मंगळवार, २९ जानेवारी, २०१९

प्रिय जॉर्ज फर्नांडीस ..



तर जॉर्ज अखेर तुम्ही गेलातच.
आता सगळीकडे तुम्हाला घाऊक श्रद्धांजल्या वाहिल्या जातील.
त्यात ते सुद्धा सामील असतील ज्यांनी तुम्हाला शहिदांचा लुटारू म्हटलं होतं !
जॉर्ज तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जाल असं त्यांना का वाटलं असावं ?
सैनिकांच्या शवपेट्यांत तुम्ही पैसा खाल्ला असा बेफाम आरोप तुमच्यावर झाला होता.
मरतानाही तुम्हाला त्याच्या वेदना जाणवल्या का हो जॉर्ज ?
तुम्ही तर तेंव्हाच मरण पावला होतात जेंव्हा तुमची तत्वे मरून गेली होती, किंबहुना समाजवादयांचे वारसदार म्हणवल्या गेल्या बाजारू नवसमाजवादयांनीच त्याची हत्या केली होती.
जॉर्ज तुम्ही त्यांना आवरलं का नाही कधी ?



आता 'जेपीं'ना भेटल्यावर तक्रार करणार की हतबलतेची कबुली देणार ?
तसे तर मागील कित्येक वर्षे बिछान्याला खिळून होतात.
तुमच्या जाण्याने पोकळी निर्माण झालीय असं आता म्हणणारे तुम्हाला भेटायला आले होते का हो कधी ?
की साधी विचारपूसही तुमची केली त्यांनी कधी ?
मला माहितीय जॉर्ज तुम्हाला या आजाराचा आधारच झाला असणार !
'स्किझोफ्रेनिया' झाला म्हणून तुम्ही काही वर्षे जगलात तरी.
नाहीतर तत्वे गुंडाळून त्यांचे हवन करणाऱ्या या आताच्या जगात तुम्ही कसे जगला असतात ?

तुमचीही काही वेगळी तत्वे होती का जॉर्ज ?
आणीबाणीच्या काळातले हिरो तुम्ही,
मुंबईचे बंदसम्राट तुम्ही,
कामगारांचा एल्गार तुम्ही,
वंचितांची ढाल तुम्ही
आणि शोषितांची तलवार तुम्ही
पण तळपून उठावं आणि आपल्याच विचारांशी ठाम राहावं असं आयुष्यभर का वागला नाहीत तुम्ही ?

तुमच्या साध्या राहणीमानाचे खूप आकर्षण होते हो !
ते तुम्हाला खूप शोभूनही दिसायचं.
तुम्ही तुमचं लढाऊ व्यक्तीमत्व अगदीच साधंसोपं ठेवलेलं.
तुमच्या विचारधारा ठाम होत्या तरीही तुम्ही त्यांना मुरड घातलीत.
विचारांची फारशी गुंतागुंत नव्हती की छक्केपंजेही फारसे जमत नव्हते. खरे तर तुम्ही एखाद्या आयाळ नसलेल्या सिंहासारखे होतात.
विराट ताकदीच्या हत्तीने आपल्या गंडस्थळावर स्वतःहून बसवून घेतलेल्या माहुताच्या अधीन व्हावं तसं तुमचं झालं होतं !

जॉर्ज तुमचा कळप चुकला होता का हो ? की तुमचाही 'कंडोम' झाला ?
जॉर्ज तुम्ही वाजपेयींचे स्नेही होतात, मतभेद असलेले मित्र होतात
त्यांच्या तेरा पक्षाच्या कडबोळ्या सरकारचे निमंत्रक होतात
तुम्हाला कधी याची खंत वाटली नाही का ? वाटली असली तरी तुम्ही बोलत नव्हता.

तुम्ही नेहमी मागे मागे राहत, तोंडपाटीलकी करण्यापुरतेच तुम्ही होतात
तरीही संसदेतले तुम्हीं बदनाम मंत्री होतात !
तुमच्यावर प्रदीर्घ काळ बहिष्कार घातला होता तेंव्हा तुम्ही कुणाशी हो बोलत होतात ?


एका हाकेसरशी तुम्ही मुंबईची चाकं थांबवत होतात ही ताकद तुम्ही कशी गमावली याचा विचार करताना तुम्ही भावविवश होऊन जात.
खरे सांगा जॉर्ज तेंव्हा तुम्हाला काय वाटायचे ?
गिरणी कामगार देशोधडीला लागल्यावरही तुम्ही मिठाची गुळणी धरून होतात, नेमकं काय चाललं होतं तेंव्हा तुमच्या मनात ?
मला माहितीय ते उत्तर !
तुम्ही स्वतःच्याच सापळ्यात अडकला होतात जॉर्ज !
सालागणिक नव्हे दशकागणिक हेच तुमच्यासोबत घडत आलेलं.
तुम्ही नेहमी 'हिटविकेट' जात राहिलात !

एक खाजगी प्रश्न विचारतोय जॉर्ज, तुम्ही नेहमी खरे बोललात. यावरही खरेच बोलाल.
तसं तर जिथं खरं सांगू शकत नव्हतात तिथं तुम्ही सोयीस्कर मौनात जात, राजकारणात इतकी तर तडजोड करावीच लागते. होय ना जॉर्ज !
जाऊ द्या. प्रश्नाकडे वळतो.
जया जेटलींशी संबंध असल्याचा आरोप झाल्यावरच तुम्ही कोसळून गेला होतात हे खरे आहे ना ?
आमच्या अरुणा देशपांडेंनी तुम्हाला मागे एक प्रश्न विचारला होता, तुमच्यापर्यंत पोहोचला होता की नाही हे ठाऊक नाही
पण आपल्याला काही तरी विचारलं जातंय यामुळे तुम्ही अस्वस्थ झाला होतात
स्वतःला कोंडून घेतलं होतंत तुम्ही.
तुम्हाला राजकारणातून संपवण्याचा तो डाव होता जो तुमच्याच तत्कालीन मित्रांनी आखला होता असं तुम्ही म्हणालात
मला सांगा जॉर्ज, या मित्रांना खुर्ची दिली कुणी ?

म्हणूनच मी वरती म्हटलंय जॉर्ज, की तुम्ही नेहमी स्वतःच्याच सापळ्यात अडकत राहिलात !

एक महत्वाचा सवाल.
जॉर्ज तुम्ही नितीशशी शेवटचे कधी बोललात ?
त्यांना चार गोष्टी सांगितल्यात की नाही ?
कारण ते देखील तुमच्याप्रमाणेच स्वतःच्याच सापळ्यात पुन्हा पुन्हा फसत आहेत.
तुमच्या पाठीमागे त्यांचे नाव असले असते पण एव्हाना त्यांचं नाव पुसट झालंय जॉर्ज
समाजवादी म्हणवून घेणारे तुमच्या पिढीचे तुम्ही अखेरचे शिलेदार होतात
आता उरलेत तरी किती समाजवादी ?
आणि त्यांचा प्रभाव तो आहे किती ?
तरीही तुमच्या पाठीमागे तुमचे नाव निघत राहील, याला कारण तुमचा उत्तुंग इतिहास.

जॉर्ज तुम्ही गेलात आणि काही अनुत्तरीत प्रश्नांचे भेंडोळे तसेच मागे राहिले.
त्याची उत्तरे आता कोण देणार ?
तुमच्यावर लावलेलं किटाळ कोण आणि कधी धुवून काढणार ?
तुम्हाला या गोष्टीची खंत वाटली नाही का कधी ?
का तुमची यालाही होती नेहमीचीच ती हतबल मूक संमती ?

जाता जाता एक गोष्ट सांगतो,
बरे झाले तुम्ही गेलात, कारण आता लोक मेलेल्या माणसाची जात धर्म पाहतात मग त्याला काय श्रद्धांजली द्यायची ते ठरवतात.
येणाऱ्या काळात हे सूत्र कसे असेल याची माहिती घ्या आणि कळवा.

अलविदा जॉर्ज...

- समीर गायकवाड

(महत्वाची सूचना - या पोस्टवर भावपूर्ण श्रद्धांजली, RIP, जॉर्ज अमर रहे इत्यादी ठेवणीतल्या कमेंटस व तत्सम ईमोजी टाकू नयेत)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा