Saturday, October 10, 2015

राजा परांजपे नावाचा राजा माणूस .....


मराठी चित्रपटसृष्टीतील एक सुवर्णपान म्हणून राजाभाऊ परांजपे यांच्या कारकिर्दीकडे पाहता येईल. दिग्दर्शक, अभिनेता म्हणून त्यांचा हा प्रवास अनिल बळेल यांनी "राजा माणूस' या पुस्तकात मांडला आहे. माणूस म्हणूनही त्यांच्या दिलदार व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडण्याचा यात प्रयत्न केला आहे.........

"राजा माणूस' हे अनिल बळेल यांनी लिहिलेले पुस्तक, राजाभाऊ परांजपे यांचे सुविहित पद्धतीने लिहिलेले चरित्र नाही, ना त्यांच्या दिग्दर्शक म्हणून गाजलेल्या कारकिर्दीची समीक्षा आहे. अनिल बळेल यांनीच पुस्तकाच्या मलपृष्ठावर नमूद केल्याप्रमाणे "त्यांनी (राजा परांजपे यांनी) अभिनेता व दिग्दर्शक म्हणून आपला अबाधित ठसा या चित्रपटसृष्टीवर उमटविला, त्याचीच ही कहाणी...' याचे प्रत्यंतर आपल्याला हे पुस्तक वाचताना सतत येते. ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके आणि राजा परांजपे ही त्रयी म्हणजे मराठी चित्रपटाच्या सुवर्णयुगाचे कर्तबगार, प्रतिभावान असे बिनीचे शिलेदार. त्यांची एकमेकांशी गाठ पडायच्या आधीही ते या क्षेत्रात येण्याची धडपड करताना स्वतंत्र कामे करीतच होते.

आपला जम बसविण्याच्या दृष्टीने आपले "बेस्ट' द्यायला लागले होतेच; पण ब्रह्मा, विष्णू, महेश हे दत्तात्रेयाच्या रूपात यावेत आणि एकत्रित अशा या तीनही ताकदीच्या दर्शनाने भाविकांच्या मनात एक अपूर्व भक्तीचा सागर उचंबळावा, तसाच अनुभव चित्ररसिकांना दीर्घ काळ अनुभवायला मिळाला.

चित्रपटसृष्टीच्या आटपाट नगरातल्या "राजा' नावाच्या या बहुरूपी माणसाने साकारलेल्या नाट्य-चित्रपटातल्या वैविध्यपूर्ण भूमिकांचा उल्लेख करताना "नाकाने त्याचा चेहरा व्यापून टाकला होता' अशा राजाभाऊंच्या चेहऱ्यातल्या ठळक वैशिष्ट्याचा उल्लेख बळेल सहज सांगतात. हाच अनलंकृत साधेपणा पुस्तक वाचताना सतत जाणवतो. राजाभाऊंचे बालपण, भावंडे, वडिलांचा बांधकामाचा व्यवसाय, आईशी असलेले त्यांचे भावबंध याच्या सविस्तर विवेचनात न गुंतता बळेल यांनी त्याचा ओझरता उल्लेख केला आहे. या पुस्तकात राजाभाऊंचा जीवनप्रवास हा त्यांच्या कलाकृतींच्या प्रदर्शित होण्याच्या कालखंडानुसार घेतलेला आहे. त्यांना त्यांच्या मेहनतीमुळे, "पॅशन'मुळे, "कमिटेड' वृत्तीमुळे कशा संधी मिळत गेल्या आणि आपल्या लौकिक प्रतिभेने, कल्पकतेने त्यांनी संधीचे कसे सोने केले याचे प्रत्यंतर आपल्याला पुस्तक वाचताना सतत येते. मूकपटाच्या जमान्यात, बोटातली पेटीवादनाची जादू कशी उपयोगी पडली आणि तोच या मोहमयी दुनियेतला प्रवेश, राजाभाऊंना दिग्दर्शक म्हणून त्या "डायरेक्‍टर' असे लिहिलेल्या खुर्चीपर्यंत कसा घेऊन गेला, याचेही दर्शन होते. याच प्रवासात चित्रतपस्वी भालजी पेंढारकर आणि मास्टर विनायक यांचाही सहवास त्यांना लाभला. यामुळे त्यांची कार्यपद्धती त्यांना निरीक्षता आली आणि जी वाटचाल आपण करायची म्हणतो आहे, ती कशी करायला हवी याचे धडेही कळत-नकळत गिरवता आले. यातून भालजींचा सहायक म्हणूनही त्यांच्यावरचे संस्कार पुढच्या वाटचालीला कसे पोषक ठरले, हे सांगताना "मुळात त्यांना काम करायला लावून आपल्याला हवे ते त्यांच्याकडून कसे काढून घेतात, आपले समाधान होईपर्यंत ते कसे थांबत नाहीत' हे सारे राजाभाऊ टिपकागदाप्रमाणे बारीक नजरेने टिपत गेले. यातून राजाभाऊंची दिग्दर्शक म्हणून कार्यपद्धती कशी होती याचे मूळही आपल्याला समजते. "बलिदान'पासून सुरू झालेला हा प्रवास बळेल त्यांच्या सोप्या, साध्या शैलीतून सांगत जातात.


राजाभाऊंनी दिग्दर्शनापूर्वी आणि दिग्दर्शन करीत असतानाही चित्रपटातून भूमिका केल्या. तसेच दिग्दर्शन थांबविल्यावरही त्यांनी काही भूमिका केल्या, त्याही संस्मरणीय ठरल्या. त्यांच्या चित्रपटांचे रौप्यमहोत्सव झाले, भूमिका गाजल्या; पण राजाभाऊ त्याच रूपेरी दुनियेत स्वतःला हरवून बसले, असे मात्र झालेले नाही. "आपण आधी रंगभूमीवर पाऊल टाकले याचा राजाभाऊंना कधीच विसर पडला नव्हता' असा उल्लेख करून एका स्वतंत्र विभागात अनिल बळेल यांनी राजाभाऊंची नाट्यकारकीर्द, त्यांच्या भूमिका, नाटकांबद्दलचे त्यांचे अतीव आकर्षण आणि रंगभूमीबद्दलची त्यांची ओढ यांचा तपशीलवार धांडोळा घेतलेला आहे. जेथे जेथे मराठी माणूस, तेथे तेथे राजाभाऊंनी "दिल्या घरी तू सुखी राहा' हे मधुसूदन कालेलकरांचे नाटक केले. याचा उल्लेख करताना राजाभाऊंची नाट्यनिष्ठा किती जाज्वल्य होती, याचे वर्णन करताना एक हृद्य प्रसंग आपल्या समोर येतो. याच नाटकाच्या दौऱ्याच्या वेळी राजाभाऊंच्या आईची तब्येत ढासळली. आपल्या प्राणप्रिय "आऊ'ला (राजाभाऊंनी ठेवलेले आईचे आवडते नाव) रुग्णालयात हलवले असताना राजाभाऊंनी दौरा सुरू ठेवला; आईच्याच आग्रही परवानगीने. दुर्दैवाने आऊच्या अंत्यसमयी राजाभाऊ जवळ नव्हते. त्याची खंत, तो सल, आईचे जाणे राजाभाऊंना सहन झाले नाही. त्यानंतर हळूहळू त्यांच्याही प्रकृतीच्या तक्रारी सुरू झाल्या आणि "संभुसांच्या चाळीत' आणि "निर्माल्य वाहिले चरणी' या नाटकांनंतर त्यांनी रंगभूमीचा निरोप घेतला. हा सारा प्रवास बळेल यांनी वेगवान पद्धतीने लांबण न लावता आटोपशीरपणे पण आवश्‍यक तपशिलाने वर्णन केलेला आहे.


या पुस्तकातला शेवटचा भाग राजाभाऊंची दिग्दर्शक म्हणून एक वेगळीच महती सांगणारा आणि आवर्जून वाचला जावा इतका महत्त्वाचा आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांची दृष्टी सांगणारा, त्यांनी या माध्यमाचा किती पूर्ण अभ्यास केला होता ते सांगणारा आहेच; पण बळेल यांच्या भाषेत, दिग्दर्शनात उतरू पाहणाऱ्यांनाही एक धडा घालून देणारा आहे. दिग्दर्शकाकडे कोणती दृष्टी हवी इथपासून छायाचित्रण, संकलन, संगीत दिग्दर्शन या सर्व बाबींचे सखोल ज्ञान दिग्दर्शकाला हवे, तेव्हाच तो टीमचा कॅप्टन म्हणून टीमकडून उत्तम कामगिरी करून घेऊ शकतो, ही त्यांची धारणा होती. त्यातही राजाभाऊंनी मांडलेले विचार सोदाहरण स्पष्ट कसे केले आहेत, हेही बळेलांनी संकलित माहितीच्या आधारावर मांडले आहे. या स्वरूपाच्या पुस्तकाची मांडणी करताना खूप अडचणी येतात आणि मर्यादा पडतात. राजाभाऊंचे काही समकालीन काळाच्या पडद्याआड गेलेले, तर काही वृद्धापकाळामुळे काही सांगण्यास असमर्थ असणारे. यात सुलोचनाबाई, रमेश देव-सीमा देव, सचिन, आशा भोसले अशांसारख्या मोठ्या दिग्गजांकडे राजाभाऊंबद्दल सांगण्यासारखे खूप असेल; पण त्या संदर्भात अनिल बळेल यांचा संपर्क झाला नसावा किंवा त्यांना आवश्‍यक तो प्रतिसाद मिळाला नसावा. या पुस्तकात त्यांच्या गाजलेल्या चित्रपटातली पूर्ण गाणीही त्या चित्रपटांच्या निर्मितिकथेत आपल्याला भेटतात. संदर्भ म्हणूनही ती उपयोगी पडावीत. शेवटी अनिल बळेल यांच्याच मनोगताचा आधार घेऊन म्हणावेसे वाटते, "राजाभाऊ म्हणजे मराठी चित्रपटाचा सुवर्णकाळ होता. "परांजपे-माडगूळकर-फडके' या त्रयीने चित्रपट पाहण्याचा जो आनंद दिला, त्याला तोड नाही. ज्यांनी हे अनुभवले त्यांना हे पुस्तक वाचताना हरवलेल्या दिवसांत गेल्याचा आनंद होईल आणि ज्यांनी हे अनुभवलेलेच नाही, त्यांना आपले जे हरवले आहे, ते समजेल.' राजाभाऊ परांजपे गेले त्या वेळी भालजी पेंढारकर म्हणाले होते, "ही राजवस्त्रे आता कोण पेलणार?' राजाभाऊ किती मोठे होते ते समजण्यासाठी हे पुस्तक वाचकांनी आवर्जून वाचावे.


"राजा' माणूस

अनिल बळेल
स्नेहल प्रकाशन, पुणे