शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०१५

तैमुरलंग ..



तैमूरलंग अत्यंत क्रूर, कपटी व दुष्ट होता आणि केवळ अमुक एका धर्माचा द्वेष्टा होता हे सांगण्याची चढाओढ काही लोकात लागली आहे. तैमूर फक्त तेव्हढाच सीमित होता की अजून कसा होता याविषयी थोडे लिहिले जाणे क्रमप्राप्त आहे. साम्राज्याच्या रक्तपिपासू विस्ताराची भूक असणाऱ्या सम्राटास आवश्यक असणारे सर्व गुण तैमूरच्या अंगी होते. त्याच्या विषयी अधिक बारकाईने पाहण्याआधी त्याचा एक प्रसिद्ध किस्सा जाणून घेतला तर त्याचे कंगोरे कळण्यास मदत होईल.
एकदा तुर्कस्थानचा प्रसिध्द कवी अहमदी यास अटक करून तैमूरलंगापुढे उभे केले गेले. तैमूरलंगाने आपल्या दोन गुलामांकडे बोट दाखवून त्या कवीला विचारले, "काय रे, कवी लोक मोठे पारखी असतात असे मी ऐकतो. मग तू माझ्या या दोन गुलामांची किंमत सांगशील का ?' खरे कवी स्वाभिमानी असतात. ते स्पष्टवक्ते असतात. ते कुणालाही घाबरत नाहीत. अहमदी त्या दोन गुलामांकडे पाहून म्हणाला, "या गुलामांची किंमत चारशे मोहरांपेक्षा कमी नाही.' मग तैमूरलंगाने त्याला विचारले, "आता माझी किंमत किती ते सांग'. अहमदी ताबडतोब म्हणाला चोवीस मोहरा ! तैमूरलंग भयंकर संतापला. तो म्हणाला, "काय ? फक्त चोवीस मोहरा ? या गुलामांची किंमत चारशे मोहरा आणि माझी फक्त चोवीस मोहरा ? अहमदीच्या दृष्टीने सगळ्या लोकांवर अन्याय करणाऱ्या तैमूरलंगाचे जीवन कवडीमोलाचे होते. कारण त्याच्या ठिकाणी माणूसकी अशी काही शिल्लकच नव्हती. तैमूरलंगाला अहमदीच्या बोलण्याचा अर्थ समजला होता. त्याचे दुष्ट मन विरोध करू शकत नव्हते. सत्याला मरण नसते. तैमूरलंगाने अहमदीच्या वधाची आज्ञा दिली नाही. त्याने त्याला मूर्ख समजून हाकलून दिले. तैमूर भडक डोक्याचा असला तरी सत्य स्वीकारण्याची ताकद त्याच्याकडे होती !

तैमूर हा आशिया खंडातील मध्ययुगीन जेता. त्याचा जन्म ९ एप्रिल १३३६ ला कीश (आधु. शख्रीश्याप्स) येथे झाला. तो आईकडून चंगीझखानाच्या वंशातील होता. त्याच्या वडिलांचे नाव अमीर तरगाई. वयाच्या बाराव्या वर्षापासून तैमूरलंगाच्या धाडसी जीवनास सुरूवात झाली. आयुष्याची पहिली सुमारे वीस वर्षे त्याला रानोमाळ पायी किंवा घोड्यावरून, एकाकी वा अनुयायांसह भटकण्यात अतिशय हालात काढावी लागली. पण विलक्षण साहस, कावेबाजपणा इत्यादींच्या जोरावर त्याने आपल्या सर्व शत्रूंवर मात करून समरकंद येथे आपली गादी स्थापन केली. या काळात चंगीझखानाच्या वंशजाकडे चाकरी करीत असता पंचविसाव्या वर्षी तैमूर काही प्रांतांचा अधिकारी झाला. त्याने १३६९ मध्ये चगताई मंगोल वंशाची समाप्ती करून समरकंदचे राज्य मिळविले. तसेच इराण, तार्तर, हिंदुस्थान व ऑटोमन राज्यांत ३५ स्वाऱ्या करून सत्तावीस राज्यांचा पाडाव केला.

जग जिंकण्याच्या महत्त्वाकांक्षेने तैमूरने १३७०–९० मध्ये पूर्व तुर्कस्तान आणि इराणमध्ये आक्रमक धोरण स्वीकारले. १३८० मध्ये ख्वारिज्‌म, कॅश्गार व १३८१ मध्ये हेरात जिंकले. १३८२–८५ मध्ये त्याने पूर्व तुर्कस्तान आणि खोरासान जिंकून १३८६–८७ मध्ये फार्स, इराक, आझरबैजान आणि आर्मेनिया येथे आपली सत्ता प्रस्थापित केली. १३९३–९४ मध्ये मेसोपोटेमिया आणि १३९४ मध्ये जॉर्जिया हस्तगत केले. हे देश जिंकत असता किपचाक तुर्कांच्या तोख्तमिश ह्या राजाने खूप विरोध केला. म्हणून १३९५ मध्ये तैमूरने त्याचा पराभव करून किपचाकचे राज्य खालसा केले. ह्याच वेळी इराणमध्ये झालेल्या बंडाचा त्याने बंदोबस्त केला.

ह्यानंतर तैमूर जवळजवळ एक लाख सैन्यानिशी एप्रिल १३९८ मध्ये हिंदुस्थानच्या स्वारीवर निघाला आणि २४ सप्टेंबर रोजी त्याने अटकजवळ सिंधू नदी ओलांडली. तसेच पूर्वेकडे जाऊन दीपालपूर, भटनेर हे किल्ले घेऊन पानिपतवरून दिल्ली येथे तो पोहोचला. त्या वेळी दिल्ली येथे राज्य करणाऱ्या मुहम्मदशाह तुघलकाने तैमूरला म्हणण्यासारखा प्रतिकार केला नाही. त्याने दिल्ली शहरात एक लक्ष लोकांची अमानुष कत्तल करून तेथील अमाप संपत्ती समरकंदला नेली.

जॉर्जिया, बगदाद, अ‍ॅनातोलिया व बेयझीदच्या बंडामुळे तैमूरलंगला तिकडे जावे लागले. वयाच्या ६३ व्या वर्षी या सर्वांचा बंदोबस्त करून तो पुन्हा पश्चिमेकडे म्हणजे सिरिया, बगदाद, ईजिप्त व ऑटोमन तुर्क इकडे वळला. त्याने आशिया मायनरमधील लहान राजांची बाजू घेऊन ऑटोमन तुर्कांविरूद्ध लढून त्यांचा पराभव केला. बगदाद व स्मर्ना येथील सर्व माणसांची कत्तल करून ती शहरे जाळली. १४०० मध्ये दमास्कस येथे ईजिप्तच्या सुलतानाचा पराभव करून १४०२ मध्ये त्याने बेयझीदशी लढाई केली. वयाच्या ६९ व्या वर्षी वीस लाख सैन्यानिशी तो चीनच्या स्वारीवर निघाला; परंतू १९ जानेवारी १४०५ मध्ये ओत्रार येथील मुक्कामात ताप येऊन तेथेच मरण पावला.

एका पायाने लंगडा असल्याने त्याला तैमूरलंग हे नाव पडले. तसाच तो एका हाताने पंगू असल्याचेही नमूद आहे. तो धाडसी व कावेबाज होता. त्याला धर्मशास्र, साहित्य यांत रस असून युद्धकलेत त्याने विलक्षण प्रावीण्य मिळविले होते. त्याची शिस्त फारच कडक होती. मंगोल भाषेतील त्याच्या आठवणींचे एक पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याला विद्वान लोकांबरोबर इतिहास, धर्मशास्र इ. विषयांवर चर्चा करणे आवडे. बगदाद आणि दमास्कस येथील विद्यापीठांचा त्याने विध्वंस केला; पण त्याच तोडीची विद्यापीठे त्याने समरकंद येथे उभारली. ईजिप्त, अरबस्तान, हिंदुस्तान, तार्तर, रशिया व स्पेन येथील वकील त्याच्या दरबाराला भेट देत. जिंकलेल्या प्रदेशांतील लाखो लोकांची त्याने कत्तल केली; पण कलावंत व कारागीर ह्यांना त्याने समरकंदला नेले.

तो विविध कलांचा भोक्ता असल्याने मध्य आशियात १४०० च्या सुमारास त्याने अनेक वास्तू आणि मशिदी बांधल्या. तेव्हा समरकंद हे कलेचे प्रमुख केंद्र बनले. समरकंद येथील गुर-इ-अमीर ही त्याची कबर १४३४ मध्ये पूर्ण झाली. दर्शनी भागावरील रंगीत कौलकाम व विशिष्ट प्रकारचे खोदकाम (कंदाकारी) केलेले घुमट ह्यांमुळे त्याच्या काळातील मशिदी प्रसिद्ध आहेत. ह्या कामासाठी निरनिराळ्या देशांतील कलावंतांची मदत त्याने घेतली होती. ह्या काळात वस्रकलेतही बरीच प्रगती झाली होती. काचेची व मातीची कलात्मक भांडीही तयार करण्यात आली. ह्या काळातील सूक्ष्माकारी चित्रे, रेखन–सौष्ठव व सतेज रंगपद्धती यांमुळे उत्कृष्ट वाटतात. स्पेनच्या वकीलाने १४०४ मध्ये समरकंदला भेट दिली होती. ह्या वकीलाने तैमूरच्या दरबारातील थाट, टापटीप, व्यवस्था इत्यादींचे वर्णन केलेले आहे. मोठमोठी राज्ये पादाक्रांत केल्याने तैमूरलंग मोठा विजेता म्हणून परिचित असला, तरी तो चंगीझखान खालोखालचाच नेता मानला जातो.

त्याला दोन मुलगे होते. त्यांपैकी शहरूख या धाकट्या मुलाने तैमूरच्या मृत्यूनंतर एकसंध राज्य राहावे असा प्रयत्न केला. तैमूरने आपल्या मृत्यूपूर्वी राज्याची विभागणी दोन मुलगे व नातू यांमध्ये केली होती. तथापि तैमूरचा वंश कसाबसा सोळाव्या शतकाच्या सुरूवातीपर्यंत तग धरून होता. पुढे त्याची राजधानी हेरात येथे होती.

आपल्याकडे इतिहास सांगताना नेहमी गाळीव पद्धतीने सिलेक्टेड मेसेज ओरीएंटेड टाईपचा इतिहास शिकवला जातो. तैमुर हा केवळ हिंदूत्वविरोधी होता म्हणून त्याने लाखो हिंदू मारले असा एक लोकोपवाद केला जातो. त्याने हिंदूंना मारले हे सत्यच आहे पण वस्तूस्थिती थोडीशी अशीही आहे. तैमुरने त्याच्या साम्राज्यविस्ताराच्या आड येणाऱ्या प्रत्येक घटकाचा विध्वंस केला.त्याने मुस्लिम, तुर्क. पश्तून, कुर्द कुणालाही सोडले नव्हते. मग दिल्लीत आल्यावर तो आपली आरती ओवाळेल असं आपल्या भाबडया गाळीव इतिहासकारांना वाटत होतं का ? तसे घडणे कदापिही शक्य नव्हते. त्याने कत्तलच केली कारण त्याच्या सत्तासूत्राचे ते दहशती तत्व होते. त्याने कत्तली करताना धर्म वा प्रांत बघून कोणाला सोडले वा कोणाला जाणीवपूर्वक रगडले असे घडलेलं नाही तरीही आपल्याकडील खोडील इतिहासकरांनी फक्त हिंदूद्वेष्टा अशी त्याची प्रतिमा तयार केली आहे. अर्थात तो तसा होताच पण त्या सोबतच तो एक जग जिंकायची लालसा असणारा क्रूर सम्राट होता. ( त्याने दिल्लीत कत्तली करताना मौलवी आणि उलेमांना बाजूला काढले होते त्यामुळेही या प्रतिमेला बळकटी मिळाली.)

एखाद्याच्या रक्तपिपासू साम्राज्यविस्तारास हरकत नसेल तर त्याने केलेल्या अमानुष शिरकाणास हरकत असायचे कारण नाही. त्याच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा आपल्या पूर्वजांना त्याने पाणी पाजले हे आपण कबूल करत नाही. आपले पूर्वज महापराक्रमी असते तर त्यांनी तैमूरलंगास हरवले असते. त्यांच्या पराभवावर बोलण्याऐवजी धर्माद्वेष्ट्या जेनोसाईडबद्दल बोलले की गाळीव इतिहास माथी मारणे सोपे जाते हे आपल्या तथाकथित इतिहासकारांना चांगले ठाऊक आहे. आपल्या अतुल्य पराक्रमाच्या जोरावर दिल्लीश्वरास नमवून तो परतला याचा त्याला अभिमानच वाटला असेल. युद्ध आणि प्रेम यात सर्व चालते असं आपल्याकडेच बोलले जाते. या कत्तलीदेखील एका युद्धाचाच भाग होत्या. प्रत्येक अधम हुकुमशहाचा जसा अंत होतो तसा त्याचाही अंत झाला. पण जगाच्या इतिहासात तैमूरलंग आपली छाप सोडून गेला हे मान्य करावेच लागेल ! आपल्या भूमीचा इतिहास अभ्यासताना तैमूरचे वर्णन क्रूर परकीय शत्रू असेच असेल या बाबत शंका नाही ..

- समीर गायकवाड

1 टिप्पणी: