
'मेरा साया' १९६६ मधला सिनेमा. माझा जन्मही झालेला नव्हता तेंव्हा. पण हा सिनेमा मी बऱ्याचदा पाहिलाय, त्यातल्या 'नयनो मे बदरा' या गाण्यासाठी आणि अर्थातच साधनासाठी. मदनमोहनजींचे सुमधुर संगीत या सिनेमाला होते. साधना ही साठच्या दशकात इतकी प्रसिद्ध अभिनेत्री होती की तिची हेअरस्टाईल तेंव्हा मुलींमध्ये साधना कट म्हणून प्रसिद्ध होती. 'मेरा साया' मध्ये सुनील दत्त ठाकुर राकेश सिंहच्या भूमिकेत होते. त्यांचे गाजलेले जे सिनेमे आहेत त्यापैकीच हा एक होय.
साधनाची दुहेरी भूमिका यात आहे. के.एन.सिंह यात सरकारी वकीलाच्या भूमिकेत आहेत. त्यांचे ते भुवई उंचावून बोलणे आणि पॉज घेऊन छद्मीपणाने हसत बोलणे सिनेरसिक कधीच विसरणार नाहीत. अन्वर हुसैन, रत्नमाला, मुक्री, मनमोहन, धुमाळ आणि प्रेम चोपड़ा यांच्या सहायक भूमिका या सिनेमात होत्या.
सिनेमा सुरु होतो तेंव्हा मुक्री डॉक्टरांना घेऊन महालात येतो आणि ते गीताला तपासतात. तिच्या सासूबाई म्हणजे राकेशच्या मावशीला (रत्नमालाला) डॉक्टर सांगतात की, 'हिचा ताप साधासुधा नाहीये, तुम्ही मला आधी कळवायला पाहिजे होते. ताबडतोब राकेशला कळवून इकडे बोलवून घ्या'. राकेशसिंह ठाकूर हा एक प्रसिद्ध वकील आहे, आपली पत्नी गीता मरणासन्न अवस्थेत अंथरुणाला खिळून आहे आणि ती काही घटिकाची सोबती आहे हे कळल्यावर तो विलायतेहुन तडक आपल्या गावी येतो. आजाराने जर्जर झालेल्या गीताचा त्याच्या कुशीतच मृत्यू होतो,तो स्वतःच्या हाताने तिला अग्नी देतो. त्याच्यासाठी हा खूप मोठा धक्का असतो. तो निराशेच्या गर्तेत जातो. त्याला उदास वाटू लागते, तिची सातत्याने आठवण येऊ लागते. तिचे जुने फोटो बघून तो मनाला दिलासा देतो. त्याला तिचे भास होऊ लागतात. तिच्या गोड आवाजातले गाणी ऐकून मनाला शांती देण्याचा तो प्रयत्न करतो. यावेळी पार्श्वसंगीतात लताजींच्या आवाजातले एव्हरग्रीन टायटल सॉंग 'तु जहां जहां चलेगा मेरा साया साथ होगा' अत्यंत खुबीने वापरले आहे....
एके दिवशी इन्स्पेक्टर दलजित तिथे येतात आणि सांगतात की आम्ही डाकूंच्या एका टोळीवर हल्ला चढविला होता, त्यात एक तरुणी देखील पकडली गेली आहे आणि ती तरुणी राकेशची पत्नी गीता असल्याचा दावा करते आहे.तिची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला तर वेगवेगळी माहिती पुढे आली.अगदी ती जत्रेत नाचत होती आणि 'वरेली की बाजार मे झुमका गिरा रे' हे गाणं गात होती इथेपर्यंतची माहिती मिळते.तिला नंतर पोलीस चौकीत आणले जाते आणि अनोळखी व्यक्ती तिच्या पुढ्यात उभ्या केल्या जातात पण ती त्यांना ओळखत नाही. मात्र जसा राकेश समोर येतो ती त्याला जाऊन बिलगते.तो तिला झिडकारतो. ती त्यांच्या आईला आणि महलातल्या हरकाम्या मुलीलाही ओळखते पण ते सर्व जण तिला गीता मानण्यास नकार देतात.
विमनस्क अवस्थेत राकेश तिथून परत येतो. महालात परतल्यावर गीताच्या आठवणी त्याच्याभोवती रुंजी घालू लागतात आणि आपल्या प्रिय पत्नीसोबत घालवलेले रम्य क्षण त्याला पुन्हा आठवतात. ' नैनों में बदरा छाये, बिजली सी चमके हाये ; ऐसे में बलम मोहे गरवा लगा ले' हे अप्रतिम कर्णमधुर गाणे पडद्यावर दिसते आणि भावविभोर झालेला राकेश ती दृष्ये डोळ्यात साठवतो असे या गाण्याचे पिक्चरायझेशन आहे. उदयपुर पेलेसच्या देखण्या आणि भव्य पार्श्वभूमीवर हे गाणे अधिकच शांत,शीतल आणि मनोहर वाटते.सुनील दत्त एखाद्या खानदानी घरंदाज रुबाबदार राजकुमारासारखे दिसतात. आपल्या बॉलीवूडमध्ये ही राजेशाही सौंदर्यदृष्टी काही अभिनेत्यांना अभिजात आहे जसे की रेहमान, राजेशखन्ना, शम्मी कपूर आणि अलीकडील नाव घ्यायचे झाल्यास अर्जुन कपूर !
'नैनों में बदरा छाये' या संपूर्ण गाण्यात फक्त दोन कडवी आहेत.पूर्ण गाण्यात दोघाना एकच वेशभूषेत दाखवले आहे. तेंव्हा नट नटी आत्तासारखे मिनिटा मिनिटाला वेगवेगळे भडक कपडे बदलून नाचत नव्हते हे सुदैवच म्हणायचे. फिकट आकाशी रंगाची सोनेरी मीनावर्क केलेली साडी घातलेली साधना गाण्यात छान दिसते. लांब काळेभोर मोकळे सोडलेल्या केसांची साधना गळ्यात फक्त एक सुबक नेकलेस असूनही भारदस्त दिसते. लाल चौकड्या शर्टातले सुनीलदत्त तिला अगदी शोभून दिसतात. पूर्ण गाण्यात कुठे अंगाला झटापट नाही की कुणी कोणाच्या अंगचटीला जात नाही. परस्परांच्या डोळ्यात पाहत आपल्या प्रेमभावना व्यक्त होणाऱ्या या गाण्याच्या दुसऱ्या कडव्यात ती त्याला ओवाळते. जणू त्याच्यासाठी आपले आयुष्य लागावे म्हणून निरंजन लावून आरती करते. अगदी हळुवार आहे हे गाणे. अजूनही कधी रेडीओवर हे गाणे लागले की असे वाटते की विस्मरणात गेलेलं आपल्या ओळखीचे कोणीतरी आपल्याला अनामिक ओढीने साद घालत आहे. एकांतात जरी कधी हे गाणे ऐकले तरी थोडेसे कावरे बावरे झाल्यासारखे वाटत राहते.
पुढे पोलीस त्या मुलीला कोर्टात हजर करतात. तेथे देखील ती तेच सांगते. कोर्ट राकेशच्या नावाने समन्स काढतात.राकेश कोर्टात आल्यावर स्वतःला गीता म्हणवणारी तरुणी अनेक खाजगी प्रश्न विचारून त्याला हैराण करते.आता राकेश पूर्णतः कोड्यात पडतो. कोर्टात त्याच्या पाठीवरची निशाणी ती तरुणी दाखवून देते. ती त्यांना एकांतात भेटण्याची विनंती करते, तिथे ती त्याला असं काही विचारते की तो नखशिखांत हादरून जातो.तरीही तो तिला नाकारतो आणि तिच्या उलटतपासणीची परवानगी मागतो. सिनेमात अधून मधून धुमाळ आणि मुक्रीचे नर्मविनोद वातावरण हलके करत राहतात. जबरदस्त कोर्टरूम ड्रामा होतो. राकेश तिला अनेक प्रश्न विचारतो.
राकेश परदेशात जाताना गीताचे मंगळसूत्र तुटते, राकेश ते दुरुस्तीला टाकतो ही आठवण ती तरुणी कोर्टात सांगते. खोलात गेल्यावर त्याच्या लक्षात येते की तो विलायतेला गेल्यावर गीताची रोजनिशी चोरीला गेली आहे. गावात नाचायला येऊन, चोरी करून दरोडे टाकणाऱ्या या तरुणीनेच गीताची डायरी चोरल्याचा आरोप तो करतो.पण ती मेलोड्रामा करते,वेड्याचे नाटक करते.सुनावणी लांबत जाते.'आपके पेहलू मे आकर रो दिये' हे प्रसिद्ध गाणे याच सिच्युएशनला आहे.पण शेवटी ती सत्यकथन करते. गीता आणि निशा या जुळ्या बहिणी असतात. त्यांची आई वाईट चालीची स्त्री असते. आईप्रमाणेच निशाही वाईट वळणाची असते. ती घरातून पळून जाऊन डाकू सूर्यसिंहच्या टोळीत सामील होते.त्याच्याशी लग्न करते.तिच्या आईची इच्छा असते की गीतानेसुद्धा हाच मार्ग अनुसरावा. मात्र गीता घरातून पळून जाते आणि आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न करते, तेंव्हा तिला राकेश वाचवतो. ती त्याला खोटे सांगते की तिचे या जगात कोणीही नाही.राकेश गीताशी विवाहबद्ध होतो. इकडे निशाला नंन्तर पश्चात्ताप होतो, ती पतीला हा वाममार्ग सोडायला सांगते. तो ऐकत नाही, शेवटी ती डाकूंची टोळी सोडून शहराकडे निघते. पण तिच्या प्रकृतीची हेळसांड होते, ती आजारी पडते आणि एका रात्रीच्या आश्रयासाठी गीताकडे येते.गीता तिला घरात झोपवून औषध आणायला बाहेर पडते. निशाच्या शोधात आलेल डाकू तिला निशा समजून घेऊन जातात. निशाची तब्येत खालावत जाते आणि राकेशला विदेश दौरा अर्धवट टाकून गीता आजारी आहे असे वाटल्यामुळे घरी परत यावे लागते. गंभीर आजारी असलेली निशा मृत्यूमुखी पडते, राकेशसह सर्वच जण गीता मृत झाल्याचे समजून तिच्या देहाला अग्नी देतात. कालांतराने डाकूच्या टोळीवर इन्स्पेक्टर दलजित जेव्हा हल्ला चढवतात तेंव्हा त्यांनी पकडून आणलेली गीताच असते. शेवटी डाकू सूर्यसिंह राकेशच्या हवेलीत घुसण्याचा प्रयत्न करतो आणि पोलिसांच्या हल्ल्यात जखमी होतो. तोच सर्व सत्य राकेशला सांगतो आणि शेवटी तिथे असणाऱ्या निशाच्या समाधीवर प्राण सोडतो. अखेर राकेश आणि गीताचे मनोमिलन होते. सुखांत होतो.
दिग्दर्शक राज खोसला यांनी चित्रपट गतिमान ठेवला आहे. रहस्यभेद शेवटपर्यंत राहिल्याने उत्कंठा मस्त ताणली जाते. कोठेही भडकपणा नाही. संयत, शालीन अभिनय आणि तगडी स्टारकास्ट यामुळे सिनेमा बॉक्सऑफिसवर सुपरहिट झाला.सिनेमातली सर्व गाणी आजही गुणगुणली जातात. पैकी टायटल सॉंग आणि 'झुमका गिरा रे' व 'आपके पेहलू में' ही गाणी भाव खाऊन गेली. पण रजा मेहंदी अली खानच्या सिद्धहस्त लेखणीतल्या 'नयनो में बदरा' मध्ये जे अद्भुत रसायन आहे, जी गायकी आहे, जो दर्द आहे तो इतर गाण्यात नाही. माणसाला भूतकाळात खेचण्याची जबरदस्त ताकद या गाण्यात आहे. आज सुनीलदत्त हयात नाहीत. साधनाने आर. के. नय्यरशी विवाह केला आणि रुपेरी पडद्यावरून ती लुप्त झाली. सीआयडी (वहिदा रेहमान) आणि वो कौन थी (साधना) नंतरचा राज खोसलाचा हा तिसरा चित्रपट होता. दो बदन (आशा पारेख -सिमी गरेवाल). दो रास्ते (मुमताज) मै तुलसी तेरे आंगन की (नूतन ) असे नायिकांना उजळवणारे सिनेमे त्यांनी काढले. ८० च्या दशकातला अमिताभ शत्रुघ्नचा त्यांनी दिग्दर्शित केलेला सिनेमा 'दोस्ताना' आजही हिट आहे. वर्षामागून वर्षे गेलीत. मेरा सायाला पन्नास वर्षे होतील. सिनेमावेडा आणि संगीतवेडा असलेला माझ्या सारखा माणूस आजही 'नयनो मे बदरा छाये लागले तरी आठवणींच्या रम्य कुपीत ध्यानमग्न होऊन जातो. हे सिनेमे आणि ही गाणी आपल्या धकाधकीच्या जीवनात विरंगुळ्याचे चार क्षण देतात त्याचा मनापासून आनंद घेतो....
नैनों में बदरा छाए, बिजली सी चमके हाए
ऐसे में बलम मोहे गरवा लगा ले
मदिरा में डूबी अखियाँ, चंचल हैं दोनों सखियाँ
झलती रहेंगी तोहे, पलकों की प्यारी पखियाँ
शरमा के देंगी तोहे मदिरा के प्याले
प्रेम दिवानी हूँ मैं, सपनों की रानी हूँ मैं
पिछले जनम से तेरी प्रेम कहानी हूँ मैं
आ इस जनम में भी तू अपना बना ले
आजही असे वाटते की फिकट आकाशी रंगाची परिधान केलेली ती सौंदर्यवती आणि तो उमदा राजबिंडा तरुण एकांतात त्या रमणीय ठिकाणी एकमेकाशी हितगुज करत असतील....
- समीर गायकवाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा