Saturday, April 2, 2016

हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय - एक बहुपेडी व्यक्तिमत्व ....'पुराने पन्नों वाली वो डायरी
अक्सर ज़िन्दा हो जाती है,
जब खुलती है,
मुस्कुराती है, पहले प्यार की हरारत,
खिलखिलाती है कर के खुछ शरारत.. रुलाती भी है वो एक कविता,
एक सूखा ग़ुलाब
कुछ आँसुओं से मिटे शब्द… कुछ मीठी, कुछ नमकीन सी यादें,
निकल आतीं हैं जब बिखरे पीले पन्नों से मैं भूल जाता हूँ इस उम्र की दोपहर को
और फिर से जी लेता हूँ कुछ अनमोल पल....' हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय ह्या गृहस्थांनी लिहिलेली ही कविता आहे...

हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय हे एक बहुपेडी व्यक्तिमत्व होते.. आठवतात का बावर्जीमधील ते खवचट आजोबा ! तेच ते !! शांती निवास ह्या घराचे सर्वेसर्वा शिवनाथ शर्मा !!
हरिंद्रनाथ संगीताचे दर्दी होते
हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय हे सरोजिनी नायडू यांचे भाऊ होते आणि मेगेसेसे पुरस्कार विजेत्या समाजवादी विचारवंत कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे ते पती होते. देशातील पहिल्या काही घटस्फोटात या जोडप्याच्या ताटातूटीचा समावेश होता. त्याचबरोबर देशाच्या पहिल्या लोकसभेत त्यांनी विजयवाडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते... सरोजिनी नायडू ह्या काँग्रेसच्या दुसऱ्या महिला अध्यक्षा होत्या तर कमलादेवी चट्टोपाध्याय ह्या समाजवादी विचाराच्या अन हरिंद्रनाथ पहिल्यांदा निवडून आले ते कम्युनिस्ट पक्षाच्या पाठींब्याच्या जोरावर ! असा वैचारिक तिढा हरिंदनाथांच्या घरी होता.. 

हरिंद्रनाथांनी लिहिलेल्या इंग्रजी भाषेतील कविता विशेष प्रसिद्ध आहेत, साहिब बिवी और गुलाम, आशीर्वाद, अभिलाषा, तीन देवियां, तेरे घर के सामने अशा हलक्या फुलक्या चित्रपटात काम केलेला हा माणूस दिसायला खत्रूड वाटायचा पण अत्यंत हळव्या मनाचा कवी हृदयाचा त्यांचा पिंड होता. हरिंद्रनाथांनी अनेक बंगाली व काही हिंदी गाणी स्वतः लिहिली, त्याला संगीत देखील दिले अन त्या गाण्यांना त्यांनी आपला आवाजही दिला होता. अशी आगळी वेगळी खुबी त्यांच्यात होती. सत्यजित रें सरांच्या सिनेमात त्यांना मानाचे अन प्रेमाचे स्थान होते. छोट्याच पण लक्षात राहतील अशा भूमिका त्यांनी
हरिंद्रनाथांचे गेटअप अफलातून असत  
रेंच्या सिनेमात केल्या. स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणारा हा माणूस अत्यंत अबोल होता मात्र त्यांच्या हिंदी रचना विरुद्ध टोकाच्या होत्या ! 

'रेलगाडी मालगाडी ...' अशोक कुमारांच्या आवाजातलं हे गाणं त्यांनीच लिहिलं होतं ! १९७५ मध्ये आलेल्या 'लक्ष्मी' या हिट चित्रपटातले 'माय हार्ट इज बिटिंग...' हे सुप्रसिद्ध गाणंदेखील याच हरिंद्रनाथांचं होतं..काही ठिकाणी हे गाणं आनंद बक्षींच्या नावाने खपवले गेले ही बाब अलाहिदा, मात्र या गाण्याने त्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती... वरवर खडबडीत वाटणारा हा माणूस आतून मात्र मेणाहून मऊ म्हणतात तसा होता, आयुष्यभर स्वतःचा शोध घेत राहिला.

बावर्ची मधील गाजलेली भुमिका वठवताना 
भूमिका मिळाव्यात म्हणून कुणाचे उंबरठे झिझवले नाहीत की त्यांना प्रसिद्धीचा सोस नव्हता.अशी माणसे चित्रपट क्षेत्रात चालत नाहीत पण त्यांनी स्वतःला बदलवले नाही. गुलजार, हृषिदा आणि सत्यजित रे या तीन तऱ्हेच्या पण त्यांच्यासारख्याच प्रतिभावान माणसांचे ते मित्र होते. मात्र या मैत्रीचाही त्यांनी कधी फायदा घेतला नाही. १९७३ मध्ये त्यांना भारत सरकारने कविता व चित्रपटक्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले होते. 

चित्रपट क्षेत्रात रोज पायलीला पासरीभर माणसे येतात आणि जातात. कोण कोणाला मोजत नसतो. काही तर केवळ वर्षभरात विस्मृतीत जातात काहीना त्याच्याशीही काही घेणेदेणे नसते, ते फक्त स्वतःच्या निखळ आनंदासाठी या क्षेत्रात आलेले असतात. अशा लोकांपैकी एक असणाऱ्या हरिंद्रनाथांचा आज जन्मदिन आहे. त्यांच्या कविता अधूनमधून वाचनात येतात तेंव्हा त्यांनी रंगवलेले 'बावर्ची' मधले आजोबा डोळ्यापुढून तरळून जातात अन आश्चर्य वाटते की सर्वच सिनेमात छोट्या भूमिका केलेला हा माणूस विस्मृतीत का जात नाही?

- समीर गायकवाड.