Wednesday, October 14, 2015

उन्हाशी झुंज अजून संपली नाही ....
सुर्याच्या आगीने जीवाची काहिली होत्येय. उन्हे भल्या सकाळपासूनच वैरया सारखी, उभ्या जन्माचा दावा मांडल्यागत डोक्यावर नेम धरून बसलेली! विहिरी कोरड्या ठक्क झालेल्या. काळ्या मायेच्या सगळ्या अंगाला खोल खोल भेगा. दूरवर कुठेही हिरवाई नाही. ओसाड माळरानावर भकास तोडाचा काळ डोळे खोल गेलेली माणसे चोवीस तास हुडकत फिरतो. दूर बांधाबांधापर्यंत कुठेही  पाखरे नाहीत की त्यांचे आवाज नाहीत, जळून गेलेल्या झाडांच्या फांद्यावर वाळून गेलेल्या घरट्यांच्या काटक्या उरल्या आहेत, र्हुमर्हुम आवाज काढणारा वारा सगळ्या शेत शिवारातून कण्हत कण्हत फिरतो आणि पाझर तलावाच्या पायथ्याशी जाऊन डोळे पुसतो. खुराड्याच्या सांदाडीला कोंबड्यांची लोळत पडलेली मातकट पिसे उगाच अस्वस्थ करतात.

आभाळाकडे तोंड वासून बघणारी जुनाट पिवळट पडलेली झाडेही ओशाळून गेली आहेत. बाभळीच्या अंगावर आता काटेही उरले नाहीत ; डोबीजवळच्या  वडाच्या पारंब्या खोल खोल जाऊन मातीला पानाचं गाऱ्हाणे सांगण्याचा प्रयत्न करतात अन त्याने मातीच्या जीवाची तगमग अजून वाढते. अन्न पाण्या विना तडफडणारया उपाशी पोराबाळांना बघून आईचा जीव जसा कासावीस होतो तसं तिचं काळीज तुटतं...गावातली शभरी पार केलेली पिकली पाने सांगतात की मातीच्या कानात झाडाच्या मुळ्या जितकं गाऱ्हाणे सांगतात तितक्यावेळा तिचा उर दुभंगतो अन आपण म्हणतो की भुई भेगाळली !!
 
पसाभर पाणी पिण्या साठी मैलोगणिक चालावे लागते, पाणी आणणार तरी कुठून ? आडातच काही नसेल तर पोहऱ्यात तरी येणार कुठून ? घसा कोरडा पडला तरी पाणी प्यावे वाटत नाही पोटाला दोन घास घालावे वाटत नाहीत. पोटपाठ एक झालेली माणसे बघितली काळीज धस्स होते, एखाद्या घरी कोनाड्यात पडलेला दोरखंड जरी कुणी बाहेर काढला तरी अंगावर काटा येतो. ना कुणाच्या दारी मंडप ना कुठे कशाचं आवतण ! कुठून सांगावा आलाच तर तो डोळ्यात पाणी आणणारा नाहीतर चिंतेचे ढग गडद करणारा असाच येतो... घरात तरी किती आणि कस बसून राहणार ? कामावर तरी कुठे जाणार ? रानात जावं म्हटलं तर काळीज भडभडून येतो, डोकं बडवून घ्यावं वाटतं. आत्ताशी तर डोळे सुद्धा खारट होत नाहीत, नुसते भणभणत राहते. चिलारीची, एरंडाची अन धोतरयाची झुडपे जरी दिसली तरी थोडी उभारी वाटते, तेव्हढीच काय ती मातीच्या जिवंतपणाची खुण !

माणसाच्या बिरादरीला कोण ना कोण मदतीला येत राहतं, आला दिवस कसातरी जात राहतो पण जित्राबाचं काय ? त्यांची मान झडलेली, कवळाभर असलेल्या गर्दनी उतरलेल्या, हातभर बरगड्या बाहेर आलेल्या. वशिंड खंगून गेलेली ती मुकी जनावरे बघून पोटात कालवते. फरयाचे मांस गळून गेलेलं, शेपट्या बारीक झालेल्या अन त्यांच्या पाठीची पन्हाळी बुजून कण्याची हाडं तोंड वर काढून बसलेली. बाहेर आल्यागत वाटणारे डोळे पार पिचून गेलेले अन त्याभोवती घोंगावणारया माशा यामुळे भेंडाळून गेलेले ते जीव बघितले तरी उमाळे दाटून येतात. त्यांचे रेशमी मऊ सुत कातडे लोंबत राहते आणि शिंगे वर आलेले, पोट आत गेलेले त्यांचे सांगाडे बघितले की दावणीचे दगड काढून गळ्यात बांधून उडी घ्यावी वाटते. पण उडी कशात मारणार ? त्याने का प्रश्न सुटणार आहे ? सांज झाली की गोठे माना मुरडून, अंग वेळावून रिकाम्या दावणीकडे बघत थिजून गेलेले अश्रुंचे ओघळ झिरपवत राहतात, तेंव्हा मात्र काळजाचे पाखरू भिर्र होऊन जाते अन ओक्साबोक्शी रडावे वाटते.....


आपल्या डोक्यावर स्वतःचेच फाटून गेलेले का असेना पण छत आहे, जनावरांचे काय ? हा प्रश्न काही पाठ सोडत नाही. इतके सारं होत असूनही ह्या जित्राबाजवळ गेलं तरी ते मायेने हात, तोंड चाटतात जणू काही मूक सांत्वन करतात. उपाशी पोटी असणारी ही जनावरे खर तर माणसासारखी वागतायत अन तिकडं कुठेतरी  वरवर जित्राबांचे कैवारी भासवणारी माणसे नुसत्या संशयावरून पशुंपेक्षाही  वाईट वागताहेत.    


यंदा तो सर्वशक्तीनिशी येतोय असं सगळे बोलताहेत, काळवंडलेल्या चेहऱ्याने अन रापलेल्या अंगाने मातीत पायाची खुरे गाडून उभे राहू पण त्याच्याशी यंदा दोन हात करून जगून दाखवू. यंदाची झुंज अखरेच्या श्वासापर्यंत अन रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू !! आजच्या घडीला हीच जिगर आम्ही मातीच्या कणाकणातुन वेचून घेतो आहोत.....दाराशी येणारया अक्राळविक्राळ काळाशी असणारा हा सामना आम्ही भूमिपुत्रच जिंकणार आहोत बस्स थोडी पाठीवरची थाप आणि अश्रू पुसायला तळहात इतकीच काय ती अपेक्षा जगाकडून आहे..    


- समीर गायकवाड.