वरतीखाली सामसूम
इकडेतिकडे सामसूम
आजूबाजूस सामसूम
जनमनांतहि सामसूम
हृदयातहि सामसूम
कुठे पोटतिडिक नाही
प्रेमामधेही धडक नाही
जीव ओढून घेईल अशी
डोळ्यामध्ये फडक नाही
तारुण्याची चमक नाही,धमक नाही
साहित्यात चैतन्य नाही
संगीतात इंगित आणि कलेमध्ये उकल नाही
सरळपणाला भाव नाही
साधा सदाचार नाही
जो तो कसा लाचार आहे
ह्याची त्याला फूस आहे
घराघरात घूस आहे !
तेरी चुप मेरी चुप
गुपचुप
सारा हिशेबी व्यवहार आहे !
जो तो जागा धरून आहे
नाही तर अडवून आहे
दबेल असून चढेल आहे
योजनांची चळत आहे
परकियांची मदत आहे
तज्ञाचीहि उणीव नाही
आपली जाणीव नाही !
त्याग त्यागिले भोग मागे
दाता दिनयाचना मागे
शील आपले मोल मागे
सौंदर्याची विक्री चाले
कागदांच्या कपटयांवर !
सारीं स्वरूपें कुरूप झाली
हुरूप कशाचा नाही चित्ता !
सारेच दीप कसे मंदावले आता !!
______________ ______________________
'अजुनी रुसून आहे' या कवितेच्या निर्मितीबद्दल जो दावा केला आहे तो चुकीचा असून दुरुस्त करणे.
उत्तर द्याहटवासंदर्भ : https://www.loksatta.com/chaturang-news/atmaram-ravaji-deshpande-original-poem-abn-97-1966263/
नमस्कार. आपण एक महत्वाची माहिती निदर्शनास आणून दिल्याबद्दल आपले आभार... लोकसत्तामधील लेखातील माहिती ब्लॉगमध्ये समाविष्ट करून घेतोय.
हटवा