Wednesday, June 22, 2016

साहिब, बिवी और गुलाम - प्रेमाची अनोखी दास्तान ....


एखाद्या घरंदाज, देखण्या, खानदानी स्त्रीला जर आपला पती दुसऱ्या स्त्रीकडे शौक पुरे करायला जातो हे कळले तर तिला काय वाटेल ? ती याला कसे हाताळते याला जास्त महत्व आहे… त्याच्यात ती बदल घडवू शकते का ? आपला नवरा सुधरावा म्हणून ती काय करू शकते ? या प्रश्नाचे व्यक्तिपरत्वे वेगळे उत्तर येईल. याचा धांडोळा घेताना गुरुदत्तने रुपेरी पडद्यावर एक नितांत सुंदर पोट्रेट रेखाटले होते, त्याचे नाव होते. 'साहिब, बिवी और गुलाम'… त्यात त्याने मीनाकुमारीला असे काही चितारले होते की एकाच वेळी बेफाम नशाही यावी अन निमिषार्धात ती नशा खाडकन उतरावीही… मीनाकुमारी परफेक्ट ट्रॅजेडीक्वीन होती, तिने हे आव्हान लीलया पेलले !आपला 'साहिब' आपल्याचपाशी रहावा यासाठी सिनेमातली 'छोटी बहु' दारू पिण्यापासून ते गाणे म्हणून त्याचे मन रिझवण्यासाठी सारं काही करायला सिद्ध होते…. मात्र तिचीही एक अट असते - 'त्याने हे सर्व शौक घरीच पुर्ण करायचे, बाहेर जायचे नाही.' यात तिचीच दुर्दशा होते, त्याला फरक पडत नाही…

त्याचं बाहेरख्यालीपण थांबवण्यासाठी ती घरी कोठा सुरु करते. दारू पिऊ लागते, त्याला रिझवू लागते. त्याच्यासाठी गाऊ लागते. त्याचे मन मात्र तिच्यात रमत नाही, किंबहुना तिनं असं काही करावं हे त्याच्या पचनी पडत नसतं. तिचं वागणं त्याला उत्शृंखल वाटू लागलं होतं. तो स्वतः बदफैल असतो याचं त्याला तिळमात्र वैषम्य नसतं मात्र तिच्या या वागण्याला त्याचा मूक विरोध होतो, जो हळूहळू जहरी होत जातो. शिवाय तो परत त्याच्या 'त्या' कोठेवालीकडे अय्याशीसाठी जातोच ! आपल्या उभ्या आयुष्याची राखरांगोळी करून ती आपल्या पतीसाठी स्वतःच्या जीवनाचा नरक करते. तरी तो तिच्यावर खुश होत नाही याचं तिला वाईट वाटू लागतं. आधी, त्याला रिझवण्यासाठी मदिरा पिणारी स्वतःला मदिराक्षी करून घेण्याच्या नादात आणखी दुःखी कष्टी होते. मग पुढे पुढे स्वतःचे दुःख हलकं करण्यासाठी पिऊ लागते...पीतच जाते ! पुढे जाऊन तिचा पती अधू होऊन जेंव्हा नाईलाजाने घरी पडून राहतो तेंव्हा त्याच्या तंदुरुस्तीसाठी सर्व दिव्ये पार पाडायलाही ती तयार होते ! तिच्या स्वप्नाच्या चिंधड्या उडत राहतात. एक शोकांतिका बनून सिनेमा अवती भोवती घुमत राहतो.

चित्रपटात एका सीनमध्ये छोट्या बहुच्या कानावार येतं की भूतनाथ(गुरुदत्त)कडे मोहिनी सिंदूर नावाचे एक चमत्कारिक कुंकू आहे, जी स्त्री हे कुंकू आपल्या भाळी लावेल तिचा नवरा तिला वश होईल. आपल्या बेवफा पतीला वश करण्यासाठी छोटी बहु आपला विश्वासू नोकर बन्सी(धुमाळ) याला भूतनाथला हवेलीवर घेऊन यायला सांगते. भूतनाथ आणि बन्सी हवेलीत छोटी बहुच्या शयनकक्षात दाखल होतात तेंव्हा मीनाकुमारीचे अप्रतिम सौंदर्य गुरुदत्तच्या कॅमेऱ्याने टिपले आहे त्याला तोड नाही. तिची विवशता आपल्याला हलवून जाते. तिला जेंव्हा हे खोटे आहे हे कळते तेंव्हा ती पुन्हा उन्मळून पडते. अनेक छोट्या प्रसंगातून छोटी बहु आपल्या अंतःकरणात रुतत जाते.. चित्रपटातला छोटे सरकारच्या रूपातला जमीनदार असणारा रेहमान हा वास्तविक जीवनात आपल्या सर्वांच्या चरित्रात डोकावतो. पुरुषाने सर्व काही करावं पण स्त्रीने ते सर्व काही करू नये अशी एक पुरुषी सरंजामी वृत्ती आपल्याकडे सर्वत्र आढळते. पुरुषाला ज्या गोष्टी बाहेरच्या स्त्री सोबत करायच्या आहेत त्याच गोष्टी घरच्या स्त्रीसोबत करताना तो 'अनकंफर्टेबल' होतो ! पुरुषाचे बाहेरख्यालीपण स्त्री जितक्या सहजतेने मान्य करते तितक्या सहजतेने एखादा पुरुष आपल्या स्त्रीचं व्यभिचारी वर्तन सहन करेल का हा प्रश्नही नकळत मनात येऊन जातो.. खरेतर आपण सारेच थोड्याफार प्रमाणात कधीतरी बदफैल झालेले असतो याची टोचणी 'साहिब बिवी..'मधून गुरुदत्त नकळत आपल्यात उतरवत राहतो…. प्रश्न विचारत राहतो, 'आपली पत्नी आणि तिच्या स्वप्नांचे काय ? तिचे काय? तिने हे सर्व घरी- बाहेर सुरु केले तर आपण तिच्याशी कसे वागू ?" वास्तवात आजही पुरुषी वर्चस्वामुळे स्त्रीच्या देहसुखाच्या कल्पनांचा, सुख दुःखाच्या कल्पनांचा विचका सर्वत्र होत असतो, कधी तो दिवसा उजेडी बंद शय्यागृहात हाय प्रोफाईल असतो तर कधी तो फ्लाय ओव्हरच्या खाली उघड्यावर अर्ध्या रात्री अचेतन शरीराबरोबर होणारया वासनेने बरबटलेला असतो…… तिच्या वासना अन भावना ती कधी प्रकट करत नाही, कधी व्यक्त झाल्याच तर ती त्याच्याशी समझौता करू पाहते… 'साहिब बिवी और… ' कितीही वेळा पाहिला तरी दरवेळेस नवीन संदर्भ शिकवतो. मनातला अपराधी भाव दृढ करतो अन परत परत अस्वस्थ करतो…

वास्तविक जीवनातही या सिनेमापासूनच मीनाकुमारीला मदिरा जवळची वाटली अन नंतर तर ती त्यातच आकंठ बुडाली. 'साहिब बिवी..' मधलं दारूच्या आहारी गेलेल्या घरंदाज बायकोचं कॅरेक्टर मीनाकुमारी वास्तवात जगली होती. तिच्या करिअरमध्ये एकाहून एक उत्कृष्ट सिनेमांचा गुलदस्ता ती रसिकांसाठी मागे सोडून गेली. तिच्या अखेरच्या क्षणी ती एकटी पडली होती ; तिचा एकांत इतका दुखद ठरला होता की, एका चाहत्याने तिच्या रुग्णालयाचे बिल अदा केले होते ! मीनाच्या अभिनयाची एक वेगळीच छाप होती. तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या डोळ्यांत आपोआप अश्रू तरळायचे. गुरुदत्तच्या 'साहिब बीवी ' मधील 'छोटी बहू' जणू मीनाच्या खासगी आयुष्यात सामील झाली होती. मीना कुमारी अशी पहिली अभिनेत्री होती की जी आपले दुःख, वेदना अन औदासिन्य मिटविण्यासाठी परपुरुषांबरोबर बसून दारु प्यायची.… 

धर्मेंद्रने प्रेमात दगा दिल्यानंतर ती दारुच्या आहारी गेली होती. 'साहिब बिवी..' नंतर दहा वर्षांनी ती अल्लाहच्या दरबारी आपली कैफियत मांडायला गेली. मीनाचे आयुष्य म्हणजे बॉलीवूडच्या पांढरया पडद्यामागची काळी बाजू होय. तिने स्वतःला दारुच्या नशेत झोकून देऊन केलेली ती एक आत्महत्त्याच होय. एका देखण्या अभिजात सौंदर्याने नटलेल्या प्रतिभावंत अभिनेत्रीचा हा करूण मृत्यू हिंदी चित्रपटसृष्टीतली एक दंतकथा बनून गेला. पण आजही सर्व वयाच्या चाहत्यांनी तिला आपल्या हृदयाच्या एका कप्प्यात हळुवार प्रेमाने जतन करून ठेवले आहे, चित्रपटातल्या ट्रॅजेडी क्वीनचे व्यक्तिगत आयुष्य पराकोटीच्या ट्रॅजेडीने भरलेले असावे हा केव्हढा दैवदुर्विलास ! यामुळेच की काय आजही मनाच्या एका काळोख्या कोपरयात आर्त आवाजात ती गात असते, "ना जाओ सैंय्या, छुडाके बैंया...कसम तुम्हारी मैं रो पडूंगी.....' ! 

- समीर गायकवाड.