बुधवार, २८ ऑक्टोबर, २०१५

उच्चवर्णाच्या झुली पांघरणारया मठ्ठ कर्मठांसाठीचे अंजन...



१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तो दिवस दसऱ्याचा होता. तेव्हापासून दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा साजरा केला जातो.१९५६मध्‍ये दस-याच्या दुस-या दिवशी बाबासाहेबांनी लाखो बौध्द उपासकांसमोर अत्यंत उद्बोधक भाषण केले होते. त्या ऐतिहासिक भाषणात.समाजाच्या साक्षरतेचे महत्व, महिला सन्मान, मासाहार विरोधातील चळवळ, माध्यमांनी केलेली टीका, नागपूरमध्‍येच सभा घेण्याचे कारण असे विविध विषय त्यांनी मांडले होते. यावेळी झालेल्या भाषणात बाबासाहेबांनी एक प्रसंग सांगितला, 'एकदा मी संगमनेरला सभेला गेलो होतो. सभा झाल्यानंतर मजकडे एक चिठ्ठी केसरीच्या त्या बातमीदाराने पाठविली व मला विचारले, "अहो, तुम्ही तर तुमच्या लोकांना मेलेली ढोरे ओढू नका म्हणुन सांगता. त्यांच्या बायकांना लुगडे चोळी नाही, त्यांना अन्न नाही, त्यांना शेतीवाडी नाही, अशी त्यांची बिकट परिस्थिती असता, दरवर्षी त्यांना मिळणारे कातड्यांचे, शिंगाचे, मांसाचे ५०० रुपयांचे उत्पन्न फेकून द्या म्हणून सांगता, यात तुमच्या लोकांचा तोटाच नाही काय?"




त्या पत्रकाराला उत्तर दिल्याचे सांगताना बाबासाहेब म्हणाले की, 'तुम्हाला याचे उत्तर कोठे देऊ ? ते येथे देऊ की सभेत देऊ ? लोकांच्या समोरच सवालपट्टी झालेली बरी, मी त्या गृहस्थांना विचारले, तुमचे म्हणणे एवढेच की आणखी काही आहे? ते गृहस्थ म्हणाले, एवढेच म्हणणे आहे व एवढ्याचेच उत्तर द्या. मी गृहस्थाला विचारले, तुम्हाला मुले, माणसे किती आहेत ? त्यांनी सांगितले, मला पाच मुलगे आहेत, भावालाही ५-७ मुले आहेत. मी म्हणालो, तर तुमचे कुटुंब मोठे आहे. तेव्हा तुम्ही व तुमच्या नातेवाईकांनी त्या गावची मेलेली सर्व ढोरे ओढावीत; आणि ५०० रुपयाचे उत्पन्न घ्यावे. शिवाय दरवर्षी मी स्वत: तुम्हाला ५०० रुपये वर देण्याची व्यवस्था करतो. माझ्या लोकांचे काय होईल, त्यांना अन्न-वस्त्र मिळेल की नाही, ते माझे मी पाहीन, मग एवढी फायद्याची गोष्ट तुम्ही का सोडुन देता? ओढा ना तुम्ही मेलेली ढोरे !"

नागपूर येथे सभा घेण्याचा उद्देश सांगताना बाबासाहेब म्हणाले होते, 'लोक मला असा प्रश्न करतात की, या कार्यासाठी तुम्ही नागपूर शहरच का ठरविले? अन्य ठिकाणी हे कार्य का केले नाही? काही लोक असे म्हणतात की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी पलटन नागपूरात असल्यामुळे त्यांच्या उरावरती म्हणुन आम्ही ही सभा शहरात घेतलेली आहे. हे मुळीच खरे नाही. त्यासाठी नागपूर येथे हे कार्य घेतलेले नाही. आमचे कार्य ईतके मोठे आहे की आयुष्यातील एक-एक मिनीट देखील कमी पडतो. आपले नाक खाजवून दुसऱ्याला अपशकुन करण्यासाठी मजजवळ वेळ नाही.' असे मत मांडत बाबासाहेबांनी नागपूर निवडण्याचे कारण सांगितले होते.

"भारतात बौध्द प्रसार जर कोणी केला असेल तर तो नाग लोंकानी केला.नाग लोकांची मुख्य वस्ती नागपूर परिसरात होती असे दिसते. म्हणून या शहराला 'नागपूर' म्‍हणतात. आर्य लोकांनी नागांना जाळून टाकल्याचे दाखले पुराणात आहेत. अगस्ती मुनीने त्यातुन फक्त एक नाग मनुष्य वाचविला. त्याचेच आपण वंशज आहोत. ज्या नाग लोकांना एवढा त्रास सोसावा लागला, त्यांच्या उन्नतीसाठी कोणीतरी महापुरूष हवा होता. येथुनच सुमारे २७ मैलांवर नागार्जुनाची टेकडी आहे. नजीकच वाहणारी जी नदी आहे, ती नाग नदी आहे.

या नदीचे नाव येथे राहणाऱ्या लोकांवरून पडले आहे. नागांच्या वस्तीमध्ये वाहणारी ती नाग नदी आहे. म्‍हणून नागपूर निवडले आहे, यामध्ये कोणाला खिजविण्याचा प्रश्न नाही, तशी भावनाही नाही. आर. एस.एस.चे कारण माझ्या मनाला शिवलेही नाही. तसा कोणी अर्थ करून घेऊ नये." असं कारण त्यांनी नागपूरच्या निवडीबद्दल दिले होते.



बाबासाहेबांच्या या कार्यावर तेव्हा मोठ्याप्रमाणात टीकाही झाली होती. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले होते, 'मी हे जे कार्य आरंभले आहे, त्यासाठी माझ्यावर अनेक लोकांनी व वृत्तपत्रांनी टिका केलेली आहे. काहींची टीका कडक आहे. त्यांना वाटते की, मी गरीब, अस्पृश्य लोकांना भलतीकडेच नेत आहे. आमच्यातील काही तरूण व वयोवृध्द लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण झाले असतील, तर त्या संशयाची निवृत्ती करणे हे आपले कर्तव्य आहे आणि अशा संशयाची निवृत्ती करणे म्हणजे आपल्या चळवळीचा पाया मजबूत करणे आहे.' अशा आशयाचे मत त्यांनी मांडले होते.

आहारविषयक चळवळीविषयी सांगताना बाबासाहेब म्हणाले होते, 'मागे आपण लोकांनी मांस खाऊ नये म्हणून चळवळ केली गेली होती. त्यामुळे स्पृश्य लोकांवर मोठ्या गदा आल्याप्रमाणे त्यांना वाटत होते. त्यांनी जिवंत म्हशीचे दूध प्यावयाचे आणि ती म्हैस मेल्यानंतर आम्ही खांद्यावर घेऊन जावयाचे, हा प्रकार विचित्र नव्हे काय? आम्ही त्यांना म्हणतो की तुमची म्हातारी मेली तर तिला आम्हाला का नेऊ देत नाही? त्यांनी मेलेली म्हैस द्यावी, तशी म्हातारीही द्यावी.' या चळवळीवर त्‍याकाळी लोकांनी केसरी वृत्‍तपत्रात पत्रव्यवहार केला होता. त्‍यावर डॉ. आंबेडकर याच भाषणात म्‍हणाले होते की, 'कोणीतरी मनुष्य 'केसरी' मधुन पत्रव्यवहार करून, अमुक अमुक गावी दर वर्षाला ५० ढोरे मरतात, त्यांच्या कातड्यांची, शिंगाची, हाडांची, मांसाची, शेपटीची, खुरांची मिळून ५०० रुपयांइतकी किंमत होइल व मृत मांस सोडल्यामुळे एवढ्या प्राप्तीला हे लोक मुकतील, असा प्रचार त्यावेळी होत होता. त्याच्या प्रश्नाला उत्तर द्यावयाची आवश्यकता खरे म्हणजे काय होती ? पण आमच्या लोकांना असे वाटे, 'या गोष्टीला आमचा साहेब उत्तर देत नाही, तर साहेब करतो तरी काय?' असेही बाबासाहेब म्हणाले होते.

स्त्री सन्मानाविषयी बोलताना बाबासाहेबांनी याच भाषणात एक संदर्भ दिला होता. ते म्हणाले होते, 'आमच्या मुंबईत, व्यभिचारी बायांची एक वस्ती आहे. त्या बाया सकाळी ८ ला उठल्या की न्याहारीसाठी शेजारच्या हॉटेलात येतात आणि म्हणतात, ( यावेळी बाबासाहेबांनी आवाज बदलून नक्‍कल केली होती. असा संदर्भ आहे. ) " सुलेमान, अरे खिम्याची प्लेट व पावरोटी घेऊन ये. तो सुलेमान ते घेऊन येतो; शिवाय चहा, पाव, केक वगैरेही आणतो. पण माझ्या दलितवर्गीय भगिनींना साधी चटणीभाकरी देखील मिळत नाही; मात्र त्या इज्जतीने राहतात. त्या सदाचारानेच राहातात.

सभेत जमलेल्‍या मीडियाच्या प्रतिनिधींकडे वळून बाबासाहेब म्‍हणाले होते, 'हे वृत्तपत्राचे लोक माझ्या मागे गेली ४० वर्षे हात धुवून लागले आहेत. माझ्यावर केवढी टीका त्यांनी आजवर केली ! मी त्यांना म्हणतो, अजून तरी विचार करा, आता तरी पोरकटपणाची भाषा सोडून काही प्रौढ भाषा वापरा. आम्ही बौध्द धर्मीय झालो, तरी राजकीय हक्क मी मिळवीन याची मला बालंबाल खात्री आहे. मी मेल्यावर काय होईल हे सांगता येणार नाही. पण या चळवळीसाठी फार मोठे काम करावे लागेल.' असे आवाहनही त्यांनी केले होते.

सर्वात जास्त महत्वाचा मुद्दा मांडताना ते म्हणाले की, "आम्ही हिंदू-धर्मत्यागाची चळवळ १९३५ पासून येवले येथे एक ठराव करुन हाती घेतली. मी हिंदू-धर्मात जन्मलो तरी हिंदू-धर्मात मरणार नाही, अशी प्रतिज्ञा मी मागेच केली होती आणि काल (१४ ऑक्टोबर १९५६) ती खरी करून दखविली. मला इतका आनंद झाला आहे, हर्षवायूच झाला आहे. नरकातुन सुटलो असे मला वाटते. मला कोणी अंधभक्त नको आहेत. ज्यांना बौध्द धर्मात यावयाचे आहे, त्यांनी जाणिवेने आले पाहिजे. त्यांना तो धर्म पटला पाहिजे."

आजचे निद्रिस्त दलित, तसेच नवबौध्द होऊनही बाबासाहेबांच्या विचाराचे पाईक न झालेले पुर्वाश्रमीचे दलित आणि अजूनही कर्मठ जातीयवादी असणारे उच्चवर्णाच्या झुली पांघरणारे मठ्ठ हिंदुत्ववादी या सर्वांसाठी हे भाषण प्रबोधनात्मक आहे.

- समीर गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा