Tuesday, September 22, 2015

अनमोल घडीची चिरंतन टिकटिक.....


"संध्याकाळी देव्हारयात लावल्या जाणारया समईचे पावित्र्य या सिनेमात असायचे, सकाळची सडारांगोळी करून तुळशीवृंदावनाला प्रदक्षिणा घालतानाची प्रसन्नता त्यात होती. दुपारच्या शीतल वामकुक्षीचा निवांतपणा त्यात असायचा. शहर झोपी गेल्यानंतर उत्तररात्री खिडकीतून येणारा गार वारा शृंगाराचे हळुवार गुंजन जोडप्यांच्या कानात करायचा तो शृंगार या सिनेमात होता. सप्तरसाचे मर्यादित पण उत्फुल्ल रसरशीत अविष्कार या सिनेमात होते म्हणून ते अधिक जवळचे आणि अधिक सच्चे वाटायचे…………"

ही गोष्ट तेंव्हाची आहे जेंव्हा आपला देश स्वतंत्रही झालेला नव्हता अन तरीदेखील त्या काळी सिनेमे बनत होते. देशात एकीकडे इंग्रजांविरुद्ध अगदी निकराने स्वातंत्र्य चळवळीने जोर धरला होता तरीही लोक सिनेमे बघत होते. १९४५ नंतर ही लढाई निर्णायक टप्प्यात आली तेंव्हाही प्रेक्षकांचा अपुर्व प्रतिसाद मिळत होता. याला कारण तत्कालीन सिनेमांची कसदार कथानके आणि आशय. जोडीला नवनवीन सादरीकरण. यामुळे त्या घनगंभीर परीस्थितित देखील थियेटर फुल्ल असत. तेंव्हाचे काही सिनेमे आणि त्यातली गाणी आज २०१५ मध्ये देखील लोकांच्या स्मरणात आहेत. हे कसे काय शक्य आहे ? सिनेमा बघणारे जे तेंव्हा तरुण असतील म्हणजे १९२०च्या पुढचा जन्म असलेले किती लोक आज ह्यात असतील ? १९३०च्या आसपास जन्मलेल्या प्रेक्षकांचे  वय आज ८५च्या आसपास असायला हरकत नाही. पण आज वयाच्या पंचविशीपासून ते सत्तरीपर्यंतच्या सिनेरसिकांचे आईवडील सुद्धा तेंव्हा जन्मले नसतील अशा चित्रपट रसिकास ते सिनेमे वा त्यातली गाणी कशामुळे माहिती असतील ? का बरं ही जुनी गाणी अन सिनेमे कालबाह्य होत नाहीत ? त्या चित्रपटातला गोडवा, निर्भेळ प्रेम, सच्च्या कथा, अवीट गोडीची गाणी आणि चित्रपटातला साधेपणा हे काही प्रमुख घटक या प्रश्नाचे उत्तर ठरू शकतात. तुम्हाला असा कुठला सिनेमा वा गाणं आठवतं का जे १९४०च्या दशकात म्हटलं गेलय पण आजही कुठे रेडीओ, टीव्ही वा इंटरनेटवर ऐकताना – पाहताना आपण त्यात गुंतून जातो ? मला तर खूप गाणी आणि सिनेमे आठवतात, पण त्यातही 'अनमोल घडी', 'बडी बहेन', 'रतन', 'बरसात', 'अंदाज', 'किस्मत', 'सिंदूर', 'आग', 'महल', 'मशाल', 'बाबुल', 'शहीद', 'झीनत' असे सिनेमे आठवतात. यांची साधीसोपी मधाळ नावेच सगळं काही सांगून जातात, अगदी साध्या पण हृदयाला भिडणारया कथा ही यांतली समानता.... असो….

तर हे सगळे सिनेमे कधी दूरदर्शनवर रविवारी संध्याकाळी ६ वाजता तर कधी शनिवारी दुपारी ३ वाजता या वेळेत पाहिलेले आहेत. ‘फिचर फिल्म अबसे कुछही देरमें’ असा फलक बरयाच वेळ डोळ्यापुढे रहायचा.
बहुतांश घरी असलेल्या ओबडधोबड कृष्णधवल टीव्ही संचावर हे सिनेमे पाहिले जायचे. चित्रपटदेखील बहुतांशी काळेपांढरे- कृष्णधवल असल्याने टीव्ही सेट रंगीत नसल्याचे फारसे दुःख नसायचे कारण एरव्ही त्यावर ‘कोर्टाची पायरी’ अन ‘आमची माती आमची माणसे’ हेच चालू असायचे....

नंतर यथावकाश सिनेमा सुरु व्हायचा ; टीव्हीवरचा जाहिरातीचा राक्षस तेंव्हा आताच्याइतका नरडीचा घोट घेत नसे ही त्यातली जमेची बाजू. हे सर्व जुने सिनेमे काहीसे संथ वाटायचे, सावकाश बोलणारी नट मंडळी,
नाचताना अगदी अदबीने अन अगदी मोजून मापून अंग हलवणारया नट्या असा मामला असायचा. खलनायक मात्र अगदी दणकेबाज पहिलवानी अंगाचे वा राकट चेहरयाचेच ! शिवाय ही सगळी पात्रे काहीसा हेल काढून संवाद म्हणायची. त्यामुळे त्या सिनेमापुढे फार तर अर्धा-एक तासच माझा निभाव लागायचा. पण अल्पशी असणारी समज जेंव्हा कधी आली तेंव्हा मात्र हे सिनेमे समरसून बघितले आणि त्या सोनेरी काळाचा आनंद घेतला. अशोक कुमार आणि लीला चिटणीसचा बंधन (१९४०) बघताना आजही मजा येते, आज ‘दिलवाले दुल्हनिया...’ ह्या शाहरुखच्या सिनेमाच्या विक्रमी शोस्क्रीनिंग बद्दल लिहिले जाते पण त्याहीपेक्षा जबराट विक्रम त्या काळी
अशोककुमारच्या ‘किस्मत’ने (१९४३) केला होता. सलग ६ वर्षे ४ शो एकाच थियेटरला कोलकात्यात हा सिनेमा तशा धामधुमीच्या काळात झेंडा फडकावत होता. ‘रतन’ मधली गाणी आजही ऐकावीशी वाटतात . तर अगदी नवतरुण दिलीप कुमार, राज कपूर यांचे ‘बरसात’, ‘आग’, ‘बाबुल’, ‘शहीद’,अंदाज’ हे सिनेमे अजूनही मेंदूत आपल्या पाऊलखुणा ठेवून आहेत. त्या काळचे बहुतांश नट- नट्या हे स्वतःच गायक गायिका असत, ते स्वतःसाठी गात. छोटासाच पण सूर तालाचा आरोह अवरोह हेच आपलं जगणं मानणारा एकजिनसी वाद्यवृंद तेंव्हाच्या संगीतकरांकडे असायचा. सुरेल गाणी आणि अर्थपूर्ण रचना या दोनेक शब्दात त्या काळच्या गाण्यांची व्याख्या करता येते. या अशा जुन्या सिनेमापैकी मला आवडतो ‘अनमोल घडी’. सुरैय्या, नुरजहां, सुरेंद्र हे सर्व गायक नट- नट्या यात प्रमुख भूमिकेत होत्या. प्रेमाचा त्रिकोण – चौकोन हा यातला कथा विषय होता.
    
चंदर आणि लता ही जेहानाबादमध्ये राहणारी किशोरवयीन जोडी आहे. लता ही एका श्रीमंत घरातली 
मुलगी आहे तर चंद्रभान उर्फ चंदर हा एका गरीब, विधवा आईचा मुलगा असतो. लताच्या पालकांना गरीब असलेल्या  चंदरबरोबरची तिची मैत्री आवडत नाही. लताचे घरातलेच लाडाचे नाव रेणू आहे. काही दिवसांनी लताचे कुटुंब मुंबईत स्थलांतरित होते. चंदर आणि लता दोघेही हिरमुसून जातात. लता जाताना आपली आठवण म्हणून तिच्याजवळचे एक घड्याळ चंदरला भेट देते. काळ पुढे सरकत राहतो. 'ये दुनियाकी चक्की है, इसे कोई रोक नही सकता' असं सांगणारी चंदरची आई (लीला मिश्रा) चांगलीच ध्यानात राहते. तिचा सगळा जीव चंदरवर आहे. गावात किरकोळ वाद्ये दुरुस्त्या करून देणारा तरुण चंदर (सुरेंद्र) पुढे कामाच्या शोधात लताचादेखील शोध घेऊ लागतो. कारण तो तिला अजिबात विसरू शकलेला नाही. प्रकाशच्या सांगण्यावरून तो पोटापाण्यासाठी मुंबईत येतो.
प्रकाश (झहूर रझा) हा मुळचा त्याच्याच गावचा असलेला चंदरचा बालमित्र आहे पण आता एक श्रीमंत व्यक्ती झालेला असतो, तो चंदरला  मदत करतो. तो त्याला वाद्य दुरुस्तीचे दुकान सुरु करून देतो. प्रकाशच्या आईला (अमीर बानो) प्रकाशने चंदरवर पैसे खर्च केलेले आवडत नाही. तरीदेखील तो त्याला मदत करत राहतो. त्याला त्याच्या पायावर उभे राहता यावे यासाठी तो प्रयत्न करतो. इकडे तरुण लता (नूरजहां) एक लेखिका झाली आहे, मात्र तिने रेणू उर्फ  'रेणुका देवी’ हे टोपणनाव तिच्या लेखनासाठी धारण केले आहे. काळ्याभोर लांबसडक केसांची, गोड गळ्याची चाफेकळी नाकाची नूरजहां फार खुलून दिसते. तिच्या लेखनाचा चंदर चाहता होतो. बसंती (सुरैय्या) ही लताची खास जीवाभावाची मैत्रीण
आहे. लता तिच्या एका कादंबरीत चंदर आणि स्वतःच्या  बालपणावर आधारित कथा गुंफते. चंदर ती कादंबरी वाचतो आणि ही गोष्ट तिला कशी काय माहीत झाली याचे कुतूहल त्याच्या मनात जागे होते. तो रेणूला म्हणजे लतालाच त्यासाठी एक पत्र लिहितो, प्रत्यक्ष भेटण्याची विनंती करतो. या भेटीला रेणू तयार नसते पण बसंती तिला तयार करते त्यासाठी बसंती स्वतः रेणू बनून भेटायला जाते. पहिल्याच भेटीत ती त्याच्यावर भाळते, पण त्या भेटीत चंदरकडून लताने आठवण म्हणून दिलेले घड्याळ तिथेच राहून जाते. ते घड्याळ बसंती घेते आणि लताला दाखवते. लता ते घड्याळ ओळखते. तिला वाईट वाटते की आपण बालपणीच्या साथीदारांनी एकमेकाला ओळखले नाही. या सिच्युएशनला ‘मेरे बचपन के साथी..’ हे मस्त गाणे आहे. घड्याळ
हरवल्यामुळे बेचैन झालेला चंदर बसंतीने घड्याळ परत दिल्यावर त्याच्या जीवात जीव येतो. त्याची ही स्थिती बसंती येऊन लताला सांगते. तिला आनंदही होतो आणि बसंतीचा त्याच्यावर जीव जडल्याने वाईट वाटतो. या प्रसंगी ती खोटे खोटे हसून वेळ मारून नेते. याच प्रसंगी सुपरहिट ‘जवां है मुहब्बत हसी है जमाना....’ हे अवीट गोडीचे गाणे आहे. तुम्हारे लिये मोहब्बत बारीश की छिटपुट बुंदे है मेरे लिये मुहब्बत घुट घुट के मर जाना है असं म्हणत लता दुखावलेल्या बसंतीच्या मार्गातून दूर होते. लताचे आईवडील प्रकाशसोबत तिचा विवाह ठरवतात, हा धक्का चंदर कसाबसा सहन करतो पण त्याची आई तो सहन करू शकत नाही, तिचा मृत्यू होतो. चौघांनाही सत्य कळून येते पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. लता आणि प्रकाशच्या लग्नात येऊन चंदर तिला लग्नाची भेट म्हणून तिने बालपणी दिलेले घड्याळ देतो. सिनेमाच्या क्लायमेक्स मध्ये सुर्यास्ताच्या वेळेस पाठमोरा चालत जाणारा चंदर आणि त्याच्या मागोमाग पळत जाणारी पाठमोरी बसंती दिसते...

सिनेमात वेगळा वाटणारा शेवट केला आहे. हळवी कथा, दोनतीन मिनिटांची छोटी छोटी पण मस्त गाणी, पार्श्वसंगीताचा कमीत कमी वापर, लो लाईट इफेक्टस, सर्वच कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय व दमदार 
evergreen movie
स्टारकास्ट यामुळे ‘अनमोल घडी’ने ऐतिहासिक यश मिळवले. मालिका-ए-तरन्नुम नूरजहां हिची कर्णमधुर गाणी हा या सिनेमाचा प्राण ठरावा इतकं यश या गाण्यांना मिळाले. किंचित किनरया वाटणारया या आवाजाचा आणि शैलीचा प्रभाव लताजींवर होता यातच सर्व काही येते. फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या नूरजहांला भारतीय रसिकांनी आपल्या हृदयात अढळस्थान दिलेले आजही कायम आहे. मेहबूबच्या परीसस्पर्शी दिग्दर्शनाने सजलेल्या  'अनमोल घडी'मध्ये तन्वीर नक्वी यांनी लिहिलेल्या अर्थपूर्ण गाण्यांना नौशादजींनी सुमधुर संगीत दिले आणि नुरजहांनी त्याच्या आधारे लोकप्रियतेचे सर्वोच्च शिखर गाठले होते...

"जवां है मुहब्बत हसीं है ज़मानालुटाया है दिल ने खुशी का ख़ज़ाना
जवां है मोहब्बत हसीं है ज़माना
लुटाया है दिल ने खुशी का ख़ज़ाना

मुहब्बत करें खुश रहें मुस्कुराएँखुश रहें मुस्कुराएँ
मुहब्बत करें खुश रहें मुस्कुराएँ
खुश रहें मुस्कुराएँ
ना सोचे हमें क्या कहेगा ज़माना
क्या कहेगा ज़माना

जवां है मोहब्बत हसीं है ज़माना 
लुटाया है दिल ने खुशी का ख़ज़ाना........."
संध्याकाळी देव्हारयात लावल्या जाणारया दिव्याचे पावित्र्य या सिनेमात असायचे, सकाळची सडारांगोळी करून तुळशीवृंदावनाला प्रदक्षिणा घालतानाची प्रसन्नता त्यात होती. दुपारच्या शीतल वामकुक्षीचा
निवांतपणा त्यात असायचा. शहर झोपी गेल्यानंतर उत्तररात्री खिडकीतून येणारा गार वारा शृंगाराचे  हळुवार गुंजन जोडप्यांच्या कानात करायचा तो शृंगार या सिनेमात होता. सप्तरसाचे मर्यादित पण उत्फुल्ल रसरशीत अविष्कार या सिनेमात होते म्हणून ते अधिक जवळचे आणि अधिक सच्चे वाटायचे. माझा जन्मदेखील या चित्रपटाच्या आसपासच्या काळात झाला नव्हता  पण या चित्रपटावर मला लिहावेसे वाटले कारण त्यातला आशय, मांडणी आणि ताजेपणा या तिन्ही गोष्टी. युट्यूबवरही हा चित्रपट आहे. काहींना तो स्लो वाटेल तर काहींना बोअर वाटेल पण त्यातला आनंद घेऊन पाहायचे ठरवले तर श्वेतशामल चित्रपटांच्या सोनेरी प्रारंभाचा देखणा काळ आपण अनुभवू शकतो...
         
आज नूरजहांचा जन्मदिवस आहे, तिला जाऊनही आता पंधरा वर्षे झालीयेत तर अनमोल घडीने सत्तरी गाठली आहे. तरीदेखील सोशल मिडियाच्या हायटेक जमान्यात ‘अनमोल घडी’ नंतर काही दशकांनी जन्माला आलेल्या माझ्यासारख्या रसिकाला त्यावर लिहावे वाटते आणि तुमच्यासारखे रसिक ते वाचतात आणि भरभरून प्रतिसाद देतात तेंव्हा ती त्या भूतकाळच्या अनमोल 'घडी'ला दिलेली प्रेमाची खरी पावती आहे असे म्हणायला काही हरकत नाही.....

- समीर गायकवाड.