शनिवार, ५ सप्टेंबर, २०१५

संभाजीराजे - वादग्रस्त मुद्द्यांची एक चिकित्सा ....



आपल्याकडे स्वतःच्या राजकीय, जातीय फायद्याच्या गणितानुसार इतिहासाच्या चिंधडया उडवण्याचे काम सर्रास केले जाते. छत्रपती संभाजीराजांच्याबद्दल तर तीन शतकापासून हा उद्योग सुरु आहे. त्याचीच एक चिकित्सा...

ऑक्टोबर १६७६ पासून शिवछत्रपतींचा मृत्यू झाला तोपर्यंत संभाजीराजे रायगड परिसरात आले नव्हते. असं ऐतिहासिक साधनं दर्शवतात तरीही मल्हार रामरावाची बखर, इंग्रजी वार्ताहराच्या नोंदी आणि आदिलशाही इतिहासातील बुसातिन-उस-सुलातिन या तीन ऐतिहासिक साधनानुसार संभाजीराजांनी रायगडावर एका महिलेवर बलात्कार केला असे सांगितलं जातं आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो ! या बदफैलीमुळे व्यथित होऊन शिवरायांनी संभाजीराजांना स्वराज्याचा वारसदार मुक्रब करण्यास नकार दिला म्हणून आपल्या पित्याविरुद्ध बंड करण्यासाठी ते मुघलांना मिळाले असा विपर्यासी इतिहास काही लोक मांडतात. ६ जून १६७४ रोजी शिवराज्याभिषेक झाला आणि १३ डिसेंबर १६७८ रोजी संभाजीराजे दिलेरखानास मिळाले. स्वराज्य आणि स्वधर्मासाठी त्यांनी ११ मार्च १६८९ रोजी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. ११ वर्षापूर्वी एक व्यक्ती आपल्या पित्याविरुद्ध, राज्याविरुद्ध तथाकथित गद्दारी करतो आणि नंतर त्याच लोकांसाठी, धर्मासाठी आपला जीव देतो या दोन घटनांची सांगड कशी घातली पाहिजे याचे उत्तर शोधण्यासाठी इतिहासाची पाने आपल्याला चाळावी लागतात.

"...हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजीराजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापीचीही बरोबरी करील इतका तो तयार आहे. तो मजबूत बांध्याचा असून अतिस्वरुपवान आहे. त्याचे सौंदर्य हाच सैनिकांचे त्याचेकडे आकर्षण वाढविणारा मोठा गुण आहे. सैनिकांचे त्याच्यावर फार प्रेम आहे व ते त्याला शिवाजीसारखाच मान देतात. फरक इतकाच ह्या सैनिकांस संभाजीच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते..." - हिंदुस्थानात प्रवास करणारा फ्रेंच प्रवासी ऍबे कँरे (१६७२)

"युवराजपदी असतानाच संभाजीराजांनी 'बुधभूषण' हा राजनीतीपर ग्रंथ रचला होता... एका तत्कालीन कागदात एका खटल्यातील वादी आपली तक्रार प्रल्हाद निराजी व कवि कलश यांच्याकडे सोपविली गेल्याचे पाहून खुद्द संभाजीराजांकडे तक्रार करताना म्हणतात, साहेब स‌र्वज्ञ, शास्त्रार्थाचा अर्थ स्वतः पंडिताचा निशा होय ऎसा करिताती. ऎसे असोन माझे पारिपत्य होत नाही." - 'छत्रपती संभाजी महाराज' पृष्ठ क्र. ३७ , ३८ - लेखक वा.सी.बेंद्रे.

"... परंतु (संभाजीराजे) उग्र प्रकृती. शिवाजीमहाराजांचे मर्जीनुसार वागणे पडेना ऎसे होऊ लागले. काही दिवस राजगडी राहून रायगडी गेले... त्यांचा व्रतबंध करून युवराजाभिषेक करावासे मनात आणून व्रतबंध केला. परंतु संभाजी महाराजांची मर्जी एक प्रकारची! कोण्हे एके दिवशी हळदकुंकू स‌मारंभ शीतलागौरी यास स‌र्व सुवासिनी स्त्रिया राजवाड्यात येणार त्यात कोण्ही रुपवान स्त्री आली. तिजला महालात नेऊन बलात्कार - अविचार जाला. हे वृत्त महाराजांसही स‌मजले. ते स‌मयी बहूत तिरस्कार येऊन बोलले जे राज्याचे अधिकारी हे, अगम्यागमन श्रेष्ठ वर्णीचे ठायी जाले; स‌र्व प्रजा हे राजाचे कुटुंब आप्तसमान, हे पुत्र जाले तरी काय करावयाचे? यांचा त्याग करीन, शिक्षा करीन. ऎसे आग्रह करून बोलले. ही बातमी संभाजी महाराज यांस स‌मजली. त्याजवरून दोन घोडियांवरि आपण व स्त्री ऎसे बसोन, पांच पंचवीस माणसे मावले आपले खासगीची घेऊन रात्रीसच निघोन पाचवडास असता तेथून गेले. ते वेळे दिलेलखान औरंगाबादेस होते त्यांजपाशी गेले... बहूत स‌त्कार करून ठेविले... " - मल्हार रामरावाची बखर.

थोडक्यात अन्वयार्थ असा की, संभाजीराजांनी एका महिलेवर राजवाड्यात बलात्कार केला आणि मग शिवाजीराजे शिक्षा करणार या भयाने ते दिलेरखानाकडे पळून गेले, असे मल्हार रामरावाचे यात लिहितात. आदिलशाहीतला इतिहासकार महमद झुबेरी हा देखील आपल्या 'बुसातिन-उस-सलातीन' (विजापूरच्या आदिलशाहीचा इतिहास) या ग्रंथात असेच लिहितो. या ग्रंथातील कथा अशी -

"संभाजी याणी दिलेरखानापासी जाऊन पोहचण्याची कैफियत अस‌ी आहे की, सिवाजी कित्येक कामाबद्दल संभाजीसी त्रासून कंटाळला होता. या दिवसांत शहरनवीस म्हणदे हुकमाचे शेरे लिहिणारा कामदार होता. त्याचे कन्येवर संभाजी फार आषक, म्हणजे लुब्ध, जाहला होता. येणेकरून संभाजीविसी सिवाचे मनात फारच वाकडेपणा येऊन सिवाजी अत्यंत त्रासला होता. अशा प्रकारे की, संभाजीचा केवळ शत्रूच जाहाला आणि सिवाजीने मनात आणिले की, संभाजीस हरएक बाहान्याने पकडून ठार जिवे मारावा किंवा कैद करावा. संभाजी याणी हा सिवाजीचा इरादा ओळखून संशयांकित जाहाला. आपण दिलेरखानाकडे निघोन जावे असा निश्चय केला. आपण जातीने जाऊन पोहचण्यापूर्वी आधी एक पत्र आम्ही आपलेकडे येतो अशा मजकुराचे लिहून दिलेरखानाकडे पाठविले. त्यानंतर जातीनेही त्या पत्राचे लागोपाठच दिलेरखानाकडे निघाला."

दोन पाऊले याही पुढे जाऊन एका इंग्रजी बातमीदाराने नोंद केलेली आहे त्यात तो म्हणतो की, संभाजीने आपल्या बापास विष देऊन ठार मारले, अशा बातम्या पसरल्या आहेत. -

"For these many days here is a continued report of Sevagee being dead and buried, naming the place of his death, distemper, manner and place of burial. It is reported he was poisoned by his son; his son being informed his father had commanded the watch of Rairee Castle to throw him down over the wall, if he left not going out at nights after the watch was set to meet a daughter of one of his chiefest Brahminees, whose daughter he had debauched; that he was sick, we certainly know, and that his distemper proceeded from the violent pain he had in his head, which was almost rotten..." (English Records on Sivaji - Ed. Shiva Charitra Karyalaya, Pune, Vol II, P. 78)

गाढे अभ्यासक म्हणून गणले गेलेले भाष्यकार कै. त्र्यं. शं. शेजवलकर या पत्राबद्दल म्हणतात, "इंग्रजांच्या पत्रातील ही नोंद इतकी सहजरित्या स्पष्ट स्वरूपात आली आहे की तीबद्दल शंका घेणे कठीण आहे..." (श्री शिवछत्रपती - संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना, आराखडा व साधने - त्र्यं. शं. शेजवलकर,१९६४, पृ. १४२ -१४३ )

उपरोक्त ऐतिहासिक दस्तावेजात ज्या स्त्रीचा उल्लेख येतो, लोकोपवादातून रचल्या गेलेल्या कथेत या स्त्रीचे नाव गोदावरी असे होते. ती अण्णाजी दत्तो यांची मुलगी होती, असे मानले जाते. लोककथेनुसार "गोदावरी नामक एका ब्राह्मणाच्या विधवा मुलीवर मोहित होऊन संभाजीने तिला पळवून नेऊन लिंगाणा किल्ल्यावर लपवून ठेवले. महाराजांना हे कळताच त्यांनी तिची सुटका केली. या गुन्ह्याबद्दल महाराजांनी संभाजीला तोफेच्या तोंडी देण्याची शिक्षा फर्मावली. अष्टप्रधान मंडळींनी मध्यस्थी करून आजचा हा युवराज आमचा उद्याचा राजा आहे, असे सांगून शिक्षा रद्द करून घेतली. पण ती माहेरी अगर सासरी जाईना. तिच्यावर भ्रष्ट होण्याचा प्रसंग आल्यामुळे ती स‌ती गेली. संभाजीनेच तिची चिता पेटवली पाहिजे, अशी स‌ती जाताना तिने अट घातली होती. त्याप्रमाणे संभाजीने तिची चिता पेटवली..." ती जिथे स‌ती गेली त्याच ठिकाणी महाराजांनी तिची स‌माधी बांधली. ती अद्यापही तेथे, रायगडाच्या पायथ्याशी आहे, असे सांगण्यात येते.

संभाजीराजांबद्दल इतकं सर्व वाचून कोणाचाही असा ग्रह होऊ शकतो की संभाजी हा दुराचारी, स्त्री लंपट आणि अय्याशी होता. ( अशाच अर्थाचा उतारा संभाजीराजांच्या पात्राच्या मुखात राम गणेश गडकरींनी घातला आहे. पण त्याला छेद देणारे आणि संभाजीराजांची महती सांगणारे संवाद अन्य पात्रांच्या मुखी घालून समतोल साधला आहे, तरीही हा लोकोपवाद गडकरींच्या काळापर्यंत टिकून होता हे देखील मान्य करावे लागते असो.)

संभाजीराजांचा समग्र जीवनपट पाहिला तर हा युवराज धर्मासाठी जीव देणारा आणि प्रजेचा रक्षणकर्ता होता तो विद्याविभूषित लेखक होता असे ढोबळमानाने सहज सांगता येते. मग असा माणूस त्याचवेळी प्रजेवर अन्याय करणारा किंवा बदफैल असू शकतो का याची बारकाईने माहिती घेण्यासाठी थोडे खोलात जावे लागते.

मल्हार रामरावाची बखर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीनंतर तब्बल १२२ वर्षांनी लिहिली गेली आहे. त्यामुळे तिच्यात बोलाचाच भात अशा स्वरूपाच्या कथा बऱ्याच असू शकतात. ही बखर त्याने पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून लिहिलेली असू शकते याचे कारण मल्हार रामरावाच्या इतिहासात आहे. बाळाजी आवजी चिटणीस हा मल्हार रामरावाचा खापर पणजोबा होता. त्याला संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी दिले होते. ही बखर लिहिताना मल्हार रामरावाच्या मनात संभाजीबद्दलचा आकस नसेल असे कसे म्हणता येईल? डॉ. जयसिगराव पवार लिहीतात की, 'बाळाजी आवजी, खंडो बल्लाळ या आपल्या पूर्वजांविषयी लिहिताना त्याने त्यांच्या प्रतिमा उजळून टाकल्या आहेत. तथापि संभाजी महाराज गादीवर येऊ नयेत म्हणून झालेल्या कटांत, किंवा त्यानंतर त्यांच्यावर झालेल्या विषप्रयोगाच्या आणि अकबराशी संगनमत केल्याच्या कारस्थानांत बाळाजी आवजीचा काही भाग होता हे तो कोठेच नमूद करीत नाही. ज्या रायगडावर ही घटना घडली असे सांगण्यात येते, त्या गडावर संभाजीराजे यावेळी नव्हतेच. मल्हार रामराव सांगतो, की ही घटना घडल्यानंतर पित्याचा रोष ओढवून त्याची शिक्षा टाळण्यासाठी संभाजीराजे रायगडाहून दिलेरखानाच्या गोटात पळून गेले. प्रत्यक्षात ते स‌ज्जनगडाहून खानाच्या गोटात गेले आणि त्यापूर्वी त्यांचा मुक्काम द. कोकणात शृंगारपुरी पावणेदोन वर्षे होता.'

या तीन ऐतिहासिक साधनातून संभाजीराजांनी रायगडावर तथाकथित बलात्कार केल्याचा जो कालखंड दिला आहे तोच या तिन्हीं साधनांच्या असत्यकथनास समोर आणतो. ऑक्टोबर १६७६ पासून शिवछत्रपतींचा मृत्यू झाला तोपर्यंत संभाजीराजे रायगड परिसरात आलेच नव्हते मग त्या स्त्रीवर बलात्कार होण्याचा प्रश्नच येत नाही. १० ऑक्टोबर १६७६ ते ३ एप्रिल १६८० या काळात संभाजी रायगडावर आल्याचे शिवकालीन बखरीत कुठेही नोंद नाही. शिवाय गोदावरी नामक त्या कथित पिडीत स्त्रीची समाधी रायगडाच्या पायथ्याशी असल्याची जी बतावणी केली जाते त्याचा खुलासाही इतिहासच करतो. रायगडाच्या पायथ्याशी असणारी 'ती' समाधी स‌वाई माधवराव पेशव्यांच्या पत्नी सौ.यशोदाबाई यांची स‌माधी आहे ! (छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ, संपा. जयसिगराव पवार, १९९०, पृ. ३९६ - ३९७ )

छत्रपती संभाजीराजांच्या आणखी दोन नायिका आपल्याकडील उच्छृंखल साहित्यात आहेत. एकीचे नाव तुळसा आणि दुसरी थोरातांची कमळा. या कमळाची स‌माधी पन्हाळ्याच्या परिसरात आहे असे कावेबाज लोक सांगतात. पण ही स‌माधी बाळाजी विश्वनाथाच्या कालखंडातील यशवंतराव थोरात या वीराची आहे! बाळाजी विश्वनाथाच्या फौजेशी करवीरकरांच्या बाजूने लढत असताना पन्हाळ्याच्या पायथ्याशी यशवंतराव धारातीर्थी पडला. त्याची बायको त्याच्याबरोबर स‌ती गेली. या दोघांची ही स‌माधी आहे. आजमितीला तिथे या दोघांच्या मूर्ती त्यांच्या वंशजांनी स्थापन केल्या आहेत. (छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ, संपा. जयसिगराव पवार, १९९०, पृ.३०६ -३०९ ) तुळसा हे पात्र निव्वळ काल्पनिक असून ते आत्माराम मोरेश्वर पाठारे या नाटककाराने१८९१ साली आपल्या 'संगीत श्री छत्रपती संभाजी' या नाटकात रेखाटले होते. या पात्राला लोककथेतही स्थान नाही. ( राजसंन्यासमध्ये गडकरींनी देखील सुरुवातीसच ही पात्रे काल्पनिक असल्याचे नमूद केले आहे हे विशेष !)

संभाजीराजांच्या चारित्र्यावर जाणीवपूर्वक शिंतोडे उडवताना केल्या गेलेल्या या लोकोपवादात काहीच तथ्य नव्हते हे इथे सिद्ध होते. आता मुद्द्दा उरतो दिलेरखानास सामील होण्याचा...

शून्यातून ज्या राजाने स्वराज्य निर्मिले त्या राजाचा युवराज आपल्या पित्याच्या राज्याभिषेकानंतर केवळ सहा महिन्यात आपल्या कट्टर दुष्मनास जाऊन मिळाला याचा मागोवा अत्यंत रंजक आहे.आपल्या पित्याविरुद्ध दंड थोपटण्यासाठी ते मुघलांना जाऊन मिळाले होते का याचे उत्तर खालील पत्रात आहे.

औरंगजेबाच्या आदेशाने दिलेरखानाने स‌ंभाजीराजांस आपल्या बाजूस आणण्यासाठी जे पत्र लिहिले त्याला उत्तर म्हणून स‌ंभाजीराजांनी एक गुप्त पत्र पाठविले होते. त्यात त्यांनी म्हटले होते, "माझ्या हिताची म्हणून तुम्ही जी गोष्ट स‌ांगितली ती तशी घडून येईल, याहून वेगळे नाही, असे माझ्या मनात आहे. आपल्या पत्रातून मला असे दिसून आले की, स‌र्वांची मने एकच असतात. परंतु ज्या प्रदेशाची जबाबदारी माझ्यावर स‌ोपवून दुसरा प्रदेश जिंकण्यासाठी अगदी बिनधास्तपणे माझे वडील निघून गेले आहेत ते इथे परत येईपर्यंत मी आपण स‌ुचविलेली मोहीम स्वीकारू शकत नाही. आपल्या हिताकडे दुर्लक्ष करून मी माझ्या वडिलांची आज्ञा मोडणार नाही. परंतु आपल्या पराक्रमाने जिंकलेल्या वैभवाने मी त्यांना स‌ंतुष्ट करीन. स्वतःची खरी योग्यता स्वीकारण्यात परिश्रम कसले? आणि दिल्लीपती माझ्या बाजूस आल्यावर काय स‌ांगावे? (ही चांगलीच गोष्ट आहे.) माझ्या बाजूचे म्हणून आपण मला पाठविलेले पत्र आपल्या प्रेमाचे प्रतीक आहे. मैत्रीच्या बाबतीत आधार आहे. आपण आपल्या पत्रामध्ये 'आपला' असे संबोधून स्नेह जुळविला आहे. तो स्नेह प्रत्यक्षात स‌ाकार होईल अथवा नाही, याबद्दल मुळीच संशय नको." (परमानंदकाव्यम्, संपादक - गो. स. स‌रदेसाई, बडोदा, १९५२, पृ. ७८, श्लोक २२-३१)

हे पत्र बारकाईने वाचले तर एक गोष्ट लक्षात येते की यात संभाजीराजे म्हणतात की, "...आपल्या हिताकडे दुर्लक्ष करून मी माझ्या वडिलांची आज्ञा मोडणार नाही..."जो युवराज आपल्या लाडक्या राज्याचा राजा असणाऱ्या आपल्या पित्याची आज्ञा मोडणार नाही असं सांगतो तो त्याच समयी आपल्या पित्याविरुद्ध बंड करेल काय ? नक्कीच नाही. पण संभाजीराजे दिलेरखानास जाऊन मिळाले ही तर सत्य घटना आहे. मग अशी काय परिस्थिती उद्भवली की संभाजीराजांना मुघलांशी सामील व्हावे लागले याचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते.

यावर अनेक तर्कवितर्क मांडले जातात. शिवपुत्र स‌ंभाजी'कार डॉ. कमल गोखले यांच्या मते, 'शिवराज्याभिषेकानंतर रायगडावर गृहकलह निर्माण झाला. राजाभिषेक प्रसंगीच आपणास पट्टराणीचा मान मिळाला तरी आपल्या पुत्रास युवराजपदाचा मान न मिळता तो स‌ंभाजीराजांकडे गेला, याचा अर्थ राज्याचा वारसा आपल्या मुलाला मिळणार नाही, याचे दुःख स‌ोयराबाईस झाले असले पाहिजे. (६ जून १६७४ रोजी शिवराज्याभिषेक झाला, १७ जून १६७४ ला जिजाऊमां साहेब निवर्तल्या,ऑक्टोबर १६७६ मध्ये महाराज कर्नाटक स्वारीवर गेले आणि १३ डिसेंबर १६७८ रोजी संभाजीराजे दिलेरखानास मिळाले. असा मुख्य घटनाक्रम आहे.) जिजाऊ निवर्तल्यानंतर संभाजी राजांना आपल्या आजीच्या मृत्यूचे दुःख निश्चितच झाले असणार. मात्र शिवराज्याभिषेकानंतर संभाजीना युवराज घोषित होताच जिजाऊंच्या मृत्यूपश्चात सोयराबाईंच्या मनात स्वपुत्राच्या सत्तेची लालसा उत्पन्न झाली असणार. स‌ोयराबाई अस्वस्थ असतानाच त्याचवेळी अष्टप्रधानमंडळातील काही प्रधानही संभाजीराजांवर खफामर्जी होते. शिवरायांच्या आदेशानुसार स‌ंभाजीराजे राज्यकारभारात लक्ष घालू लागल्यानंतर त्यांच्या आणि प्रधानांच्या वितुष्टास प्रारंभ झाला असावा. यातून रायगडावरील गृहकलह इतका टोकाला गेला, की अखेर राज्याच्या वाटण्या करण्याइतपत बाका प्रसंग ओढवला..'

कवी परमानंदाचा पुत्र देवदत्त याने रचलेल्या 'अनुपुराणा'त यावर प्रकाश पडतो. सोयराबाईंनी वारसदार म्हणून आपला पुत्र राजाराम यास पुढे रेटणे किंवा स्वराज्याची वाटणी करून एक हिस्सा राजारामास देणे यावर ठोस पुरावे कुठेच उपलब्ध नाहीत. आहेत ते तर्क. यावर विचार करता असे लक्षात येते की शिवाजीमहाराजांना राज्याचे विभाजन मान्य नव्हते. "१९७५ - ७६ या कालखंडात राज्यविभाजनाचा प्रस्ताव रायगडावर चर्चिला गेला आणि शिवाजी महाराजांनी थोड्या नाराजीने का होईना पण त्यास आपली संमती दिली. असे वाटते की पितापुत्रांच्या बेबनावाला इथूनच स‌ुरुवात झाली. संभाजीराजास राज्याचे विभाजनच मंजूर नव्हते. कारण महाराज कर्नाटकात जे जिंकणार होते, तोही मराठी राज्याचाच एक भाग बनणार होता." या स‌र्व राजकारणात मोरोपंत, आण्णाजी दत्तो, राहुजी स‌ोमनाथ, प्रल्हाद निराजी, बाळाजी आवजी यांची भूमिका युवराज स‌ंभाजीराजांना विरोध करण्याची व राणी स‌ोयराबाईंचा पक्ष उचलून धरण्याची होती.शिवराय कर्नाटकचे राज्य राजारामास देऊ इच्छित होते तर सोयराबाईस स्वराज्यात हिस्सा हवा होता जो शिवाजीराजांना मान्य नव्हता. इथे घटकाभर सोयराबाईंचा हट्ट खरा धरू कारण संभाजीराजांची बदनामी करणारांनी सोयराबाईंना असेच रंगवले आहे. जर शिवराय आपले स्वनिर्मित जिजाऊंच्या स्वप्नातील राज्य संभाजी सोडून कोणास द्यायला राजी नव्हते तर संभाजीराजांनी सत्तेसाठी दिलेरखानाला जवळ केले हे कसे काय खरे मानता येते?

या दरम्यान शिवरायांनी दक्षिण दिग्विजयाची तयारी स‌ुरू केली होती. ६ ऑक्टोबर १६७६ रोजी दस-याच्या मुहुर्तावर महाराजांनी कर्नाटक स्वारीसाठी प्रयाण केले. मात्र आपण रायगडावर नसताना, तेथे स‌ोयराबाई आणि त्यांच्या गटाच्या कोंडाळ्यात स‌ंभाजीराजांना ठेवणे योग्य ठरणार नाही, हे जाणून त्यांनी स‌ंभाजीरांना येसूबाईंच्या माहेरी कोकणातील शृंगारपूर येथे धाडले. त्या प्रांताच्या कारभाराची जबाबदारी छत्रपतींनी स‌ंभाजीराजांकडे स‌ोपविली. इथे स‌ंभाजीराजे शाक्त पंथीयांच्या प्रभावाखाली आले. कवि कलशांनी पुढाकार घेऊन राजांचा इथेच कलशाभिषेक केला. एप्रिल-मे १६७८ च्या स‌ुमारास शिवाजीराजे कर्नाटक स्वारीवरून परतले. पण इतिहासकारांच्या मते त्यानंतर शिवाजीराजे आणि स‌ंभाजीची भेटच झाली नाही. रायगडावर परतल्यानंतर शिवाजीराजांनी स‌ंभाजीराजांना शृंगारपूरहून स‌मर्थभेटीसाठी स‌ज्जनगडास जाण्याची आज्ञा फर्मावली. ( 'शिवराय रामदास स्वामींना कस्पटाचीही किंमत देत नसत' असे विधान काही कथित इतिहासकार करतात त्याला छेद देणारा हा पुरावा आहे) 'अनुपुराणा'नुसार शिवाजी महाराजांच्या स्वहस्तलिखित पत्राद्वारे शिवराय स‌ंभाजीराजांना कळवतात की "तू प्रजेला अभय देतोस, पण प्रजा कर बुडवीत आहे. तू अमात्यांचा उघड अपमान करीत आहेस‌. तरी शृंगारपुराहून उठून तू स‌ज्जनगडास जा." स‌ंभाजीराजे स‌ज्जनगडावर गेले, पण तेथे रामदासस्वामी नव्हते. स‌ंगम माहुलीस तीर्थस्नानास जातो असे सज्जनगडाच्या किल्लेदारास सांगून स‌ज्जनगडच्या माहुलीवरून ते थेट दिलेरखानाच्या छावणीत जाऊन पोहोचले.

स‌ंभाजीराजांचे २४ डिसेंबर१६८० चे एका ब्राह्मणास दिलेले दानपत्र उपलब्ध आहे. त्यात त्यांनी आपल्या या कृत्याचे स‌मर्थन केले आहे. 'छत्रपती शिवाजी' या पुस्तकात (पृ. १४२ ) सेतुमाधवराव पगडी याच पत्राच्या आधारे लिहितात की, "सोयराबाईचे मन स्फटिकासारखे निर्मळ होते. पण कुटिल मंत्र्यांनी दुष्ट स‌ल्ला दिला की मोठ्या मुलाला गादी मिळता कामा नये. या स‌ल्ल्याचा प्रभाव तिच्यावर पडला. राजाने राणीच्या बाजूने पक्षपात केला. त्यामुळे तो संभाजीराजा विरुद्ध झाला. असे असूनही त्याने आपल्या वडिलांच्या स‌ेवेत आणि निष्ठेत काही म्हणता काही कसूर केली नाही. आपल्या कर्तव्यपालनात तो स्वतः (संभाजी) दशरथी रामाप्रमाणे होता. त्याने दीड कोटी रूपयांची दौलत, किल्ले, राजाचा दर्जा, मान आणि सन्मानही गवताप्रमाणे तुच्छ मानून त्यांचा त्याग केला." हे जर खरे मानले तर याचा मतितार्थ असा होतो की राणी स‌ोयराबाई आणि प्रधानांनी केलेल्या कुटील कारवायांमुळे स‌ंभाजीराजांना मोगलांना जाऊन मिळण्याचे कृत्य करावे लागले. हे खरे मानायचे झाले तर यात उल्लेख केलेल्या कारवाया कोणत्या आणि कोणी केल्या हा प्रश्न निर्माण होतो.

कुटिल राजकारणी व मत्सरग्रस्त प्रधान एकत्र आल्यानंतर या दोहोंच्या स‌मान प्रतिस्पर्ध्यास - स‌ंभाजीराजांस हतबल करण्यासाठी अनेक डावपेच लढविणे आवश्यक ठरले. स‌ंभाजीराजांचे चारित्र्यहनन हा अशाच एका डावपेचाचा भाग असावा. राजकारणातील स‌त्तास्पर्धेत प्रतिपक्षाचे चारित्र्यहनन करून त्यास बदनाम करण्याची अनेक उदाहरणे आपणास अगदी अलीकडच्या इतिहासातस‌ुद्धा स‌ापडू शकतील.या सर्व संकटातून मार्ग काढण्यासाठी शिवरायांनीच सुंठेवाचून खोकला घालवण्यासाठी संभाजी राजांना दिलेरखानाकडे पाठवले असल्याची शक्यता जास्त रास्त वाटते. एक पराक्रमी योद्धा, एक पराकोटीचा धर्माभिमानी, एक प्रजाहितदक्ष राजा, एक आज्ञाधारक पुत्र, एक प्रतिभाशाली लेखक, एक जाणकार वाचक, एक दूरदृष्टीचा प्रशासक, स्वतःचे आरमार सैन्य मजबूत करणारा सेनानायक, एक प्रेमळ पती, एक सच्चा दोस्तयार अशी गुणलक्षणे असणारा कर्तव्यसन्मुख पुरुष दुराचारी असू शकतो का

इतिहासाचे अवलोकन करताना ऐतिहासिक व्यक्तींच्या समग्र चरित्राकडे तटस्थतेने पाहणे गरजेचे ठरते. माफीनामे लिहून इंग्रजांच्या आधीन होणारे सावरकर कधी देशद्रोही असू शकतील का याचे उत्तर त्यांच्या समग्र चरित्राकडे बघून सारासार विचार करताच निमिषार्धात मिळते. तद्वतच आपल्या राज्यासाठी, धर्मासाठी प्राण देण्याची मानसिकता असणारा राजा आपल्याच पित्याविरुद्ध कटकारस्थान करण्यासाठी जाऊ शकतो का याचे उत्तर समग्र संभाजीमहाराजांचे चरित्र बघताच ध्यानी येते. इतका साधा मुद्दा आजच्या काही भंपक लोकांच्या ध्यानी येत नाही. आणि ते वाट्टेल तसे बरळत राहतात हे इतिहासाचे आणि त्या महानायकांचे दुर्दैवच म्हणावे लागेल....

- समीर गायकवाड

( संदर्भ - मराठेशाहीचा मागोवा - डॉ. जयसिंगराव पवार, मंजुश्री प्रकाशन, कोल्हापूर)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा