शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०१५

उन्हातले चांदणे - दत्ता हलसगीकर


दिलेल्या शब्दांसाठी एके काळी लोक स्वतःचे आयुष्य उध्वस्त करून घेत असत, वाट्टेल ती किंमत मोजून शब्द पूर्ण करीत. कारण दिलेल्या शब्दाला तितकी किंमत असायची. 'चले जाव' हे दोनच शब्द होते पण ब्रिटीश महासत्तेला त्यांनी घाम फोडला होता, 'स्वराज्य' या एका शब्दाने अनेकांच्या हृदयात चैतन्याचे अग्निकुंड प्रदिप्त झाले होते. इतकेच नव्हे तर शब्दांची महती सांगताना तुकोबा म्हणतात "आम्हा घरी धन । शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे । यत्नें करू ।" शब्द हे जीवनाच्या प्रारंभापासून आपली साथसोबत करतात ते थेट श्वासाची माळ तुटल्यावरच थबकतात. शब्द कधी चांदण्यासारखे शीतल असतात, तर कधी पाण्यासारखे निर्मळ असतात, तर कधी कस्तुरीसारखे गंधित असतात तर पाकळ्यांसारखे नाजूक असतात, निखाऱ्यांसारखे तप्त असतात तर कधी ज्वालामुखीच्या लाव्ह्यासारखे दग्ध असतात, तर कधी आईच्या मायेसारखे सोज्वळ असतात तर कधी गायीच्या डोळ्यासारखे दयाशील असतात तर कधी देव्हाऱ्यातील निरंजनाच्या ज्योतीसारखे मंगलमय असतात. शब्द आहेत म्हणून जीवन आहे आणि शब्द आहेत म्हणून जीवनाला अर्थ प्राप्त झाला आहे. ह्या सर्व शब्दकळांचे प्रकटन म्हणजे मानवी जीवनाचा जणू आत्मा बनून गेला असावा इतके महत्व या शब्दांना आहे.

"कळ्यांची फुले व्हावीत तसे शब्द उमलतात
खडकातून झरे फुटावेत तसे भाव झुळझुळतात
हाक यावी अज्ञातातून शब्द साद घालतात मला
माझ्या ओळीओळीतून नाजूक मोगरे फुलतात ...
..शब्द मनाचे आरसे ....शब्द ईश्वराचे दूत
माझ्या कवितांमधून मीच होतो आहे प्रसूत !"
शब्द आणि जीवन व शब्द आणि आत्मा यांचे परस्परसंबंध उधृत करणारी ही कविता आहे कवी दत्ता हलसगीकरांची ! ज्यातल्या शब्दकळां आपल्या मनाला स्पर्शून जातात व त्याचबरोबर कवीच्या काव्यप्रेरणांना उत्तुंग स्वरूप देऊन जातात.

एकेकाळी गिरणगाव म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सोलापूरची अर्वाचीन साहित्यिक ओळख म्हणून कवी संजीव, कवी रा.ना. पवार आणि कवी दत्ता हलसगीकर या त्रयीकडे पाहिले जाते. कालमानानुसार हे तिघेही काळाच्या पडदयाआड गेले मात्र त्यांनी दिलेली अक्षरओळख आजही टिकून आहे. कारण या तिघांनी स्वतंत्र शैलीतून, वेगेवगळ्या आशयविषयांचे दर्जेदार साहित्य लेखन करताना स्वतःचा रेखीव ठसा मराठी साहित्यात उमटवला होता. तिघांचेही व्यक्तिमत्व भिन्न स्वभावविशिष्ट्यांचे होते, राहणीमान - विचारमान भिन्न प्रांतातले होते, भाषिक जडणघडण सुद्धा वेगवेगळी होती. तसेच या तिघांनीही आपल्या अंतःकरणापासून सरस्वतीच्या दरबारी आपली सेवा रुजू केली होती. रा.ना.पवार, संजीव आणि दत्ताजींच्या कविता वेगवेगळ्या धाटणीच्या आहेत. यांची कोणतीही कविता वाचल्याबरोबर या तिघांपैकी कोणत्या कवीने ही कविता लिहिली असेल हे लक्षात यावे इतकी कसदार चैतन्यदायी शैली या तिन्ही कवींनी जतन केली होती. यातील हलसगीकरांची कविता श्रामिकांपासून ते श्रीमंतापर्यंत भाष्य करताना जास्त खुलून यायची. मराठी साहित्यात स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या या तिन्ही प्रज्ञावंताचे वागणे, बोलणे हे अत्यंत साधेपणाचे होते. कवी दत्ता हलसगीकर तर एखाद्या वटवृक्षाप्रमाणे नवकवी वा साहित्याच्या अभ्यासकाच्या पाठीवर त्यांचा हात असे. कवी हलसगीकर हे स्वतःच श्रमिक वर्गातून उपजीविका करत असल्याने त्यांच्या वागण्यात, बोलण्यात एक कणव दाटलेली असे तीच त्यांच्या कवितेत व्यक्त होई. त्यांचे प्रेमळ, निर्मळ अन् सात्त्विक व्यक्तिमत्त्व त्यांच्या साहित्यिक निर्मितीचे मुख्य स्त्रोत असे.

कवी दत्ता हलसगीकर ऊर्फ गणेश तात्याजी हलसगीकर हे सोप्या, हळुवार, प्रवाही आणि सृजन काव्यरचनांसाठी ओळखले जातात. आपला आशय नेमक्या शब्दात व्यक्तवण्यात त्यांची हातोटी होती. ७ ऑगस्ट १९३४ रोजी सोलापुरात जन्मलेले दत्ताजी हे 'भेटेन नऊ महिन्यांनी...' ही अजरामर कविता लिहिणाऱ्या मराठीतील अग्रगण्य कवी कुंजविहारींचे भाचे होत. सोलापूरमधील लक्ष्मी विष्णू मिल नावाच्या कापडगिरणीमध्ये हलसगीकरांनी वयाच्या साठाव्या वयापर्यंत नोकरी केली. किशोर वयापासून सुरु केलेली कविता त्यांनी अव्याहतपणे अखेरपर्यंत सुरु ठेवली. काव्यरचनेच्या जोडीने त्यांचे ललित लेखनदेखील अखंडितपणे चालू होते. वंचितांचे दुखणे मांडणारी, गोरगरीबांबद्दल कणव बाळगणारी त्यांची कविता मनाला भिडणारी आणि आवाहन करणारी होती.

त्यांच्या कवितांतून जगण्याचा आनंद कशात आहे आणि जगणे कसे सुखकर करता येईल यावर सुंदर भाष्य करण्यात आलं आहे. ती जशी श्रमिकांविषयी हळवी होते तशी पानाफुलांसोबत डोलते, ती समाजवेदनांनी व्यथित होते आणि वत्सल प्रेमभावनेने ओथंबूनही जाते, अंधाराचे गाऱ्हाणं मांडते, प्रकाशाचे तोरण दारी लावते, वय झालेल्या जराजर्जरांचे भाव रेखाटते, नवतरुणींचे हळदओले रंगही लेते, नास्तिकांच्या मनाचा वेध घेते आणि देव्हाऱ्यातल्या समईपशीही घुटमळते. सरतेशेवटी त्यांची कविता मातीशी इमान राखून आभाळाशी नाते सांगते. दत्ता हलसगीकरांची कविता सप्तरसांत न्हालेली आहे. ती शब्दसौंदर्याने नटलेली असल्याने सदोदित टवटवीत वाटते.

"एकट्याने किती करावी जाग्रणे, झाडावी अंगणे दुसऱ्याची" असे परखड बोलही त्यांची कविता सुनावते. 'एव्हढासा अंधार मोठा होत गेला, त्याने सूर्यसुद्धा झाकून टाकला...विनाशाची एव्हढीशी निसरडी वाट एव्हढ्याश्या छिद्राने रिता झाला माठ' असं चिरंतन जीवनज्ञान त्यांची कविता सहजतेने शिकवून जाते. 'दिशांचे सारे कोपरे शोधून झाले पण सुवासाचे उगम अजून सापडत नाहीत, अवघ्या फुलांच्या जन्मकोषातही सुगंधाचे झरे अजून गवसले नाहीत..' असं सांगत त्यांची कविता आपल्याला अस्तित्वाचा शोध घ्यायला भाग पाडते.

"तो म्हणाला, 'या वयातही तुम्ही किती तरुण दिसता !', मी ऋतूराज वसंत झालो ..." या कवितेतून आपल्या 'अहं'वर ते नेमकेपणाने बोट ठेवतात. सदैव आशावादी जीवन जगणाऱ्या दत्ताजींचे आशेचे स्वर थेट सप्तकातले होते. ते म्हणतात-

"मला अजून पहाटेची स्वप्ने पडत आहेत,
थोड्याशा अंधाराने मी निराश नाही,
अजून मला वसंताची चाहूल लागत आहे
थोड्याशा पानझडीने मी हताश नाही".

असे बहुआयामी स्वरूप असणारी हलसगीकरांची कविता एकाच वेळी आनंद आणि दुःख यांचे प्रेरणादायी अनुभव देते हे त्यांच्या कवितांचे सर्वात मोठे यश म्हणावे लागेल.
"ज्यांची बाग फुलून आली, त्यांनी दोन फुले द्यावीत;
ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी द्यावीत"
अशा देखण्या शब्दातून सामाजिक परिस्थितीची जाणीव करून देणारी दत्ता हलसगीकरांची कविता अर्थवाही आहे. 'आशयघन', 'उन्हातल्या चांदण्यात', 'करुणाघन', 'कोषातून बाहेर', 'चाहूल वसंताची', 'शब्दरूप मी', 'सहवास' हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या कविता आजही लोकप्रिय आहेत, - 'इथे फुलांच्या मार्गावरती सर्प हिंडती सदा', 'ज्यांची बाग फुलून आली', 'झपझप चाललेत नाजुक पाय', 'तू नाहीस कसे म्हणू, प्राणातुन वाजे वेणू', 'पैशाचा मोह असा की सूर्यही झाकला जातो', 'समुद्र लाटेसारखी धावत आलीस माझ्या भेटीला' या त्यातीलच काही प्रसिद्ध कविता आहेत. त्यांच्या ’उंची’ या कवितेचे बावीस विविध भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. ही कविता आकाशवाणीवरून अनेकदा सादर करण्यात आली होती. २०११ साली आकाशवाणीवर झालेल्या राष्ट्रीय कविसंमेलनात दत्ता हलसगीकरांचा सक्रिय सहभाग होता. वाराणसीमध्ये झालेल्या सर्वभाषी कविसंमेलनातही हलसगीकरांनी आपली ’उंची’ ही कविता वाचली होती. मलेशियात झालेल्या जागतिक मराठी साहित्य संमेलनात त्यांच्या आणि त्यांच्याच कवितांचा एक विशेष कार्यक्रम झाला. तो जगभरातल्या मराठी रसिकांनी ऐकला. त्यातला काव्यानंद उपभोगला. अनुभवला आणि कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी उठून टाळ्या वाजवून त्यांना अभिवादन केलं. त्यांच्या कवितांना रसिकांनी स्टँडिंग ओवेशन दिले होते. 

पुणे आकाशवाणीच्या हिरक महोत्सवानिमित्त दत्ता हलसगीकरांवरती ’शुभंकराचा सांगाती’ नावाचा कार्यक्रम नभोवाणीवर झाला होता. त्या कार्यक्रमात हलसगीकरांच्या काही कवितांचे अभिवाचन झाले होते. दिवंगत कवी चंद्रभूषण कुलश्रेष्ठ यांच्या काव्यशिल्पाचे अनावरण करताना दत्ताजींनी १९ मे रोजी केलेलं भाषण त्यांचं अखेरचं भाषण ठरलं.
त्यात ते म्हणाले होते, "कविता हा वरवर अनुभवण्याचा विषय नाही. जो कविता वरवर अनभुवतो त्याला काही मिळत नाही पण कवितेच्या सागरात जो खोलवर बुडतो त्यालाच मोती सापडतात. स्वत: हलसगीकर कवितेच्या समुद्रात खोल बुडून काही मोती घेऊन आले होते आणि त्या मोत्यांच्या माळा समाजाला वाटत होते. ते मोती असतात समाजासाठी जगण्याच्या विचाराचे."

त्यांची कविता अगदी साधी सरळ सोपी आहे. किशोरांसाठी लिहिलेली बालकविता असो वा परिपक्व मनांसाठी केलेली सात्विक कविता असो ते त्यात समरसून जाऊनच लिहितात. 'वय झाले आहे माझे पण अजूनही फुलांची निमंत्रणं येत असतात मला' असं लडिवाळ रुपडं धारण करणारी त्यांची कविता त्यामुळेच सर्वांना हवीहवीशी वाटते. त्यांच्या कविता अगदी सरळमार्गी आहेत. ‘झप् झप् चाललेत नाजुक पाय’ही त्यांची अगदी सुटसुटीत शब्दातील रचना आहे मात्र तिचा आशय आणि त्यामागील पार्श्वभूमी पहिली की कविता वाचताना डोळे पाणावतात. दररोज एक नवे मॅचिंगची वेशभूषा करून येणार्‍या तरुणीवर केलेली 'रंगसंगती' ही त्यांची कविता त्यांच्यातील अवखळतेचा प्रत्यय देते, बुक बाइंडिंग करून मिळवलेल्या पैशात बहिणीला ओवाळणी टाकणाऱ्या या कवीने त्या अनुषंगाने लिहिलेली 'दिवाळी' ही कविता दिवाळीतला प्रकाश गडद करून जाते. त्यांनी लिहिलेल्या 'रस्त्यांच्या कविता' आपल्याला जीवनाचा अचूक मार्ग दाखवतात. अलंकारिक भाषेचा सोस न करता, मोठमोठाली रूपके, उपमा यातील काहीही न वापरता ते निरलसपणे रसाळ शैलीत एखाद्या निरुपणकाराने जीवनाचा अर्थ नेमक्या शब्दांत उलगडून सांगावा तसं आपल्या कवितेला प्रवाही स्वरूपात प्रसवत जातात. तिला ते सजवत नाहीत की तिची आत्मप्रौढी करत नाहीत, ते तिला शब्दजडत्वात बंदिस्तही करत नाहीत. आपल्याला काय सांगायचे आहे हे त्यांना पूर्णतः ज्ञात असल्याने ते आपल्या अभिव्यक्तीतून नेमका तोच आशय व्यक्त करतात.

आपण समाजाचे काही तरी देणे लागतो याची उत्कट जाणीव करून देणारी त्यांची 'उंची' ही कविता आपल्याला जीवनाचे सार फक्त तीन कडव्यात सांगून जाते. आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला झिंजोडण्याचे सामर्थ्य या कवितेत आहे.
" उंची " -
ज्यांची बाग फुलून आली
त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे सूर जुळून आले
त्यांनी दोन गाणी द्यावीत I
ज्यांच्या अंगणात झुकले ढग
त्यांनी ओंजळ पाणी द्यावे
आपले श्रीमंत हृदय त्यांनी
रिते करून भरून घ्यावे I
आभाळा-एवढी ज्यांची उंची
त्यांनी थोडे खाली यावे
मातीत ज्यांचे जन्म मळले
त्यांना खांद्यावरती घ्यावे I

आपलं आयुष्य जगून झाल्यावर आपल्या निर्वाणाची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे, आपली एक्झिट जवळ आलीय हे नुसते ओळखून चालणार नाही तर त्याबरहुकुम आपण मनाची तयारी केली पाहिजे, निरवानीरव सोपी आणि सुसह्य असली पाहिजे अशा आशयाची त्यांची एक कविता आहे. ही कविता वाचताना हलसगीकरांची काव्यश्रीमंती आणि त्यांना असलेला सरस्वतीचा वरदहस्त जाणवतो.
'भूतकाळाचा पिसारा फुलवून नाचालेले मोर, आता थकून गेले आहेत
आणि भविष्य तर थिजून गेलेले, आता निर्माल्यावर पाण्याचा शिडकावा करून
आम्ही फुले टवटवीत करतो, त्या म्लान गंधातही हरवतो..
वसंत ऋतूच्या गोष्टी बोलताना किती हळुवार होतो आम्ही !
कष्ट उपसलेल्या रेषांचे हात ती दाखवते,
स्वप्ने थिजल्या माझ्या मोतीबिंदुच्या डोळ्यात ती डोकावते
विरळ झालेल्या तिच्या रुपेरी केसांना पाहून मी गहिवरतो.
माझ्या छातीवर सांडलेल्या तिच्या काळ्याभोर केसांचा पाऊस आठवतो.
माझ्याबरोबर चालताना थकून थकून गेलेल्या
तिच्या पावलांना मी रोज रात्री तेल चोळतो तेंव्हा ती पोटभर रडते,,,,
उसवलेल्या माझ्या आयुष्याला तिने किती वेळा रफू केले..
या आठवणीच्या उमाळ्याने मी जवळ घेतो
तेंव्हा सुरकुतलेल्या तिच्या निस्तेज गालांवर लाली चढते.
ऊन आणि पाऊस, सकाळ आणि संध्याकाळ आता वसतीला आली आहेत,
घर आवरून झाले आहे ; हाक आली की आता उठून निघायचे !!'

कोणताही अभिनिवेश न बाळगता आपलं सरळमार्गी जीवन जगताना आपल्याला आलेले अनुभव शब्दबद्ध करताना त्यांनी इतरांच्या लेखणीला देखील मोहोर फुलवले. ते लक्ष्मी विष्णू मिलमध्ये कामास होते तेंव्हा त्यांच्या अंगी असणारा साधेपणा त्यांच्या अंगी अखेरपर्यंत टिकून राहिला. कुणीही स्नेही भेटला की, "या ऽऽ देवा !" म्हणून हाक मारणारा मोकळ्या मनाचा हा कवी वास्तविक जीवनातही एक जिंदादिल माणूस होता. आपले वय कितीही असो पण आपण मनाने चिरतरुण असले पाहिजे असं सांगणारा हा कवी कधी म्लान वाटणाऱ्या कविता लिहून गेला नाही. फुलांचे संदर्भ देऊन बोलायला आणि त्यांच्या वासांनी भारलेल्या जीवनरीतीचे गुंजन करायला आवेशाची गरज काय आहे असा साधा प्रश्न करणाऱ्या या कवीने जीवनातील आनंद कसा घ्यावा यावर अतीव देखणे, रेखीव भाष्य 'वय' या कवितेतून केले आहे. -

वय झाले असेल माझे नाही असे नाही,
अजूनही फुलांची निमंत्रणे येत असतात मला.
डोळ्यावरच्या चष्म्याच्याही पलीकडचा
हिरवागार बहारदार खुणावतोय मळा.
तुकारामाचा अभंग उत्कट ओढ लावतो तरी
अजूनही आर्त गाझेलेची चढते नशा
दिवसभर मग्न असतो माझ्या व्यापात मी
रुमझुमणारे पैंजण बांधून अजून येते निशा .
सगळेच ऋतू वेढून आहेत, वसंत तर सखा
मस्त कोसळणाऱ्या पावसात अजून राहतो उभा.
दरवळणारा सुगंध घेऊन भेटते लाजरी उषा
वेड लावते अजून मला नक्षत्रांची आभा.
वय म्हणजे नक्की काय, वार्धक्याची व्याख्या काय
न बोलावताही आपण, येतच असते मरण
पैलतीरावर नजर तरी जत्रेत रंगलो आहे
झुलते माझ्या दारात तारुण्याचे सदाबहार तोरण !!

'दारे उघडी ठेवली म्हणून फार बरे झाले, नाहीतर सडून गेलो आसतो हवाबंद पोकळीत. उघडया दारातून थोडीशी धूळ आली हे मान्य पण वाऱ्यासवे सुगंधाच्या लाटाही आल्या झुळझुळत..' अशी देखणी कविता लिहिणाऱ्या या कवीची दारे सर्व काव्य रसिकांसाठी सदैव उघडी असायची आणि दारापाशी हसऱ्या चेहऱ्याने ते अगत्यशीलतेने उभे असत. कविता कशीही असो तिच्या रचनात्मक बाह्य स्वरूपावर हरखून न जाता कवीने आपल्या आशय विचारांशी प्रामाणिक राहून लेखन केले पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष असे. जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन आशावादी होता, रसिक मनाचा होता, जीवनासक्तीचा आनंद शोधणारा होता, त्यात लढाऊ बाणाही होता आणि फुलांची तोरणेही होती. 'जीवनात सारंच घडत नसतं आपल्या मनासारखं. नाही त्याचा नाद सोड, आहे त्याचा हात धर. जीवनावर प्रेम कर, जगणं फार सुंदर आहे. अमावास्येच्या रात्रीलाही, नक्षत्रांचं झुंबर आहे" या पंक्तीतून जाणवणारे त्यांचे जीवनविषयक विचार एखाद्या माणसाला नीरस कंटाळवाण्या वाटणाऱ्या जीवनाच्या नकारात्मकतेतून बाहेर काढण्यास पुरेसे आहेत. त्यांचे काव्य जन्म मरण या दोन्हीची सांगड घालते. कवी हलसगीकरांचे वास्तव्य शेवटपर्यंत सोलापुरात होते. ९ जून २०१२ रोजी आपल्या अनंताच्या प्रवासाला निघून गेले. 'ज्याची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले दयावीत' असा संदेश देणाऱ्या या शब्दकुबेराने आपले दोन नेत्रसुमन मरणोत्तर दान करून आपल्या शब्दांना कृतीची जोड दिली होती. त्यांच्या ह्या आचरणामुळे ते केवळ एक प्रतिभाशाली कवी म्हणून जितके रसिकमान्य झाले तितकेच एक सृजनशील व्यक्ती म्हणून जनमाणसात दृढ झाले...
अनंताच्या प्रवासाला जाण्याआधी त्यांनी जो ऋणनिर्देश आपल्या कवितेतून केला आहे त्याला तोड नाही. 'तुमच्यामुळेच' या त्यांच्या कवितेत ते लिहितात –

तुमच्यामुळेच अंधारातून सुखरूप चालत आलो
आणि सुरेख घराच्या दाराआड येऊन पोहोचल.
अशी किर्रर्र रात्र होती, उरात होती भीती
तुमच्या शब्दातला उजेड घेऊन, उजेड होऊन आलो.
तसे कोण जवळ होते, एकटाच तर होतो
एकटा कसा ? तुमचे डोळे सोबत घेऊन आलो.
वाटेमधून मागे फिरावे असे वाटलेच नाही
तुम्ही दिली होती शिदोरी तेव्हढ्यावरच आलो.
जिद्द तर होतीच पण तुम्ही सांगितलीत दिशा
मातीतून रुजून आलो...आकाश पेलून आलो !

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा