Saturday, March 19, 2016

'पिंजरा' - मराठी सिनेमाचे सोनेरी पान ...पूर्वेला तांबडफुटी झालीय...मातीच्या रस्त्याने दोनचार बैलगाड्या -छकडे चाललेत, बैलांच्या गळ्यातला घंटांचा मंजुळ नाद कानी येतोय..गावाकडची रम्य पायवाट नजरेस पडतेय,...बैलगाडीची चाके एका अनामिक ओढीने विशिष्ट गतीने पुढे जातायत अन गाडी हाकणारा गाडीवान गाऊ लागतोय....

'गंsssssssssssss साजणे, कुण्या गावाची कंच्या नावाची कुण्या राजाची तु ग रानी, आली ठुमकत नार लचकत, मान मुरडत हिरव्या रानी...'

या गाण्याचा ठेकाच असा होता की बघणाऱ्याने ताल धरावा. या सुरेल गाडयांचे गाडीवान दुसरे तिसरे कुणी नसून मराठी माणसांच्या गळ्यातले ताईत असणारे आपले निळूभाऊ ! निळु फुले !!

या छकडयास चिकाचा पडदा असतो. या पडदयाआड असते एक अप्सरा, तिचे दर्शन होणार इतक्यात सुरु होते श्रेयनामावली...पडद्यावर अक्षरं झळकतात. व्ही शांताराम प्रस्तुत - पिंजरा !!!

गं साजणेपासुन सुरु होणारा हा प्रवास अखेरपर्यंत खिळवून ठेवतो. टायटल संपले की वाटेवरून ठुमकत येणाऱ्या बैलगाड्यांतुन गावात तमाशाचा फड येतो. खटार्यासतुन उतरते तमाशाची नर्तिका- चंद्रकला. डोळ्यांची वेगळीच लकब, भुवई उडवत मानेची हालचाल करत बोलणं आणि खरं तर अतिच सुंदर गाण्यांवर केलेलं संध्याबाईंच नृत्य म्हणजे अजब रसायन होतं !

"गावात तमाशा लावायचा तर मास्तरांना इचारायला पाहज्ये".कुणीतरी सांगतं.

"अस्सं मग इचारु की"

मास्तर - एक आदर्श गाव नी त्या गावातला आदर्श तत्वनिष्ठ मास्तर- श्रीधर पंत. हा मास्तर म्हणजे डॉ.लागू.या श्रीधरपंतास डॉक्टरांनी आपल्या अभिनयाने चिरंतन भूमिकेत परावर्तित करून टाकले आहे. श्रीराम लागू यांनी रंगवलेल्या इतर अनेक मुख्य भूमिका जसे की सामना आणि सिंहासन मधल्या भूमिका आजही रसिकांच्या मनात विराजमान आहेत, मात्र 'पिंजरा'मधला मास्तर ही और बात होती ! याची सर दुसऱ्या भूमिकेला नाही !!तर हा सारा गाव आदर्श, तंटामुक्त, शिक्षित आणि सुसंकृत व्हावा ह्यासाठी झटणारे मास्तर आणि त्यांचा नुसता आदरच नाही तर त्यांच्यावर श्रद्धा - भक्ती असलेला गाव. आपली तत्वे जोपासत, गावाचे भले ह्यात नाही हे ओळखुन मास्तर तमाशाच्या फडाला अपमानित करुन गावाबाहेर हाकलुन लावतात. अपमानित झालेली चंद्रकला सुडाने पेटुन उठते. "नाय ह्या मास्तराला बोर्डावर तुणतुणं घेउन उभा केला तर नावाची चंद्रकला चंद्रावळीकर नाय मी" आणि इथुनच सुरुवात होते आदर्श, तत्वनिष्ठ, गावासाठी विभुती ठरलेल्या श्रीधर मास्तरांच्या अधःपतनाला.गावाबाहेर नदी पल्याड तमाशाचा फड उभारला जातो. खाणाखणा वाजणाऱ्या ढोलकीच्या थापेने अन छमछम आवाज करणाऱ्या नाजूक घुंगरांच्या तालावर नाचणाऱ्या चंद्रकलेच्या तालाने गाव बहकते. गावकरी खोटं बोलुन, लपुन छपुन तमाशाला जाऊ लागतात.

ही चंद्रकलेच्या विजयाची सुरुवात असते. म्हणुन ती म्हणते,

"अवं हे गाव लई न्यारं, हितं थंड गार वारं ह्याला गरम शिणगार सोसंना

ह्याचा आदर्शाचा तोरा, ह्याचा कागद हाय कोरा

हितं शाहिरी लेखणी पोचंना

हितं वरणभाताची गोडी रं, नको फुकट छेडाछेडी रं

अरं सोंगाढोंगाचा बाजार हिथला, साळसूद घालतोय्‌ अळीमिळी

अन्‌ सार वरपती, रसा भुरकती, घरात पोळी अन्‌ भायेर नळी रं, रं, रं..."मास्तरांना लोकांच्या या उद्योगाची अन चंद्राबाईच्या करामतीची कुणकुण लागते. ते गावकर्यां ना रंगेहाथ पकडण्यासाठी व चंद्रकलेला समज देण्यासाठी तिथे जातात. तेव्हाच मास्तर प्रवेश करतात एका पिंजर्याात. एका क्षणिक मोहाच्या क्षणी ते ढासळतात आणि मग कोसळतात आणि कोसळतच जातात. अगदी चंद्रकलेने म्हटल्याप्रमाणे जेव्हा बोर्डावर तुणतुणं घेउन उभा राहिलेला नशेतला मास्तर 'कशी नशिबानं थट्टा आज मांडली' म्हणतो तेव्हा काळजात तुटत जातं. आपल्या दुखावल्या पायाचं निमित्त करुन चंद्रकला त्यांना भुलवु पहातेय - तिचा उघडा पाय - त्या पायाकडे डोळे विस्फारुन बघणारे मास्तर - आणी तेव्हाच पिंजर्यालतील पोपटाकडे नेलेला कॅमेरा. अतिशय प्रतिकात्मक. जाण्यार्या मास्तरांना भुलवण्यासाठी थाम्बवण्यासाठी चंद्रकला म्हणते,

"लाडेलाडे अदबीनं तुम्हा विनवते बाई

पिरतिचा उघडला पिंजरा तुमच्यापायी

अशीच र्हाघवी रात साजणा

कधी न व्हावी सकाळ....."मास्तर बहकतात. आपल्या कार्याचा, मान मरतब्याचा, संस्काराचा त्यांना विसर पडतो. आदर्श शिक्षक गावासाठी देव असलेल्या मास्तरांचे अस्तित्व एका नाचणारया नर्तिके पायी पतित होते. कलंकीत होते. नितिमुल्ये हरवलेला, वैफल्यग्रस्त मास्तर तमाशात तुणतुणं घेउन उभा रहातो.

"माझ्या काळजाची तार आज छेडली

कशी नशिबानं थट्टा आज मांडली.....

खुळ्या जीव कळला नाही खोटा तिचा खेळ

तपोभंग झाला त्याचा पुरा जाई तोल

त्याला कुत्र्या मांजराची दशा आणली

कशी नशिबाने थट्टा आज मांडली....."इथे आठवतात ते एक निळु फुले. मास्तरांना कुत्र्याच्या पंगतीत बसून जेवायला देण्याचा सीन. निळू फुलेंनी त्या भुमिकेचं सोनं केलं.चंद्रकलेचा सुड पुर्ण झाला अस वाटत असतांना जाणीव होते ती तिच्या प्रेमाची. मास्तरांची अवस्था बघुन आपल्याबरोबर तिच्याही काळजात काहीतरी तुटतं. तिला एका सज्जन तत्वनिष्ठ माणसाला आयुष्यातुन उठवल्याची बोचणी लागल्याचे स्पष्ट कळते. ती त्यांच्यावर प्रेम करु लागते. त्यांच्या सारख्या देव माणसाच्या पतनाला आपणच कारणीभुत आहोत याची तिला जाणीव असते.इकडे गावासाठी मास्तर मरुन गेलेले असतात. त्यांचा खुन करणारा फरारी असतो. गावकर्यां नी त्या देवमाणसाचा पुतळा उभारलेला असतो. आपलाच जिवंतपणी उभारलेला पुतळा पाहुन मास्तर शरमिंदा होतात. तेव्हा आठवतं"अशा गावी होता एक भोळा भाग्यवंत

पुण्यवान म्हणे त्याला कुणी म्हणे संत

त्याला एका मेनकेची दृष्ट लागली

कशी नशिबाने थट्टा आज मांडली...."

आणि शेवटी नियतीचा तमाशा कसा ते ह्या चित्रपटात कळते. मास्तरांना स्वत:च्या खुनाच्या गुन्ह्याखाली अटक होते. खटला चालु होतो. ह्या भोळ्या सज्जन माणसावर ही वेळ आपल्यामुळे आलीये ह्याची चंद्रकलेला जाणीव असते. ती तमाशा, ते आयुष्य सोडुन मास्तरांसोबत निघते. खटला चालु असतांना ती ' हेच मास्तर आहेत' असं सांगण्याचा प्रयत्न करते पण तिची वाचा जाते. मास्तरांना त्यांच्याच खुनाच्या आरोपात फाशीची शिक्षा होते. हे ऐकुन बाहेर असलेली चंद्रकला जीव सोडते.मन विषण्ण करणारा अनुभव देऊन चित्रपट संपतो आणि जड पावलाने प्रेक्षक चित्रपटगृहाबाहेर पडतात. डोक्याला झिंग आणणाऱ्या गाण्यांची नशा चित्रपटाच्या शेवटच्या तासात पार उतरते आणि आचार - विचार आणि वर्तन यांची स्वैराचाराशी असणारी परंपरागत लढाई सर्वांच्याच मनात सुरु होते हे याचित्रपटाचे घवघवीत यश ! विचारमुल्ये आणि संदेश घेऊन आलेला हा सिनेमा अनेक समीक्षकांनी तमाशापट म्हणून उल्लेखला आहे याची खंत इथे नमूद करावीशी वाटते. मराठी सिनेमाचा इतिहास कधीही कुणीही लिहिला तरी त्यात 'पिंजरा'ला अढळस्थान असणार आहे हे निश्चित ....चित्रतपस्वी व्ही. शांताराम यांचा 'पिंजरा' हा मराठीतला पहिला रंगीत सिनेमा होता.

पिंजरा’ ... त्यो कुनाला चुकलाय ?

अवो मानसाचं घर तरी काय असतं?

त्योबी एक पिंजराच की!

हे तत्वज्ञान आपल्या रांगड्या भाषेत सांगणारी तमाशातील एक नर्तकी आणि

व्यक्ती मेली तरी चालेल पण समाजापुढील आदर्श जिवंत राहिले पाहिजेत

या महान तत्वावर श्रद्धा असलेला एक माणूस या दोघांच्या संघर्षाची हृदयस्पर्शी कथा म्हणजे...पिंजरा.

१९३० सालच्या 'द ब्लू एंजल' या जर्मन सिनेमावर आधारित 'पिंजरा'ने सिनेमाने रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. 'पिंजरा'ने तिकीटबारीवर छप्परफाड यश मिळवले होते आणि त्यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार पटकावला होता. सत्तरच्या दशकात आलेल्या व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या या सुंदर कलाकृतीचा जादू आता पुन्हा एकदा सिनेरसिकांना अनुभवता येणार आहे.आली ठुमकत नार लचकत... छबीदार छबी मी तोऱ्यात उभी... दिसला गं बाई दिसला... तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंगमहाल... कशी नशीबानं थट्टा आज मांडली... यांसारख्या सदाबहार गीतांनी पिंंजराचित्रपटाच्या शिरपेचात मोरपंख रोवला गेला अन् तो सिनेमा सुवर्णाक्षरांनी मराठी चित्रपटसृष्टीत अजरामर होऊन गेला. तत्त्वनिष्ठ व ब्रह्मचारी शिक्षकाची केवळ एका नर्तकीच्या क्षणिक मोहाच्या पिंजऱ्यात अडकून झालेल्या आत्मिक व सामाजिक अध:पतनाची ही कथा पाहताना अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत. श्रीराम लागू यांनी त्यांच्या कसदार अभिनयशैलीच्या जोरावर जो मास्तर पिंजरामध्ये साकारलाय त्याला कोणाचीच तोड नाही, तर संध्या यांनी केलेली नर्तकीची भूमिका आणि त्यांच्या नृत्याच्या अदांनी तर प्रेक्षकांना घायाळ केले होते.


डॉ. श्रीराम लागू, संध्या, निळू फुले यांच्या जबरदस्त अदाकारीने नटलेला हा सिनेमा ३१ मार्च १९७२ रोजी रिलीज झाला होता. आता तब्बल ४४ वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर नव्या अंदाजात बघण्याची संधी सिनेरसिकांना मिळाली आहे.पुरुषोत्तम लढ्ढा आणि सौ चंद्रसेना पाटील यांच्या पुष्पक प्रियदर्शनी फिल्म्सने व्ही. शांताराम प्रॉडक्शनकडून किरण शांताराम यांच्या सहकार्याने वितरणाचे हक्क घेत प्रसाद लॅबमध्ये या चित्रपटाच्या ओरिजिनल प्रिंटवर प्रक्रिया करत तिचे २ के स्कॅनिंग करत नवी अद्यावत प्रिंट तयार केली. हॅंड क्लिनिंग, अल्ट्रासॉनिक क्लिनिंग, २ के स्कॅनिंग, ऑडिओ ग्रॅबिंग, कलर ग्रेडिंग, ऑडिओ रीस्ट्रोरेशन या नानविध तांत्रिक प्रक्रिया करून या अभिजात कलाकृतीला आधुनिकतेचा नवा साज चढवला आहे.१८ मार्च रोजी हा सिनेमा नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.'पिंजरा' ही एका तत्वनिष्ठ व ब्रम्हचारी शिक्षकाची केवळ एका वारांगनेच्या क्षणीक मोहाच्या पिंजऱ्यात अडकून झालेल्या त्याच्या नैतीक, आत्मीक व सामाजीक अध:पतनाची कथा आहे.मराठीतला 'पिंजरा' सुपरडुपर हिट झाला तर त्याच वर्षी हिंदी फिल्म इंडस्ट्रीत याच नावाच्या, याच कलाकारांच्या संचातल्या, याच कथानकावरच्या सिनेमाने तिकीटबारीवर पाणी देखील मागितले नाही इतकी त्याची फरफट झाली होती !पिंजरामध्ये असणाऱ्या सर्व ९ गाण्यांची कोरिओग्राफी अभिनेत्री संध्या यांनीच केली होती आणि चित्रिकरणापूर्वी सगळ्या गाण्यांची आठ दिवस रिहर्सल घेतली जायची. 'पिंजरा'मध्ये चंद्रकला चंद्रावळीकर हे तमाशा नर्तिकेचे पात्र साकारणाऱ्या संध्या ह्या व्ही. शांताराम यांच्या तिसरया पत्नी होत्या.या सिनेमाने कोरसमधील संध्यांच्या मागे नृत्य करणाऱ्या उषा नाईक आणि माया जाधव यांचे आयुष्य बदलून टाकले यावरून या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत किती कल्लोळ माजवला असेल याची कल्पना येते. 'पिंजरा'मधल्या 'मला लागली कुणाची उचकी...' या गाण्याच्या चित्रिकरणा दम्यान तेंव्हा एकवीस वर्षाच्या असणाऱ्या माया जाधव लोबीपीमुळे भोवळ येऊन खाली पडल्या. चीत्राकरण थांबले काहींनी दुसरी कोडान्सर घेऊन गाणं पूर्ण कारण्याचा सल्ला शांताराम यांना दिला पण त्यांनी कुणाचेही ऐकले नाही. माया जाधव यांना बरे वाटू लागल्यावरच दोन-तीन दिवसांनी त्यांच्यासह गाण्याचे चित्रीकरण पूर्ण केले.
 

'पिंजरा'मध्ये संध्या यांच्या आईची भूमिका त्यांच्या सख्ख्या मोठ्या भगिनी वत्सला देशमुख यांनी केली होती, आजमितीस त्यांचे वय ८७ आहे ! सुप्रसिद्ध अभिनेत्री रंजना या वत्सला देशमुख यांच्या कन्या होत. रंजनाला मराठी सिनेमात प्रथम संधी व्ही. शांताराम यांनीच दिली होती. 'पिंजरा'ची कास्टिंग होण्याआधी मास्तरांच्या भूमिकेतील अभिनेत्याच्या नावावर व्ही. शांताराम यांच्या मनात एकमत होत नव्हते. त्या काळात रंगभूमीवर डॉक्टर लागूंच्या 'नटसम्राट'चे प्रयोग सुरु होते, एका प्रयोगाला वत्सला देशमुख यांनी हजेरी लावली अन त्यांनी व्ही. शांताराम यांना मास्तरांची भूमिका डॉक्टर श्रीराम लागू यांना द्यावी म्हणून गळ घातली. मात्र डॉ.लागू यांना मात्र आपण ह्या भूमिकेला चपखल आहोत की नाही अन ही भूमिका आपल्याला योग्य पद्धतीने जमेल की नाही याची शंका होती.मात्र डॉ. लागूंनी वठवलेला मास्तर अजरामर होऊन गेला!व्ही. शांताराम यांना सिनेमातील गाणी आणि कथा यावर चित्रपट तारून न्यायचा होता, गाण्यांची लांबी आणि संख्या पाहता त्यांनी राम कदमांना प्रत्येक गाण्याच्या अनेक चाली बनवायला सांगितल्या होत्या अन राम कदमांनीही नऊ गाण्यांसाठी शंभरएक चाली तयार केल्या होत्या ! 'पिंजरा'ची कथा कल्पना अनंत माने यांनी लिहिली होती अन ठसकेबाज संवाद शंकर पाटील यांनी लिहिले होते..
डॉ. श्रीराम लागू 'पिंजरा' बद्दल सांगतात की, "सिनेमाच्या शीर्षकाला, या नावालाच माझा विरोध होता. शूटिंग सुरू झाल्यानंतर समजले, की हा पिंजरा काही लोखंडाचा नाही, तर माणसाच्या जाणिवेचा आहे अन् यात माणूस अगदी उत्कृष्टपणे सापडू शकतो. व्ही. शांताराम यांनी माझ्यातील नट जागा केला आणि माझ्याकडून उत्तम काम करून घेतलं. या माणसाबरोबर मला पहिला चित्रपट करायला मिळाला, हे मी माझे भाग्य समजतो. असेच व्ही. शांताराम चित्रपटसृष्टीला लाभो अन् चित्रपटाची यशस्वी वाटचाल सुरू राहो. जोपर्यंत अशी माणसे मराठी चित्रपटसृष्टीला मिळतील तोपर्यंत मराठी सिनेमाला मरण नाही. मी मोजक्याच लोकांच्या चरणी माझे डोके टेकवले आहे त्यापैकी एक व्ही. शांताराम होते, ज्यांनी माझ्यातला अभिनेता सशक्त व समृद्ध केला !" डॉ. लागू यांच्यासारख्या महान दिग्गज कलाकाराच्या या विधानावरून व्ही. शांताराम यांच्या प्रतिभेची आणि 'पिंजरा'च्या समृद्धतेची जाणीव व्हावी !आजच्या तरुण पिढीचे सरासरी वय सोळा ते अठ्ठावीस धरले तर त्यांच्या पालकांचे आजचे सरासरी वय अदमासे पन्नास ते साठच्या दरम्यान येते ! या तरुण पिढीच्या बापजाद्यांच्या तारुण्य काळात तुफान गाजलेला, त्यांनी शिट्या वाजवत पाहिलेला आणि मंत्रमुग्ध होऊन डोळ्यात साठवलेला हा सिनेमा मागच्या १८ मार्चला रुपेरी पडदयावर पुन्हा दाखल झाला होता, तोही फुल्ली मॉडर्न टेक्निक्ससह ! या सिनेमातली गाणी आजही ठेका धरायला लावतात हे याचे वैशिष्ट्य !ज्वानीच्या आगीची मशाल हाती, आले मी अवसंच्या भयाण राती.

काजवा उडं, किरकिर किडं, रानात सुरात गाती

दिलाचा दिलवर, जिवाचा जिवलग

कुठं दिसंना मला, ग बाई बाई, कुठं दिसंना मला

कुठं दिसंना, इथं दिसंना, तिथं दिसंना

शोधु कुठं, शोधु कुठं, शोधु कुठं ?

या ओळी जरी गुणगुणल्या तरी माणूस आपोआप पुढची ओळ 'दिसला गं बाई दिसला ही गुणगुणतोच ! खरेतर जगदिश खेबुडकरांनी किडं, अवस, दिलवर, भयाण, किरकिर, काजवा असे अनेकविध गदय शब्द इथे गाण्यात इतके बेमालूम वापरले आहेत की गाण्यांना चित्रमयशैली प्राप्त होते. यातली गाणी ऐकताना चित्रपटातली दृश्ये डोळ्यासमोर तरळत राहतात याचे फार मोठे श्रेय या अप्रतिम शब्दरचनांना आहे !तेंव्हा डॉल्बीचा दणदणाट नव्हता, स्पष्ट आवाजाच्या अद्ययावत स्टिरीओफोनिक साऊंड सिस्टिम्स नव्हत्या, गावोगावी लाऊडस्पिकरचे कर्णे (भोंगे) लावलेले असत अन त्यावरच्या घरघरत्या आवाजात ही अवीट गोडीची गाणी कान लावून ऐकली जात ! लोक माना डोलवत असत अन त्यांचा ठेका नकळत सुरु होई ! अगदी मंतरलेले दिवस होते ते ! माझ्या मनावरचे 'पिंजरा'चे ते गारुड आजही कायम आहे...आजही तो चित्रपट जसाच्या तसा डोळ्यापुढे तरळतो..नव्या पिढीने जुन्या मराठी सिनेमातला 'माईलस्टोन मुव्ही' कसा होता हे पाहण्यासाठी, सत्तरच्या दशकातील सामाजिक वातावरण अनुभवण्यासाठी व दिग्गज मराठी अभिनेत्यांचा सरस अभिनय बघण्यासाठी 'पिंजरा' जरूर बघावा अन आपल्या सोनेरी आठवणी जागवायच्या असतील तर जुन्या पिढीला 'पिंजरा' शब्दच पुरेसा आहे ....- समीर गायकवाड.