शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०१५

इंदिराजी ....काही आठवणी ...



आजपासून बरोबर ३३ वर्षापूर्वीची ही घटना आहे. ३० ऑक्टोबर १९८४, भुवनेश्वर, ओरिसा. दुपारी ३ वाजताची रणरणती दुपार. निवडणुकीची प्रचारसभा सुरु होती. समोर गर्दीचा सागर उसळलेला होता आणि व्यासपीठावरून त्या नेहमीच्या तडफदार शैलीत बोलत होत्या. त्यांच्या भाषण माध्‍यम सल्लागार एच.वाय.शारदा प्रसाद यांनी तयार केलेल्या नोट्सचा कागद बोलता बोलता त्यांनी बाजूला सारला आणि त्याऐवजी दुसरेच काहीतरी त्या बोलून गेल्या. "मैं आज यहां हूं। कल शायद यहां न रहूं। मुझे चिंता नहीं मैं रहूं या न रहूं। मेरा लंबा जीवन रहा है और मुझे इस बात का गर्व है कि मैंने अपना पूरा जीवन अपने लोगों की सेवा में बिताया है। मैं अपनी आखिरी सांस तक ऐसा करती रहूंगी और जब मैं मरूंगी तो मेरे ख़ून का एक-एक क़तरा भारत को मजबूत करने में लगेगा।" त्यांच्या या भाषणाने सगळेच जण अवाक झाले अन दुसऱ्याच दिवशी ३१ ऑक्टोबर रोजी त्यांच्याच अंगरक्षकांनी त्यांची निर्घृण हत्या केली...



३० एप्रिल २००८, संसदेचे सत्र सुरु होते. चर्चेचा विषय होता अणुकरार.पीठासीन सभापतींच्या पुढ्यात बोलणारे वक्ते होते तत्कालीन विरोधी पक्ष नेते लालकृष्ण अडवाणी ! त्यांच्या भाषणात ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे कौतुक करत होते. राजकीय विरोधक असलो तरी इंदिरा गांधी यांचे कौतुक करण्यात मला गैर वाटत असे म्हणतानाच एक पाऊल पुढे टाकत ते बोलले की, "पंतप्रधान या नात्याने देशाच्या संरक्षणाला प्राधान्य देणा-या इंदिरा गांधी यांच्या खंबीरपणामुळेच सप्टेंबर १९७२ मध्ये देशाला पोखरण मध्ये अणू चाचणी करता आली. केल्या गेल्या आहेत. त्यामुळे अणू चाचणी करण्यासारखा निर्णय घेताना किती आंतरराष्ट्रीय दबावांना सामोरे जावे लागते याची मला कल्पना आहे असे ते म्हणाले... आण्विक सामर्थ्य हे नागरी विकास आणि देशाचे रक्षण दोन्हीसाठी आवश्यक असून देशहितासाठी आवश्यक असलेले निर्णय पंतप्रधानांनी दबाव आले तर ते झुगारुन देत घेतलेच पाहिजेत, हे काम इंदिराजींनी यथार्थ पार पाडले होते."....इंदिराजी म्हणजे असं अजब आणि ऐतिहासिक अभूतपूर्व रसायन होतं...

इंदिराजींच्या सभा म्हणजे एक मोठी मेजवानी असायची, तो एक मोठा उत्सव असायचा. त्या शक्य तो उघड्या जीपगाडीतूनच सभास्थानापर्यंत यायच्या ; येताना रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या लोकांना त्यांचे हातवारे, नमस्कार सुरु असायचे. सभास्थानी आल्याबरोबर अत्यंत जलदगतीने तरातरा चालत त्या सभामंचापर्यंत यायच्या. शिडी वा जिना चढताना देखील त्यांचे लक्ष समोरच्या गर्दीकडे असायचे. आणि अर्थातच व्यासपीठावरील उपस्थितांकडे एक कटाक्ष असायचा. सुत्राधाराने त्यांचे नाव पुकारेपर्यंत बारकाईने निरीक्षण करत त्या एकंदर माहौलचा अंदाज घ्यायच्या अन माईकपुढे येऊन उभ्या राहिल्या की 'दुर्गाशक्ती' वाटायच्या. बहुतांश वेळा लांब बाह्यांचे, बंद गळ्याचे पोलके आणि कॉटन वा खादीची साडी हा त्यांचा पोशाख असायचा. पायात शूज वा खडावा असा त्यांचा जामानिमा असायचा. पाणीदार डोळ्यावर जाड काचांचा काळ्या फ्रेमचा चष्मा, डोक्यावरून चापून चोपून पदर घेतलेला असायचा. एक हात माईककडे अन एका हातात छोट्याशा रुमालाची घडी अशा अविर्भावात त्यांच्या सभेला सुरुवात व्हायची. "मेरे प्यारे भाईयो और बहनो" या वाक्यापासून त्या समोरच्या श्रोत्यांना आपलेसे करून घायच्या. ज्या ठिकाणी सभा असेल तिथल्या ग्रामदेवता वा एखाद्या वैशिष्ट्याचा उल्लेख करून मग पुढे त्यांचं झंझावाती भाषण सुरु व्हायचं. बोलताना विरोधकांचा उल्लेख आला की अगदी वरच्या पट्टीत तारसप्तकातला आवाज चढवून त्या बोलत, तेंव्हा नकळत त्या सभेतल्या प्रत्येक माणसाला त्यांनी जिंकून घेतलेलं असायचं. बोलताना रुमालाने ओठ पुसायची त्यांची लकब होती. पण त्यांच्या आवाजात कधी थरकाप नव्हता की देहात कंपही नव्हता ! अगदी जशी भवानी तलवार वाटावी असा त्यांचा जोशपूर्ण आवेश असायचा. भाषणाच्या अखेरीस मोठ्या आवाजात "जय- हिंद"चा नारा बुलंद करून झाल्यावर गर्दीला पुन्हा हातवारे अन नमन करून त्या वेगाने पुढे निघायच्या, गाडीत बसण्यापूर्वी गर्दीशी हातमिळवणी करायच्या, एखाद्या चिमुरड्याच्या गालावरून हात फिरवायच्या नाहीतर एखाद्या वृद्धापुढे किंचित मान तुकवून त्यांच्या मस्तकावरून हात फिरवायच्या, हातातला हार गर्दीत भिरकवायच्या ! हे सर्व करताना एक अत्यंत सहजता आणि नैसर्गिक वाटावं असं आपलेपण त्यात असायचं....त्या निघून गेल्या तरी पुढचे कितीतरी दिवस त्यांच्या सभेच्या कैफात राहावं वाटावं असं जबरदस्त गारुड त्यांच्या सभेचं जनमाणसावर असायचं ...

आजघडीला साधारण पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्यांनी शालेय जीवनात भारताच्या पंतप्रधान कोण या प्रश्नाचे उत्तर देताना 'इंदिरा गांधी' हेच दोन शब्द लिहिलेत. इंदिराजींच्या राजकीय कारकिर्दीच्या काळात वाढलेल्या पिढीला त्यांच्याविषयी आदर, दरारा व सुप्त आकर्षण कायमच वाटत राहिले. 'भारतीय राजकारणातील एक शक्तिशाली वादळी पर्व' असा त्यांच्या कारकिर्दीचा उल्लेख केला जातो. भारतीय राजकारणात इंदिरा गांधी हे पर्व सर्वतोपरी वादळी राहिले आहे. अर्थात, त्यांच्या विचारधारणेविषयी, राजवटीविषयी, निर्णयांविषयी अनेक मतप्रवाह आहेत; परंतू 'देशाचे राज्यशकट सक्षमतेने हाकणारी कणखर स्त्री', ही त्यांची प्रतिमा सकल भारतीय जनमानसात आजही रूढ आहे. त्यांच्याबाबत विविध मतमतांतरे असली तरी आजही परकीय आक्रमणाची चाहूल जरी लागली, तरी त्यांची आठवण प्रकर्षाने काढणाऱ्या लोकांत सर्वपक्षीय समर्थक आहेत. राजकारणात घराणेशाहीची पद्धत रूढ करणाऱ्या, देशात आणीबाणी लागू करून लोकशाही स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या अशीही त्यांची ओळख असली, तरी दुसऱ्या बाजूला परकीय शक्तीला सज्जड दम भरणारी रणरागिणी अशीही त्यांची प्रतिमा आहे....

ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक तवलीन सिंह यांच्या 'दरबार' या गांधी कुटुंबाच्या आठवणींवरील पुस्तकात काही वाचनीय मजकूर आहे. दरबार म्हणजे 'दिल्ली दरबार' असं तवलीन यांनी शीर्षकातूनच सुचवलं आहे. पुरोगामी विचारवंत राज थापर आणि त्यांचे पती रोमेश थापर हे एके काळचे इंदिरा गांधींचे निकटवर्ती. इंदिरा गांधींनी आपल्या पंतप्रधानपदाच्या सुरुवातीच्या काळात डाव्या विचारसरणीच्या विचारवंतांचं एक वर्तुळ आपल्याभोवती गोळा केलं होतं. मोरारजी देसाई, निजलिंगप्पा आणि स. का. पाटील यांच्याविरोधात आपली पुरोगामी प्रतिमा उजळ करण्यासाठी या मित्रपरिवाराचा वापर त्यांनी केला आणि १९७१ साली निरंकुश सत्ता मिळताच त्यांना अडगळीत फेकून दिलं. रोमेश थापर यांच्या 'सेमिनार' या मासिकावर तर आणीबाणीत सेन्सॉर बोर्डाची कुऱ्हाडही कोसळली होती. या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक माधवराव देवरस यांनी इंदिरा गांधींना लांगुलचलन करणारी पत्रं लिहिली होती, असा उल्लेख तवलीन यांनी पुस्तकात केला आहे. नवीन पटनाईक, वसुंधरा राजे, अरुण सिंह, नीना सिंह, विकी भरतराम वगैरे मित्रमंडळींच्या उच्चभ्रू वर्तुळात सतत वावरणाऱ्या लेखिकेने दिल्लीच्या ड्रॉइंग रुममधील वातावरण उभं केलं आहे. कोट्यवधी लोकांच्या भवितव्यासंबंधीचे निर्णय कसे बेफिकीरीने घेतले जातात, याविषयीचा अंदाज या लेखनातून येतो. यात पुढे लेखिकेने आपली व्यक्तिगत आठवण लिहून सोनिया गांधींना राजकारणाचा किती तिटकारा होता, हे नोंदवून ठेवले आहे. एकदा एका पार्टीनंतर घरी निघताना तवलीन या राजीव आणि सोनियांच्या बरोबर होत्या. त्यावेळी, "तुमची मुलं राजकारणात शिरली तर काय?" असा थेट प्रश्न त्यांनी सोनियांना विचारला. त्यावर सोनियांचं उत्तर होतं,"त्यापेक्षा माझ्या मुलांनी रस्त्यावर भीक मागितली तरी पत्करेन !" पण नियतीने त्यांच्या या उत्तरावर पाणी फिरवल्याचे पुढे देशाने अनुभवले.....

आणीबाणीनंतर इंदिरा गांधी सत्तेपासून दूर गेल्या होत्या. पुन्हा त्या राजकीय पटावर दिसणार नाहीत, अशा वल्गना केल्या जात होत्या. त्यांच्यावर अनेक चौकशी आयोगाचा ससेमिरा लावून जनता सरकार त्रास देत होते. या गोंधळलेल्या मानसिक स्थितीमध्ये त्यांनी पवनार येथे जाऊन आचार्य विनोबा भावे यांचे मार्गदर्शन घेण्याचा निर्णय १९७८ मध्ये घेतला. पवनारला जाण्यासाठी त्या विमानाने नागपूरला आल्या. इंदिरा गांधी यांच्या स्वागताला कार्यकर्त्यांना नागपूर विमानतळावर जाऊ देऊ नये, अशा सूचना दिल्लीहून आल्या होत्या. शिवाय काँग्रेसकडून देखील या भेटीचे मोठे स्तोम माजवले नव्हते. कारण इंदिरांजीची विमनस्क अवस्था ! पण या सूचनेला भीक न घालता हजारो कार्यकर्ते स्वागतासाठी विमानतळावर हजर होते. इंदिरा गांधींचे आगमन झाल्यानंतर काही मोजक्‍या नेत्यांना विमानतळावर प्रवेश दिला होता. यात माजी उपमुख्यमंत्री नासिकराव तिरपुडे यांचा समावेश होता. पोलिस मात्र कार्यकर्त्यांना मज्जाव करीत होते. विमानतळावरील हजारो कार्यकर्त्यांना अडविणे आता पोलिसांना शक्‍य नव्हते. अखेर पोलिसांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्याचा निर्णय घेतला. या लाठीमारालाही कार्यकर्ते जुमानत नव्हते. त्यांना इंदिरा गांधी यांना पाहायचे होते. या लाठीमारात खासदार विलास मुत्तेमवार जबर जखमी झाले होते. सत्तेतून दूर झाल्यानंतर इंदिरा गांधींना पहिल्यांदाच कार्यकर्त्यांची सहानुभूती पाहायला मिळाली. या घटनेने इंदिराजी पुरत्या अचंबित झाल्या पण पुढच्याच क्षणी त्यांनी जनतेच्या मनात काय चालले आहे याचा अचूक वेध घेतला. पवनार येथे विनोबा भावे यांचे आशिर्वाद घेऊन त्यांनी लगेच देशभर दौरे काढण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर इंदिरा गांधी यांच्या राजकीय जीवनाला कलाटणी मिळाली. आणि फिनिक्स प्रमाणे त्यानी पुन्हा शून्यातून उत्तुंग भरारी घेतली.....

पंजाब जेंव्हा खलिस्तानच्या आगीत नुकताच होरपळत होता तेंव्हा जर्नेलसिंह भिंद्रनवालेला उचकावून अकाली दलाच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचं गलिच्छ राजकारण ही संजय गांधींच्या सुपीक मेंदूतील कल्पना होती. अनंतबीर सिंह अत्तारी या उटपटांग तरुणांचा वापर भिंद्रनवालेला भडकावण्यासाठी करण्यात आला होता. अनंतबीरचे पूर्वज शाम सिंह अत्तारीवाला (जन्म १७९०) हे शीख इतिहासातील एक कथानायक होत. महाराजा रणजितसिंहांच्या काळात ते काश्मीरचा प्रांतपाल होते आणि त्यांनी रणांगणावर अनेक पराक्रम केले होते. त्याची दुधारी तलवार वारसाहक्काने अनंतबीरकडे आली होती. संजय गांधींनी अकाली दलाला शह देण्यासाठी १९७७/७८ या काळात अनंतबीरमार्फत भिंद्रनवालेला राजकारणात उतरावे याकरिता अनेक निरोप पाठवले होते. परंतू शीख समाजात आपण फूट पाडू इच्छित नाही, असे सांगत भिंद्रनवालेने त्याला नकार दिला होता. अखेरीस शाम सिंह अत्तारीवालाची ती दुधारी तलवार घेऊन अनंतबीर भिंद्रनवालेकडे गेला आणि त्या तलवारीची शपथ त्याला घातली. शिखांच्या इतिहासातील कथानायकाची ती तलवार पाहून भिंद्रनवाले सदगदित झाला आणि त्याने राजकारणात यायचं ठरवलं. पुढचा इतिहास सर्वज्ञात आहे....

'ऑपरेशन ब्ल्यू स्टार'द्वारे अतिरेक्यांचा आणि भिंद्रनवालेचा खातमा करण्याआधी इंदिरा गांधीनी दमदमी टकसाळचे प्रमुख या नात्याने जर्नेलसिंहला चुचकारण्याचा प्रयत्नही करून पाहिला होता. त्यांनी त्याला एक पत्र लिहिले होते. त्यानुसार इंदिराजी एकीकडे श्री दरबार साहेबमधून दहशतवाद्यांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात होत्या तर, दुसरीकडे त्यांची शीख नेत्यांशीही बोलणी सुरू होती. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. शेवटी सुवर्णमंदिरात लष्कर घुसवून पंजाबमध्ये नवा रक्तरंजित इतिहास लिहिला गेला. त्याची किंमत इंदिराजींना आपल्या प्राणाचे बलिदान देऊन चुकवावी लागली, इंदिराजींची हत्त्या करून आपल्या धर्मवेडाचा बदला घेण्याचा शीख मानसिकतेने जसा प्रयत्न केला त्याचाच पुढचा टप्पा म्हणून जनरल अरुण वैद्य यांची हत्त्या केली गेली कारण या 'ऑपरेशन ब्लू स्टार'ची जबाबदारी त्यांच्यावरच होती. मात्र इंदिराजींच्या हत्येनंतर सूडभावनेतून पुढे देशभरात विशेषतः उत्तर भारतात शिखांचे मोठे हत्याकांड घडले जे पूर्णतः निषेधार्ह आणि अयोग्य, असमर्थनीय होते. इंदिराजी गेल्या आणि अनेक प्रश्नांना वेगळी झळाळी मिळाली असं दुर्दैवाने म्हणावे लागते...

एक मात्र खरे की सर्वपक्षीय राजकारण्यांपासून ते राजकारणात रस नसणाऱ्या सामान्य माणसापर्यंत भारतीय जनतेच्या हृदयात त्यांना आजही मोठ्या प्रेमाने दिलेले मानाचे आयर्न लेडीचे स्थान कायम आहे....उद्या इंदिराजींची पुण्यतिथी आहे...त्यांना भावपूर्ण नमन..


- समीर गायकवाड.

सूचना- या पोस्टवर राजकीय वा वैयक्तिक शेरेबाजी करणारया कॉमेंटस करू नयेत.

(टीप - लेखातील माहिती जालावरून संकलित केलेली आहे)  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा